अनिल देसाई: शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर बसणार, याचा अर्थ स्पष्ट आहे

राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करत आहे. चर्चेला सुरूवात होत असतानाच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामाही दिला.
या राजीनाम्यानंतर शिवसेना एनडीएतून अधिकृतपणे बाहेर पडली का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी (17 नोव्हेंबर) या प्रश्नाचं उत्तर दिलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
शिवसेना नेत्यांची बसण्याची जागा बदलण्यात आली असून ते विरोधी बाकांवर बसतील असं स्पष्ट करण्यात आलं. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचं एनडीएतील स्थान, सरकार स्थापनेच्या चर्चा तसंच मुख्यमंत्रिपदावरचा शिवसेनेचा दावा यासंबंधी शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्याशी बीबीसी मराठीनं संवाद साधला.

राज्यसभेतील शिवसेनेच्या जागा आता बदलल्यात, अशी चर्चा आहे. शिवसेना आता विरोधी बाकांवर बसणार का?
- हो. कालच या प्रकारचं एक पत्र आम्हाला सेक्रेटरिएटकडून आलं. यामध्ये मी, संजय आणि राजकुमार धूत यांची राज्य सभेतील आसनव्यवस्था बदलण्यात आली आहे.
आमचा जो काही डिव्हीजन नंबर असेल तोसुद्धा त्या अनुषंगाने बदलला आहे. ट्रेझरी बेंचेसवर होतो, तिथून आता विरोधी बाकांवर टाकण्यात आला आहे. ठीक आहे. शेवटी सभागृहामध्ये देशासाठी कायदा बनवणं आणि देशाच्या ज्या काही महत्त्वाच्या समस्या आहेत, त्या सभागृहापुढे मांडून त्याचा पाठपुरावा करणं आणि संघर्ष करून न्याय मिळवणं, हे खासदार म्हणून आपलं काम आहे. ते काम कुठेही बसलो तरी करणं स्वाभाविक आहे.
पण याचा अर्थ युती अधिकृतपणे तुटली असा आहे का? शिवसेना आता असं स्पष्टपणे म्हणेल का?
- जी कृती झाली आहे, आमची जर आसनंच बदलली आहेत, तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे.
म्हणजे तुम्ही आता एनडीएचा भाग नाहीये?
- मला वाटतं, की आता याची केवळ औपचारिकताच बाकी आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा कुठपर्यंत आली आहे? पहिला ड्राफ्ट तयार आहे, असं कळंतय. उद्धव ठाकरे, सोनिया गांधी आणि शरद पवार अंतिम निर्णय घेणार, असं समजतंय. चर्चा कोणत्या टप्प्यावर आलीये आणि सरकार कधीपर्यंत स्थापन होणार?
- तीनही पक्षांकडून आपापल्या पक्षाध्यक्षांनी नेमून दिलेली मंडळी आहेत. शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आहेत. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखी नेतेमंडळी आहेत. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील आहेत.

फोटो स्रोत, Twitter/NCP
हे सर्वजण बसून कॉमन मिनिमम कार्यक्रम किंवा जे काही महत्त्वाचे मुद्दे असतील त्यावर चर्चा करत आहेत, आपापल्या पक्षाध्यक्षांना त्यासंबंधीची माहिती देत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सर्व चर्चेवर नजर ठेवून आहेत. एकूण योग्य दिशेने चर्चा होत आहे.
पण काही कालमर्यादा सांगता येईल? म्हणजे या आठवड्यात होईल, पुढच्या आठवड्यात होईल की यापेक्षा वेळ लागेल?
- निश्चित अशी तारीख सांगता येत नाही. पण जेवढं लवकर करता येईल, व्यवस्थिपणे करता येईल हे पाहू. कारण तीन पक्ष असल्यामुळे सगळं काही नीटनेटकं होईल हे पाहणं आवश्यक आहे. या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा विषय आहे, तो महाराष्ट्राला स्थिर सरकार देणं. कोणत्याही प्रकारची अस्थिरता असणं हे राज्याच्या दृष्टिनं योग्य ठरणार नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा वेध घेऊन या गोष्टी मांडल्या जात आहेत. एकदा या गोष्टींचा मेळ पडला, की स्थिर सरकार अस्तित्वात येईल.
असं म्हटलं जातंय, की सोनिया गांधींना विचारधारा, हिंदुत्वाचा मुद्दा, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अशा काही गोष्टींवर आक्षेप किंवा काही शंका होत्या. तुम्हीही या सर्व चर्चांमध्ये होता. या मुद्द्यांपाशी येऊन चर्चा अडली आहे का?
- मला असं नाही वाटत. नाहीतर चर्चा एवढ्या पुढे गेल्याच नसत्या. तीनही नेते एकमेकांशी बोलत आहेत. त्यामुळे माझ्या मते चर्चा व्यवस्थित सुरू आहे.
11 नोव्हेंबरला नेमकं काय झालं? शिवसेनेकडे संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ होता. सोनिया गांधी सर्व आमदारांशी बोलल्या होत्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, की काँग्रेसनं निर्णय घेतला होता. मात्र आपण बोलून काही गोष्टी ठरवू आणि मग पत्र देऊ, असं शरद पवारांनी म्हटलं. तिथे सगळं थांबलं. शिवसेनेला यातलं नेमकं काय माहिती होतं? शिवसेनेची बाजू काय?
- मुळात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं जे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटण्यासाठी गेलं होतं, ते वेळ वाढवून मागण्यासाठी. कारण बहुमत सिद्ध करण्यासाठी दिला गेलेला वेळ खूप कमी होता.

