कोरोना व्हायरस : भविष्यातलं कामाचं स्वरूप कसं असेल?

फोटो स्रोत, Nikita Deshpande/bbc
- Author, निधी राय
- Role, बीबीसी न्यूज
भारतात लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हापासून म्हणजेच मार्च 2020 पासून पूर्वी शहा घरूनच काम करते. पूर्वी पब्लिक रिलेशन्स प्रोफेशनल आहे. तिला दोन लहान मुलं आहेत. वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यापासून पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात समतोल साधण्यासाठी तिला बरीच तारेवरची कसरत करावी लागते.
"घरून काम करणं अवघड आहे. यात शंका नाही. मात्र, आता मला याची सवय होतेय."
तिने घरातल्याच एका कोपऱ्यात स्वतःचं ऑफिस थाटलं आहे. एक टेबल, त्यावरच तिचा प्रिंटर आहे आणि इंटरनेट कनेक्शनसुद्धा.
परिस्थिती थोडी निवळली की घराजवळच एका छोट्याशा जागी ऑफिस सुरू करायचा तिचा विचार आहे.
"अंतर खूप जास्त असल्याने ऑफिसला जाण्याची माझी इच्छा नाही. पण मला वर्क फ्रॉम होमही करायचं नाही. चांगलं काम करता यावं, यासाठी मला जागेतला बदल हवाच."
वर्क फ्रॉम होम
ब्रँड कन्सल्टंट हरीश बिजौर म्हणतात, "मोठे ऑफिस युनिट आता छोटे होत आहेत. लोक ऑफिस बॉयसारख्या इतर मानवी सहकार्याशिवाय जगायला शिकत आहेत. अनेकांसाठी हा मोठा इगो शिफ्ट आहे."
लॉकडाऊनमुळे लोक आपल्या घरातच आहेत. घर त्यांच्यासाठी एखाद्या कोषाप्रमाणे झालंय.
बिजौर म्हणतात, "आता लोकांना दोन मोबाईल फोन्सची गरज आहे. एक खाजगी वापरासाठी आणि एक ऑफिस कामांसाठी. लोकांना मोठ्या घराची गरज असेल. कारण आता त्यांना त्यांच्या घरातच ऑफिससाठीही जागा करायची आहे. प्रिंटर आणि ऑफिससाठी लागणाऱ्या इतर सामानांची मागणी वाढेल आणि हेच न्यू नॉर्मल असणार आहे."

फोटो स्रोत, Nikita Deshpande/bbc
भारतातला सुप्रसिद्ध फर्निचर ब्रँड असणाऱ्या गोदरेज इंटेरियोमधले समीर जोशी म्हणतात भाारतातली घरं आकाराने लहान आहेत आणि इथे ऑफिससाठी वेगळी जागा तयार करणं अवघड आहे.
ते म्हणतात, "आमच्या वेबसाईटवर खुर्चांसाठी करण्यात येणारा सर्च 140 टक्क्यांनी वाढला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे - ऑफिस टेबल."
त्यामुळे गोदरेजने असे फर्निचर आणले आहेत जे घरातल्या इतर फर्निचरसोबत जाऊ शकतील. उदाहरणार्थ जाड उशा, इझी सीट, फोल्डेबल खुर्च्या, फोल्डेबल टेबल, कॉम्प्युटर टेबल्स आणि स्टडी टेबल्स.
तज्ज्ञांच्या मते कामाची वर्क फ्रॉम होम ही पद्धत आपल्यासोबत अनेक आव्हानं घेऊन आली आहे. केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर नोकरी देणाऱ्यांसाठीसुद्धा.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

