कोरोना महाराष्ट्र : उद्धव ठाकरे स्वतः घराबाहेर का पडत नाहीयेत?

फोटो स्रोत, CMOMaharashtra
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण 10 मार्चला आढळला. त्यानंतर काही काळातच रुग्णांची संख्या वाढली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर दोन दिवसांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला.
पण गेल्या दोन महिन्यांपासून उद्धव ठाकरे प्रत्यक्षात बाहेर जाऊन परिस्थितीची पाहणी का करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. हॉस्पिटल, वस्त्यांमध्ये जाऊन मुख्यमंत्री जनतेला आश्वस्त का करत नाहीत, अशी विचारणा विरोधकांकडून केली जात आहे.
खरं तर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा जनतेशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला आहे. जनतेशी ते ज्या शैलीत बोलले, त्याचे कौतुकही करण्यात आलं.
एखाद वेळला ते कामांची पाहणी करताना दिसले, स्वतःच्या आमदारकीसाठी अर्ज भरण्यासाठीही ते सहकुटुंब गेले होते. पण ते थेट लोकांमध्ये जात नाहीत, यावरून मात्र त्यांच्यावर टीका करण्यात आली.
उद्धव ठाकरेंचं बाहेर पडणं प्रकृतीसाठी धोकादायक?
यामागे एक कारण त्यांची प्रकृती असल्याची चर्चा होत आहे. Kolaj.in चे संपादक सचिन परब यांच्यामते उद्धव ठाकरे यांचा स्वभावही याला कारणीभूत आहे. "उद्धव ठाकरे हे आपल्या प्रकृती विषयी पूर्वीपासूनच जागरूक आहेत. त्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे. त्यामुळे ते आपल्या आरोग्याची काळजी घेतातच. ते नियमित व्यायाम करतात. डॉक्टरांच्या सतत संपर्कात असतात."
शिवाय, महाराष्ट्रात दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी किती धोका पत्कारावा, असाही प्रश्न परब यांनी उपस्थित केला.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

तरी मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा पदावर असलेल्या व्यक्तींनी अशा काळात संसर्ग होत असलेल्या ठिकाणी जाणं अपेक्षित नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
त्यांनी म्हटलं, "दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण होणं ही काही कौतुकास्पद बाब नाही. मुख्यमंत्र्यांनी थेट रुग्णांच्या संपर्कात यावे ही अपेक्षा बाळगणं चुकीचं आहे. पंतप्रधान, केंद्रीय आरोग्य मंत्री, इतर राज्याचे मुख्यमंत्रीही लोकांमध्ये थेट न जाताच काम करत आहेत, कारण या सगळ्यांवर मोठी जबाबदारी आहे. उद्धव ठाकरेंनी प्रशासन उत्तमरीत्या हाताळणे अपेक्षित आहे. त्यात जर ते कमी पडत असतील तर टीका व्हायला हवी."
कोरोना व्हायरसचा धोका हा मधुमेह, श्वसनाचे आजार, हदयविकार असे आजार असणाऱ्या व्यक्तींना जास्त आहे, असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
"उद्धव ठाकरे यांच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया झाल्याने ते निश्चितच डॉक्टरांचा सल्ला घेऊन काम करत असतील," असं मत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी व्यक्त केले.
'पंतप्रधानही घराच्या बाहेर पडत नाहीत'
बीबीसी मराठीच्या मुलाखतीमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनीही ठाकरे सरकारवर हा आरोप केला होता. "राजेश टोपे वगळता इतर कोणताही मंत्री फील्डवर लोकांमध्ये जाऊन काम करताना दिसत नाही."
भाजप नेते गिरीश महाजन यांनीही मुख्यमंत्री घराबाहेर पडतच नाहीत. शपथविधीसाठी मात्र कुटुंबासह घराबाहेर पडल्याचे पाहिले, अशी टीका केली होती.

फोटो स्रोत, Twitter
विरोधकांच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे बाहेर पडतायेत. वर्षा, सह्याद्री, मातोश्री या सगळ्या ठिकाणाहून ते काम करत आहेत.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा घराबाहेर न पडता काम करत आहेत. गृहमंत्री अमित शहासुद्धा गेल्या कित्येक दिवसांत दिसलेले नाहीत. तुम्ही त्यांना हे प्रश्न का विचारत नाहीत? नरेंद्र मोदी यांनीच सांगितले आहे 'वर्क फ्रॉम होम' करायचे, म्हणून मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करत आहेत."
विरोधी पक्षाने त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलण्याची गरज असल्याचा सल्ला राऊत यांनी दिलाय.
शिवसेनेची कार्यपद्धती कारणीभूत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत हा आरोप शिवसेनेने अमान्य केलाय. कोरोना संकटाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी आवश्यक तिथे बाहेर पडून काम केले असून दिवस रात्र मुख्यमंत्री कोरोनाचे संकट दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
उद्धव ठाकरे अनेक बैठका नियोजित बाळासाहेब स्मारक म्हणजेच जुन्या महापौर बंगल्यावर घेत असतात. राजकीय नेते, मंत्री, अधिकारी यांच्याही बैठका या ठिकाणी होत असतात.
"केंद्रीय पथकाने महाराष्ट्रात मे महिन्यापर्यंत लाखो रुग्ण असतील असा दावा केला होता. पण प्रत्यक्षात 30 हजारपर्यंत अॅक्टिव्ह रुग्ण राज्यात आहेत. रुग्णांना क्वारंटाईन होण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करण्यात आली. 15 दिवसांत मुंबईत 4 हॉस्पिटल्स उभी राहिली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. हे सगळं मुख्यमंत्री काम न करता होतंय का? त्यामुळे अशा आरोपांना काही अर्थ राहत नाही," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्यक्ष लोकांमध्ये न जाता शिवसैनिकांना ठिकठिकाणी लोकांच्या मदतीसाठी सज्ज केले. संघटनात्मक बांधणी हीच शिवसेनेची पूर्वापार चालत आलेली कार्यपद्धती आहे. पण आता ठाकरे स्वत: सत्तेत सक्रिय झाल्याने शिवसेनेची कार्यपद्धती आणि सरकारची जबाबदारी या दोन्ही गोष्टी उद्धव ठाकरेंनी सांभाळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
दुष्काळी दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते, पण कोरोनाची परिस्थिती वेगळी असल्याचं विश्लेषक सांगतात.
"उद्धव ठाकरे आता लोकांमध्ये गेले तर विरोधकांच्या टीकेची धार निश्चित कमी होईल. पण शिवसेनेची कार्यपद्धती कायम अशीच राहिलेली आहे. उद्धव ठाकरे त्याच पद्धतीने काम करत आहेत," असं संदीप प्रधान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिनचर्या

फोटो स्रोत, CMOMaharashtra
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा दिवसाआड मुख्यमंत्री घेत असतात. 2-3 तास ही बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगवर सुरू असते. शिवाय, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनही याच माध्यमावर चर्चा होते.
शिक्षण, उद्योग, अर्थव्यवस्था या क्षेत्रातील अपडेट्स आणि नवीन योजनांच्या बाबतीत तज्ज्ञांसोबत चर्चा होते. सरकारी कामकाजाबाबतही महत्त्वाच्या बैठकांचे सत्र सुरू असते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








