MPSC टॉपर वसिमा शेख: आईने मोलमजुरी करून शिकवलं, लेकीने उपजिल्हाधिकारी बनून दाखवलं

वसिमा शेख

फोटो स्रोत, Wasima Shaikh

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

शेख वसिमा मेहबूब शेख नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या जोशी सांगवी गावात राहते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा (MPSC) निकाल जाहीर झाला आणि वसिमा शेखने खुल्या प्रवर्गातून महिलांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. गावात वीजेची सुविधा नसलेल्या घरापासून ते आता उपजिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीपर्यंत वसिमाचा प्रवास कसा होता, हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला.

वसिमाच्या घरात एकूण 6 भावंडं. 4 बहिणी, 2 भाऊ आणि आई-वडील. वडिलांचं मानसिक आरोग्य पहिल्यापासूनच बरं नसल्यानं त्यांच्याकडून कोणतंही काम होत नव्हतं. त्यामुळे मग वसिमाची आई मोलमजुरी करून, लोकांच्या इथं भांडीकुंडी करून घर सांभाळायच्या. मोठा भाऊ ऑटो रिक्षा चालवून आईला मदत करायचा.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यांच्या घरात ना लाईटची सुविधा होती, ना पाणी वेळेवर यायचं. शाळेत जाणाऱ्या वसिमाला हे बघून एक चीड निर्माण झाली आणि व्यवस्थेत बदल करण्यासाठी त्यांनी व्यवस्थेतच जागा निर्माण करायचं मनाशी पक्कं केलं. याची सुरुवाती गावातल्या मराठी शाळेपासून झाली.

गावाच्या शाळेत शिक्षण

वसिमा यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण गावातल्या शाळेत झालं. ती सांगते, "माझं 10 वीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं. त्यानंतर 12 किमी अंतरावर कॉलेज होतं. त्यासाठी दररोज 6 किमी पायी चालत जावं लागायचं. अकरावीला नियमितपणे वर्षभर चालत जाऊन कॉलेज केलं मी."

"12वीला मात्र मी एकटीच कॉलेजला जायचे, बाकी मुलींना पालक पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे मग मी माझ्या आजोळी कंधारच्या जवळ बासोटी गाव आहे, तिथं राहिले. बासोटीहून गावाहून कंधार 10 किमी आहे, तिथून बसनं डेली अपडाऊन करायचे."

यानंतर वसिमाने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए केलं आणि त्यानंतर स्पर्धा परिक्षांच्या तयारीची सुरुवात केली.

वसिमा शेख

फोटो स्रोत, Wasima shaikh

ती सांगते "2015ला माझं बीए कम्प्लीट झालं. 2015-16ला मी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला. गावाकडे पुस्तकं, वर्तमानपत्रं नसायची त्यामुळे खूप अडथळा होता. लायब्ररीची सुविधा नव्हती. आमच्या समाजात मुलीवर खूप बंधनं असतात. नांदेडला होते तर तिथं पण लायब्ररीला जात येत नव्हतं. समाजातल्या खूप साऱ्या लोकांचा विरोध होत होता. कारण एक तर मी मुलगी होते हा पहिला मुद्दा, आमच्या समाजात मुलींच्या शिक्षणाला विरोध आहे. मुलींना शिकवण्याची मानसिकताच नाही लोकांची."

आणि दुसरं म्हणजे परंपरेनं लादलेली अनेक बंधनं जसं की पडदा पद्धती आहे, अशा स्थितीत लायब्ररीला जाणं, तिथं पंधरा- पंधरा तास अभ्यास करणं लोकांना पटणारं नव्हतं. त्यामुळे मला नांदेडला अभ्यास करता येत नव्हता."

आपल्या बहिणीची कुचंबना बघून वसिमा यांचा भाऊ शेख इम्रान यांनी त्याचं शिक्षण सोडलं आणि ऑटो रिक्षा चालवायला घेतली. वसिमाला शिक्षण थांबवायचं नव्हतं.

ती सांगते "माझा भाऊ मला म्हणाला की, तू पुण्यात जा, तिथं तुला अभ्यासासाठी चांगलं वातावरण मिळेल. त्यामुळे 2016ला मी पुण्याला गेले. तिथं लायब्ररी जॉईन केली, अभ्यास केला. MPSCच्या पहिल्या प्रयत्नात मी पूर्व परीक्षा पास केली, पण, मुख्य परीक्षेत दोन मार्क्स कमी मिळाले. 2018मध्ये मात्र मला STIची पोस्ट मिळाली आणि मी नागपूरला जॉईन केलं. पण, मला ऑफिस वर्क पेक्षा लोकांमध्ये जाऊन त्यांच्यात मिसळून त्यांचे प्रश्न सोडवायला आवडतं. म्हणून मग मी सर्व्हिस करता करता अभ्यास चालू ठेवला आणि आता मला उप-जिल्हाधिकारी पद मिळालं आहे."

अभ्यास कसा केला?

MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की, नेमका परीक्षेचा अभ्यास कसा करायचा?