Sequretek या सिक्युरिटी सर्विस कंपनीचे सहसंस्थापक पंकित देसाई म्हणतात, "सर्वात मोठं आव्हान आहे की कर्मचाऱ्याला इंटरनेटवर मानवी हस्तक्षेपाची चिंता न करता योग्य रितीने काम करता यावं, याची काळजी घेणं. उदाहरणार्थ ऑफिसचा कॉम्प्युटर घरातलं इतर कुणी काही वेळासाठी वापरणे, नकळत डेटाशी छेडछाड होणं किंवा इंटरनेट सर्फिंगसाठी ऑफिसचा कॉम्प्युटर वापरणे. शिवाय, तुम्ही जेव्ही इतर कुणाचा डेटा हाताळता तेव्हा त्याच्या सुरक्षेचीही जबाबदारी असते."
फेसबुक आणि टीसीएससारख्या बलाढ्य कंपन्यांनीसुद्धा ऑफिसमध्ये 30 ते 50 टक्क्यांहून जास्त कर्मचारी न बोलावता काम कसं करता येईल, यावर विचार करायला सुरुवात केली आहे. एकदा या सर्वांसाठीच्या पायाभूत सुविधा उभारल्या की पुढच्या 3 ते 5 वर्षात नवीन प्रक्रिया राबविण्यात येतील.
युनिकॉर्न इंडिया व्हेंचर्समध्ये मॅनेजिंग पार्टनर असणारे भास्कर मुजुमदार म्हणतात, "भविष्यात आपल्याला एक मोठा बदल बघायला मिळेल आणि तो म्हणजे सर्वच पातळीवरच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक किंवा दोन वेळा ऑफिसमध्ये बोलवण्यात येईल आणि त्यासाठी त्यांना वेगळा भत्ताही मिळेल."
कामाच्या ठिकाणी मूलभूत बदल
वर्क फ्रॉम होम न्यू नॉर्मल असल्याने ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कंपन्या काही मूलभूत बदल करण्याचा विचार करत आहेत. उदाहरणार्थ बसण्याची व्यवस्था अशी असेल की कुणीही एकमेकांच्या जवळ किंवा समोरासमोर असणार नाहीत.

फोटो स्रोत, Nikita Deshpande/bbc
सध्या जो कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कर्मचारी सामावून घेण्याचा दृष्टीकोन आहे त्यात मोठा बदल होईल. आता जो बदल होतील त्यात कर्मचारी प्रत्यक्ष जवळ असण्याऐवजी डिजीटली जवळ येतील. एकत्र येऊन मीटिंग घेणे किंवा व्हिडियो कॉन्फरंसिंग यासाठी ऑफिसमध्ये आता जास्त जागेची गरज असेल.
दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचं अंतर ठेवायचं असेल तर ऑफिसला फार मोठी जागा लागणार आहे. काचेसारख्या वस्तू जास्त वापरल्या जातील. कारण काच सहज निर्जंतूक करता येते. अँटी-बॅक्टेरियल कोटिंग असलेल्या वस्तूंना जास्त पसंती मिळेल.
कृषी
भारतात कृषी क्षेत्र जवळपास 50% रोजगार देणारं क्षेत्र आहे. तर सकल राष्ट्रीय उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा 17% आहे आणि इतर कुठल्याही व्यवसायाप्रमाणे या क्षेत्रातही कायमस्वरुपी बदल बघायला मिळतील. आजचा शेतकरी माती परीक्षणासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतोय. खतं, बियाणेसुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करूनच मागवतो.
उन्नती या अॅग्रीटेक कंपनीचे सहसंस्थापक अमित सिन्हा म्हणतात, "हे तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांना किमान तीन वर्ष लागली असती. पण, जागतिक आरोग्य संकटामुळे नवं तंत्रज्ञान स्वीकारण्याचा वेग वाढला आहे. अवघ्या 6-8 महिन्यात शेतकरी हे सर्व हाताळू लागला आहे."

