कोरोना होमिओपॅथी उपचार : 'अर्सेनिक अल्बम 30'च्या गोळ्या खरंच किती गुणकारी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
होमिओपॅथीच्या गोळ्या म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. कारण या गोळ्या बाकीच्या औषधांसारख्या कडू नसतात. त्या गोड असल्यामुळे सहसा होमिओपॅथीच्या गोळ्यांना कुणाची ना नसते.
कोरोनाच्या केसेसची संख्या राज्यात आणि देशात वाढत असताना होमिओपॅथीचं एक औषध खूप चर्चेत आलंय. त्याचं नाव आहे 'अर्सेनिक अल्बम 30'. अनेकांना वाटतंय की, हे औषध कोरोनाविरोधात एक महत्त्वाचं शस्त्र ठरू शकतं.
काहीजण या औषधाला 'मिरॅकल ड्रग' म्हणतायत तर काहींच्या मते याबाबत अजून कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाहीये. म्हणूनच कोरोनासारख्या आजारावर आर्सेनिक अल्बम 30 कितपत उपयोगी ठरू शकतं, याबाबत शंकाच आहे.
पण हे औषध आहे तरी काय? सध्या ते इतकं चर्चेत का आलंय? त्यांनी खरंच कोरोनापासून बचाव होऊ शकतो का? जगात कोरोनाची लस तयार झाली नसताना होमिओपॅथीकडे कोरोनाचा उपचार आहे का?
भारत सरकारचं AYUSH मंत्रालय म्हणजेच आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्ससाठी असलेल्या मंत्रालयाने 6 मार्चला एक सर्क्युलर काढलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, कोव्हिड-19 चा संसर्ग पसरण्याची चिन्हं आहेत, पण घाबरण्याचं काहीही कारण नाही.
आयुष हे वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आहे आणि या उपचार पद्धती रुग्णांच्या सर्वांगीण आरोग्याचा विकास व्हावा, या तत्त्वावर आधारित आहेत. त्यामुळे रुग्णाची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी जे शक्य होईल ते करावं.
हे करत असताना मेडिकल रिसर्च काउन्सिल आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं, असंही आयुष मंत्रालयानं म्हटलं होतं. याच सर्क्युलरमध्ये अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचा उल्लेख करण्यात आलाय. हे औषध रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतं, असं यात म्हटलं गेलंय.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

जेव्हा हे सर्क्युलर आलं त्यावेळी हे औषध फारसं चर्चेत आलं नाही. पण गेल्या काही दिवसांमध्ये या औषधाबाबतच्या चर्चेनं जोर धरलाय. त्याचं एक कारण म्हणजे रत्नागिरीचे आमदार आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं की, त्यांच्या मतदारसंघातील तब्बल साडे चार लाख कुटुंबीयांना अर्सेनिक अल्बम 30च्या गोळ्यांचं वाटप केलं जाईल.
राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी आपली याबाबत चर्चा झालीये आणि त्यांनी हे औषध रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं, असं आपल्याला सांगितल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं होतं. इतकंच नाही तर मुंबईच्या काही नगरसेवकांनीही त्यांच्या विभागात हजारो गोळ्यांचं वाटप केलं होतं. त्यानंतर 'अर्सेनिक अल्बम 30' नेमकं काय आहे? आणि कोव्हिडविरोधातील लढ्यात रोगप्रतिकारक क्षमतेची नेमकी काय भूमिका आहे, यावर चर्चा होतेय.
अर्सेनिक अल्बम 30 कसं काम करतं?
आयुषने प्रसिद्ध केलेल्या सर्क्युलरमध्ये म्हटलं आहे की, अर्सेनिक अल्बम 30 चा डोस तीन दिवस उपाशी पोटी घ्यावा. त्यानंतर पुन्हा महिन्याभराने हा डोस घ्यावा. जोपर्यंत कोरोनाचा संसर्ग समुदायामध्ये आहे तोपर्यंत हे औषध घेत रहावं. या औषधावर संशोधन झालं असून ते रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं, असं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे.
आत्तापर्यंत समोर आलेल्या गोष्टींनुसार कोरोना व्हायरस आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेवर हल्ला करत अलल्याचं दिसून आलंय. त्यामुळे जर आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढली तर ते आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
हे औषध नेमकं कसं काम करतं हे जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबईतील होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर डॉ. जयेश वैशंपायन यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मते, "होमिओपॅथी जीनस एपिडेमिकस या सिद्धांतावर अवलंबून आहे. म्हणजे त्या रुग्णाची पूर्ण हिस्टरी काढून त्याला असलेल्या आजारांच्या लक्षणाच्या आधारावर काही औषधं दिली जातात. काही औषधं अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. त्यांना 'काँस्टिट्यूशनल मेडिसीन' म्हणतात. अर्सेनिक अल्बम 30 हेही एक काँस्टिट्यूशनल मेडिसीन आहे."
ज्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप, जीव जाण्याची भीती वाटणं अशी लक्षणं आहेत त्यांना हे औषध दिलं जातं. कोव्हिड-19 मध्येही अशीच लक्षणं आहेत. त्यामुळेच हे औषध कोव्हिडच्या रुग्णांना दिलं जाऊ शकतं, असंही वैशंपायन सांगतात.


