तुम्ही कसे आहात, या प्रश्नाला आपण खरंच 'खरं' उत्तर का देत नाही?

फोटो स्रोत, Getty Images
एक मग दुसऱ्या मगाला म्हणाला, काय मग कसं काय? हा विनोद आपण कितीतरी वेळा आयुष्यात ऐकला असेल. पण याचं उत्तर? त्याचा कधी विचार केलाय? तुम्हाला जेव्हा कोणी विचारतं, कशी आहेस, तुम्ही खरंच खरं उत्तर देता?
किती वेळा तुम्ही खरंच सांगता, की मला खूप त्रास होतोय, मी रात्रभर रडून उठलोय. दिवसेंदिवस, महिने लोक सहन करत राहातात, एकावर एक मुखवटे घालून जगाला तोंड देत राहतात.
काही तगतात, काही जगतात तर काही वाहून जातात. कुठूनतरी एखादा बळी पडल्याची बातमी येते आणि जीवाला चटका लागतो...का बोलत नाहीत ही माणसं?
अर्थात बोलावं न बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न, त्यातून सापडणारे उपायात हा पुढचा. पण पहिली पायरी बोलण्याची, खरं बोलण्याची. आपण खरंच का खरं बोलत नाही? आम्ही काही मानसोपचारतज्ज्ञांशी बोललो. त्यांच्या बोलण्यातून बीबीसी मराठीने या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. आणि काही उपाय शोधण्याचाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
डॉ. तेजस्विनी कुलकर्णी म्हणाल्या आपल्या खऱ्या भावना लपवण्यामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत. अज्ञान, भीती, कलंक, समाजमान्यता, विश्वास, कौटुंबिक जडणघडण अशा अनेक मुद्द्यांचा त्यात समावेश होतो.
याबद्दल आम्ही डॉ. अपूर्वा देशपांडे यांच्याशीही बोललो. या दोघींच्या बोलण्यातून आम्हाला काही कारणं सापडली ती अशी.
तुम्ही कसे आहात? याला आपण खरंच 'खरं' उत्तर का देत नाही?
शिकवण: लहानपणापासून नेहमी जगासमोर सगळं छान, सुंदर, आनंदी चित्र रंगवण्याची, सगळ उत्तम चालू आहे असं दाखवण्याची शिकवण आपल्याला दिली जाते. सध्या सोशल मीडियामुळे तर याचा अतिरेक झालाय.
सकारत्मकतेचा विचार आपल्यावर नेहमीच बिंबवला जातो. पण त्यामुळे नकारात्मक विचार व्यक्त करायला माणूस घाबरतो. अशा परिस्थितीत आपल्याला काही दुखतंय, काही त्रास होतोय, काही अपयश आलंय हे दाखवणं माणसाला कमीपणाचं वाटतं, न्यूनगंड वाटतो.
समाजभय: लोक काय म्हणतील ही माणसाच्या मनातली सर्वांत मोठी भीती. यातूनच तो स्वतःच्या प्रस्थापित प्रतिमेच्या पलीकडे जाण्यास धजावत नाही, मदत मागायला घाबरतो.
यातून आपल्याला कमीपणा येईल, समाज हसेल, आपल्याला कमी लेखेल, आपल्या करियरवर परिणाम होईल अशा भावना व्यक्तीला असुरक्षित करतात.
स्वत:ला व्यक्त न करता येणे: भावना जाणून घेऊन त्याचं योग्य विश्लेषण करून मगच व्यक्त होणं याला self expression म्हणतात. सुदृढ मानसिक आरोग्यासाठी हे गरजेचं आहे.
दुर्दैवाने आपल्याला आपल्या भावना जाणून कशा घायच्या याचं शिक्षण कुठेही दिल जात नाही. भावना योग्य रीतीने व्यक्त न केल्यामुळे त्या नीट पोहोचत नाहीत आणि त्यातून गैरसमज निर्माण होतात. यातून मग आपण भावना लपवायला लागतो.

