सावरकरः जेव्हा मनमोहन सिंह यांनी काँग्रेसचा सावरकरांना विरोध नाही असं म्हटलं होतं...

फोटो स्रोत, SAVARKARSMARAK.COM
विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांनी आपापली मतं मांडण्यास सुरूवात केली होती. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी मुंबईमध्ये बोलताना सावरकरांना काँग्रेसचा विरोध नाही, अशा शब्दांमध्ये आपल्या पक्षाची बाजू मांडली होती.
इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट काढलं होतं. मात्र सावरकरांच्या विचारसरणीला आमचा विरोध होता आणि आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
सावरकरांच्या कार्याबद्दल आणि एकूणच इतिहासातील त्यांच्या स्थानाबद्दल दरवर्षी नव्याने चर्चा उपस्थित होत असते. 2004 साली अंदमान बेटांवरील स्वतंत्र ज्योती स्मारकावरील सावरकरांच्या कवितेच्या ओळी मणिशंकर अय्यर यांनी काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर तत्कालीन विरोधी पक्षातील शिवसेना, भाजपाने प्रखर विरोधाची भूमिका घेतली होती. मणिशंकर अय्यर यांच्याविरोधात 'जोडे मारा' आंदोलनही मुंबईत करण्यात आलं होतं. सावरकरांची प्रतिमा संसदेत लावण्यावरही अनेक वाद निर्माण झाले होते.
सावरकर यांच्याबाबतीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या काही आक्षेपार्ह ट्वीटमुळेही गदारोळ झाला होता. 5, 22 आणि 23 मार्च 2016 रोजी राहुल गांधी यांनी ही ट्वीटस् केली होती. यामध्ये राहुल यांनी सावरकरांबद्दल 'ट्रेटर' म्हणजेच गद्दार असा शब्द वापरला होता.
सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी याबाबत राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रारही नोंदवली होती. सावरकरांच्या आयुष्याबद्दल तसंच त्यांच्या योगदानाबद्दल अशा प्रकारच्या चर्चा, टीका, वादळं सतत निर्माण होत असतात.
आता मात्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि माजी पंतप्रधानांनीच आजवरच्या भूमिकेपेक्षा वेगळं मत व्यक्त केल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या भूमिकेत बदल झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काँग्रेसच्या भूमिकेत अचानक बदल?
सावरकरांना गांधीहत्येच्या पूर्वीपासून विरोध होत होता, असं मत रणजित सावरकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
"पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवासाठी म्हणजेच गांधीहत्येच्या आधीच त्यांना दिल्ली किंवा मुंबईतील कार्यक्रमासाठी आमंत्रण नव्हतं. स्वातंत्र्यवीर सावरकर तेव्हा हिंदू महासभेचे नेते होते. म्हणजेच एका मोठ्या पक्षाचे नेते होते. तरीही त्यांना आमंत्रण नव्हतं. त्यानंतर त्यांचं नाव गांधीहत्येच्या खटल्यात गुंतवलं गेलं. याचाच अर्थ तेव्हापासून काँग्रेस त्यांना विरोध करत आहे," असं रणजित सावरकर सांगतात.

फोटो स्रोत, SAVARKARSMARAK.COM
ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्रातल्या काँग्रेसनं सावरकरांबाबत नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. शरद पवार यांनी सावरकर स्मारकाला देणगी दिली होती. इतकंच नाही तर सुशीलकुमार शिंदे यांनीही सावरकरांसंबंधी कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. केंद्रामध्ये वाजपेयी यांचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर सावरकरांवर नव्याने आरोप सुरू झाले. सावरकरांनी आपला तुरुंगातला पत्रव्यवहार कधीच लपवलेला नाही. आपली भूमिका त्यांनी सविस्तरपणे या पत्रांतून मांडली होती. सावरकरांच्या पत्रांना माफीनामा म्हणण्याची पद्धत सुरू करण्यात आली.
गांधीहत्येमध्ये त्यांचा समावेश असल्याचं कपूर कमिशननं कोठेही सूचित केलेलं नाही. सावरकरांना वारंवार लक्ष्य करण्याच्या या काँग्रेसच्या भूमिकेवर नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या. वारंवार सावकरांवर का टीका केली जाते, असा प्रश्न महाराष्ट्राबाहेर विचारला जातो. महाराष्ट्राबाहेर काँग्रेसचे लोकच त्यांचं नाव सतत घेत असतात. लोकांची नकारात्मक प्रतिक्रिया लक्षात घेऊनच आता काँग्रेस आपली भूमिका बदलत आहे."
"गांधीहत्या प्रकरणी निर्दोष सुटका झाली असताना देखील कपूर कमिशन अहवालातील एका असंबद्ध वाक्याचा संदर्भ देत 'कपूर कमिशनने त्यांना दोषी ठरवलं आहे आणि हा नवीन पुरावा कोर्टाला उपलब्ध झाला असता तर सावरकरांना फाशीच झाली असती' असा खोटा प्रचार सुरु झाला. वस्तुत: कपूर कमिशनने असा कुठलाही निष्कर्ष काढला नसून, अहवालाच्या निष्कर्षात सावरकरांचा दुरान्वयेही संबंध कमिशनला जोडता आला नाही," रणजित सावरकर यांनी पुढे सांगितलं.

