अजित जोगीः प्राध्यापक, IPS, IAS ते काँग्रेसचा बंडखोर नेता आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री

फोटो स्रोत, AJIT JOGI FB
- Author, आलोक प्रकाश पुतुल
- Role, रायपूरहून, बीबीसी हिंदीसाठी
छत्तीसगड राज्याचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचं शुक्रवारी रायपूरमधल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झालं.
9 मे रोजी एका फळाची बी त्यांच्या श्वासनलिकेमध्ये अडकली होती. यानंतर कार्डिअॅक स्ट्रोक आल्याने त्यांना रायपूरमधल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
प्राध्यापक, IPS, IAS, खासदार आणि मुख्यमंत्री अशी विविध पदं भूषवणारे अजित जोगी गेली 16 वर्षं व्हीलचेअरवर होते.
एका अपघातानंतर त्यांच्या शरीराचा कमरेच्या खालच्या भाग निकामी झाला होता. मात्र प्रबळ इच्छाशक्ती आणि मनौधैर्यामुळे ते शेवटपर्यंत चर्चेत राहिले.
अजित जोगी यांचा जन्म 21 एप्रिल 1946 रोजी छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये झाला. भोपाळमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती.
त्यानंतर काही काळ त्यांनी रायपूर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली. यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवांच्या परीक्षा दिल्या आणि ते IPS साठी निवडले गेले. दीड वर्षं ही सेवा केल्यानंतर त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि IAS साठी निवडले गेले.
अजित जोगी स्वतःला आदिवासी मानायचे, पण त्यांनी स्वतः कधी आरक्षणाचा फायदा घेतला नाही. गेली अनेक वर्षं त्यांची जात कोणती, यावरून वाद सुरू होता. अजूनही हे प्रकरण न्यायालयात आहे.
पूर्वीच्या मध्य प्रदेशातल्या विविध जिल्ह्यांमध्ये अजित जोगी 14 वर्षं कलेक्टर होते. तेव्हाचे मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांच्या जवळच्या लोकांपैकी ते एक होते. त्यांच्या आणि राजीव गांधींच्या सल्ल्यावरूनच त्यांनी नोकरी सोडली आणि काँग्रेस पक्षातर्फे राज्यसभा सदस्य झाले.

फोटो स्रोत, AJIT JOGI FB
1998 मध्ये त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि ते संसदेत गेले. पण 1999 मध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
त्यानंतर 2000 साली छत्तीसगड हे वेगळं राज्य स्थापन करण्यात आलं आणि अजित जोगी या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.
दुर्घटना
निवडणूक प्रचारादरम्यान अजित जोगी यांना 20 एप्रिल 2004 रोजी अपघात झाला आणि यात ते गंभीर जखमी झाले. यामध्ये त्यांच्या शरीराचा कमरेच्या खालचा भाग अधू झाला. तेव्हापासून ते व्हीलचेअरवर होते.
पण त्यांच्या राजकारणावर मात्र यामुळे परिणाम झाला नाही. 2008च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यातल्या मोठ्या नेत्यांनी मिळून जितके दौरे केले होते, त्यापेक्षा जास्त दौरे आणि भाषणं एकट्या अजित जोगींनी व्हीलचेअरवरून केली होती.
या सगळ्या प्रवासात त्यांनी कथा-कविता, सामाजिक विषयांवरचं वाचन-लेखन कधीच सोडलं नाही. या दरम्यान त्यांची पत्नी डॉ. रेणू जोगी आणि मुलगा अमित जोगी, हे देखील राजकारणात उतरले आणि निवडूनही आले.

फोटो स्रोत, AJIT JOGI FB
तब्बल 16 वर्षं छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोणीही असलं तरी निर्णायक भूमिका अजित जोगींची असायची.
पण नंतर भूपेश बघेल आणि टी. एस. सिंहदेव या जोडीने आपलं वर्चस्व वाढवलं आणि छत्तीसगडमधल्या काँग्रेस नेत्यांमध्ये धुसफूस व्हायला लागली.
छत्तीसगड जनता काँग्रेस
यानंतर अजित जोगींनी स्वतः काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला, आणि 23 जून 2016 ला छत्तीसगड जनता काँग्रेसची स्थापना केली.
त्यांच्या पक्षाला राज्यात सरकार बनवता आलं नाही तरी राज्याचं सरकार तयार करण्यात अजित जोगींची निर्णायक भूमिका असेल, असं त्यांच्या लोकप्रियतेमुळे मानलं जात होतं.
2018 साली त्यांच्या पक्षाने बहुजन समाज पार्टीशी हातमिळवणी करत विधानसभा निवडणूक लढवली. पण यामध्ये अजित जोगी आणि त्यांच्या पत्नीखेरीज फक्त तीन उमेदवारच निवडून आले.

फोटो स्रोत, AJIT JOGI FB
यानंतर त्यांच्या पक्षातले अनेकजण पक्ष सोडून गेले. पण अजित जोगींचा मुलगा आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष अमित जोगी हे पक्षाला पुन्हा चांगल्या परिस्थितीत आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
छत्तीसगडमधला काँग्रेस पक्ष आणि त्याच्या नेत्यांवर नेहमी टीका करणाऱ्या अजित जोगींनी कधीही सोनिया गांधींवर टीका केली नाही. म्हणूनच ते कोणत्याही दिवशी काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात, अशा चर्चा कायम होत राहिली.
आता मात्र या सगळ्या चर्चांना कायमचा पूर्णविराम मिळालाय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








