कोरोना लस : मुंबईच्या 'या' मराठी उद्योगपतीने ह्युमन ट्रायलसाठी टोचून घेतली लस

ओंकार हेर्लेकर

फोटो स्रोत, ONKAR HERLEKAR

फोटो कॅप्शन, ओंकार हेर्लेकर
    • Author, संकेत सबनीस
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"गेले काही दिवस कोरोनाच्या संकटामुळे आपण सगळेच अस्वस्थ आहोत. या काळात मी बऱ्याच जणांना मदत केली. पण, हे संकट दूर जाण्यासाठी स्वतःहून काहीतरी करायची इच्छा होती. म्हणून मी लशीच्या ह्युमन ट्रायलमध्ये सहभागी झालो," मुंबईतल्या लासा सुपर जेनेरिक्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. ओंकार हेर्लेकर बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होते.

कोरोना लशीच्या मानवी चाचणीच्या संशोधनात सहभागी झाल्यानंतरचा अनुभव त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितला.

जगात सध्या युके, अमेरिका, रशिया आणि चीनमध्ये कोरोनाला नष्ट करणारी लस निर्माण करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. भारतातही हे काम भारत बायोटेक कंपनी करत असून ही कंपनी 'कोवॅक्सीन लशी'च्या संशोधनात गुंतली आहे. आयसीएमआरने भारत बायोटेकसोबत या लशीची निर्मिती केली आहे.

या लशीच्या प्रायमरी ह्युमन ट्रायलला म्हणजेच प्राथमिक टप्प्यातल्या मानवी चाचणीला सुरुवात झाली असून भारतातल्या काही निवडक स्वयंसेवकांवर याची चाचणी 24 जुलैला झाली. तर, काहींवर 28 जुलैला ही चाचणी झाली.

कोरोना
लाईन

डॉ. ओंकार हेर्लेकर या पहिल्या टप्प्यातल्या स्वयंसेवकांपैकी एक आहेत. ते लाहनाचे मोठे झाले बदलापुरात झाले असून उद्योगानिमित्त मुंबईत स्थायिक आहेत.

असा घेतला ह्युमन ट्रायलसाठी निर्णय

हेर्लेकर कोरोना संकटानंतर गोव्यात आपल्या गावी गेले होते. तिथे कोरोना लशीसाठी भारत बायोटेक कंपनीकडून मानवी चाचणी होणार असल्याचं त्यांना समजलं.

या संकट काळात मुंबई, बदलापूर, कोकण इथल्या लोकांना लॉकडाऊन दरम्यान मदत करण्याचं काम त्यांनी सुरू ठेवलं होतं. मात्र, लशीच्या संशोधनात सहभागी होऊन या संकट काळात आपण काहीतरी केल्याचं समाधान वाटावं ही सुद्धा त्यांची इच्छा होती. म्हणून हा निर्णय त्यांनी घेतल्याचं सांगितलं.

ओंकार हेर्लेकर

फोटो स्रोत, ONKAR HERLEKAR

40 वर्षीय हेर्लेकर त्यांच्या या निर्णयाबद्दल बोलताना सांगतात, "मी गेले काही दिवस गोव्यातच आहे. इथल्या रेडकर हॉस्पिटलमध्ये कोरोना लशीच्या चाचणीसाठी स्वयंसेवकांची नोंद सुरू होती. मी माझी नोंदणी तिथे केली.

माझ्या अनेक प्रकारच्या रक्त चाचण्या तिथे झाल्या. त्यांचे निकाल बरे आले असून मानवी चाचणीसाठी माझी निवड झाल्याचं मला हॉस्पिटलमधून आठवडाभराने सांगण्यात आलं."

ते पुढे सांगतात, "निवड झाल्याने मी सुद्धा प्रथम आनंदी आणि काहीसा भयभीतही झालो. परंतु, मी काही झालं तरी स्वतः या प्रकल्पात सहभागी व्हायचं ठरवलं. माझ्या घरच्यांनी मला पाठिंबा दर्शवत माझा उत्साह वाढवला."

लस टोचतानाचा अनुभव कसा होता?

नेमकं लस टोचून घेताना काय अनुभव आला याबद्दल बोलताना हेर्लेकर यांच्या अंगावर आजही रोमांच उठतात.

ते पुढे सांगतात, "ही ह्युमन ट्रायल डबल ब्लाईंड कंट्रोल्ड प्लासिबो ट्रायल आहे. म्हणजे लस टोचणाऱ्या आणि टोचून घेणाऱ्याला त्यात औषध आहे की इतर काही आहे हे माहिती नसतं. त्यामुळे मला काय टोचलं जातंय हे माहिती नव्हतं. टोचल्यानंतर त्या ठिकाणी जळजळ होत होती आणि तेवढा भाग काळा-निळाही पडला. डोकेदुखी आणि तापासारखं थोडावेळ वाटलं. त्यानंतर आजपर्यंत मला काहीच त्रास झाला नाही."

लस

फोटो स्रोत, Getty Images

पुन्हा त्यांच्यावर चाचणी केली जाईल का? याबद्दल ते सांगतात, "माझ्यावर चौदा दिवसांनी पुन्हा अशीच चाचणी केली जाईल. या चौदा दिवसात माझ्या शरीरात विषाणूला विरोध करणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्या की नाही याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातल्या लोकांच्या ट्रायल्स सुरू होतील."

सध्या हेर्लेकर त्यांच्या घरीच आहेत. लशीची चाचणी केल्यानंतर हॉस्पिटल त्यांच्या कायम संपर्कात असून त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवलं जातंय. पहिल्या चाचणीला 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पुन्हा रक्त चाचण्या केल्या जातील. त्यानंतर त्यांच्यावरच्या दुसऱ्या चाचणीचा निर्णय घेतला जाईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)