कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जातीभेदाच्या भिंती कोसळू लागल्या आहेत?

फोटो स्रोत, Robert nickelsberg
- Author, बद्री नारायण
- Role, बीबीसी हिंदीसाठी
भारतात कोरोना विषाणूने जातीला थोडं मागे सारत 'संसर्गाच्या काळजीने ग्रासलेल्या देहा'ला केंद्रस्थानी आणलं आहे.
प्रयागराज इथल्या गोविंद वल्लभ पंत सामाजिक विज्ञान संस्थेच्या आमच्या टीमने 'आपत्ती काळातील जातीभेद' या विषयाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.
कोरोना विषाणूच्या जागतिक संकटकाळात प्रवासी मजूर लॉकडाऊनमुळे नोकरी गमावल्यानंतर दिल्ली, मुंबई, सूरतसारख्या मोठ्या शहरातून पायी, ट्रकमधून आणि शेवटी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या बस आणि रेल्वेगाड्यातून आपापल्या गावी परतले.
गावी परतल्यानंतर या सर्वांनी 14 दिवस सामूहिक क्वारंटाईमध्ये घालवले. तर काही जण होम क्वारंटाईमध्ये होते. आम्ही यातल्या अनेकांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीतून जे निष्कर्ष निघाले त्या आधारे आम्ही म्हणू शकतो की, सध्या सामाजिक भेदाचा आधार जातीय उतरंडीऐवजी शरीर हा आहे.
अस्पृश्यता आता जातीवर अवलंबून नाही
जातीवर आधारित अस्पृश्यतेला सध्या आपल्या समाजात दुय्यम स्थान असल्याचं दिसतंय. आज संक्रमणकाळात एकमेकांमधलं सामाजिक अंतर जातीच्या नव्हे तर व्यक्तीच्या एका देहापासून दुसऱ्या देहातल्या अंतराच्या रुपात समोर येतंय.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

प्रवासी मजूर ज्यांना गावात 'परदेसी' म्हणतात, ते आज गावात कोरोनाचे प्रतीक बनले आहेत. 'परदेसी' कुठल्याही जातीचा असला तरी आज लोक कमीत कमी 14 दिवस आणि त्यानंतरही बराच काळ त्याच्या जवळ जात नाहीत. त्याचा स्पर्श होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
प्रवासी मजूर स्वतःही लोकांपासून दूरच राहण्याचा प्रयत्न करतो. सकाळी शेतात जाताना वाटेत असा कुणी 'परदेसी' भेटू नये, अशी भीती सध्या गावकऱ्यांच्या मनात बघायला मिळतेय.
अनेक ठिकाणी तर होम क्वारंटाईन असणाऱ्या मजुरांना पत्नीही जेवणाचं ताट हातात देण्याऐवजी दुरूनच त्यांच्याकडे सरकवते.
मुलांनी वडिलांना स्पर्श करायला नको, याचीही काळजी तिला असते. हा एक विचित्र मानवी अनुभव आहे.
ब्राह्मण समाजातल्या मुलाला जातीतल्या लोकांकडून टक्केटोमणे
उत्तर प्रदेशातल्या बुंदेलखंडमधल्या एका गावात मुंबईहून आलेला ब्राह्मण समाजातला एक मुलगा होम क्वारंटाईनमध्ये होता.

फोटो स्रोत, Getty Images
आपला अनुभव सांगताना हा तरुण म्हणतो की, चुकून कधी घराबाहेर पडलो तरी वस्तीतले त्याच्याच जातीतले लोक त्याला ओरडतात. कोरोना पसरवू नको, अशी बोलणी ऐकावी लागतात.
संध्याकाळी शेताकडे जायला निघालो की, लोक 'कोरोना-कोरोना' म्हणून हिणवतात, असंही या तरुणाने सांगितलं.
पत्नीला पाणी भरण्यापासून रोखलं
या तरुणाच्या पत्नीशीही आमच्या पथकातल्या सदस्याने संवाद साधला. यावेळी बोलताना तिने सांगितलं की, तिला हँडपम्पावर पाणी भरण्यापासूनही रोखण्यात आलं. तिला पाणी भरायला मज्जाव करणारे तिच्याच जातीचे होते. तुझा नवरा अजून क्वारंटाईनमध्ये आहे. तू हँडपम्पाला स्पर्श केला तर संपूर्ण वस्तीत कोरोना पसरण्याची भीती असल्याचं लोकांचं म्हणणं होतं.
खोलात जाऊन विचार केला तर ही अस्पृश्यता काही दिवसांसाठी असली तरी याची बोच जातीय अस्पृश्यतेपेक्षा कमी नाही.

