CAA समर्थनसाठीची भाजपची मिस्ड कॉल मोहीम वादात

फोटो स्रोत, Getty Images
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) समर्थन देणारे देशात किती लोक आहेत, याची संख्या समोर आणण्यासाठी भाजपनं 'मिस्ड कॉल' मोहीम सुरु केलीय. यासाठी एक मोबाईल नंबर जारी करण्यात आलाय. मात्र यावरूनच आता वाद सुरु झालाय.
पक्षाकडून जारी केलेल्या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल देऊन कुणीही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला समर्थन देऊ शकतं, असा दावा भाजपकडून करण्यात आला होता. मात्र, CAA च्या समर्थनसाठी हा मोबाईल नंबर सोशल मीडियावर वेगवेगळ्या दाव्यांनी शेअर करण्यात आला.
ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा नंबर शेअर करत, मिस्ड कॉल दिल्यास विविध सुविधांचा लाभ घेता येईल, असे दावे करण्यात आले आहेत.
महिलांच्या नावानं सोशल मीडियावर अनेक बनावट अकाऊंट आहेत, ज्यावरुून भाजपनं जारी केलेला मोबाईल नंबर शेअर करण्यात आलाय. मुलींशी बोलण्यासाठी या नंबरवर फोन करा, असं म्हणत मिस्ड कॉल देण्याची विनंती केली गेलीय.

फोटो स्रोत, Twitter
दोन दिवसांपूर्वी म्हणजे 2 जानेवारी रोजी भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन CAA च्या समर्थनसाठी मोबाईल नंबर जारी करण्यात आला होता. #IndiaSupportsCAA या हॅशटॉगसोबत भाजपनं ते ट्वीट केलं होतं.
"नागरिकत्व दुरुस्ती कायदा-2019 ला समर्थन देण्यासाठी 8866288662 वर मिस्ड कॉल द्या," असं भाजपनं ट्विटरवरून सांगितलं होतं.
त्यानंतर 3 जानेवारीला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राजस्थानातील जोधपूरमध्ये झालेल्या सभेतून या मोबाईल नंबरबद्दल सांगितलंही होतं.

फोटो स्रोत, Twitter
अमित शाह जोधपूरमध्ये म्हणाले होते, "मी एक नंबर सांगेन. त्या नंबरवर तुम्ही फोन करायचा. पैसे लागणार नाहीत. त्यावर फोन केल्यानंतर CAA चं तुमचं समर्थन थेट मोदींपर्यंत पोहोचेल."
संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोबाईल नंबर देऊन त्यामागचा उद्देश सांगितला. मात्र, या माध्यमातून जे समर्थन असेल, त्याला किती महत्त्व असेल? आणि तेही अशावेळी, जेव्हा अनेकजण चुकीच्या पद्धतीनं मिस्ड कॉल देण्यासाठी सोशल मीडियावरून विनंत्या करताना दिसतायत.

फोटो स्रोत, SM VIRAL POST
गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे दिग्गज नेते मोबाईल नंबर शेअर करुन CAA ला समर्थन देण्याचं आवाहन करत आहेत.
नेटफ्लिक्सच्या नावानंही काही जणांनी मिस्ड कॉलचं आवाहन केलंय. मात्र, नेटफ्लिक्सनं तातडीनं ट्वीट करून हे फेटाळलं.
मुरलीकृष्णा नामक ट्विटर हँडलनं म्हटलं की, "सहा महिन्यांपर्यंत मोफत नेटफ्लिक्स पाहण्यासाठी 8866288662 या नंबरवर फोन करा. ही ऑफर पहिल्या एक हजार लोकांसाठीच आहे."

फोटो स्रोत, Twitter
हे ट्वीट नेटफ्लिक्सनं रिट्विट करत म्हटलं की, "अशी कोणतीही ऑफर नाही. ही चुकीची माहिती आहे."
दुसरीकडे, मध्य प्रदेशमधील स्थानिक काँग्रेस नेते देवाशीष जररिया यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोधासाठीही मोबाईल नंबर जारी केला. हा मोबाईल नंबरही शनिवारी ट्विटरवर टॉप ट्रेण्ड राहिला.

फोटो स्रोत, Twitter
"या, सगळ्यांनी मिळून CAA ला विरोध करुया. #99535_88585_AgainstCAA या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि मोदी-शाहां देशाचा मूड सांगा," असं देवाशिष जररिया यांनी ट्वीट केलंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








