गुगल : सुंदर पिचई भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक का करत आहेत?

फोटो स्रोत, Reuters
- Author, अपूर्व कृष्ण
- Role, बीबीसी प्रतिनिधी
टेक्नॉलॉजी जायंट गुगलने भारतासाठी एक विशेष निधी तयार केला आहे. या निधीचं नाव आहे - गुगल फॉर इंडिया डिजिटायझेशन फंड. याअंतर्गत ते पुढच्या पाच ते सात वर्षांत भारतात 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 750 अब्ज रुपयांची तगडी गुंतवणूक करणार आहेत.
गुगल वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसा लावणार की भागीदारी करणार? याविषयी कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे, "निश्चितच आम्ही दोन्ही प्रकारच्या शक्यतांचा अभ्यास करू. आम्ही इतर कंपन्यांमध्ये पैसा लावू. गुगल वेंचर्सच्या माध्यमातून याआधीही आम्ही ते करतच होतो. मात्र, हा फंड इतका मोठा आहे की आम्ही इतर मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचीही शक्यता आहे. आम्ही डेटा सेंटरसारख्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित गुंतवणूकही करणार आहोत. आमच्या फंडचा मोठा वाटा भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवू."
एकूणच गुगल पुढे काय करणार, याचे सगळे पत्ते अजूनतरी सुंदर पिचाई यांनी खुले केलेले नाहीत. त्यामुळे काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात -
गुगल कुठे पैसा गुंतवणार?
गुंतवणूक म्हटली की परतावा आलाच.
मग कुणाच्या खिशातून गुगलच्या तिजोरीत पैसे जाणार? आणि खिसा रिकामा करणाऱ्यांना मोबदल्यात काय मिळणार?
याचा सामान्य माणसावरही काही परिणाम होणार की ही फक्त टेक्नॉलॉजी कंपनीसाठीचीच बातमी आहे?
असे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याआधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की गेल्या काही दिवसात भारतात पैसा गुंतवण्याची घोषणा करणारी गुगल काही एकमेव कंपनी नाही.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

गुगलच्या आधी याचवर्षी अॅमेझॉननेही भारतात 1 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. त्याआधीही 5 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली होती.
यानंतर फेसबुकने रिलायंस जिओशी 5.7 अब्ज डॉलर्सचा करार केला होता.
आणि गेल्याच महिन्यात मायक्रोसॉफ्टची गुंतवणूक कंपनी असलेल्या एमवनटूने भारतात गुंवतणुकीच्या शक्यता पडताळून बघण्यासाठी भारतात ऑफीस उघडणार असल्याचं म्हटलं होतं. यात प्रामुख्याने बिझनेस-टू-बिझनेस सॉफ्टवेअर स्टार्टअप कंपन्यांवर विचार होईल.

फोटो स्रोत, AFP
भारतच का?
याचं सरळ उत्तर आहे - मार्केट. मात्र, भारतीय मार्केट तर पूर्वीही होतं. मग अचानक आताच या दिग्गज कंपन्या भारतात पैसा का ओतू इच्छित आहेत?
जाणकारांच्या मते भारतीय मार्केट आता बदलतंय. विशेषकरून डिजिटल क्रांती आणि स्मार्ट फोन क्रांती आल्यानंतर.
फायनॅन्शिअल एक्सप्रेसचे कार्यकारी संपादक आणि तंत्रज्ञान विषयाचे जाणकार ऋषी राज म्हणतात की गेल्या काही काळात या कंपन्यांच्या कामात एकप्रकारची कन्वर्जन्सची परिस्थिती येत असल्याचं दिसतंय.
ऋषी राज म्हणतात, "आज एकच कंपनी दूरसंचार सेवा देते. तीच कंपनी मनोरंजनही उपलब्ध करून देते. ई-कॉमर्सही करते. तीच ई-पेमेंटचं माध्यम आहे. तीच सर्च इंजीनचंही काम करते. नेव्हिगेशनचं कामही करते. पूर्वीही कॉन्व्हर्जन्स असायचं. मात्र, पूर्वी या गोष्टी फार ढोबळ होत्या. उदाहरणार्थ टिव्ही-मोबाईलचं कॉन्व्हर्जन्स. मात्र, सध्या त्याची व्याप्ती खूप वाढली आहे."

