संजय राऊत : 'कंगना रणावतची महाराष्ट्रविरोधी चिवचिव भाजपच्या पाठिंब्याने'

संजय राऊत, शिवसेना
फोटो कॅप्शन, संजय राऊत

"राजकीय पाठबळाशिवाय कुणी एवढी हिंमत करत नाही. महाराष्ट्राच्या विरोधात ही जी चिवचिव, कावकाव, चमचेगिरी चालतेय, त्याला कायमच दिल्लीचा पाठिंबा आहे," असं शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी कंगना राणावत प्रकरणावर बोलताना म्हटलंय.

खासदार संजय राऊत यांनी बीबीसी मराठीला विशेष मुलाखत दिली आणि कंगना राणावतकडून ट्विटरवरून होणाऱ्या सतताच्या टीकेला उत्तरं दिली. त्याचसोबत संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनाही खडे बोल सुनावले.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

संजय राऊत यांची मुलाखत:

प्रश्न - कंगना राणावतनं आव्हान दिलंय की, 9 सप्टेंबरला मी मुंबईत येतेय, काय करायचं ते करा. शिवसेना नेमकं काय करणार आहे? शिवसेनेनं काही ठरवलंय का?

संजय राऊत - जर ठरवल असेल, तर ठरवलेल्या गोष्टी अशा समोरून सांगायच्या असतात का? पाहू काय करायचं ते. या लोकांशी आमचं व्यक्तिगत भांडण नाही. फार लहान माणसं आहेत. मुंबई त्यांना पोसते. मुंबई त्यांना देते. मुंबई नसती, मुंबईचे पोलीस नसते, मुंबईचा उद्योग नसता, तर हे इथे कशाकरता आले असते?

त्यामुळे त्यांनी मुंबईचे ऋण मान्य केले पाहिजे. सगळ्यांनीच, अगदी आमच्यासारख्यांनी सुद्धा. मुंबई महाराष्ट्राकडे आहे, ती आपल्या लोकांनी मिळवली. त्यासाठी बलिदान दिलं. त्यामुळे लाखो मराठी लोकांना इथे राहता येतं, रोजगार मिळतोय, विविध प्रकारचे उद्योग आम्ही करतो. कुणी उठायचं आणि मुंबईवर थुंकायचं आणि तेही इथलंच खाऊन, तर त्यासंदर्भात आम्ही बोललो.

संजय राऊत, शिवसेना

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, संजय राऊत

प्रश्न - इतकी लहान माणसं असतील, तरी तुम्ही वारंवार त्यावर बोललात, अगदी तुम्ही अपशब्दही वापरलात. त्याचा अर्थ काय घ्यायचा?

संजय राऊत - तुम्ही त्या शब्दाचा शब्दकोशातून अर्थ काढा. तुम्ही शोधा. हे महाराष्ट्राला दुषणं देणारे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? आचार्य अत्रेंच्या काळापासून अशा हरामखोर लोकांना, जे महाराष्ट्रात येऊन आमच्याशी गद्दारी करतात, त्यांना आचार्य अत्रेंनी हरामखोरच म्हटलंय, बाळासाहेबांनी हरामखोरच म्हटलंय.

प्रश्न - पण हे योग्य आहे का, कारण तुमच्या राजकीय भूमिका वेगळ्या असू शकतात, पण महिलेला असा शब्द वापरण योग्य आहे का?

संजय राऊत - इथे महिला आणि पुरुष या विषयाचा संबंधच काय? बाकीचं महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार, हक्क, स्वातंत्र्य हवं असतं ना, मग एखादा पुरुषानं मुंबईवर दारू, ड्रग्जच्या गुळण्या टाकल्या, तर त्याला आम्ही जोड्यानं मारायचं आणि एखाद्या महिलेनं तेच वक्तव्य केलं, तर..? महिलांचा सन्मान करण्याचं आम्हाला शिकवू नका.

प्रश्न - समान हक्कांचं म्हणजे अपशब्द सुद्धा समान झेलायचे, असा त्याचा अर्थ होतो?

