महिला खेळाडूंबद्दल भारतीयांना काय वाटतं? - बीबीसी रिसर्च - ISWOTY

मुली

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी न्यूज

क्रीडा क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने खेळू शकतात का? बीबीसीने केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतांश लोकांनी या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर दिलं आहे.

क्रीडा क्षेत्रात महिला खेळाडूंकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं जातं, यासंदर्भात बीबीसीने सर्वेक्षण केलं आहे. यात असं आढळून आलं की बहुतांश लोक महिला खेळाडूंनाही पुरूष खेळाडूंएवढंच मानधन देण्याच्या मताचे आहेत.

असं असलं तरी पुरुषांच्या तुलनेत महिला खेळाडूंचा खेळ फार मनोरंजक नसतो, असं मतही 42% लोकांनी व्यक्त केलं आहे.

महिला खेळाडूंची बाळाला जन्म देण्याची क्षमता आणि खेळाचा त्यांच्या सौंदर्यावर होणाऱ्या परिणामाविषयीही लोकांमध्ये नकारात्मक सूर दिसला.

बीबीसीने 14 राज्यांमध्ये एकूण 10,181 लोकांमध्ये हा सर्व्हे केला. यात स्त्री आणि पुरुष यांच्या जीवनात खेळाचं महत्त्व, भारतातील कुठल्या राज्यांमध्ये जास्त खेळ खेळले जातात आणि देशातील सर्वाधिक चर्चेत खेळाडूंविषयी मतं विचारण्यात आली.

या सर्वेक्षणातील प्रमुख निष्कर्ष बघूया.

महिला खेळाडूंबद्दल दृष्टिकोन

भारतात मुलं क्रिकेट, फुटबॉल, वॉलीबॉल खेळू शकतात, धावू शकतात, सायकल चालवू शकतात. मात्र, मुलींकडे खेळाचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत.

मुलं

फोटो स्रोत, Getty Images

भारतीय समाजात असलेला लैंगिक भेदभाव, हे यामागचं कारण असल्याचं जाणवतं. तसं नसेल तर ज्या लोकांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला, त्यातल्या एक तृतियांश लोकांनी एकापेक्षा जास्त क्रीडा प्रकार स्त्रियांसाठी योग्य नसल्याचं मत का व्यक्त केलं असतं?

यात कुस्ती, बॉक्सिंग, कबड्डी आणि वेट लिफ्टिंग या खेळांचा समावेश आहे.

अॅथलेटिक्स आणि घराच्या आत खेळले जाणारे खेळ स्त्रियांसाठी 'सर्वात कमी अनुपयोगी' मानले जात असल्याचंही या सर्व्हेमध्ये आढळून आलं आहे.

मात्र, भारतीय स्त्रियांनी लैंगिक आधारावर तयार झालेले हे समज तोडत जागतिक स्तरावर कुस्ती, बॉक्सिंग, वेट लिफ्टिंग आणि कबड्डीसारख्या फारसं ग्लॅमर नसलेल्या खेळांमध्ये प्राविण्य दाखवलं आहे.

भारतीय महिला खेळाडूंनी ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्ससारख्या अनेक मानांकित जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये पदक पटकावून भारताची शान वाढवली आहे.

कमी खेळाडू असलेला देश

भारतातील 64% प्रौढ कुठलाच खेळ किंवा फिजिकल अॅक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नसल्याचंही या सर्व्हेमध्ये आढळलं.

लैंगिक दृष्टिकोनातून या आकडेवारीकडे बघितल्यास परिस्थिती आणखी वाईट आहे. 42% पुरुषांचं म्हणणं आहे की ते किमान एक खेळ खेळले आहेत. मात्र, स्त्रियांच्या बाबतीत चित्र वाईट आहे. केवळ 29% महिलांनी खेळात भाग घेतला आहे.

विनेश

फोटो स्रोत, vinesh fogat

वयाच्या निकषातून बघितल्या भारतात 15 ते 24 या वयोगटातले पुरूष इतर कुठल्याही लैंगिक गट किंवा वयोगटापेक्षा जास्त खेळतात.

राज्यांच्या बाबतीतही बराच फरक आढळतो.

क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यांमध्ये दक्षिणेकडील तामिळनाडू (54%) आणि पश्चिमेकडील महाराष्ट्र (53%) यांचा क्रमांक वरचा आहे.

तर उत्तर भारतातील पंजाब-हरियाणा राज्यामधून केवळ 15% लोकच क्रीडा स्पर्धांमध्ये उतरतात.

भारतातील चर्चित खेळाडू

लोकांना भारतातील सर्वाधिक चर्चित खेळाडूविषयी विचारलं तेव्हा बहुतांश लोकांनी सचिन तेंडुलकरचं नाव सांगितलं. सचिन आता निवृत्त झाला आहे, हा भाग निराळा.

सचिन तेंडुलकर

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 30% लोकांना एकाही खेळाडूचं नाव सांगता आलं नाही.

महिला खेळाडूंविषयीची आकडेवारी तर याहून वाईट आहे. सर्व्हेमध्ये सहभागी झालेले 50% लोक एकाही महिला खेळाडूचं नाव सांगू शकले नाही.

18% लोकांनी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्जा हिचं नाव घेतलं. सानियाने भारताला अनेक ग्रँडस्लॅम मिळवून दिले आहेत.

1970-80 च्या दशकात ट्रॅक अँड फिल्डवर दबदबा असणाऱ्या पी. टी. उषाचं नाव मात्र आजही अनेकांना लक्षात आहे.

लोकांच्या स्मृतीत असण्यामध्ये सध्याच्या स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्या तुलनेत त्या केवळ एक टक्क्याने मागे होत्या.

मात्र, सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या स्त्री आणि पुरुष यांच्या नावांच्या यादीतील खेळाडूंची नावं ओळखायला सांगण्यात आलं तेव्हा 83% लोकांना खेळाडूंची नावं ओळखली. मात्र, यातही आकडेवारी पुरुष खेळाडूंच्याच बाजूने जास्त होती.

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)