फोटो स्रोत, NArinder nanu
लोकांना प्रवासी मजुराच्या देहापासून किंवा संसर्ग झाल्याचा संशय असणाऱ्यांच्या देहापासून आपल्यालाही कोरोनाची लागण होऊन आपला मृत्यू ओढावेल, अशी भीती वाटते.
मृत्यूची ही भीती 'जातआधारित शुद्धता गमावण्याच्या भीतीपेक्षा' कमी क्लेषकारी घृणा निर्माण करत असेल का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
आपत्ती काळात बदलत्या रुढी-परंपरा
कुठल्याही आपत्ती काळात पूर्वापार चालत आलेल्या रुढी-परंपरा जरा सैल होत जातात. काही मोडतात, तर काही नवं रुप धारण करतात.
कोरोनाच्या भीतीने भारतीय गावांमधली जातीय समीकरणं कोलमडली आहेत. हे सगळं तात्पुरतं असलं तरीसुद्धा यातून येणारा सामाजिक अनुभव भारतीय समाजातल्या जातीभेदाला काही प्रमाणात का होईना कमी करू शकतो.
बिहारमधल्या समस्तीपूर जिल्ह्यातल्या एका गावात एक सवर्ण तरुण लॉकडाऊनमध्ये कोलकात्याहून परतला.

फोटो स्रोत, PAcific press
गावी परतल्यावर सामूहिक क्वारंटाईनऐवजी तो थेट घरी गेला. मात्र, याविरोधात लोकांनी आवाज उठवला. विशेष म्हणजे त्या गावातल्या दलित समाजाने हा आवाज उठवला.
या विरोधाला गावातल्या इतर सवर्णांनीही पाठिंबा दिला. कारण संसर्ग जात बघून होत नाही आणि संसर्गाची भीती लोकांमध्ये एकी निर्माण करतो.
खाण्याचं पॅकेट देणाऱ्याची जात विचारली नाही
काही प्रवाशांनी आपला अनुभव कथन करताना सांगितलं की, हे संकट सुरू झाल्यानंतर सुखरूप गावी कसं पोहोचता येईल, एवढीच एकमेव चिंता लागून होती.
आमच्या एका प्रश्नावर जवळपास सर्वच सवर्ण, मागास आणि दलित जातीतल्या प्रवासी मजुरांनी सांगितलं की, लॉकडाऊननंतर जेव्हा संकट कोसळलं तेव्हा आम्हाला जात आठवली नाही, तर गाव आणि गावात असलेलं आपलं कुटुंब एवढंच फक्त आठवलं.
पायी घराची वाट धरल्यानतंर वाटेत जो कुणी खायला किंवा प्यायला देई, आम्ही गुपचूप ते घेत असू. जेवण देणारा कुठल्या जातीचा आहे, त्याचा धर्म काय, याचा विचारही आमच्या मनात येत नव्हता.
जात आधारित रुढी-परंपरा पुन्हा डोकं वर काढणार का?
प्रवासी मजुरांशी चर्चा केल्यानंतर हा प्रश्न पडतो की कोरोना संकटामुळे जात आधारित रुढी-परंपरांमध्ये जे सकारात्मक बदल, लवचिकता दिसतेय ती संकट टळल्यानंतर संपणार का?तशी दाट शक्यता आहे. कारण आता येणारा अनुभव हा आपत्ती काळातील सामाजिक अनुभव आहे.
मात्र, अशाप्रकारचा कुठलाही सामाजिक अनुभव आपल्या स्मृतीमध्ये अशी आठवण ठेवून जातो जी गरज पडल्यावर नकारात्मक भाव असणाऱ्या जातीभेदाच्या भावनेला दुबळं करून मानवतेचा भाव प्रभावी करते.
कोरोना काळात काही ठिकाणी जातीय अस्पृश्यतेच्या काही घटना घडल्या आहेच. हे खरं आहे. मात्र, त्यासोबतच जातीय अस्पृश्यता दूर सारणाऱ्या आणि मानवतेची चुणूक दाखवणाऱ्या अनेक घटनाही याच कोरोना काळात आपल्या आसपास घडल्या आहेत.
यादेखील संचित आणि संकलित करून आपण भारतीय समाजाकडे परंपरागत चौकटीपेक्षा दूर जाऊन वेगळ्या दृष्टीकोनातून बघू आणि समजून घेऊ शकतो.
(बद्री नारायण, जी. बी. पंत सोशल सायन्स इन्स्टिट्युटचे संचालक आहेत. ही संस्था अलाहबाद केंद्रीय विद्यापीठाची एक घटक संस्था आहे.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