फोटो स्रोत, Nikita Deshpande/bbc
फॅन्सी टेक्नॉलॉजी भारतीय शेतकऱ्याच्या खिशाला परवडणारी नाही आणि ती वापरायची कशी, हेसुद्धा त्याला माहिती नाही. इथेच अॅग्रीटेक कंपनी भूमिका बजावतात. ते मध्यस्थ आणि शेतकरी यांना एका व्यासपीठावर आणतात. उदाहरणार्थ शेतकरी भाड्याने ट्रॅक्टर घेऊ शकतात किंवा व्हिडियो कॉलवरून शेतीतज्ज्ञाकडून टिप्स घेऊ शकतात.
शेतकरी पावसाचा अंदाज घेण्यासाठी किंवा खतांची गुणवत्ता तपासण्यासाठी तंत्रज्ञान किंवा गॅझेट्स भाड्याने घेऊ शकतात. एका विशिष्ट भागात ट्रॅक्टर भाड्याने घेऊन मग त्या भागातले इतर शेतकरीसुद्धा गरजेनुसार त्याचा वापर करू शकतात. कोणतं पीक घ्यायचं किंवा मंडई बंद असेल तर शेतमाल थेट डिलरला कसा विकता येईल, याविषयी तज्ज्ञ किंवा मध्यस्थ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकतात.
तज्ज्ञांच्या मते अधिकाधिक शेतकऱ्यांना हे जाणवू लागलं आहे की आजच्या काळात माणसांऐवजी मशीन्स आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करणं अधिक सुरक्षित आहे. त्यामुळे शेतीचं भविष्य हे तंत्रज्ञान समृद्ध असणार आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव होण्याआधी शेतकरी आणि मध्यस्थ या नवीन तंत्रज्ञानाचा अंगिकार त्यांच्या सवडीने करत होते. मात्र, आता त्यांना हे कळून चुकलं आहे की ही काळाची गरज आहे. या सर्व प्रक्रियेत स्वस्त डेटा प्लॅन आणि स्वस्त मोबाईल महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
नोकरीत बदल
जगभरातल्या कंपन्या नवीन बिझनेस मॉडलवर मंथन करत आहेत. कोव्हिड नंतरच्या काळात अनेक रोजगार निरर्थक झाले आहेत आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणं गरजेचं होणार आहे.
2030 सालापर्यंत ऑटोमेशनमुळे (यांत्रिकीकरणामुळे )जगभरातल्या जवळपास 14% कामगारांना नवीन रोजगार शोधावा लागेल, असा अंदाज 2017 साली मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्युटने व्यक्त केला होता. मात्र, जागतिक आरोग्य संकटामुळे ही समस्या अधिक गहिरी होत आहे.
तज्ज्ञांच्या मते आता फ्रीलान्स कामाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघितलं जाईल. जिग इकॉनॉमी म्हणजेच कायमस्वरूपी नोकरीऐवजी कंत्राटी, हंगामी, फ्रीलान्स अशा रोजगारावर आधारित अर्थव्यवस्था बळकट होईल आणि जास्तीत जास्त कंपन्या याचा अंगीकार करतील.
'शेफ ऑन कॉल' यासारखे रोजगाराचे नवीन मार्ग अस्तित्वात येतील. संसर्गाच्या भीतीने लोक रेस्टॉरंटमध्ये जाणार नाहीत. रेस्टॉरेंटमधल्या खाण्याची आठवण मात्र होईल. तेव्हा आपल्याच स्वयंपाकघरात रेस्टॉरंटमधला शेफ आला आणि त्याने नवनवीन पदार्थ बनवून खाऊ घातले तर लोक त्याला पसंती देणारच.

फोटो स्रोत, Nikita Deshpande/bbc
सलून, हाऊसकिपींग, समारंभ, फिझियो थेरपी, क्रीडा प्रशिक्षक, कॅशिअर, सुरक्षा कर्मचारी, कोरिओग्राफर्स, नट असे अनेक व्यवसाय असुरक्षित म्हणून बघितले जाऊ लागले आहेत. अनेक कामं आता डिजीटल होऊ लागली आहेत. उदाहरणार्थ योग, नृत्य आणि संगिताचे ऑनलाईन क्लासेस मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. यात लाईव्ह स्ट्रिमिंगचेही पर्याय आता उपलब्ध आहेत.
काही एचआर प्रोफेशनल्सच्या मते नजिकच्या भविष्यात क्लाउड कॉम्प्युटिंग, कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स), मशीन लर्निंग, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा कौशल्य या सर्व कामांसाठी जास्तीत जास्त डेटा इंजीनिअर्स, डेटा अॅनालिस्ट आणि डेटा सायंटिस्ट यांची गरज भासणार आहे. इतकंच नाही तर अशाप्रकारे काम करताना ताण वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात कर्मचाऱ्याची निवड करताना इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता याचाही विचार होईल.
रोबोटिक्स आणि ऑटोमेशन
भारतात 2011 सालापासून रोबोट्सवर काम सुरू झालंय. कोरोना आरोग्य संकटाने त्याला चालना मिळाली आहे. हॉटेल्स, मॉल्स, हॉस्पिटल्स आणि घरातसुद्धा खिडक्या, दारं, लादी पुसणे, एअर डक्ट्स स्वच्छ करणे इतकंच कशाला बागेतलं गवत काढणे, अशा दैनंदिन कामासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावर रोबोट्सची मदत घेतली जाऊ शकते.
मिलॅग्रो रोबोट्स कंपनीचे संस्थापक राजीव करवाल म्हणतात, "अशा रोबोट्ससाठीची मागणी हजार ते दोन हजार टक्क्यांनी वाढली आहे. यापुढे माणसं फक्त हाय व्हॅल्यू जॉब करतील. घर स्वच्छ करणे, यासारखी छोटी कामं रोबोट्सच करतील."
या कंपनीची मिलॅग्रो iMap9 आणि ह्युमनॉईड ELF ही दोन रोबोट्स सध्या नवी दिल्लीतल्या AIIMS हॉस्पिटलमध्ये लादी निर्जंतूक करण्यासाठी वापरली जात आहेत. फोर्टिस, अपोलो आणि मॅक्स अशा मोठ्या हॉस्पिटल्समध्येही या कंपनीने रोबोट्स पुरवले आहेत.