संजय राऊत - मी कुठे अपशब्द वापरले? बेईमान या शब्दाचा दुसरा अर्थ हरामखोर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हरामजादा ही शिवी आहे. हरामखोर या शब्दाला मराठी भाषेत शिवी म्हणत नाही.

प्रश्न - म्हणजे, तुम्ही म्हणालात ते बरोबरच आहे?

संजय राऊत - खाल्ल्या अन्नाला न जागणारी लोकं असतात, त्यांना आपल्याकडे बेईमान म्हणतात.

संजय राऊत, शिवसेना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवसेनेचे खासदार संजय राऊत

प्रश्न - इंडियन एक्स्प्रेसनं या शब्दाच्या अनुषंगाने शिवसेनेला 'स्त्री-द्वेषी' (Misogynist) असा शब्द वापरलाय. कंगनाला वापरलेला तो शब्द उच्चारण्याबद्दल तुमची भूमिका अजूनही कायम आहे?

संजय राऊत - कधी कुठल्या महिलेचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यांना काय माहीत आहे शिवसेनेविषयी, आमच्या भूमिकांविषयी? कुठेतरी लांब दिल्लीत बसायचं आणि आमच्यावर लिहायचं, तुम्हाला काय माहीत आहे?

हे चॅनेलचे काही लोक भुंकत असतात, त्यांना काय शिवसेना माहीत आहे? काय बाळासाहेब माहीत आहेत? पन्नास-साठ वर्षांत आम्ही काय काम केलंय, हे त्यांना काय माहीत आहे? सांगावं त्यांनी. आम्हाला का अक्कल शिकवतायेत?

प्रश्न - एकीकडे तुम्ही म्हणता, लहान माणसांच्या तोंडी लागण्याची गरज नाही, दुसरीकडे विधानसभेत हक्कभंग आणला गेलाय.

संजय राऊत - महाराष्ट्राची 285 आमदारांची विधानसभा मुर्ख आहे का? त्यांनी हक्कभंग आणला. मी बोलतोय ते चुकीचं, पण बाहेरील एक व्यक्ती महाराष्ट्राविषयी, मुंबईविषयी, मुंबई पोलीस माफिया असं बोलण्याला तुम्ही माध्यम म्हणून समर्थन करत आहात का?

प्रश्न - काँग्रेसचं म्हणणं असंय की, याच्या मागील बोलवता धनी वेगळा आहे, तुमचंही म्हणणं तसंच आहे का?

संजय राऊत - राजकीय पाठबळाशिवाय कुणी एवढी हिंमत करत नाही. महाराष्ट्राच्या विरोधात ही जी चिवचिव, कावकाव, चमचेगिरी चालतेय, त्याला कायमच दिल्लीचा पाठिंबा आहे. दिल्लीमध्ये मुंबईविषयी सुप्त राग आहे, द्वेष आहे की, मुंबई आम्हाला मिळाली नाही, स्वतंत्र झाली नाही. मुंबईतल्या पैशावर डोळा आहे, उद्योग बंद करणे वगैरे. आता हेच पाहा ना, मुंबईतले उद्योग कसे 'एका' राज्यात जातायेत. मुंबईचं महत्त्वं कमी करायचं.

प्रश्न - या सगळ्याचा बोलवता धनी कोण आहे?

संजय राऊत - आधी काँग्रेस होती दिल्लीत, आम्ही काँग्रेसवर टीका करायचो. आता इथले उद्योग उचलून कुठे नेत आहेत? सुरत, अहमदाबादला नेत आहेत. गुजरात आमचंच आहे. गुजरात आणि महाराष्ट्र आम्ही कधीच वेगळं मानलं नाहीत. गुजराती लोकांना आम्ही भावंडंच समजतो. कारण एकच राज्य होतं. मुंबईमध्ये गुजराती आहेच. बाळासाहेब ठाकरे सांगायचे, तुमची लक्ष्मी आणि आमची सरस्वती, या दोघांनी हातात हात घालून काम केलं, तर आपण देशावर राज्य करू.

प्रश्न - बोलवता धनी कोण आहे?

