विकास दुबेः योगी आदित्यनाथांच्या पोलिसांनी माफिया विकास दुबेचं एन्काउंटर कसं केलं होतं?

फोटो स्रोत, EPA
- Author, समीरात्मज मिश्र
- Role, बीबीसी हिंदीसाठी, कानपूरहून
कानपूरमध्ये 2020 मध्ये 8 पोलिसांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या विकास दुबे याचा कथित पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. मात्र, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेपासून विकास दुबेच्या राजकीय ओळखीपर्यंत अनेक बाबतीत यापूर्वी जसे प्रश्न उपस्थित करण्यात येत होते, तसेच प्रश्न आता या चकमकीवरूनही उपस्थित करण्यात आले.
8 पोलिसांच्या मृत्यूनंतर विकास दुबेला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांच्या अनेक पथकांनी अनेक राज्यांपासून ते नेपाळपर्यंत सापळे रचले होते. मात्र, आठवडाभर उलटूनही विकास दुबे गळाला लागला नव्हता.
गुरुवारी उज्जैनमधल्या महाकालेश्वर मंदिरात विकास दुबेने कथित आत्मसमर्पण केलं. मात्र, विकास दुबेला अटक केल्याचा मध्य प्रदेश पोलिसांचा दावा आहोता. मात्र, या अटकेवर संशय व्यक्त करण्यात येतोय.
गुरुवारचं अटकनाट्य संपतं न संपतं तोच शुक्रवारी सकाळीच विकास दुबे चकमकीत जखमी झाल्याची आणि त्यानंतर कानपूरच्या हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. या चकमकीविषयी उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) पत्रकारांना माहिती दिली.
या माहितीनुसार विकास दुबेला उज्जैनमधून अटक केल्यानंतर त्याला बाय रोड कानपूरला नेण्यात येत होतं. कानपूरजवळ पोलिसांच्या ताफ्यातल्या एका गाडीला अपघात होऊन ती उलटली. दरम्यान विकास दुबेने पोलिसांची पिस्तुल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनाही गोळीबार करावा लागला आणि या गोळीबारात विकास दुबे जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
दोन साथीदारांचाही चकमकीत मृत्यू
मात्र, या संपूर्ण प्रकरणाच्या घटनाक्रमात इतके खाचखळगे आहेत की कुणाचाही त्यावर सहजासहजी विश्वास बसत नाहीय. ज्या दिवशी विकास दुबेला अटक झाली त्याच दिवसापासून सोशल मीडियावर विकास दुबेसोबत असंच काहीतरी घडेल, असा संशय व्यक्त करण्यात येत होता.
या मागचं कारण म्हणजे विकास दुबेच्या दोन साथीदारांचाही आदल्याच दिवशी अशाच प्रकारे पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. त्या दोघांना यूपी एसटीएफने हरियाणातल्या फरिदाबादमधून अटक केली. त्यानंतर त्यांनाही उत्तर प्रदेशच्या सीमेत जवळपास अशाच पद्धतीने आणि याच परिस्थितीत ठार करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Reuters
या चकमकीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. उदाहरणार्थ 1200 किमी रस्त्यावर कुठलाच अडथळा आला नाही. मात्र, कानपूर जवळ येताच असं काय झालं की पोलीस ताफ्यातल्या नेमका विकास दुबे ज्या गाडीत बसला होता त्याच गाडीला अपघात झाला आणि ती उलटली.
इतकंच नाही तर गाडी उलटल्यानंतर गाडीत बसलेले पोलीस कर्मचारी जखमी होतात. मात्र, विकास दुबे जखमी होत नाही. उलट तो जखमी झालेल्या पोलीस शिपायांपैकी एकाचं पिस्तुल हिसकावून उलटलेल्या गाडीतून स्वतः बाहेर येतो आणि पळून जायचा प्रयत्न करतो. असं कसं शक्य आहे?
पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, किती पोलीस जखमी झाले आणि त्यांना कुठे-कुठे जखमा झाल्या, याची माहिती अजूनही मिळालेली नाही.
काँग्रेसने या कथित चकमकीवर संशय व्यक्त करत विचारलं आहे की विकास दुबे पिस्तुल हिसकावून पळून जात होता तर त्याच्या छातीत गोळी कशी लागली?
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाल म्हणाले, "गोळी पाठीवर लागायला हवी होती. विकास दुबेच्या पायात रॉड आहे. त्यामुळे त्याला काही अंतरही नीट पार करता येत नाही. अशा परिस्थितीत तो पोलिसांच्या तावडीतून पळालाच कसा?"
विकास दुबेला चार्टर्ड प्लेनने आणण्याचीही चर्चा होती. तरीदेखील त्याला 1200 किमी रस्त्याने का आणण्यात आलं. इतकंच नाही त्याला गाडीत बसवून आणलं जात असताना त्याच्या हातात बेड्या का घातल्या नव्हत्या.