फोटो स्रोत, Getty Images
तंत्रज्ञान आणि संबंधित विषयांचे जाणकार ज्येष्ठ पत्रकार माधवन नारायण म्हणतात की "इंटरनेट सुपरमार्केट बनलं आहे. इथे सॉफ्टवेअरचीही विक्री होते आणि कॉन्टेंटचीसुद्धा. याचं उदाहरण देताना ते म्हणतात अॅमेझॉन आता निर्माता बनला आहे. तिथे चित्रपट प्रदर्शित होतात. फेसबुकची तर बातच निराळी आहे. फेसबुकवर मैत्रीपासून ते व्यापारापर्यंत सर्व होतं."
माधवन नारायण पुढे म्हणतात, "कॉन्टेंट, कॉमर्स, कनेक्टिव्हिटी आणि कम्युनिटी - हे चारही 'C' इंटरनेटवर उपलब्ध आहेत आणि फॅन्ग म्हणजेच फेसबुक, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि गुगल या चारही व्यासपीठांवर हे चारही सी उपलब्ध आहेत. नेटफ्लिक्सला थोडं वेगळं ठेवलं तरी उर्वरित तिन्ही कंपन्या छोट्या व्यावसायिकांच्या कामी येत आहेत.
इथे तुम्ही जाहिरात करू शकता, त्यांचे सॉफ्टवेअरही भाड्याने घेऊ शकता (उदा. व्हीडियो कॉन्फरंसिंग). या तिन्ही कंपन्या कुठल्या ना कुठल्या स्वरुपात सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करतात. मग ते यूट्यूबच्या माध्यमातून असो, ओला-उबरच्या माध्यमातून असो किंवा मग डिजिटल क्लासरुमच्या माध्यमातून."
नारायण म्हणतात की अशा परिस्थितीत भारतात एवढी मोठी लोकसंख्या आणि मार्केट यांचं मिश्रण असेल तर मोठ्या कंपन्यांना भारतात रस असणं स्वाभाविक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इंटरनेटचा फैलाव आणि वाढती कमाई
भारताच्या 130 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास 1 अब्ज लोकांच्या हातात मोबाईल पोहोचला आहे. मात्र, यातल्या 40 ते 50 कोटी लोकांकडे साधा फिचर फोन आहे. यात इंटरनेट नाही. पण फिचर फोन आणि स्मार्ट फोन यातलं अंतर कमी होत चाललंय.
माधवन नारायण यांच्या मते मोबाईल फोन आणि डेटा प्लॅन स्वस्त होत आहेत. त्यामुळे ही संख्या येत्या चार-पाच वर्षांत सहज दुप्पट होईल.
ऋषी राज म्हणतात की हे जे 60 कोटी इंटरनेट स्मार्टफोन ग्राहक आहेत ते मोबाईल ऑपरेटर्सकडे आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच अॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स यासारख्या कंपन्यांची सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवली जात आहे.
ते म्हणतात, "माझ्या मते गुगलला हे कळून चुकलं आहे की हीच वेळ आहे जेव्हा भारतात त्यांच्या आधीपासूनच उपलब्ध असलेल्या सेवा कुठल्यातरी कंपनीशी टाय-अप करायच्या. त्यातून ते जे पैसा लावतील तो ग्राहकांपर्यंत पोहोचावा जेणेकरून त्यांची कमाई होईल, जी कमाई आतापर्यंत होत नव्हती."

फोटो स्रोत, AFP
डेटा भांडार आणि काळजी
गुगलसारख्या बड्या कंपनीने भारताकडे मोर्चा वळवण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे डेटा जो भारतात अगदी सहज मिळवता येतो.
ऋषी म्हणतात, "या कंपन्या भारतात येतात, यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्यांना सहज डेटा मिळतो. या डेटा प्रोफायलिंगमुळे कंपन्यांजवळ एक मोठं भांडार तयार होतं. या भांडारातून त्यांना ग्राहकांच्या सवयींची माहिती मिळू शकते. ते मार्केट रिसर्च करू शकतात."
मात्र, यातून डेटाचा चुकीचा वापर तर होणार नाही ना, ही काळजीही असते.
ऋषी सांगतात की ज्या वेगाने डेटा प्रोफायलिंगचं काम होतंय त्या वेगाने या डेटाची देखभाल, सुरक्षितता, डेटा एकाधिकारशाही नियंत्रित करणं, अशी कामं झालेली नाहीत आणि हे काळजीचं सर्वात मोठं कारण आहे.
ते म्हणतात, "त्यासाठीची कुठलीच प्रक्रिया नाही. त्यामुळे परवानगी देणं किंवा नाकारणं शक्यच नाही. यावर काम सुरू आहे. मात्र, अत्यंत धीम्या गतीने. आणि आपण याआधीही बघितलं आहे की प्लेअर मोठा असेल तर रेग्युलेशन दुबळंच ठरतं."
माधवनदेखील म्हणतात, "डेटा कुठे आणि कसा ठेवायचा, यावर येणाऱ्या काळात रिलायंस जिओ आणि गुगल-फेसबुक-अॅमेझॉन यासारख्या कंपन्यांमध्ये वाद होऊ शकतो."
मात्र, माधवन हेदेखील सांगतात की गोपनीयतेच्या नावाखाली येणाऱ्या काळात मार्केटमध्ये निर्बंध लागता कामा नये. कदाचित याचा अंदाज असल्यामुळेच या कंपन्यांचा हे सांगण्याचा प्रयत्न दिसतोय की या माहितीचा उपयोग ते केवळ जाहिरातींसाठी करतील. कुणाच्याही खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करण्यासाठी नाही.