फोटो स्रोत, SAVARKARSMARAK.COM
काँग्रेसचा भाजपवर आरोप
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मात्र आपल्या पक्षाच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असं मत बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
ते म्हणतात, "काँग्रेसने सावरकरांचा तिरस्कार किंवा द्वेष कधीच केलेला नाही. काँग्रेसचा त्यांच्या विचारांना विरोध होता आणि तो असेलच. त्यांच्याबद्दल आदर आहे, पण ते आमच्या पक्षाचे आदर्श नाहीत. सावरकरांना भारतरत्न देण्यात येण्याचं विधान आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळेस कसं आलं? हे तर केंद्र पातळीवर होतं ना, मग लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळेस त्याबाबत चर्चा व्हायला हवी होती. पण आता महाराष्ट्रातली काही मतं मिळवण्यासाठी हा मुद्दा समोर आला आहे."
"सावरकरांचे विचार इतकी वर्षं आरएसएस आणि भाजपाला तरी कुठे पटले होते. सावरकरांचे हिंदूधर्म सुधारणेचे, गाय हा एक उपयुक्त पशू असल्याचं मत संघाला तरी कुठे मान्य होतं," असा प्रश्नही सावंत यांनी विचारला आहे.

फोटो स्रोत, SAVARKARSMARAK.COM
इंदिरा गांधीकडून सावरकरांचे अनुकरण?
इंदिरा गांधी या सावरकरांच्या विचारांचं अनुसरण करत होत्या असं मत रणजित सावरकर व्यक्त करतात.
ते म्हणाले, "देशाच्या सीमेची आखणी शस्त्रानं केली जाते. 1971 साली त्यांनी बांगलादेश मुक्तीयुद्धाच्यावेळेस ढाक्यापर्यंत चढाई केली होती. सावरकरांनीही आक्रमणाला पाठिंबा दिला होता. तसंच सावरकर औद्योगीकरणाच्या बाजूचे होते. यासर्व मुद्द्यांवरच इंदिरा गांधी मार्गक्रमण केलं होतं. आज काँग्रेस सावरकरांना विरोध नाही म्हणत आहे तर मग त्यांनी हा विषय आता सोडून द्यावा. एकदा गांधीहत्येमध्ये सावरकरांचा सहभाग नाही हे सिद्ध झाल्यावर त्याविरोधात कोणीही अपिल केलं नाही. त्यांच्याविरोधात पुरावेच नाहीत हे सिद्ध झालं आहे."
काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल?
डॉ. मनमोहन सिंह यांनी काँग्रेसचा सावरकरांना विरोध नाही अशी भूमिका घेण्यामागे डॅमेज कंट्रोलची नीती आहे, असं मत पत्रकार वैभव पुरंदरे व्यक्त करतात.
वैभव पुरंदरे यांचं 'सावरकर, द ट्रू स्टोरी ऑफ द फादर ऑफ हिंदुत्व' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "यापूर्वी राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत बोलताना ट्रेटर, कॉवर्ड असे शब्द वापरलेले आहेत. सावरकरांनी सर्व जातींना एका मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले होते, अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न केले होते हे नाकारता येत नाही. त्यामुळे आता काँग्रेसची बदललेली भूमिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेली सारवासारव वाटते. तसंच सावरकरांची पं. नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याशी सतत तुलना करणंही अकारण वाटतं."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