पण मग अर्सेनिक अल्बम 30 मुळे रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढते? तज्ज्ञांच्या मते रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढवता येईल, यावरच होमिओपॅथीचा आधार आहे. जसं अॅलोपॅथीमध्ये एखाद्या स्पेसिफिक अवयवावर थेट परिणाम व्हावा म्हणून औषध दिली जातं.
उदाहरणार्थ - शरीरातली इन्शुलिनची पातळी वाढावी म्हणून अशी औषधी दिली जातात जी थेट पॅंक्रियाजवरच परिणाम करतात. पण तसं होमिओपॅथीमध्ये नसतं.
जे औषध इथे दिलं जातं ते शरीरातली रोगप्रतिकारक क्षमता बळकट करतं आणि इतर अनावश्यक तत्त्वांचं निर्मूलन करत असतं. त्यामुळे आजाराचं नाव काहीही जरी असलं तरी लक्षणांच्या आधारावर होमिओपॅथीची ट्रीटमेंट दिली जाऊ शकते. महाराष्ट्र सरकारने कोव्हिड विरोधात लढण्यासाठी एक टास्कफोर्स तयार केलीये. यात आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीच्या तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांचा समावेश आहे.
पण मुळात होमिओपॅथी ही उपचार पद्धती आहे तरी काय? तीचा शोध कोणी लावला? हेही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.
होमिओपॅथीचे जनक कोण?
200 वर्षांपूर्वी जर्मनीमध्ये सॅम्युएल हॅनमन नावाच्या एका डॉक्टरने होमिओपॅथीचा शोध लावला. वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर त्यांना जाणवलं की आपण जे उपचार करत आहोत ती पद्धत कठोर आणि अपरिणामकारक आहे. या गोष्टीमुळे त्यांनी आपली प्रॅक्टिस सोडून दिली आणि ते भाषांतरकार बनले.
पुढे पुस्तकं वाचता वाचता त्यांच्या हातात एक पुस्तक लागलं त्यात लिहिलं होतं की, झाडाच्या सालीपासून तयार करण्यात आलेल्या क्विनोन या औषधाने मलेरिया बरा होतो.

फोटो स्रोत, EPA
या गोष्टीचं त्यांना कुतूहल वाटलं आणि ते यावर विचार करायला लागले. सॅम्युअल यांनी स्वतःवरच प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांच्या हे लक्षात आलं की, जेव्हा ते क्विनोनचा डोस घेत होते तेव्हा त्यांच्या शरीरात मलेरियाची लक्षणं दिसू लागली होती.
मग यातूनच त्यांनी एक सिद्धांत मांडला आणि या विचारावरच होमिओपॅथी आज उभी आहे. या सिद्धांताला होमिओपॅथीमध्ये 'like cures like' असं म्हणतात. याचा अर्थ आहे काट्याने काटा काढणं. म्हणजे काय, तर ज्या तत्त्वापासून किंवा पदार्थापासून आजार तयार होतो, तेच तत्त्व औषध म्हणून वापरायचं.
पण जर होमिओपॅथीची औषधं खूप मोठ्या प्रमाणात घेतली तर ती जीवघेणीसुद्धा ठरू शकतात असंही यपूर्वी तज्ज्ञांना आढळून आलंय आणि म्हणूनच औषध देण्यापूर्वी ते औषध डायलूट केलं जातं. यावरूनच होमिओपॅथी आणि अलोपॅथीदरम्यान वाद आहेत. कारण तज्ज्ञांच्या मते जर होमिओपॅथीचं औषध इतकं डायल्यूट केलं गेलं तर मग त्यात मूळ गोष्टी फारच कमी प्रमाणात राहातात.
प्लसिबो इफेक्ट म्हणजे काय?
पण या बरं होण्यामागे औषधांपेक्षा त्या रुग्णाच्या इच्छाशक्तीमुळेच आजार बरा झाल्याचं काही संशोधक म्हणतात. याला 'प्लसिबो इफेक्ट' म्हणतात. 'प्लासिबो इफेक्ट' म्हणजे त्या औषधामध्ये नेमका काय कंटेट आहे, हे माहीत नसतानाही तो रुग्ण ते औषध घेत राहतो. या औषधाने आपण बरे होऊ, असं त्या व्यक्तीला वाटत असतं. पण खरं तर त्या गोळ्यांमध्ये काहीच केमिकल नसतं.
'प्लासिबो इफेक्ट' या संकल्पनेबद्दल बरंच काही लिहिलं गेलंय. काही जणांना वाटतं की, पूर्ण होमिओपॅथी याच सिद्धांतावर अवलंबून आहे. पण तसं असतं तर लहान मुलं का बरी झाली असती? त्यांना तर औषध म्हणजे काय आणि ते घेतल्यावर आपण बरे होऊ हेसुद्धा माहीत नसतं, असाही युक्तिवाद केला जातो.
पण होमिओपॅथी आणि अर्सेनिक अल्बम 30 बद्दल बोलताना हेसुद्धा स्पष्ट करणं तितकंच गरजेचं आहे की, या दोन्ही गोष्टींमुळे कोरोनापासून पूर्णपणे बचाव होऊ शकतं हे मात्र सिद्ध झालेलं नाही. पण जिथे कोरोनाची लस आलेली नाही आणि आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेवर आपण सगळेच जण अवलंबून आहोत तिथे अर्सेनिक अल्बम 30 आणि होमिओपॅथीमुळे काही जणांना आधारही मिळतोय.
पण तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर तुमच्या आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश अधिक करा. व्यायाम, फिरायला जाणं या गोष्टी नियमित करा. संतुलित आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि मुख्य म्हणजे ताण-तणाव घेऊ नका. या गोष्टी जर केल्या तर तुमची रोग प्रतिकारक क्षमता नैसर्गिकरीत्या वाढू शकते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









