UPSC: मास्क आणि फेसशिल्डविना मुलाखत देत नेहाने मिळवली 15वी रँक

नेहा भोसले, UPSC

फोटो स्रोत, Neha Bhosale

फोटो कॅप्शन, नेहा भोसले
    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल गेल्या आठवड्यात लागला. हा निकाल लागला की यशवंत विद्यार्थ्यांच्या प्रैरणादायी कथा विविध माध्यमांवर येतात.

गेल्या काही वर्षांपासून मुलींनीही या स्पर्धेत आघाडी घेतली आहे. देशाच्या विविध भागातून वेगवेगळ्या परिस्थितीशी संघर्ष करत मुली यश मिळवत आहेत. यावर्षीही निवड झालेल्या 829 उमेदवारांपैकी 197 मुली आहेत.

काश्मीरमधून यावर्षी 13 मुलींनी अंतिम यादीत स्थान मिळवलं आहे. तर तामिळनाडूतून एक दृष्टिहीन मुलीने अंतिम यादीत स्थान मिळवलं आहे.

महाराष्ट्रातून मुलींनी नेत्रदीपक यश मिळवण्याची परंपरा यावर्षीही कायम आहे. यावर्षी मुंबईची नेहा भोसले राज्यातून पहिली आली आहे. तिने या परीक्षेत 15 वा आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. हे स्पृहणीय यश तिने कसं मिळवलं याबद्दल बीबीसी मराठीने तिच्याशी संवाद साधला.

नेहा मुळची मुंबईची. तिचं शिक्षण मुंबईतच झालं. त्यानंतर तिने IIIM लखनौ मधून MBA केलं. MBA नंतर मी एका खासगी कंपनीत तीन वर्ष काम केलं, तिथे काम करताना तिला परीक्षा द्यावी असं वाटलं मात्र काम करताना तेवढा वेळ मिळत नव्हता. मग 2017 ला नोकरी सोडून नेहाने पूर्णवेळ अभ्यासाला सुरुवात केली.

याबद्दल बोलताना नेहा सांगते, "मी खरंतर द्विधा मन:स्थिती मध्ये होती. माझं प्रेरणास्थान इंद्रा नुयी होत्या. त्यांनी IIM मधून MBA केल्यावर पुन्हा अमेरिकेत जाऊनही MBA केलं. तसंच मलाही करायचं होतं. MBA केल्यानंतर माझ्या एक दोन मित्रांनी या नागरी सेवा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली होती. त्यांनी मला सांगितलं की तू ही देऊन पहा.

त्याचवेळी मी GMAT ही दिली होती. त्याचा स्कोरही चांगला होता. त्याआधी एकदा तरी देऊन बघावा अशी इच्छा होती. माझ्या मित्रमैत्रिणींनीही मला प्रोत्साहन दिलं. पहिल्या प्रयत्नानंतर मला असं वाटलं की मी हे करू शकते आणि मग दुसऱ्यांदा प्रयत्न केला आणि मी पास झाले."

क्लासेसचा फायदा

नेहाने दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलं. तिचा समाजशास्त्र विषय होता. तिने दिल्लीतले सगळे क्लासेस ऑनलाईन पद्धतीने केले. या क्लासेसचा यशात मोठा वाटा असल्याचं ती सांगते.

नेहा भोसले, UPSC

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, UPSC

"मी मुख्यत: ऑनलाईन क्लास केले होते. त्यांचे लेक्चर्स, टेस्ट, मी काढलेल्या नोट्स यावर मी जास्त भर दिला, उत्तरं लिहिणं. मी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यात फारसा फरक केलाच नाही. पूर्वपरीक्षेच्या दोन महिने आधी मी फक्त तोच अभ्यास केला. मर्यादित स्रोतांचा वापर केला."

