भारत-चीन सीमा तणाव : चीनने गलवानमधून माघार घेतली का?

भारत, चीन

फोटो स्रोत, MEA

फोटो कॅप्शन, भारत-चीन संबंध ताणले गेले होते.

भारत आणि चीनच्या सैन्याने गलवानमधून माघार घेतल्याच्या बातम्या येत आहेत. यादरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी स्पष्टीकरण दिलंय.

सीमेवरचा ताण कमी करण्याच्या दिशेने दोन्ही देश काम करत असल्याचं चीनने म्हटलंय. पण आपल्या सैन्याने माघार घेतलीय की नाही, याविषयी चीनने आपल्या वक्तव्यात स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाही.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चाओ लिजीआन यांना रॉयटर्स वृत्तसंस्थेने विचारलं, "भारतीय मीडियातल्या बातम्यांनुसार ज्या गलवान खोऱ्यामध्ये दोन्ही देशांदरम्यान झटापट झाली होती होती, तिथून चीनने तंबू आणि उपकरणं हलवली आहेत. या वृत्ताला तुमचा दुजोरा आहे का?"

या प्रश्नावर उत्तर देताना चाओ लिजिआन यांनी म्हटलं, "30 जूनला चीन आणि भारतीय लष्करादरम्यान कमांडर पातळीवरची तिसऱ्या टप्प्यातली चर्चा आयोजित करण्यात आली होती. कमांडर पातळीवरच्या आधीच्या दोन फेऱ्यांमध्ये ज्या गोष्टींवर एकमत झालं होतं त्याची अंमलबजावणी करण्याबाबत दोन्ही बाजूंची सहमती होती आणि सीमेवरचा ताण कमी करण्यासाठी आम्ही प्रभावी पावलं उचलली आहेत. भारतही असंच करेल आणि दोन्ही देशांदरम्यान ठरलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावलं उचलेल, लष्करी आणि राजकीय माध्यमांतून चीनच्या संपर्कात राहील आणि सीमेलगतच्या भागांतला ताण कमी करण्यासाठी चीनसोबत काम करेल अशी आमची अपेक्षा आहे."

सोमवारी (6 जुलै) उचलण्यात आलेली पावलं भारत आणि चीनदरम्यानचा LAC वरचा तणाव कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचं रॉयटर्सने म्हटलंय. पण लष्कराची सतर्कता, त्यांची सज्जता आणि लडाखच्या पर्वत रांगांमध्ये दीर्घ काळासाठी राहण्यासाठी करण्यात येणाऱ्या तयारीवर याचा फारसा परिणाम होणार नाही.

पाच दशकांच्या शांततेनंतर गेल्या महिन्यात भारत - चीन सीमेवर रक्तपात झाला. गेल्या नऊ आठवड्यांमध्ये सीमेवर झालेल्या विविध घटनांमुळे दोन्ही देशांच्या लष्करांदरम्यान उच्च पातळीवर अविश्वास निर्माण झालाय. यानंतर लष्कराने नवीन आव्हानांसाठी सज्ज राहणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

या दोन्ही देशांदरम्यान कमांडर पातळीवर चर्चा झाल्यानंतर गलवान भागामध्ये दोन्ही देशांच्या सैन्याने मागे हटायला सुरुवात केली. पण असं असूनही 15 जूनला गलवान खोऱ्यात हिंसक झटापट झाली.

भारत, चीन

फोटो स्रोत, TWITTER/ANURAGTHAKU

फोटो कॅप्शन, चीनने गलवानमधून माघार घेतली का?

गलवान खोऱ्यातल्या या हिंसाचाराच्या जखमा अजूनही ताज्या आहेत आणि त्या भरून यायला वेळ लागेल. दोन्ही देशांमधला हा ताण कमी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान भारत अतिशय सावधगिरी बाळगत असून प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत असल्याचं सांगितलं जातंय. याचाच अर्थ ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायला मोठा कालावधी लागू शकतो.

तणाव कसा कमी होणार?

या तणावग्रस्त भागामध्ये सुरुवातीची पावलं उचलायलाच दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, असं लष्करातल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा दाखला देत रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटलंय. यानंतरच लष्कराच्या कमांडर्सची बैठक होईल आणि पुढचं पाऊल उचलण्यात येईल. याचाच अर्थ इथे पुढचे काही आठवडे तरी इथे लष्कर तैनात असेल.

शिवाय प्राथमिक पावलं उचलूनही LACजवळ चिनी सैन्य मोठ्या संख्येने उपस्थित असून ते कधीही उलट चाल करेल अशी काळजी भारतीय लष्कराला आहे. म्हणूनच भारतीय सैन्य आपल्यातर्फे कोणत्याही बाबतीत शिथीलता येऊ देणार नाही किंवा या भागातलं सैन्य कमी करण्याचा विचारही करणार नाही.

समोरची बाजू किती सैन्य वा शस्त्रात्रं कमी करतंय याचा अंदाज घेऊन मग लष्कर आणि मोठी हत्यारं हळुहळू हटवण्यात येतील. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यादरम्यान रविवारी चर्चा झाली होती. सैन्य मागे घेण्याची आणि सीमेवर शांतता स्थापित करण्यासाठी दोन्ही देशांनी यादरम्यान सहमती दाखवली होती.

भारत, चीन

फोटो स्रोत, TAUSEEF MUSTAFA/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, चीनने माघार घेतली आहे का?

डोभाल आणि वांग यापूर्वी 2018 आणि 2019 मध्येही भेटले होते. गलवान खोऱ्यामध्ये 20 जवानांचा मृत्यू झाल्यानंतर 17 जूनलाही परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही वांग यी यांच्याशी चर्चा केली होती.

LAC वरचा तणाव कमी करण्यासाठीच्या हालचालींना वेग आणत ही प्रक्रिया लवकर संपवण्यासाठी डोभाल आणि वांग ली यांच्यादरम्यानच्या चर्चेत सहमती झाल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी आपल्या निवेदनात म्हटलं होतं.

आपल्या अधिकृत निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "दोन्ही बाजू साचेबद्धरीतीने डी-एक्सलेशन करतील. LACचं कठोरपणे पालन करण्यात यावं, सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी एकतर्फी कारवाई करू नये आणि ज्यामुळे सीमेलगतच्या भागाममध्ये अशांतता आणि अस्थिरता पसरले अशी कोणतीही घटना यापुढे घडू नये यासाठी प्रयत्न करण्यात यावे यावर दोन्ही देशांनी भर दिला," असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.

भारत, चीन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, चीनने माघार घेतली आहे का?

तर दोन्ही बाजूंमध्ये नुकत्याच झालेल्या लष्करी आणि धोरणात्मक बैठकांतून झालेल्या प्रगतीचं स्वागत करत असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय. याशिवाय यापूर्वी ठरलेल्या आणि कमांडर पातळीवरच्या चर्चेत एकमत झालेल्या गोष्टींवर ठसा उमटवण्यासाठी लवकर पावलं उचलण्यात यावी यावरही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भर दिलाय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)