फोटो स्रोत, THINKSTOCK
अपेक्षा: अनेकदा आपल्या समस्येसाठी आपण दुसऱ्या व्यक्तीकडे जातो. आपल्याला पटेल असा उपाय त्या व्यक्तीने सांगावा अशी आपली सुप्त अपेक्षा असते. तो मिळेपर्यंत आपण मात्र अनेकदा या बाबतीत अपेक्षाभंग होतो, समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. असे वारंवार घडल्यास माणूस हळूहळू स्वतःला व्यक्त करणं बंद करतो.
नातेसंबंध: समोरच्या व्यक्तीशी आपले नातेसंबंध कसे आहेत, त्यांच्यावर आपला किती विश्वास आहे आणि त्या व्यक्तीचं आपल्याविषयी मत काय यावरही तुमच्या प्रश्नाचं उत्तर ठरतं. सहसा, शांतपणे ऐकून कुठलाही मत न मांडणाऱ्या व्यक्तींकडे लोक खरं बोलायची शक्यता जास्त असते.
यावर आणखी उपाययोजना काय करता येतील?
डॉ.तेजस्विनी कुलकर्णी मनाच्या स्वच्छतेबद्दल सांगतात. जसं शरीराला तंदुरुस्त राहण्यासाठी चांगला आहार व व्यायाम महत्त्वाचा, तसंच मनासाठीही तो योग्य आहार आणि मनाचा व्यायाम गरजेचा असतो. यासोबतच त्या असंही म्हणतात की,
"कुठल्याही मानसिक आजार किंवा समस्येवर इलाज करण्याआधी स्वतः ला समजून घेणं, आपल्यासोबत नक्की काय होतंय हे डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याची स्वीकार करणं(acceptance) महत्त्वाचं.
आपल्यालाही काही त्रास होऊ शकतो, तो त्रास होणं म्हणजे माझ्यात काहीतरी कमतरता आहे असं मुळीच नाही ही जाणीव ठेवली आणि त्यावर आपल्याला इलाज कारायचा आहे हे मनापासून स्वीकारलं की पुढचा मार्ग सोपा होतो.
ही स्वीकृती समाजाकडूनही अपेक्षित आहे. किंबहुना आपण वैयक्तिक पातळीवर आणि समाज म्हणून जितके non-judgemental राहू शकू तितकी ती स्वीकृती सोपी होईल.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या भावना समजून घेण्यासाठी स्वतःला पुरेसा वेळ देणही गरजेचं आहे. स्वतःहून उकल होत नसेल तर त्यासाठी मदत घेण्याला आपण प्रोत्साहन द्यायला हवं. आपल्याला अमुक एक त्रास होतो आहे, असं नाव देण्याची घाई करू नये. मानसिक आजारांची व्याप्ती खूप मोठी आहे.
या लढ्यामध्ये समाजाची भूमिकाही महत्त्वाची. त्या व्यक्तीचं ऐकून घेणं, चटकन मत व्यक्त न करणं, बोलत राहणं, आपल्या जीवलगांच्या वागण्यातील लहानसहान बदल टिपणं, त्यांच्या मनस्वास्थ्याबद्दल सजग राहाणं अशा छोट्या छोट्या गोष्टी व्यक्तीच्या मनस्वास्थ्यासाठी सहायक ठरतात. बदलत्या समाजात मानसिक आजार अपरिहार्य आहेत. त्याबद्दल जागरूक असणं आवश्यक आहे. त्यासोबतच मनाच्या प्रतिकारशक्तीचाही विचार व्हायला हवा.
मानसिक आजाराला बळी पडल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा त्याबद्दल सजग राहून आपण मानसिकरित्या कणखर बनून आपली psychological immunity वाढवणं ही काळाची गरज आहे."
थोडक्यात काय, आपल्या भावना समजून घ्या, त्यांच्याशी प्रामाणिक राहा, एकमेकांची काळजी घ्या, मित्रांना मदत करा... आणि जेव्हा कोणी विचारेल कसे आहात ... खरंच 'खरं' सांगा, तुमच्या आणि त्यांच्या चांगल्यासाठी!
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








