निसर्ग चक्रीवादळ : उद्धव ठाकरे सरकार वादळाचा तडाखा बसलेल्या कोकणाला मदत देण्यात कमी पडतंय?

फोटो स्रोत, Twitter/@CMOMaharashtra
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड मोठं नुकसान झाले आहे. घरं, शेती, फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. या परिस्थितीत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत पुरेशी नसल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
भाजपने कोल्हापूर,सांगलीची पूरपरिस्थिती यशस्वीरित्या हाताळली होती. आम्हाला नैसर्गिक आपत्तीचा अनुभव आहे. पण कोकणातली परिस्थिती हाताळण्यात सरकार कमी पडतंय, असाही आरोप फडणवीसांनी केला आहे.
राज्य सरकारकडून अद्याप नुकसान भरपाई दिली गेली नसून तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. रायगडला 100 कोटी रुपये तर रत्नागिरीला 75 कोटी, सिंधुदुर्गाला 25 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आलीये.
सरकारची मदत अपुरी ?
"राज्य सरकारने रायगडसाठी 100 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. पण सरकार टप्प्याटप्प्यात मदत पाठवत आहे. पूर्ण रक्कम अजून आलेली नाही," अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली. त्यामुळे सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या तातडीच्या मदतीबाबतही शंका उपस्थित करण्यात येत आहे.
"आम्ही सरकारला जशी मदत हवीय तसा प्रस्ताव पाठवत आहोत. पंचनाम्याचेही काम सुरू आहे. 250 कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे," अशी मीहिती चौधरी यांनी दिली. त्यामुळे ही मदत किती लवकर मिळणार हा खरा प्रश्न आहे.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
रायगडच नव्हे तर रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रचंड नुकसान झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात फळबागांची संख्या मोठी आहे. पर्यटनाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात आहे. चक्रीवादळाने आंबा,काजू,सुपारी बागायतदारांचे पुढच्या 20 वर्षांचे नुकसान केले आहे.

"त्यामुळे सरकारी मदत ही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच गावांमध्ये होऊ शकते. रत्नागिरीसाठी 75 कोटी म्हणजे पाच गावांनाही पुरेशी न ठरणारी मदत आहे. बागायतदारांसोबत कोळी बांधवांची घरही पडली आहेत. प्रत्येक घर कोसळले आहे." अशी टीका स्थानिक पत्रकार प्रणव पोळेकर यांनी केलीय.
कोकण अजूनही अंधारात
चक्रीवादळाने कोकणाचे अतोनात नुकसान केले आहे. चार दिवस उलटले तरी अनेक गावांपर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहचलेल्या नाहीत. 50% रायगड जिल्हा आजही अंधारात आहे.
"1100 गावांमध्ये आजही वीज पुरवठा खंडित आहे. आतापर्यंत 786 गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान सर्वात मोठे आहे," अशी माहिती निधी चौधरी यांनी दिली.
रत्नागिरी, सिंधुदुर्गातही चक्रीवादळाचा तडाखा बसला असून काही भागांमधले सर्व विजेचे खांब पडले आहेत. प्रशासनालाही अशा गावांमध्ये पोहचणे आणि त्याठिकाणची प्राथमिक माहिती घेण्यात अजून यश आलेले नाही.

"वीज नसल्याने गावे अंधारात आहेत. फोनवरुनही संपर्क होत नाहीय. वीजेचे खांब बसवण्यासाठी सांगली,कोल्हापूर,सातारा या भागांमधून महावितरणाची पथके बोलवण्यात आली आहेत. प्रत्येक खांब उभा करुन त्यातल्या तांत्रिक बाबी हाताळण्यात बराच वेळ जातोय," अशी माहिती स्थानिक पत्रकार प्रणव पोळेकर यांनी दिली.
पंचनामे प्रलंबित
नैसर्गिक आपत्तीनंतर पंचनामे झाल्यावर नुकसान भरपाई देण्यात येते. पण प्रशासनाकडून अद्याप पंचनामेही पूर्ण करण्यात आलेले नाहीत.
"आजही अनेक गावांमध्ये प्रशासकीय यंत्रणेचा संपर्क झालेला नाही. सुरुवातीचे दोन दिवस तर रस्त्यांचा तुटलेला संपर्क आणि त्यावर पडलेली झाडं बाजूला सारण्यातच गेले," अशी माहिती पत्रकार हर्षद कशाळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
या परिस्थितीमुळे अर्थातच पंचनामा करण्यास उशीर होत आहे. याविषयी बोलताना चौधरी सांगत होत्या, "रायगडमध्ये 70% पंचनामे झाले आहेत. मनुष्यबळासाठी पालघर,ठाणे,विरार या भागांमधून पथकं आले आहेत."

