शकुंतला देवी यांना 'मानवी संगणक' का म्हटलं जायचं?

शकुंतला देवी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शकुंतला देवी

आज (21 एप्रिल) गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

Presentational grey line

1929 सालच्या नोव्हेंबर महिन्यातील 4 तारखेला कन्नड कुटुंबात एका मुलीनं जन्म घेतला. या मुलीला ईश्वरी वरदान लाभल्याचं तिच्या हस्तरेषा पाहून घरातीलच एका वृद्धानं म्हटलं होतं. शकुंतला देवी असं त्या मुलीचं नाव.

ही मुलगी पुढे जाऊन गायिका किंवा नृत्यांगणा होईल, असं कुटुंबीयांना वाटलं. मात्र, मोठी झाल्यावर ही मुलगी केवळ कुटुंबाचंच नव्हे, तर देशाचं नावही अभिमानाने उंचावेल आणि तेही अशा विषयात, जो विषय अनेकांना कठीण वाटलं नव्हतं.

एक गणितज्ज्ञ, ज्योतिषी, लेखिका, बासरी वादक अशा अनेक कला विलक्षण प्रतिभा असलेल्या व्यक्तीतच असू शकतात. त्या शकुंतला देवी नावाच्या व्यक्तीत होत्या.

1982 साली शकुंतला यांनी 13 अंकांचा गुणाकार केवळ 28 सेकंदात सांगून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली.

विद्या बालन

फोटो स्रोत, Amazon

फोटो कॅप्शन, अभिनेत्री विद्या बालन ही शकुंतले देवी यांची भूमिका साकरतेय.

शकुंतला यांच्या ज्योतिषविद्येतून आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी मोठ-मोठे नेते त्यांच्याकडे रांगा लावून बसत. त्यांच्या अद्भुत प्रतिभेला समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ हजारो प्रश्नांसह विचार करत बसत.

विलक्षण प्रतिभा

शकुंतला या तीन वर्षे वयाच्या असतानाच एकदा पत्ते खेळत होत्या. त्यावेळीच गणितातील त्यांची विलक्षण प्रतिभा त्यांच्या वडिलांनी हेरली होती.

वयानं लहान असतानाही शकुंतला ज्या वेगानं अंक लक्षात ठेवत असत, ते पाहून त्यांचे वडील आश्चर्यचकित होत असत. पाच वर्षांच्या झाल्यानंतर त्यांनी गणितातील प्रश्नही सहज सोडवण्यास सुरुवात केली.

गणितातले प्रश्न सोडवण्यासाठी शेजारची मुलंही शकुंतला यांच्याकडेच येत. हळूहळू गणितातील त्यांची कुशलता सर्वत्र पसरू लागली.

शकुंतला यांच्या माहितीनुसार, त्यांनी चार वर्षांच्या असतानाच म्हैसूर विद्यापीठाच्या एका मोठ्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. भारतासह जगभरात त्यांच्या गणितीय ज्ञानाबद्दल माहिती होण्याचं हे पहिलं पाऊल होतं.

शिक्षणापासून दूर

शकुंतला देवी यांचे वडील सर्कसमध्ये काम करत. शकुंतला यांनी शिक्षण घेतलं नव्हतं.

गणित

फोटो स्रोत, Getty Images

त्यावेळी बीबीसीने त्यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा प्रश्न विचारला गेला होता की, लंडनमध्ये तुम्ही गणिताच्या प्रश्नांना व्यवस्थित सोडवलंत, पण तुम्ही शालेय शिक्षण तर घेतलं नाहीय, मग हे कसं शक्य झालं? त्यावेळी शकुंतला यांनी उत्तर दिलं, "मी इंग्रजीचंही शिक्षण घेतलं नाही, पण चांगलं इंग्रजी बोलते. शालेय शिक्षण मी घेतलं नहीय. इंग्रजीतून कादंबऱ्याही मी लिहिल्या आहेत. तामिळमध्ये कुठलाच सराव न करताही कथा लिहिल्यात."

"भाषा तर इतरांशी बोलता बोलता शिकत गेले. हिंदी मला लिहिता, वाचता येत नाही, मात्र हिंदी उत्तम बोलते. मी शिक्षण घेतलं नाही, पण मला हे सर्व अभ्यासातून येत गेलं," असं शकुंतला यांनी बीबीसीला सांगितलं होतं.

