सावरकर: राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात 'मी राहुल सावरकर नाही'वक्तव्यावरून जुंपली

फोटो स्रोत, Twitter @InCIndia
"माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. सत्य बोललो, त्यासाठी माफी मागणार नाही. मरेन मात्र माफी मागणार नाही," असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं.
राजधानी दिल्लीत काँग्रेसतर्फे आयोजित 'भारत बचाओ रॅली'मध्ये ते बोलत होते. त्यावर शिवसेनेने सावरकरांच्या बाबतीत "तडजोड नाही" असं सांगितलंय. तर भाजप नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींनी "स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये!" असं टीका करताना म्हटलंय.
त्यामुळे सावरकरांवरून पुन्हा काँग्रेस आणि शिवसेनेत तणाव निर्माण होणार का, आणि भाजप यावरून महाविकासआघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार का, असा प्रश्न उपस्थित होतो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
नेमका वाद काय?
काही दिवसांपूर्वी रांचीमधील एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले होते, "नरेंद्र मोदी म्हणाले होते, मेक इन इंडिया, मात्र सध्या तुम्ही कुठेही पाहिल्यास 'रेप इन इंडिया' दिसतं."
"उत्तर प्रदेशात उन्नावमध्ये मोदींच्या आमदारानं एका महिलेवर बलात्कार केला. नंतर पीडित महिलेच्या गाडीला अपघात झाला. मात्र, नरेंद्र मोदींनी अवाक्षरही काढला नाही," असं ते म्हणाले होते.
हाच धागा पकडत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजपच्या इतर महिला खासदारांनी लोकसभा सभागृहात राहुल गांधींवर शाब्दिक हल्ला चढवला होता. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्यालाच प्रत्युत्तर देताना "मरेन मात्र माफी मागणार नाही," असं ते शनिवारी आयोजित या रॅलीत सावरकरांचा उल्लेख करत म्हणाले.
इंग्रजांनी सावरकर यांना अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. या शिक्षेत सूट मिळावी, यासाठीचे अर्ज सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे केले होते. याचा संदर्भ देताना राहुल गांधी यांनी हे विधान केलं.
मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पं. नेहरू, महात्मा गांधी यांच्याप्रमाणे सावरकरांचाही सन्मान केला पाहिजे असं ट्वीट करून राहुल गांधी यांना उत्तर दिले आहे.

फोटो स्रोत, TWITTER

फोटो स्रोत, Twitter
त्यातच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून राहुल गांधींच्या या विधानाला "अतिशय निंदनीय" म्हटलं आहे. "ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये! केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे!"
"स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे," अशी मागणीही त्यांनी केली.

फोटो स्रोत, Twitter
त्यमुळे येत्या काळात महाविकास आघाडीसाठी काँग्रेस आणि शिवसेना यांचं नातं कसं राहाणार अशी शंका उपस्थित होत आहे.
भारत बचाव रॅलीत राहुल गांधी काय म्हणाले?
"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी माफी मागायला हवी. आधी अर्थव्यवस्था ही आपली ताकद होती. विकासदर 9 टक्के होता. आज अर्थव्यवस्थेची काय स्थिती आहे?" असं राहुल गांधी यांनी रामलीला मैदानावर बोलताना विचारलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
"नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये आग लावली. देशाला विभाजित केलं जात आहे आणि देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली जात आहे," असं राहुल म्हणाले. "सत्तेसाठी नरेंद्र मोदी काहीही करू शकतात. ते स्वतःचं मार्केटिंग करतात. ते दिवसभर टीव्हीवर दिसतात. भारतातले इतर नेते दिसत नाही. या जाहिरातींचे पैसे कोण देत आहे? जे लोक तुमचा पैसा लुटत आहे ते जाहिरातींचा पैसा भरत आहे," असं राहुल गांधी म्हणाले.
सोनिया गांधी काय म्हणाल्या?
भारत बचाओ रॅलीमध्ये सोनिया गांधी यांनी भाषण केलं. देशाला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करावा असं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या.
- देशाला वाचावायचं असेल तर आपल्याला कठोर संघर्ष करावा लागेल.
- बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. युवकांसमोर अंधकार आहे. युवकांच्या भविष्यांसाठी तुम्ही संघर्ष करण्यास तयार आहात की नाही?
- जेव्हा मी माझ्या अन्नदाता शेतकरी बांधवांकडे पाहते तेव्हा माझ्या मनाला यातना होतात. त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला देखील मिळत नाहीये.
- छोटे व्यापारी, मजूर यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. मजुरांना, कामगारांना तर काम करून दोन वेळचं जेवण देखील मिळत नाही. या लोकांसाठी तुम्ही संघर्ष करण्यास तयार आहात की नाहीत असा प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
- नवरत्न कंपन्या कुणाला विकल्या जात आहेत? सामान्य माणूस आपला पैसा ना बॅंकेत ठेऊ शकत नाहीये. हेच अच्छे दिन आहेत का?
- हे लोक संविधान दिवस तर साजरा करतात पण रोज संविधानाचे तुकडे करत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे देशाचा आत्माच मारला गेल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या.
- मोदी आणि शाह यांचं एक लक्ष्य आहे की लोकांना विभाजित करा आणि सत्तेवर ताबा ठेवा. लोकशाहीच्या संरक्षणासाठी आम्ही कोणतंही बलिदान देण्यास तयार आहोत.
- जनतेच्या हक्कासाठी काँग्रेसने नेहमी संघर्ष केला आहे. आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत देश आणि संविधानांचं रक्षण करू असं सोनिया गांधी म्हणाल्या.
भाजपचा हल्ला
राहुल गांधी यांनी देशाची माफी मागितली तरी देश तुम्हाला माफ नाही करणार. 'मेक इन इंडिया' नव्हे तर 'रेप इन इंडिया' आहे, असं लाजिरवाणं वक्तव्य आजवर राजकारणात कुणीही केलं नव्हतं, असं भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.
"मला याही गोष्टीचं आश्चर्य वाटतं की काँग्रेसची भूमिका ही प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या भूमिकेसारखीच का असते, मग ते तिहेर तलाक असो, CABचा विषय असो वा आत्ताचं हे बलात्कारावरील वक्तव्यं?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनीही राहुल गांधींवर हल्ला केला. "देशाचे महान भक्त वीर सावरकर, ज्यांनी ब्रिटिशांच्या कोठडीत आयुष्याची 25-30 वर्षं घालवली, त्यांच्यावर राहुल गांधींनी असी टीका करणं अशोभनीय आहे. त्यांनी इतिहास नीट वाचला नाहीये.
"आम्हाला अभिमान आहे सावरकरांचा आणि ते भारतात जन्मले होते याचा. आम्ही त्यांना सन्मान करूच. अशा देशभक्तांचा अपमान करणं, भारतीय सैन्याचा अपमान करणं राहुल गांधींची सवयच झाली आहे आता. जसं बालाकोटच्या वेळी त्यांनी सैन्याकडून पुरावे मागितले होते, तसंच आता सावरकरांच्या देशभक्तीचे पुरावे ते मागतायत. त्यांच्याकडून आणखी अपेक्षाही काय करावी," असंही प्रसाद म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 4
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








