राम मंदिर अयोध्या : राम मंदिरासाठी सपाटीकरण करताना पुरातन मंदिराचे अवशेष सापडले होते का?

प्रस्तावित राम मंदिराची प्रतिमा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रस्तावित राम मंदिराची प्रतिमा
    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

राम मंदिराचं आज (5 ऑगस्ट) भूमिपूजन पार पडलं. या भूमिपूजनाआधी राम मंदिराच्या कामाला सुरुवात झाली होती. मंदिर परिसरात सपाटीकरण करताना पुरातन मंदिराचे काही अवशेष सापडल्याचा दावा अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं केलाय.

या ट्रस्टनं अयोध्याचे जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांच्या परवानगीने 11 मेपासून मंदिर परिसरातील जमिनीच्या सपाटीकरणाचं काम सुरू केलं. आता 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे.

ट्रस्टकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, “सपाटीकरणादरम्यान मोठ्या संख्येत पुरातन अवशेष, देवी-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती, पुष्प कलश, खांब इत्यादी वस्तू सापडल्या.”

या सर्व पुरातन वस्तू म्हणजे राम मंदिराची सत्यता असल्याचं सांगितलं जातंय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी रामलल्ला ज्या ठिकाणी विराजमान होते, तिथेच राम जन्मभूमीसाठीच्या सपाटीकरणाचं काम केलं जातंय.

सपाटीकरणाचं काम कधी सुरू झालं?

11 मेपासून इथं काम सुरू झालं. मंदिराच्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी येणारे अडथळे दूर केले जात आहेत. साफसफाई केली जातेय.

ट्रस्टचे सचिव चंपत राय सांगतात, “सपाटीकरण करण्यासाठी तीन जेसीबी, एक क्रेन, दोन ट्रॅक्टर आणि 10 मजूर काम करत आहेत. सध्या सर्वत्र कोरोनाचं संकट आहे. इथं काम करतानाही सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व खबरदारी, मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंग या गोष्टींचं पालन केलं जातंय.”

अयोध्या

फोटो स्रोत, Mahendra Tripathi

अयोध्याचे जिल्हाधिकारी अनुज कुमार झा सांगतात, “लॉकडाऊन शिथिल असताना ट्रस्टनं सपाटीकरणासाठी परवानगी मागितली होती. त्यावेळीच परवानगी दिली होती. सर्व खबरदारी घेऊनच काम सुरू आहे.”

सपाटीकरणादरम्यान सापडलेल्या पुरातन अवशेषांबाबत अनुज कुमार झा म्हणतात, “आता जे काही अवशेष सापडले आहेत, ते सर्व ट्रस्टच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेत. अवशेषांची व्यवस्थित स्वच्छता करण्यात आलीय. पुरातत्वाच्या दृष्टीनं अद्याप अवशेषांचं परीक्षण करण्यात आलं नाहीय. एवढ्या लवकर असं परीक्षण करणं शक्यही नाही.”

सपाटीकरणादरम्यान जे अवशेष सापडले, तसेच अवशेष याआधीही सापडल्याचं म्हटलं जातंय.

लाईन

लाईन

याआधीही असेच अवशेष सापडलेले

अयोध्येतील स्थानिक पत्रकार महेंद्र त्रिपाठी सांगतात, “पुरातन मंदिराचे अवशेष याआधीही सापडले होते. आता जे अवशेष सापडतायेत, ते आधीच्या अवशेषांशी मिळते-जुळतेच आहेत. शिवलिंग असो, कलश असो किंवा पुरातन मूर्ती असो. सरकारनं ही जागा तातडीनं ताब्यात घेऊन तिथं रामलल्लाची मूर्ती ठेवली होती. त्यामुळे तिथल्या वस्तू संरक्षित ठेवता आल्या नव्हत्या. त्याच वस्तू आता पुन्हा सापडत आहेत.”

अयोध्या

फोटो स्रोत, MAHENDRA TRIPATHI

मात्र बाबरी मशीद अॅक्शन कमिटीचे संयोजक आणि सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील राहिलेले जफरयाब जिलानी यांनी या पुरातन अवशेषांवर शंका उपस्थित केलीय.

माध्यमांशी बोलताना जिलानी म्हणाले, “सुप्रीम कोर्टानं हे सांगितलंय की, ASI च्या पुराव्यांनुसार तेराव्या शतकात तिथं कुठलेच मंदिर नव्हते. त्यामुळे अवशेष सापडण्याचा दावा केवळ प्रोपगंडा आहे.”

श्रीराम जन्मभूमीचे प्रधान पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणतात, याआधीही याच ठिकाणी पुरातत्व विभागानं खोदकाम केलं होतं आमि त्यावेळीही मंदिराचे पुरावे सापडले होते.

बीबीसीशी बोलताना सत्येंद्र दास म्हणाले, “खोदकामात सापडलेल्या पुराव्यांच्या आधारावरच सुप्रीम कोर्टानं रामलल्लाच्या बाजूनं निर्णय दिला होता. आता पुन्हा एकदा मंदिराच्या पुराव्यांना दुजोरा देणारे अवशेष सापडतायेत. कमल दल, शंख, चक्र आणि धनुष्य यांचे अवशेष आहेत. या सर्व वस्तू सनातन धर्माशी जोडलेल्या आहेत आणि इथं मंदिर होतं, याच गोष्टीकडे त्या दिशानिर्देश करतात.”

बौद्ध धर्म

सपाटीकरणादरम्यान सापडलेल्या अवशेषांच्या चर्चेत आता आणखी एक मुद्दा समाविष्ट झालाय, तो म्हणजे बौद्ध धर्माचा.

अयोध्या

फोटो स्रोत, MaHENDRA TRIPATHI

अयोध्येतील खोदकामात जे अवशेष सापडत आहेत, त्यातील शिवलिंग हे मंदिराशी संबंधित नसून, बौद्ध स्तंभ आहे आणि बौद्ध धर्माशी संबंधित आहेत, असं म्हणत काहीजण आता नवीन वादाला तोंड फोडू पाहतायेत.

सोशल मीडियावर ‘बौद्धस्थल अयोध्या’ नावाचा हॅशटगही ट्रेंड करण्यात आला. या हॅशटॅगद्वारे काही फोटोही शेअर करण्यात आले.

याच मुद्द्यावरून काँग्रेसच्या55च दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये ट्विटरवर जुंपल्याचं पाहायला मिळालं.

भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी खासदार डॉ. उदित राज यांनी अयोध्येतल्या राम मंदिराच्या जागी बौद्ध स्थळ असल्याचा दावा केला. मात्र, या दाव्याला काँग्रेसचेच नेते राजीव त्यागी यांनी विरोध केला.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter / @RTforINdia

दरम्यान, गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टानं अयोध्या-बाबरी प्रकरणावर निकाल दिला. 2.77 एकर जमीन रामलल्लाला सोपवली. त्यानंतर कोर्टानं मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारला एका ट्रस्टची स्थापन करण्यासही सांगितलं होतं.

दुसरीकडे, सुन्नी वक्फ बोडाला अयोध्येतच मशीद बनवण्यासाठी पाच एकर जमीन देण्याचे आदेश सरकारला कोर्टानं दिले होते. सरकारने बोर्डाला ती जमीन उपलब्ध करून दिलीय.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)