दसरा : विजयादशमीला या गावात पाळतात 'शहीद दिवस'

महिषासुर

फोटो स्रोत, ASUR ADIVASI WISDOM DOCUMENTATION INITIATIVE

    • Author, रवी प्रकाश
    • Role, रांचीहून बीबीसी हिंदीसाठी

झारखंडच्या नेतरहाटच्या डोंगरांमध्ये राहणारे असुर आदिवासी विजयादशमीला महिषासुराची पूजा करतात. हीच पूजा पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातल्या काशीपूर प्रखंडमध्येही होते.

2011 सालापासून इथे महिषासुराचा 'शहीद दिवस' पाळला जातो.

महिषासुर आपले पूर्वज असल्याचं असुर आदिवासी मानतात. या जातीच्या आदिवासींची लोकसंख्या झपाट्याने कमी होतेय. झारखंड सोबतच पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढमध्येही असुर आदिवासींच्या वस्त्या आहेत.

या असुर आदिवासींपैकी फार कमी जणांना लिहिता-वाचता येतं.

आदिवासी

फोटो स्रोत, ASUR ADIVASI WISDOM DOCUMENTATION INITIATIVE

महिषासुराचं खरं नाव हुडुर दुर्गा असल्याचं कथाकार सुषमा असुर सांगतात. असुर आदिवासींमधल्या त्या एकमेव कथाकार आहेत. महिषासुर महिलांवर हत्यार उगारत नव्हता, म्हणूनच दुर्गेला पुढे करत कपटाने त्याची हत्या करण्यात आल्याचं त्या सांगतात. "ते युद्ध नव्हतं. ती आर्य आणि जे आर्य नाहीत, यांच्यातली लढाई होती. यामध्ये महिषासुराला मारण्यात आलं."

सुषमा म्हणतात, "आमच्या प्रजातीचा संहार झाला आणि या विजयाच्या स्मृतिप्रित्यर्थ हिंदू दसरा साजरा करतात. म्हणूनच आम्ही जर हा दिवस महिषासुराचा शहीद दिवस म्हणून पाळला तर त्यावर कुणाला आक्षेप असू नये."

सुषमा आसुर

फोटो स्रोत, ASUR ADIVASI WISDOM DOCUMENTATION INITIATIVE

महिषासुराची फक्त झारखंडच नाही तर छत्तीसगढ, पश्चिम बंगालसोबतच दक्षिणेतही पूजा होत असल्याचं आदिवासी विषयांवरील अभ्यासक अश्विनी पंकज सांगतात

कर्नाटकातल्या म्हैसूरमध्ये महिषासुराची मोठी प्रतिमाही लावण्यात आली आहे. असुर आदिवासींची मुलं मातीपासून तयार करण्यात आलेल्या सिंहाच्या खेळण्यांशी खेळतात, पण त्यांची मुंडकी छाटण्यात आलेली असतात. कारण हा सिंह त्या दुर्गेचं वाहन आहे, ज्यावर स्वार होऊन त्यांच्या पूर्वजांचा नरसंहार केला होता.

पंकज म्हणतात, "महिषासुर खलनायक असल्याचं सांगणाऱ्यांनी तो नायक म्हणूनही कसा होता, याचा अभ्यास करावा."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, ASUR ADIVASI WISDOM DOCUMENTATION INITIATIVE

2008 साली झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी रांचीच्या मोराबादी मैदानावर होणाऱ्या रावण दहनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला नकार दिला होता. रावण आदिवासींचा पूर्वज असल्याने आपल्याला त्याचं दहन करणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

महिषासुर शहीद दिन

फोटो स्रोत, ASUR ADIVASI WISDOM DOCUMENTATION INITIATIVE

देश-विदेशातले लोक यामध्ये सहभागी होण्यासाठी येतात. 1997 सालापासून हा उत्सव साजरा करण्यात येतो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)