वसिमा शेख

फोटो स्रोत, Wasima shaikh

वसिमा सांगते, "MPSCच्या अभ्यासाला आपण ज्यावेळी सुरुवात करतो, तेव्हा खूप जणांना परीक्षेचं स्वरूपच समजत नाही. खरं तर इथं कोणत्याही एका विषयाचं स्पेसिफिक नॉलेज नकोय, तर जनरल नॉलेज गरजेचं आहे. दुसरं म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला काय अपेक्षित आहे, त्यांचा प्रश्न विचारण्याचा कल कसा आहे, कोणत्या अभ्यासक्रमावर कसे प्रश्न विचारले जातात, हे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केल्यावर कळतं आणि बहुतांश लोक तेच करत नाही. विश्लेषण न केल्यामुळे त्यांची अभ्यासाची दिशा चुकते. एकदा का दिशा चुकली की मग ध्येयापर्यंत जाता येत नाही."

"अभ्यासात सातत्य हवं. मी दोनच वर्ष व्यवस्थित अभ्यास केला. दररोज 15 ते 16 तास अभ्यास केला. बहुतांशी विद्यार्थी परीक्षा जवळ आली की अभ्यासाला लागतात, पण असं केल्यानं स्पर्धा परीक्षा पास होता येत नाही, त्यासाठी अभ्यासात सातत्य लागतं, संयम लागतो आणि हार्ड वर्क या तीन गोष्टी असल्या तर मग स्पर्धा परीक्षा पास करणं अवघड नाही."

पण, मग स्पर्धा परीक्षेची तयारीच करायची, असं का वाटलं, असं विचारल्यावर वसिमा सांगते, "मी ज्या वातावरणात सर्वाईव्ह केलं, त्याने मला यासाठी प्रवृत्त केलं. पंधरा वर्षांपूर्वी घरात लाईट नव्हती, कधी पाणी नाही यायचं, अशा परिस्थितीत मी सर्वाईव्ह केलं. सरकारी योजना असतात, पण त्या वेळेवर लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. या गोष्टी कुठंतरी खटकत होत्या. एक साधं प्रमाणपत्र काढाण्यासाठी खूप वेळ लागायचा. 8 दिवसाच्या कामासाठी 1 महिना वाट पाहावी लागायची. या सगळ्या गोष्टींविषयी माझ्या मनात चीड निर्माण झाली होती.

"हे व्यवस्थित व्हायला पाहिजे, असं मनातून वाटत होतं. त्यामुळे मग व्यवस्थेत जाऊन बदल करायचा होतं. एक प्रशासकीय अधिकारी त्याचा एखादा महत्त्वाचा निर्णय लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणू शकतो. त्यानं फक्त लोकाभिमुख निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं असतं, हे मी काही उदाहरणांमधून अनुभवत होते."

मुलगी म्हणून काय अडचणी आल्या?

एखादी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी जेव्हा घरापासून दूर जाऊन पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यास करायचा म्हणते, तर तिला विरोध केला जातो, असं वसिमा यांचं मत आहे.

वसिमा शेख

फोटो स्रोत, Wasima shaikh

याविषयी ती सांगते, "आमच्या समाजात तर घरातून बाहेर पडायची परवानगी नाही, अशा परिस्थितीत शिक्षण घ्यायला किती अडचणी येऊ शकतात, याची तुम्ही कल्पना करू शकता. मला सुरुवातीला खूप लोकांनी विरोध केला, माझ्या शिक्षणामुळे आई-वडिलांना, भावांना समाजाचं बोलणं खावं लागायचं.

"मी 2016ला पुण्यात गेले आणि 2018च्या जूनमध्ये गावात परत आले. अडीच वर्षं मी गावात आलेच नाही. जेव्हा मला STIचं पद मिळालं, तेव्हाच मी गावात आहे. कारण मी आले असते तर घरच्यांना पुन्हा त्याचं प्रश्नांना सामोरं जावं लागलं असतं. आणि कसं असतं लोकांना आपण जेव्हा चमत्कार दाखवतो, तेव्हाच नमस्कार केला जातो."

मुस्लीम समाजातल्या मुलींसाठी शिक्षण का महत्त्वाचं?

शिक्षण हा असा मार्ग आहे, ज्यातून एक व्यक्तिमत्व घडतं. आयुष्य बदलण्याची ताकद आहे शिक्षणात. यासाठी आमच्या समाजातल्या मुलींनी शिकायला हवं. यासाठी लोकांनीही मानसिकता बदलायला हवी, असं वसिमा यांचं स्पष्ट मत आहे.

त्या म्हणतात, "आमच्या समाजात पालकांचा कल धार्मिक शिक्षणाकडे असतो. पण, माझ्या पालकांनी मला मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकवलं. हा त्यांचा खूप महत्त्वाचा निर्णय होता. बहुतांशी पालकांचा निर्णय कुठंतरी चुकतो."

आता पुढच्या एक ते दोन महिन्यांत वसिमा यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल आणि त्या उपजिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतील.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्याची त्यांची इच्छा आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)