कोरोना व्हायरसच्या संकटाशी लढण्यासाठी कल्याण डोंबिवलीच्या महापौर बनणार पुन्हा नर्स

विनिता राणे

फोटो स्रोत, vinita rane

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"मी महापौर असले तरी मला नर्स म्हणून काम करताना खूप समाधान मिळायचं. एखादा गंभीर पेशंट आजारातून बाहेर आल्यावर त्याच्या आणि पेशंटच्या नातेवाईकांच्या चेहर्‍यावर जो आनंद असायचा तो एक नर्स म्हणून समाधान देऊन जायचा. राजकारणातही आपण अनेक लोकांना भेटतो. आवाका मोठा असला, कितीही काम केलं तरी कोणीतरी त्रुटी दाखवतंच."

कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता विश्वनाथ राणे सांगत होत्या.

जे लोक रुग्णसेवेत होते त्यांनी कोरोनाच्या संकटाच्या काळात रुग्णसेवा करावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुन्हा कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा देण्याचा निश्चय विनिता यांनी केला आहे. केला आहे.

2015 मध्ये राजकारणात प्रवेश

1983 साली विनिता मुंबई सेंट्रलच्या नायर हॉस्पिटलला नर्सिंग डिप्लोमा पास करून स्टाफ नर्स म्हणून रूजू झाल्या. 1983 ते 2015 पर्यंत विनिता यांनी नायर हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम केलं. 198६ सालीच विनिता यांचं विश्वनाथ राणे यांच्याशी लग्न झालं. शाखाप्रमुख असलेल्या विश्वनाथ राणे यांना 2000 साली शिवसेनेनं नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आणि विश्वनाथ राणे हे शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले.

कोरोना
लाईन

2000 ते 2015 या काळात पती नगरसेवक असूनही विनिता यांनी नायर हॉस्पिटलमधली नर्सची नोकरी सोडली नाही. 2015 ला त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या.

विनिता राणे

फोटो स्रोत, vinita rane

कल्याण डोंबिवली महापालिका 2018 च्या निवडणुकीतही विनिता राणे निवडून आल्या. याचवेळी महापौर पदासाठीही त्यांनी फॉर्म भरला आणि त्या बिनविरोध निवडून आल्या. गेली दोन वर्षे विनिता राणे या कल्याण डोंबिवली महापालिकेचं महापौर पद भूषवत आहेत.

दोन्ही भूमिकांना न्याय देणार

कोरोनाच्या संकटाबाबत बोलताना त्या सांगतात, "सुरवातीपासूनच मला यावेळी हॉस्पिटलमध्ये असायला हवं होतं, असं वाटत होतं. मी माझ्या पतीला हे बोलूनही दाखवलं. पण महापौर पदाची जबाबदारी ही जास्त मोठी असल्यामुळे आता लोकांसाठी काम करणं अत्यंत महत्त्वाचे असल्याचं त्यांचं मत होतं. 4 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय सेवेचा अनुभव असलेले निवृत्त अधिकारी सैनिक, नर्स, डॉक्टर यांनी पुन्हा सेवेत येण्याचं आवाहन केलं. त्यावेळी मला आपणही जाऊन काम केलं पाहिजे ही जाणीव झाली. मग मी महापौर पदाबरोबरच वैद्यकीय सेवा द्यायला तयार असल्याचं पत्र महापालिका आयुक्तांना दिलं."

विनिता राणे

फोटो स्रोत, vinita rane

महापौर पद आणि वैद्यकीय सेवा या दोन्ही सेवा सध्याच्या परिस्थितीत महत्त्वाच्या आहेत. तुम्ही दोन्हीकडे कसा न्याय देणार या प्रश्नावर विनिता राणे सांगतात, "मी कल्याण - डोंबिवलीमधल्या हॉस्पिटलमध्ये सेवा देण्याचं ठरवलं आहे. जेणेकरून मला कल्याण-डोंबिवलीत राहून महापौर म्हणूनही लक्ष देता येईल. महापौर म्हणून तुम्हाला 24 तास उपलब्ध राहावं लागतं. सध्याच्या दिनक्रमात थोडा बदल करून अर्धा वेळ वैद्यकीय सेवेसाठी आणि अर्धावेळ लोकप्रतिनिधी म्हणून काम करेन. माझ्या घरी माझे पती, दोन मुलं आणि सुना आहेत. ते सर्वजण माझं घर सांभाळतात. त्यामुळे मला घरचं टेन्शन नाही. त्यांच्यामुळे मी बिनधास्तपणे बाहेर काम करू शकते."

नर्सिंगचं काम अजूनही समाधान देतं

राजकारण आणि नर्सिंग या दोन्ही भूमिकांची आव्हानं वेगळी असल्याचं त्या सांगतात. "राजकारणाचा आवाका खूप मोठा आहे. त्यातही काम करण्याची खूप संधी आहे. पण नर्स म्हणून काम करणं हे मला कायम समाधान द्यायचं. पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्याशी कमी दिवसात एक नातं निर्माण व्हायचं. बरे होऊन डिस्चार्ज झाल्यानंतरही अनेक पेशंट सहज भेटायला म्हणूनही यायचे. अनेक पेशंट बरे झाल्यावर त्यांचे नातेवाईक आशीर्वाद द्यायचे. त्यातून समाधान मिळायचं."

आज देश संकटात असताना इतक्या वर्षांनी मला पुन्हा ते करायला मिळणार याचा आनंद आहे. यामुळे मी दोन्ही भूमिकांमधून लोकांसाठीच काम करणार आहे, असं त्या म्हणतात.

महापौर आता नर्स म्हणून काम करताना डॉक्टरांवर दबाव नाही का निर्माण होणार? यावर बोलताना विनिता हसल्या. त्या म्हणाल्या, "मी जेव्हा नर्स असेन तेव्हा डॉक्टरचं तिकडचे सर्वेसर्वा असतील मी फक्त नर्सच्या भूमिकेत असेन. त्यामुळे मी असा दबाव निर्माण करून कधीच काम करणार नाही."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)