आपल्या प्रतिभेला ईश्वराची देणगी म्हणणाऱ्या शकुंतला देवी या गणिताला केवळ 'कॉन्सेप्ट' आणि 'लॉजिक' मानत असत. गणिताबद्दलचं आपल्या ज्ञानाची चमक त्यांनी जगभरातील असंख्य कॉलेज, विद्यापीठं, थिएटर, रेडिओ आणि टेलिव्हिजन कार्यक्रमातही दाखवली.

1977 मध्ये अमेरिकेत तर शकुंतला यांनी कॉम्प्युटरच्या क्षमतेशी स्पर्धा करून दाखवली. त्यावेळी 188132517 या संख्येचं घनमूळ सांगितलं होतं.

काही सेकंदात उत्तरं

1980 साली लंडनमध्ये एम्पेरियल कॉलेजमध्ये 7,686,369,774,870 आणि 2,465,099,745,779 या 13 अंकांच्या दोन संख्या निवडल्या गेल्या. या दोन संख्येचा गुणाकार करून उत्तर शोधायचं होतं. शकुंतला देवी यांनी अवघ्या काही सेकंदात उत्तर सांगितलं.

अशाच मोठ-मोठ्या संख्यांची गणितं काही सेकंदात सोडवणाऱ्या शकुंतला यांच्यावर 1988 साली कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ प्रा. आर्थर जेन्सन यांनी अभ्यास केला होता. प्रा. जेन्सन यांनी त्यांच्या अहवालात म्हटलंय की, एखाद्या गणिताचं उत्तर वहीत लिहिण्याआधीच शकुंतला उत्तर सांगत असत.

असाच एक अनुभव त्यांनी बीबीसीलाही सांगितला. "एका पत्रकारानं मला अंक दिला आणि गुणाकार करण्यास सांगतिला. मी उत्तर दिलं तर पत्रकार म्हणाला, हे चूक आहे. मात्र, आम्ही त्याच कार्यालयातील अकाऊंट विभागात जाऊन तपासलं, तर माझं उत्तर बरोबर होतं."

शकुंतला यांचं ज्योतिषविषयक ज्ञानही प्रसिद्ध होतं. रशिया आणि चीन वगळता त्या जगातील बहुतांश देशांमध्ये फिरल्या होत्या. ईश्वरावर पूर्ण श्रद्धा असलेल्या शकुंतला म्हणायच्या, ईश्वराच्या देणगीला कम्युनिस्ट देशांमध्ये कसा घेऊन जाणार?

एटीएन कॅनडाला दिलेल्या एका मुलाखतीत शकुंतला यांनी सतारवादनबाबत एक किस्सा सांगितला होता. "मुंबई विमानतळावर बसली होती. मी खूप थकली होती. माझं फ्लाईट रात्री उशिराचं होतं. माझ्या बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे सतार होतं."

विद्या बालन

फोटो स्रोत, Amazon

फोटो कॅप्शन, शकुंतला देवींवरील सिनेमातील दृश्य

मी विचारलं, हे काय आहे? तर त्या व्यक्तीनं उत्तर दिलं, सतार आहे.

मी म्हटलं, मलाही सतारवादन खूप आवडतं आणि तुम्हालाही सतार इतकं आवडत असेल तर रवी शंकर यांच्याकडून तुम्ही शिकलं पाहिजे.

त्यावर त्या व्यक्तीनं उत्तर दिलं, माझंही नाव रवी शंकर आहे. त्यानंतर आम्ही दोघेही हसलो. ज्यावेळी विमानाच्या दिशेनं जाण्यास निघाले, त्यावेळी त्या व्यक्तीनं मला विचारलं, मे आय नो युअर नेम प्लीज?

मी म्हटलं, शकुंतला देवी.

'ह्युमन कॉम्प्युटर' म्हटल्या जाणाऱ्या शकुंतला देवी यांनी गणितासह पाककलेवरही पुस्तकं लिहिली आहेत.

1977 मध्ये शकुंतला देवी यांनी वर्ल्ड ऑफ होमोसेक्शुअलवरही पुस्तक लिहिलं. भारतात समलैंगिकतेवर हे पहिलं पुस्तक मानलं जातं.

21 एप्रिल 2013 मध्ये त्यांचं बंगळुरूमध्ये निधन झालं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)