संजय राऊत - या सगळ्या प्रकरणात कंगना राणावत वगैरे लोकांचं समर्थन कोण करतंय? आम्ही नाही करत. भारतीय जनता पक्ष समर्थन करतोय. का करतोय? खरंतर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मागे कुठल्याच राजकीय नेत्यांने राहू नये. भाजपनं समजून घेतलं पाहिजे. तेही कालचे राज्यकर्ते होते. इथे जर भाजपचं राज्य असतं, तर चित्र वेगळं दिसलं असतं. एखाद्या चॅनेलवर नरेंद्र मोदी साहेबांवर, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एकेरी उल्लेखात कुणी काही बोलले असते, तर तुरुंगात गेले असते. इतर राज्यात तसं झालंय. उत्तर प्रदेशात बघा. योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात कुणी कार्टून काढलं, कुणी लिहिलं, तर तुरुंगात गेलेत. महाराष्ट्रात तशी परंपरा नाही. आम्ही संयमाने वागतो, काटेकोरपणे वागतो, कायद्याचं पालन करतो, त्याचा गैरफायदा हे लोक घेत आहेत.

प्रश्न - शिवसेना पुढे काय करणार?

संजय राऊत - तुम्हाला असं वाटत नाही का, की तुम्ही वारंवार शिवसेनेला प्रश्न विचारताय. मुंबई शिवसेनेच्या मालकीची नाहीय, ती महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षाची मुंबई आहे. म्हणून तर विधानसभेतील प्रस्तावावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप असे सगळे एकत्र आहेत. म्हणून तर यासंदर्भात सर्वांत आक्रमक भूमिका कुणी घेतली? अनिल देशमुखांनी काही गोष्टी ठामपणे सांगितल्या. मुंबईचा अपमान करणाऱ्याला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असं राज्याचे गृहमंत्री म्हणाले. यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सचिन सावंत या तिघांनीही ठामपणे सांगितलं, मुंबईविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा. कारण हा विषय राज्याचा आहे, एखाद्या पक्षाचा आहे?

संजय राऊत, शिवसेना

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, संजय राऊत

प्रश्न - हा राज्याचा प्रश्न झालाय, पण दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 23 हजाराचा टप्पा गाठतेय, पुण्यात बिकट स्थिती आहे, असं असताना असे वाद होतात, हे चित्र काय सांगतं?

संजय राऊत - या वादात सरकारने कारवाई करून पुढे जायला हवं. पण सरकारला कारवाई करूच द्यायची नाही. विरोधी पक्षाने हा विषय ताणलेला आहे. एका तपासासाठी सीबीआय आलं, तर इथले राजकीय पक्ष त्याचं समर्थन कसं काय करू शकतात? महाराष्ट्राच्या अधिकारावर केंद्राचे लोक अतिक्रमण करत आहेत. बिहारचे पोलीस इकडे येतात. आम्ही त्यांना रोखायचा प्रयत्न करतो आणि इकडचा विरोधी पक्ष, मराठी नेते आहेत, ते आमच्याविरोधात उभे राहतात? ही कसली मराठी अस्मिता?

प्रश्न - या सगळ्यात मूळ प्रश्न बाजूला राहिले, हे चुकीचं झालं का?

संजय राऊत - महाराष्ट्रात असंख्य प्रश्न आहेत, पूरपरिस्थिती आहे, अनेक जिल्ह्यात कोरोनाचं संक्रमण वाढतंय, इतर अनेक जीवन-मरणाचे प्रश्न होते. पण विरोधी पक्षाने हे प्रश्न उचलले.

प्रश्न - पण तुम्ही पण याच वादांवर बोलत होतात...

संजय राऊत - आमच्यावर लादलं गेलंय. महाराष्ट्राच्या अपमानाच्या प्रश्नी विरोधी पक्ष सरकारसोबत असायला हवं होतं, मग हे प्रकरण दहा मिनिटात पुढे गेलं असतं. महाराष्ट्राचा ज्यावेळी अपमान होतो, तेव्हा विरोधी पक्ष आणि इतर पक्ष वेगळे असू शकत नाहीत. आम्ही सगळे या मातीची लेकरं आहोत, दुर्दैवानं विरोधी पक्ष वेगळी भूमिका घेतोय, जी महाराष्ट्राच्या हिताची नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)