शेतकरी आत्महत्या: सरकार स्थापनेच्या महिन्यात 300 शेतकऱ्यांच्या आत्महत्या #5 मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1) राज्यात सत्तास्थापनेचा खेळ सुरू असताना 300 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडी घडत असताना जवळपास 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीय. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.
नोव्हेंबर 2019 या महिन्यात 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या चार वर्षात प्रथमच असं घडलं. 2015 या वर्षातील काही महिन्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनी 300 चा आकडा पार केला होता.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर सुरू असलेल्या सत्तानाट्यादरम्यान राज्यातला शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत होता. जवळपास 70 टक्के खरीप पीक अवकाळी पावसामुळं उद्ध्वस्त झाला.
ऑक्टोबर महिन्यात 186 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. ही संख्या नोव्हेंबरमध्ये 114 नं वाढली.
एकट्या मराठवाड्यात नोव्हेंबर महिन्यात 120 शेतकरी आत्महत्यांची नोंद झालीय, तर विदर्भात 112 घटनांची नोंद झालीय.
2) CAA : नरेंद्र मोदी म्हणतात, 'संसदेविरोधात नव्हे, पाकिस्तानविरोधात आंदोलन करा'
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) विरोधक करण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर टीका केलीय. काँग्रेस राज्यघटनला विरोध करत असल्याचं मोदी म्हणाले. ते कर्नाटकातील सभेत बोलत होते. टाईम्स नाऊनं ही बातमी दिलीय.
"जे लोक भारताच्या संसदेविरोधात आंदोलन करत आहेत, त्यांना मला सांगायचंय की, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या कारनाम्यांना उघडं पाडण्याची गरज आहे. जर तुम्हाला आंदोलन करायचंच असेल, तर पाकिस्तानच्या गेल्या 70 वर्षांच्या कारनाम्यांविरोधात आंदोलन करायला हवं. पाकिस्तानविरुद्ध आवाज उठायला हवं," असं नरेंद्र मोदी म्हणाले.

फोटो स्रोत, Twitter
मोदींच्या या टीकेवर काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलंय. भाजपच्या ट्वीटला रिट्वीट करत काँग्रेसनं म्हटलंय की, "मोदीजी, आंदोलन संसदेविरोधात नसून, तुमच्या फुटीरतावादी धोरणाविरोधात आहे."
तसेच, "पाकिस्तानबाबत बोलायचं झाल्यास, 1948, 1965, 1971, कारगील या युद्धांमध्ये पाकिस्तानला ज्या जखमा दिल्यात, त्यातून ते अजून सावरले नाहीत. पाकिस्तानला धडा शिकवायचाय, तर बिर्याणी आणि आंब्याचा खेळ बंद करा," असं काँग्रेसनं म्हटलंय.
3) विदर्भात गारपीट, शेतपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान
विदर्भाला गुरुवारी (2 जानेवारी) वादळी वारे आणि मुसळधार पावसानं झोडपलं. यावेळी गारपीटही मोठ्या प्रमाणात झाली. परिणामी शेतपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालंय. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस पडला असून, याचा फटका विशेषत: सोलापुरातील पिकांना बसलाय.

फोटो स्रोत, SURBHI SHIRPURKAR
तर मराठवाड्यात लातूर, परभणी, हिंगोलीतही पावसानं हजेरी लावलीय. नगरमध्ये द्राक्ष आणि कांद्याचं नुकसान झालं.
उत्तरेकडील राज्यांतून सध्या थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहत असल्याने राज्यात दोन ते तीन दिवसांपासून थंडीत वाढ झालीय. मात्र, वातावरणात होणारे बदल आणि मध्य भारतातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे थंडीत अडथळा निर्माण होऊन राज्याच्या काही भागात ढगाळ स्थिती निर्माण होतेय.
4) महाराष्ट्रातील सत्ताप्रयोग देशभर राबवण्यासाठी पुढाकार - शरद पवार
महाराष्ट्रासारखाच सत्तप्रयोग देशातील इतर राज्यांमध्येही भाजपच्या विरोधात राबवण्यासाठी आपण पुढाकर घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगरमध्ये म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं आपल्याला पत्र मिळालं असून, राष्ट्रीय स्तरावर पुढाकार घेण्यास आणि त्यासंबंधी बैठक बोलावण्यास त्यांनी सांगितल्याचं पवारांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
"लोकांना पर्याय हवाय. देशात आणि राज्यात एकच पक्ष अशी स्थिती बरी नाही, असं लोकांना वाटतं. त्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या प्रयोगाकडे पाहिलं जातंय. समान कार्यक्रमावर पक्ष एकत्र येऊन नवा पर्याय देऊ शकतील, असा विश्वास महाराष्ट्रानंतर जाणकारांना वाटतंय," असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीत कुणाला कुठलं खातं द्यायचं, याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच झाल्याचा दावा पवारांनी केला. खातेवाटपावरुन नाराजी असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळलं.
5) आदेश दिल्यास PoK वर हल्ल्यास तयार - लष्करप्रमुख मनोज नरवणे
पाकव्याप्त काश्मीरसाठी (Pok) विविध योजना आहेत आणि कोणत्याही स्थितीत निपटण्यास तयार आहोत, असं भारताचे नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
"भारताचं सैन्य जम्मू आणि काश्मीरसह सर्व सीमांवर तैनात आहे आणि आमच्याजवळ विविध योजनाही आहेत. आवश्यकता भासल्यास त्या योजना अमलात आणल्या जातील. आम्हाला जे सांगितलं जाईल, ते काम यशस्वीपणे पूर्ण करू," असं नरवणे म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
नरवणे पुढे म्हणाले, "दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी विशेष रणनीतीनुसार सैन्य काम करतं. आवश्यकतेनुसार रणनितीचं नियोजन केले जाईल."
चीनसंदर्भातही नरवणेंनी यावेळी एनडीटीव्हीशी बातचीत केली. ते म्हणाले, "भारत-चीन सीमेवर शांततेचं वातावरण असून, कुठलीही समस्या नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