फोटो स्रोत, ANI
प्रत्येकच गावात नुकसान झाल्याने रायगडसहीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातही मनुष्यबळ अपुरे पडत आहे.
पंचनामे करताना स्थानिकांना विश्वासात घ्या, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
पंचनामे तातडीने करण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
घराघरात नुकसान झाल्याने प्रत्येक ठिकामी पंचनामे करण्यासाठी तलाठ्यांचे मनुष्यबळ कमी आहे. प्रत्येक गावात एक किंवा दोन तलाठी आहेत.
भाजपकडून पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात चक्रीवादळाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
विशेषत: महाविकास आघाडीचे नेतृत्व म्हणजेच उद्धव ठाकरे अनुभवी नसल्याचा उल्लेख करण्यात येतो. कोकणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीला हाताळण्यात सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
सरकारने कशापद्धतीने परिस्थिती हाताळायला हवी हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर,सांगली,कोकणातली पूरपरिस्थिती कशी हाताळली याचे दाखले दिले. आम्हाला अशी परिस्थिती हाताळण्याचा अनुभव आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
"आर्थिक मदत द्यायला उशीर होतोय. लोकांना थेट रोख रक्कम द्यायला हवी होती. नुकसान भरपाई देण्यास उशीर होत असल्यामुळे लोकांना अडचणी येत आहेत," असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
शिवाय, शरद पवार सरकारला सूचना देतील हे वक्तव्य करत त्यांनी पुन्हा एकदा सरकारचे नेतृत्व अनुभवी नाही हे रेखाटण्याचा प्रयत्न केला. "पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, परिस्थितीचे गांभीर्य समजून ते योग्य त्या सूचना सरकारला करतील अशी मला खात्री आहे." असंही फडणवीस म्हणाले.
चक्रीवादळाशी लढायला भाजपचे कार्यकर्ते उभे करायचे का ?
भाजपच्या टीकेला महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय.
बीबीसी मराठीशी बोलताना मलिक यांनी म्हटलं, "भाजपकडे सध्या टीका करण्याशिवाय दुसरे काहीही काम नाही. चक्रीवादळ हे मोठं होतं. ती नैसर्गिक आपत्ती आहे. आम्ही तातडीची मदत जाहीर केलीय. आता चक्रीवादळाशी लढायला भाजपचे कार्यकर्ते उभे करायचे का ?"
महाविकास आघाडीत तीन राजकीय पक्ष आहेत. पण तरीही भाजपकडून सर्वाधिक टीका आणि आरोप हे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर होताना दिसतात.
"भाजपचं दुखणं काँग्रेस,राष्ट्रवादी नाहीय. त्यांचं दुखणं शिवसेना आहे. शिवाय, सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडे असल्याने सतत मुख्यमंत्र्यांवर टीका करणे ही विरोधकांची रणनीती असू शकते," असं विश्लेषण राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केले.
गेल्या दोन महिन्यांत राज्यापालांची भेट घेणे असो वा कोरोना रूग्णांच्या आकडेवारीबद्दल टीका करणं, परीक्षा रद्द केल्याचा निर्णय असो भाजपकडून देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांच्याकडून विविध मुद्यांवर शिवसेनेवरच टीका करण्यात येत आहे.
सरकारच्या उपाययोजना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरंसिगद्वारे प्रशासन आणि मंत्र्यांची बैठक घेतली.
पंचनामे करण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. नुकसान भरपाईची काही आगाऊ रक्कम जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात देऊन पंचनामे होताच ती देण्यात येईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी, तांत्रिक दुरुस्त्या करण्यासाठी अनुभव असलेल्या कंपन्यांकडून काम करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

राज्य सरकार नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईसाठीचे नवे सुधारित निकष आणणार आहे. जुने निकष बदलण्यासाठी प्रशासनाकडून माहिती मागवण्यात आली आहे.
कोकण किनारपट्टीवर कायमस्वरूपी सुरक्षितरित्या निवारे उभारता येतील का, हे विचाराधीन आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