फोटो स्रोत, Twitter/NCP
त्यानंतर बाकीच्या गोष्टी अलाहिदा आहेत, कारण तिथेच जर घोडं अडलं असतं तर चर्चा एवढी पुढं गेलीच नसती. आता पुढच्या गोष्टीही झाल्या आहेत.
बाहेर एक वातावरण तयार झालं होतं, की शिवसेनेला पत्र मिळणार होतं. त्या आशेवरच ते राज्यपालांकडे गेले. पण प्रत्यक्षात ते पत्र आलं नाही.
- या सगळ्याचा खुलासा संबंधित पक्षाच्या पक्षाध्यक्षांनी केलेला आहे. त्यामुळे आता तिथून आम्ही बरेच पुढे आलो आहोत.
मुख्यमंत्रिपदाबद्दल बरंचसं बोललं जात आहे. या सगळ्या चर्चांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा विषय आला? पाच वर्षं मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे राहील असं ठरलं आहे का? किंवा काय ठरलंय?
- याबाबत स्वतः उद्धव ठाकरे जातीनं लक्ष घालून आहेत आणि हा निर्णय अधिकृतरीत्या स्वतः उद्धव ठाकरेच घेतील. ते योग्य निर्णय योग्य वेळी घेतील.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, असं सगळे आमदार म्हणत आहेत. त्यांची स्वतःची तशी इच्छा आणि तयारी आहे का?
- आमची इच्छा आहे. पण याबाबतचा निर्णय स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील.
देवेंद्र फडणवीस यांनी परवा असं म्हटलं, की सरकार एकतर भाजपचं येईल किंवा भाजपसोबत येईल. याचा अर्थ कसा लावायचा?
- देवेंद्र फडणवीसांनी ही आकडेमोड केलेली आहे. त्यामुळे ती कशी केली हे स्वतः तेच सांगू शकतात. ज्या गोष्टींचा मेळ ते घालत आहेत किंवा ज्या पद्धतीने त्यांचे कॅलक्युलेशन आहेत ते मी कसं सांगू शकतो?
पण शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता त्यामुळे अजूनही खुली आहे का ती पूर्णपणे संपलीये?
- आज गोष्टी यादृष्टिनं कुठेतरी पुढं गेल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख या गोष्टी स्वतः हाताळत आहेत. त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही.
या आठवड्यात नक्की सरकार स्थापन होणार- अब्दुल सत्तार
एकीकडे, अनिल देसाई यांनी सत्ता स्थापनेच्या वाटाघाटी सुरू आहेत, असा सावध पवित्रा घेतला, तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी या आठवड्याभरात सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला.
"सरकार स्थापनेच्या सर्व वाटाघाटी झालेल्या आहेत. तीनही पक्षांचा जो काही जाहीरनामा आहे त्याचंही एकत्रीकरण करून एक नवीन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पाच वर्षे यशस्वीपणे राबविण्यात येईल," असा विश्वास शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला.

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार. आम्ही शिवसैनिकांनी हे ठरवलं आहे," असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. अब्दुल सत्तार यांनी पुढे म्हटलं, की शिवसेना पक्षप्रमुखांनी ठरवलंय की नाही हे मला माहीत नाही.
सत्ता स्थापनेच्या वाटाघटींबद्दल बोलताना अब्दुल सत्तार यांनी म्हटलं, "शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चेचा पहिला राउंड झालेला आहे. दुसऱ्या राउंडमध्ये शपथविधीची तयारी होईल आणि जास्तीत जास्त या आठवड्यामध्ये नवीन सरकार येईल. शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल."
शिवसेनेची हिंदुत्वाबद्दलची भूमिका आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा चर्चेत अडथळा ठरतोय का, या प्रश्नाला उत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी म्हटलं, "बाळासाहेब कधीही मुसलमानांच्या विरोधात असल्याचं मला आठवत नाहीये. किंवा उद्धवजीही मुसलमानांच्या विरोधात नाहीयेत. हिंदुत्वाची अंमलबजावणी तंतोतंत होईल, परंतु दुसऱ्या समाजावरही अन्याय होणार नाही, यासाठी उद्धव ठाकरे स्वतः प्रयत्नशील असतील. सिल्लोडच्या सभेत पन्नास हजार जनसमुदायासमोर त्यांनी हे वक्तव्य केल्याचं मला आठवतंय."
"शिवसेना महाराष्ट्रात एकेकाळी क्रमांक एकचा पक्ष होता. पण ज्यावेळी त्याचे पाय कापण्याचे काम केलं, तेव्हा भाजपसोबत जाण्याची वेळ गेली. आता भविष्यातही शिवसेना 288 जागांवर लढणार," असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी भाजप-शिवसेना एकत्र येण्य़ाची शक्यता फेटाळून लावली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