फोटो स्रोत, Getty Images
प्रतिमा संगोपन
गुगलसारखी मोठी कंपनी भारतात गुंतवणूक करताना आपण भारताकडे केवळ मार्केट म्हणून बघत नाही, असं दाखवण्याचाही त्यांचा प्रयत्न असू शकतो.
माधवन नारायण म्हणतात, "आपण भारतात फक्त कमाई करण्यासाठी आलो आहोत, अशी आपली प्रतिमा असू नये, असं या कंपन्यांना वाटतं. आंतरराष्ट्रीय कंपन्या असल्या तरी त्यांना स्वतःची चांगली प्रतिमा इथलं सरकार आणि लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. जेणेकरून राष्ट्रवादाच्या नावाखाली या कंपन्यांवर कसल्याच प्रकारची कुऱ्हाड कोसळू नये."
शिवाय या कंपन्यांचा असाही प्रयत्न आहे की त्यांचं लक्ष केवळ ग्राहकांवर नाही.
ऋषी राज म्हणतात, "या कंपन्यांचे अनेक प्रकल्प सरकारसोबतही असतात. त्यामुळे त्यांना सरकारला हे दाखवणंही गरजेचं असतं की एखाद्या कंपनीने गुंतवणूक केली तर आम्हीही मागे नाही. कारण तसं केलं नाही तर सरकारी प्रकल्पांचे फायदे तुम्हाला मिळणार नाहीत."
कर वाचवण्याचा प्रयत्न आहे का?
गुगल किंवा डिजिटल सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कर लावण्याचा विचार जगभरात सुरू आहे. कारण या कंपन्या सर्च आणि जाहिरातींच्या माध्यमातून भरघोस कमाई करतात. त्यामुळे जाणकारांच्या मते भारतासारख्या देशात गुंतवणूक करण्यामागचा एक उद्देश हासुद्धा असू शकतो.
माधवन म्हणतात, "या कंपन्या भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या बाजारात आल्यास नफ्यातला एक वाटा ते इथेच गुंतवू इच्छितील. यामुळे त्यांचा खर्च वाढेल. काम विस्तारेल आणि करही कमी भरावा लागेल."

फोटो स्रोत, AFP
यात काळजीचं कारण तर नाही?
या प्रश्नाचं उत्तर देताना माधवन म्हणतात की हे असं क्षेत्रं आहे जिथे घाईघाईत आरोप करणं योग्य ठरणार नाही.
ते म्हणतात, "काळजीचं कारण नाही. पण चिंतन मात्र करायला हवं. घोटाळे तर भारतीय कंपन्यासुद्धा करतात. कर्ज घेऊन पळून जातात. करचुकवेगिरी करतात. मात्र, आंतरराष्ट्रीय कंपन्या तशा नसतात. असं असलं तरी त्या समाजसेवा करण्यासाठी आलेल्या नाहीत. त्यामुळे हात मिळवायचा आहे. पण नजर खाली करायची नाही."
ऋषी सांगतात की या कंपन्या भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांप्रती अधिक सावधगिरी बाळगतील. कारण इथे तुम्ही काहीही यशस्वीपणे लॉन्च केलं ज्याद्वारे तुम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचलात, त्यातून पैसे कमावले तर हेच मॉडेल या कंपन्या इतर देशांमध्येही राबवू शकतात.
तर गुगलला भारतावर 10 अब्ज डॉलर्सचं प्रेम का आलं? याचं उत्तर माधवन नारायण यांच्या या प्रतिक्रियेतून मिळू शकतं.
ते म्हणतात, "भारताच्या बाजूने असणाऱ्या बाबी लक्षात घेतल्या तर गुगल जी 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे, ती खूप कमी असल्याचं तुम्हाला जाणवेल. इतक्या मोठ्या अर्थव्यवस्थेसोबत रोमांस करायचा म्हणजे फूलं आणि चॉकलेट्सवर काही पैसे तर खर्च करावेच लागतील."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








