प्रकाश आमटे यांचा बिल गेट्स यांच्या हस्ते गौरव होणार #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. प्रकाश आमटे यांचा बिल गेट्स यांच्या हस्ते होणार गौरव

डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचा त्यांच्या आरोग्यसेवेतील योगदानासाठी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.

आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय तसंच इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार होणार आहे. डॉ. प्रकाश आमटे यांच्यासह डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सहसंस्थापक बिल गेट्स या तिघांचा राजधानी दिल्लीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करतील. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

गडचिरोलीतील 'लोकबिरादरी प्रकल्पा'च्या माध्यमातून ते आरोग्य सेवा देत आहेत. आमटे दांपत्याला याआधी प्रतिष्ठेच्या मॅगसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.

2. एअर इंडिया, BPCL मार्चपर्यंत विकणार - निर्मला सीतारमण

एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या दोन सरकारी आस्थापनांची मार्चपर्यंत विक्री करणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

गुंतवणूकदार या दोन कंपन्या विकत घेण्यासाठी उत्सुक आहेत. आर्थिक मंदीच्या काळात या दोन कंपन्यांच्या विक्रीच्या माध्यमातून एक लाख कोटी उभे करण्याची सरकारची योजना आहे.

मंदीची झळ बसू नये यासाठी सरकारने आवश्यक उपाययोजना अंमलात आणल्याचंही त्यांनी सांगितलं.

3. PMC बँक घोटाळा, माजी भाजप आमदाराचा मुलगा अटकेत

PMC बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी रणजीत सिंग यांना अटक केली. रणजीत सिंग PMC बँकेचे माजी संचालक आहेत तसंच माजी भाजप आमदार तारासिंग यांचे सुपुत्र आहेत. 4,355 कोटी रुपयांच्या PMC बँक घोटाळाप्रकरणी या आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेने दोन ऑडिटर्सना अटक केली होती. 'मुंबई मिरर'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

पोलिसांनी आतापर्यंत पाचजणांना अटक केली असून, यामध्ये HDIL कंपनीचे प्रवर्तक आणि बँकेच्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

4. रिलायन्स कम्युनिकेशनमधून अनिल अंबानी बाहेर

दिवाळखोरीत गेलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीच्या संचालकपदाचा अनिल अंबानी यांच्यासह पाच संचालकांनी शनिवारी राजीनामा दिला. 'इकॉनॉमिक टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

या कंपनीचा दुसऱ्या तिमाहीतील तोटा 30 हजार 142 कोटी रुपयांचा आहे. ही कंपनी दिवाळखोरी आणि नादारीसाठीच्या प्रक्रियेत आहे. अनिल यांच्या बरोबरीने छाया विराणी, रायना कराणी, मंजिरी कक्कर, सुरेश रंगाचार या संचालकांनीही राजीनामे दिले.

5. 'मी भाजप सोडतोय' हॅशटॅग झाला ट्रेंड

विधानसभा निवडणुकीत आणि निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचं 'मी परत येईन' वाक्य चांगलंच गाजत होतं. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी एकत्र येत असतानाच सोशल मीडियावर 'मी भाजप सोडतोय' हॅशटॅग चर्चेत आहे. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

पक्षाला सोडचिठ्ठी देत असलेले अनेक कथित नेते हा हॅशटॅग वापरत आहेत. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची भाजप राहिली नसल्याची खंत व्यक्त करत हा हॅशटॅग वापरला जातो आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)