फोटो स्रोत, Nikita Deshpande/bbc
अनेक कंपन्या तर उत्पादनाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठीच ऑटोमॅटिक सेटअप उभारत आहेत. महत्त्वाची कामं तेवढी स्टाफ करतो. उर्वरित छोटी कामं मशीनवर सोपवण्यात आली आहेत.
इतकंच कशाला रिअल इस्टेट क्षेत्रातही बदल बघायला मिळतोय. अनेक बांधकाम व्यावसायिक ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने रहिवाशी किंवा व्यावसायिक मालमत्तेचं शूटिंग करून ग्राहकांना आकर्षित करू पाहत आहेत.
Surveillance
भारत एक असा देश आहे जिथे घरून फार काही काम होत नाही, असा समज आहे. अनेक मॅनेजर्सना वाटतं की कर्मचाऱ्याकडून अधिकाधिक काम करून घ्यायचं असेल तर त्याने ऑफिसमध्ये जास्तीत जास्त वेळ थांबलं पाहिजे.
कोव्हिडोत्तर काळ हा मॅनेजर आणि कर्मचारी यांच्यातल्या विश्वासाच्याही परीक्षेचा काळ असणार आहे. गार्टनर या रिसर्च अँड अॅडव्हायझरी कंपनीचं म्हणणं आहे की आरोग्य संकटामुळे जे कर्मचारी घरून काम करत आहेत त्यापैकी काही जण परिस्थिती निवळल्यानंतरही घरूनच काम करण्याला प्राधान्य देतील, असं इथल्या 74% सीएफओंना वाटतं.
अशाप्रकारे घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक कंपन्या मोबाईल डिव्हाईस मॅनेजमेंट (MDM) यासारख्या सर्विलियंस स्वॉफ्टवेअरमध्येही गुंतवणूक करत आहेत.
InfySec या सायबर सिक्युरिटी कंपनीचे सीईओ विनोद सेंथील यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं होतं, "हे एक प्रि-बिल्ट ट्रॅकिंग मेकॅनिझम आहे. या यंत्रणेच्या मदतीने डेटा वाचता येतो, लॅपटॉपचा स्क्रिन अॅक्सेस करता येतो आणि कुठल्याही डिव्हाईसवरून दुसऱ्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरची संवेदनशील माहिती पुसता येते."

फोटो स्रोत, Nikita Deshpande/bbc
क्रॉसओव्हर हीसुद्धा एक सायबर सिक्युरिटी कंपनी आहे. ही कंपनी असं स्वॉफ्टवेअर बनवते ज्याद्वारे मॅनेजरला सर्व गोष्टींवर लक्ष ठेवता येतं. कर्मचारी किबोर्डवर काय दाबतोय इथपासून ते तो कोणते अॅप्स वापरतोय, इथपर्यंत सगळीकडे मॅनेजर लक्ष ठेवू शकतो. दर दहाव्या मिनिटाला हे स्वॉफ्टवेअर रिपोर्ट तयार करतो. यात कर्मचारी काय करतोय त्याचे वेबकॅमने काढलेले फोटोही असतात.
WorkAnalytics, WorkAnalytics, Destrack, Qumram, iMonit आणि Teramind या कंपन्यांच्याही सर्विलियंस स्वॉफ्टवेअरची मागणी वाढली आहे.
नाव उघड न करण्याच्या अटीवर एका आयटी कर्मचाऱ्याने बीबीसीला सांगितलं, "मी कितीवेळा लघुशंकेला जाते, हेसुद्धा माझ्या मॅनेजरला माहिती असतं. मला हे योग्य वाटत नाही. हे जरा जास्तच होतं नाही का?"
काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळी वेबकॅमेरा सुरू ठेवायलाही सांगितलं आहे. पण हा गोपनीयतेचा भंग नाही का?
असं असलं तरी सर्वसाधारणपणे सर्वच क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनी हेच भविष्यातलं न्यू नॉर्मल असणार आहे, याचा स्वीकार केलेला दिसतो.
(स्टोरी - निधी राय, संपादन - निकिता मंधानी, इलुस्ट्रेशन -निकिता देशपांडे)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









