कोरोना लॉकडाऊन: मुंबई लोकल कधी सुरू होणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. कंपनीतील 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावर येऊ देण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल रेल्वे अजून सुरू करण्यात आलेली नाही.
ऐरवी दररोज 75 लाख प्रवासी लोकल ट्रेननं प्रवास करतात. मुंबईतच नाही, तर लंडन, न्यूयॉर्क, टोकिओ अशा शहरांतही सर्वसामान्य लोक मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून असतात.
राज्य सरकार लोकल सुरू करण्याची मागणी का करत आहे?
8 जूनपासून मोठ्या संख्येने प्रवासी एसटी, बेस्ट आणि स्थानिक बस सेवेतून प्रवास करत आहेत. पण डोंबिवली, नवी मुंबई, कामोठे, भाईंदर आणि मुंबई शहरातील अनेक बस स्थानकांवर लोकांनी मोठी गर्दी केली. म्हणजेच फिजिकल डिस्टंसिंग न पाळता लोकं प्रवास करताना दिसून येत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी लोकल रेल्वे सुरू करण्याची मागणी राज्य सरकारने केलीय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे मुंबईत लोकल रेल्वे सुरू करण्याची मागणी केलीय. लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशी बसमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा सुरू होणं गरजेचं असल्याचं ते म्हणालेत.
तसंच परिवहन मंत्री अनिल परबही लोकल रेल्वे सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. बेस्ट प्रशासनाने 8 जूनपासून आपली बस सेवा पूर्ववत केली आहे. त्या पार्श्वभूमीवर परब यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे ही मागणी केली.
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या मोजक्या फेऱ्या
मध्य, पश्चिम आणि हार्बर या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरुन प्रवास करणारे प्रवासी सध्या हतबल आहेत. त्यात डॉक्टर्स, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, माध्यमकर्मी अशा अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या हजारो प्रवाशांची प्रचंड अडचण होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
22 मार्चला भारतीय रेल्वे प्रशासनानं देशभरातली प्रवासी रेल्वे वाहतूक स्थगित केल्याचं जाहीर केलं. पण आता गेल्या काही दिवसांत श्रमिक एक्सप्रेस आणि विशेष राजधानी ट्रेन्स सुरू केल्या आहेत.
मध्य आणि हार्बर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंह यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "मुंबईची लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयच घेऊ शकते. झोनल विभागात हा निर्णय घेतला जाणार नाही. सध्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कर्जत ते सीएसएमटी, कसारा ते सीएसएमटी, पनवेल ते सीएसएमटी, कल्याण ते कसारा अशी शटल रेल्वे सेवा सुरू आहे. दिवसभरात शटल रेल्वेच्या 12 फेऱ्या होतात."
लोकलची ही सेवा केवळ रेल्वे कर्मचारी,गार्ड्स, मोटरमन यांच्यासाठी असल्याचंही रेल्वेने स्पष्ट केले.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

केंद्राचा सध्यातरी लोकल सुरू करण्यास नकार?
मुंबईत रेल्वेत होणारी गर्दी पाहता लोकल सुरू करण्यापूर्वी खबरदारी म्हणून नियोजन आणि नियमांची कडक अंमलबजावणी करावी लागणार आहेत.
राज्य सरकारकडून वारंवार मागणी करुनही केंद्रीय रेल्वे मंत्रालय याबाबत प्रतिसाद देत नाहीय. त्यामुळे केंद्राकडून लोकल सुरू करण्याचा निर्णय तर सोडाच पण प्राथमिक पाहणी आणि तयारीही अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
"आम्हाला जोपर्यंत केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि गृह विभागाच्या सूचना येत नाहीत तोपर्यंत आम्ही काहीही पावलं उचलू शकत नाही. अद्याप कुठलीही तयारी सुरू केलेली नाही. अधिकृत आदेश येईपर्यंत काहीच करता येणार नाही." असं स्पष्टीकरण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिले.
पावसाळ्यात लोकल सुरू करणं धोकादायक?
कोरोनाचे संकट मुंबईकरांसमोर असताना खबरदारीचे सर्व नियम धुडकावून गर्दीत प्रवास करणं धोकादयक ठरू शकतं. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग नियम पाळूनच लोकलमध्येही प्रवास करणं प्रशासकीय यंत्रणांना अपेक्षित आहे.
केवळ अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरू केली तरी सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे आव्हान रेल्वेसमोर आहे. दुसरे मोठे आव्हान म्हणजे ऐन पावसाळ्यात रेल्वे कशी सुरू करणार?

फोटो स्रोत, Getty Images
पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचते,गाड्या रेल्वे मार्गावर मध्येच थांबतात,रेल्वे रद्द झाल्याने गर्दी होते अशात फिजिकल डिस्टंसिंग, मास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायजर हे सगळं अमलात आणणं रेल्वे प्रशासन आणि प्रवासी दोघांसाठी डोकेदुखी ठरणारं आहे.
"रेल्वे सुरू करण्याबाबत आम्हाला कोणतेही आदेश नाहीत. जेव्हा आदेश येतील तेव्हा तयारी करू आणि लोकल सुरू करू. केंद्रीय पातळीवर चर्चा होत असेल तर त्याबाबत आम्हाला कल्पना नाही," अशी माहिती पश्चिम रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