मुलाखतीचं आव्हान

कोरोनामुळे यावेळी नागरी सेवा परीक्षेचे वेळापत्रकही कोलमडलं. नेहाची मुलाखत 20 जुलैला झाली. त्याविषयी बोलताना ती म्हणते, "माझा इंटरव्ह्यू कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर झाला. 20 जुलैला माझी मुलाखत झाली. यावर्षी युपीएससीने उमेदवारांची सगळी सोय केली होती. कोरोना मुळे काही काळ मुलाखती थांबल्या. पुन्हा सुरूवात झाल्यानंतर माझी मुलाखतच पहिली होती. गंमत म्हणजे मी मास्क आणि फेस शिल्ड काढून मुलाखत दिली. काही लोकांनी तो घालूनच मुलाखत दिल्याचं नंतर माझ्या कानावर आलं. मुलाखत ही नागरी सेवा आणि इतर गोष्टींच्या आसपासच्या विषयांवरच होती."

नेहा भोसले, UPSC

फोटो स्रोत, Neha Bhosale

फोटो कॅप्शन, नेहा भोसले

नियोजनबद्ध अभ्यास, अविरत कष्ट आणि आत्मविश्वास या बळावर तिने हे यश मिळवल्याचं तिच्याशी बोलताना जाणवलं.

नेहाने काही महत्त्वाच्या टीप्सही सांगितल्या

  • अनेकांना हे पटत नाही पण मला क्लासेस जास्त उपयोगी वाटले. जितके क्लासेस लावले त्याचा फायदा झाला. त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यांचं योग्य पालन केल्यामुळे मला बराच फायदा झाला. उत्तरं नीट तपासून घ्यावीत. जो फीडबॅक मिळतो त्यावर काम करायला हवं.
  • मुख्य परीक्षेत पेपर पूर्ण लिहिण्यावर भर द्यावा. आपण निवडलेल्या पर्यायी विषयाचा अभ्यास पूर्ण करावा, गेल्या काही वर्षांपासून विज्ञान विषयाच्या मुलांचा स्कोर जास्त येत आहे. त्यामुळे कला विषय थोडे मागे पडू शकतात. निबंध या विषयाचं व्यक्तिपरत्त्वे मत बदलत असतं. कारण एकाच निबंधाबद्ल अनेकांचे वेगवेगळे विचार असू शकतात.
  • मुलाखतीचे मार्क आल्याशिवाय मला त्याबद्दल सांगता येणार नाही. तसं पहायला गेलं तर मुलाखतही थोडी अनिश्चित असते. त्यामुळे मुख्य परीक्षेत जितके जास्त मार्क मिळतील तितकं चांगलं. मुख्य परीक्षेच्या कट ऑफ पेक्षा 70-80 मार्क जास्त मिळतील असा अभ्यास करावा.
  • पूर्व परीक्षेबाबत बोलायचं झालं तर माझा स्कोर फारसा तिथे झाला नाही. मी कायम कट ऑफच्या आसपासच होते. सारख्या परीक्षा देत रहाणे हा त्यावरचा उपाय होता. थोडे अंदाजपंचे लावावेच लागतात पण तेही योग्य पद्धतीने लावावेत. अन्यथा निगेटिव्ह मार्कामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
  • मी सोशल मीडियापासून अभ्यास सुरू केल्यापासून दूर झाले. तिथे अजिबात वेळ घालवला नाही. सरतेशेवटी युपीएससीशिवायही बाहेर जग आहे हे सगळ्यांनी विशेष ध्यानात घ्यायला हवं.

शिक्षण आणि स्त्री सबलीकरणात विशेष रस

नेहा आता सनदी सेवेत जाण्यास सज्ज झाली आहे. तिला IAS मध्ये जायचं आहे. सध्याचं प्रशासन हे वेगवान आहे. तिथे पटापट निर्णय घेण्याची गरज आहे. सनदी सेवा आता प्रचंड उत्तरदायी झाली आहे.

ट्विटर, फेसबुकवर अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारतात त्यामुळे प्रशासक होणं अधिक आव्हानात्मक आहे असं तिला वाटतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)