'आमिर खानला चीन, तुर्कस्तानसारखे भारताचे शत्रू अधिक प्रिय,' संघाची टीका

आमिर खान, तुर्कस्तान

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, आमिर खान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या पांचजन्यने चित्रपट अभिनेता आमिर खानच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा लेख लिहिला आहे. यात आमीर खानच्या चीन प्रेमाचाही उल्लेख आहे.

पांचजन्यने आपल्या कव्हर स्टोरीमध्ये बॉलीवुडमधल्या काही अभिनेत्यांना राष्ट्रभक्त म्हटलं आहे. तर आमिर खानसारख्या काही अभिनेत्यांच्या गेल्या काही काळातल्या 'कृतींवरून' त्यांच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या लेखात लिहिलं आहे, "एकीकडे अक्षय कुमार, अजय देवगण, जॉन अब्राहम आणि कंगणा राणावतसह काही स्टार्स आणि फिल्ममेकर आहेत जे राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्तीपर चित्रपट तयार करणं किंवा त्यात भूमिका साकारून देशाप्रती आपली निष्ठा दाखवत आहेत.

तर दुसरीकडे आमिर खानसारखे नट आहेत ज्यांना भारताच्या शत्रू राष्ट्रांशी मैत्री वाढवण्यात काहीच गैर वाटत नाही. मग तो विश्वासघातकी चीन असो किंवा मग पाकिस्तानशी हातमिळवणी करून भारतविरोधात जिहादी इरादे ठेवणारा तुर्कस्तान असो, जिथे आजकाल आमिर खानने तंबू ठोकला आहे," असं पांचजन्यने म्हटलं आहे.

पांचजन्यचे संपादक हितेश शंकर यांनी 'द हिंदू' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की आमिर खानने 'लगान', 'सरफरोश', '1857 : द रायजिंग' यासारखे चित्रपट बनवले आहेत. मात्र, सध्या ते जे काही करत आहेत ते राष्ट्रवादाच्या श्रेणीत येत नाहीत.

आमिर खान, तुर्कस्तान

फोटो स्रोत, @EMINEERDOGAN

फोटो कॅप्शन, आमिर खान

हितेश शंकर म्हणतात, "आमिर खान यांनी तुर्कीचे अध्यक्ष अर्दोआन यांच्या पत्नीची भेट घेतल्याने भारतात भावनांना धक्का बसला आहे. अर्दोआन सरकारने जम्मू-काश्मीर मुद्द्यावर भारताच्या कायदेशीर पावलांचा विरोध केला आहे."

ते पुढे म्हणाले, "आम्हाला हेसुद्धा जाणून घ्यायचं होतं की चीनमध्ये आमिर खान इतर बॉलीवुड अभिनेत्यांपेक्षा अधिक लोकप्रिय का आहेत? 'सुल्तान' (सलमान खानचा चित्रपट) चित्रपटाच्या तुलनेत चीनमध्ये 'दंगल' चित्रपट अधिक चालला. खरंतर दोन्ही चित्रपटांचा विषय जवळपास सारखाच होता. आमिर खान काही विशेष चीनी ब्रँडची जाहिरात करतात आणि चीनमध्ये सरकारने प्रमोट केल्याशिवाय कुणी काहीही करू शकत नाही."

पांचजन्यमध्ये छापून आलेल्या या लेखाचं शीर्षक आहे - 'ड्रॅगनचा प्रिय खान'

या लेखातही म्हटलं आहे, "चीनप्रती खान यांचे प्रेम पूर्वीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात आहे. अशा परिस्थितीत तुर्कीच्या त्यांच्या दौऱ्यातून काय संदेश मिळतो. हे काही लपून नाही."

आमिर खान, तुर्कस्तान

फोटो स्रोत, PANCHJANYA

फोटो कॅप्शन, पांचजन्यमधील उतारा

लेखात काही वर्षांपूर्वी एका पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान आमिर खान यांनी केलेल्या एका वक्तव्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. देशात असहिष्णुता वाढत असल्याचं ते त्यावेळी म्हणाले होते.

त्यावेळी आमिर खान म्हणाले होते, "माझी पत्नी किरण राव हिला भारतात भीती वाटते. भारतात असहिष्णुता वाढली आहे."

त्यावेळीसुद्धा संघ परिवाराशी संबंधित काही संघटनांनी हे वक्तव्य राजकारणाने प्रेरित असल्याचं म्हटलं होतं.

या लेखात आमिर खानवर निशाणा साधत म्हटलं आहे, "भारतात लोक जेव्हा एखाद्या सिनेअभिनेत्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतात, त्याच्या चित्रपटांवर खूप पैसा उडवतात, त्यावेळी ते त्याच्या धर्माचे नाही तर त्याच्या अभिनयाचे प्रशंसक असतात. मात्र, तीच व्यक्ती जेव्हा देशवासियांच्या भावनांना अंगठा दाखवत त्यांच्या प्रेमाच्या बदल्यात आधी धर्म आणि मग देशाची जिहादी विचारधारा दाखवत असेल, शत्रू राष्ट्राच्या मूठभर पैशांसाठी कळसूत्री बाहुल्याप्रमाणे चालत असेल किंवा शत्रू राष्ट्राचं आदरातिथ्य निर्लज्जपणे स्वीकारत असेल तर अशा परिस्थितीत देशबांधवांना फसवलं गेल्याची भावना वाटणार नाही का?"

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)