एकापाठोपाठ एक योगायोग
विकास दुबे चकमक प्रकरणातले योगायोग इथेच संपत नाहीत. यूपी पोलीस विकास दुबेला उज्जैनहून कानपूरला नेत असताना काही पत्रकारही पोलीस ताफ्याच्या मागेच होते. मात्र, चकमक झाली त्या ठिकाणापासून काही अंतर अलिकडेच चेकिंगसाठी पत्रकारांच्या गाड्या अडवण्यात आल्या होत्या. शिवाय विकास दुबेची गाडी अशा ठिकाणी उलटली जिथे रस्त्यालगत डिव्हायडर नव्हता.
आणखी एक योगायोग म्हणजे ज्या ठिकाणी गाडी उलटली त्या ठिकाणी अपघात झाल्याच्या कुठल्याच खुणा नाहीत. इतकंच नाही तर रस्ता वाहता असूनदेखील गाडीला अपघात होताना कुणीही बघितलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
एक मोठा योगायोग म्हणजे ज्या कुख्यात विकास दुबेला महाकालेश्वर मंदिरातल्या निशस्त्र गार्डने पकडलं तो विकास दुबे यूपी एसटीएफच्या प्रशिक्षित पोलीस अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पळाला आणि पळालाही असा की त्याला जिवंत पकडण्याऐवजी त्याला ठार करणंच पोलिसांना अधिक योग्य वाटलं.
असे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं पोलिसांकडे नाहीत किंवा त्यांना द्यायची नाहीत. कानपूर पोलीस आणि यूपी एसटीएफच्या अधिकाऱ्यांशी बोलून आम्ही या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्यातरी उत्तरं मिळालेली नाहीत.
चकमकींवरून यापूर्वीही उत्तर प्रदेश सरकारवर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
सरकारचं म्हणणं आहे की राज्यात भाजप सरकार आल्यापासून जवळपास 2 हजार चकमकी झाल्या आहेत आणि यात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
काही प्रकरणांमध्ये मानवाधिकार आयोगाने नोटीसही बजावली आहे. मात्र, तरीदेखील चकमकी कमी झालेल्या नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
कथित बनावट चकमकींविषयी सरकार आणि अधिकाऱ्यांना न्यायालय किंवा इतर घटनात्मक संस्थांची भीती उरलेली नाही का? या प्रश्नाचं उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार सुभाष मिश्र म्हणतात, "इतक्या चकमकी झाल्या आहेत. मात्र, आजवर कुणावरही कारवाई झालेली नाही. इतकंच नाही तर मानवाधिकार आयोगासारख्या संस्था किंवा न्यायालय यांच्याकडून कधीही अशी नोटीसही आलेली नाही की सरकार किंवा पोलिसांना वचक बसेल. यामुळे पोलिसांचंही मनोधैर्य वाढतं. त्यांना वाटतं काही होतं नाही. याआधीच्या सरकारांशी तुलना केली तर त्यांच्या काळात 100 चकमकीही झालेल्या नाहीत. असं वाटतं जणू चकमक राज्याचं धोरण बनलं आहे. यामुळे पोलिसांची हिम्मत वाढतच गेली. 'ठोका' धोरणाचा अवलंब करा, हा संदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक व्यासपीठावरून दिला आहे."
सुभाष मिश्र पुढे म्हणतात, "उत्तर प्रदेश पोलिसांना एक चांगली संधी मिळाली होती. पोलिसांनी या संधीचा योग्य उपयोग केला असता तर अनेक गुपितं बाहेर आली असती. माफिया-पोलीस-राजकारणी यांचं सत्य जनतेसमोर येऊ शकलं असतं. विकासला कुणाचं अभय होतं, पोलिसांचं काय कनेक्शन होतं, हे सारं कळू शकलं असतं. त्यानंतर त्याला शिक्षा देता आली असती. यातून समस्येचं समूळ उच्चाटन झालं नसतं तरी बऱ्याच अंशी ते करता येऊ शकलं असतं."
"पोलिसांना वाटलं की हैदराबाद चकमकीप्रमाणे ही देखील त्यांच्यासाठी हिरो बनण्याची संधी आहे. लोकांनीही अशा घटनांनंतर पोलिसांना खांद्यावर बसवून त्यांना हिरो बनवलं आहे."
निवृत्त पोलीस अधिकारी विभूतीनारायण राय म्हणतात, "ही जी कहाणी सांगितली जात आहे त्यात बरीच गडबड आहे. जेवढ्या प्रश्नांची उत्तरं दिली जात आहेत त्याहून जास्त प्रश्न निर्माण होत आहेत. मीडियामध्ये कालपासूनच चर्चा होती की विकास दुबेला रस्त्यातच ठार केलं जाईल आणि घडलंही तसंच. उत्तर प्रदेश पोलिसांना आपली प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी स्वतःच या चकमकीची एखाद्या निष्पक्ष संस्थेकडून चौकशी करायला हवी. त्यातून ही चकमक खरी होती की बनावट, हे सत्य समोर येईल."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








