कोरोना लॉकडाऊन : चार दिवस जंगलातून वाट तुडवली, पण घरी पोहोचण्याआधीच मृत्यूनं गाठलं

जमलोची आई सुकमति आणि वडील आंदोराम मडकम

फोटो स्रोत, cg khabar

फोटो कॅप्शन, जमलोची आई सुकमति आणि वडील आंदोराम मडकम
    • Author, आलोक प्रकाश पुतुल
    • Role, रायपूरहून, बीबीसी हिंदीसाठी

लॉकडाऊनमुळे आपल्या राज्यांपासून दूर इतर राज्यात अडकलेल्या मजुरांची घरी जाण्यासाठी धडपड सुरू आहे. काहीजण तर त्यासाठी जीवावर बेतणार धाडसही करत आहेत.

मूळ छत्तीसगढच्या असणाऱ्या 12 वर्षांच्या जमलो मडकमलाही घरी जाण्यासाठी केलेल्या पायपीटीमध्ये आपले प्राण गमवावे लागले.

छत्तीसगढमधल्या आदेड गावची असणारी 12 वर्षांची जमलो मडकम मजुरीसाठी तेलंगणाला गेली होती. ती ज्या मजुरांसोबत होती त्यांनी लॉकडाऊननंतर पायीच गाव गाठण्याचं ठरवलं आणि जमलोही त्यांच्यासोबत निघाली.

आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असणारी जमलो चार दिवस जंगलातला खडतर रस्ता पायी तुडवत होती.

चार दिवसांची पायपीट केल्यानंतर गाव अगदी टप्प्यात आलं होतं. जेमतेम 14 किलोमीटर अंतरावर तिचं गाव होतं. मात्र, जंगल तुडवून छत्तीसगढपर्यंत पोचणाऱ्या जमलोला हे 14 किलोमीटर अंतर कापता आलं नाही. गावी पोहोचण्याआधीच ती दगावली.

कोरोना
लाईन

बिजापूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी बी. आर. पुजारी यांनी या घटनेबद्दल सांगितलं, "आम्ही जमलोची कोव्हिड-19 चाचणी केली. मात्र, तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. शवविच्छेदन अहवालातही विशेष काही आढळलं नाही. इलेक्ट्रॉलाईट इम्बॅलन्समुळे ती दगावली असावी, असा माझा अंदाज आहे. सध्या या मुलीचा व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. व्हिसेरा तपासणीनतंर कदाचित काही कळू शकेल."

जमलोचे वडील आंदोराम मडकम यांना आपली मुलगी का दगावली कळत नाहीय, तर आई सुकमती यांचे अश्रू थांबत नाहीयत. त्या कुणाशी बोलण्याच्या मनस्थितीतही नाहीत.

आंदोराम म्हणतात, "सोबत असलेले मजूर सांगतात रात्री सगळ्यांनी व्यवस्थित जेवण केलं आणि आराम केला. सकाळी जेवण करून निघायची तयारी केली तेव्हा उसूर गावाजवळ जमलोच्या पोटात दुखू लागलं. त्यानंतर काय झालं माहिती नाही. ती तिथेच दगावली."

लॉकडाऊन आणि बेरोजगारी

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात गावातल्या इतर नातेवाईकांप्रमाणेच जमलोही शेजारच्या तेलंगणा राज्यात मिरची तोडणीसाठी गेली होती.

तेलंगणातल्या मुलुगू जिल्ह्यातल्या पेरूर गावात या लोकांना काम मिळालं होतं. मात्र, दोनच महिन्यात कोरोना लॉकडाऊनमुळे मिरचीची वाहतूक बंद झाली आणि मजुरीचं कामही थांबलं.

साठवून ठेवलेले पैसेही संपू लागले. त्यामुळे ठेकेदाराच्या सल्ल्यानुसार या सर्व मजुरांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला.

गावकरी सांगतात, की मुलुगू जिल्हा मुख्यालयपासून गोदावरी नदी ओलांडून भोपालपट्टनम मार्गे आदेड गाव जवळपास 200 किमी अंतरावर आहे. खरंतर पेरूर गाव सीमेवरच आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे सीमा बंद आहेत. त्यामुळे वाहतुकीचं साधन नाही. पायी गावी जाण्याशिवाय या मजुरांकडे दुसरा पर्याय नव्हता.

हे मजूर लपून-छपून जंगलातून येत होते आणि जंगलातच या मुलीचा मृत्यू झाल्याचं जिल्हाधिकारी के. डी. कुंजाम यांनी सांगितलं. ही बातमी कळताच सोबत असलेल्या सर्व 11 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आणि मुलीचीही कोव्हिड चाचणी करण्यात आली. मात्र, रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, छत्तीसगढ सरकारने जमलो मडकमच्या कुटुंबाला मुख्यमंत्री मदत निधीतून 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मात्र, या सर्वांमध्ये बिजापूरचे पत्रकार रानू तिवारी यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे.

ते विचारतात, "12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला परराज्यात काम करायला जायची गरजच का पडावी? शिक्षण घेण्याचं वय असताना तिला पैसे कमावण्याची गरज का पडली असावी? प्रश्न अनेक आहेत. जमलोच्या मृत्यूचं कारण समोर येईलच. मात्र, सध्या तरी एवढंच दिसतं की जमलो व्यवस्थेचा बळी ठरली."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)