विधानसभा निवडणूक 2019: सिंधुदुर्गात भाजपचे नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेना मैदानात

नितेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला तेव्हा

फोटो स्रोत, Twitter / NiteshNRane

फोटो कॅप्शन, नितेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला तेव्हा
    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी

नारायण राणे यांचे धाकटे पुत्र नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच एका छोटेखानी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना भाजपने कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. मात्र आता नितेश राणेंच्या विरोधात शिवसेनेनं उमेदवार दिला आहे.

"शिवसेना कणकवलीतला उमेदवार मागे घेत नाही, तोपर्यंत कुडाळमधून दत्ता सामंत आणि सावंतवाडीतून राजन तेलींचा पाठिंबा आम्ही कायम ठेवू," असं भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

त्यामुळं राज्यात जरी शिवसेना-भाजप युती असली तरी सिंधुदुर्गात 'राणे विरुद्ध शिवसेना' हाच संघर्ष कायम राहणार असल्याचं दिसतंय.

'राणे विरुद्ध शिवसेना' हा संघर्ष जुना आहे. तोच पुन्हा एकदा इथं पाहायला मिळतोय. नितेश राणे यांच्या विरुद्ध शिवसेनेनं सतीश सावंत यांना उमेदवारी दिलीय. विशेष म्हणजे, सतीश सावंत हे काही दिवसांपूर्वीपर्यंत राणेंचे समर्थक होते.

राणेंविरोधात शिवसेनेनं उमेदवार दिल्यानं सिंधुदुर्गातील इतर दोन मतदारसंघात म्हणजे कुडाळ आणि सावंतवाडी इथं भाजपनं सेनेच्या विरोधातल्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय.

नितेश राणे

फोटो स्रोत, Twitter/@NiteshNRane

भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार म्हणतात, "युतीच्या फॉर्म्युल्यात कणकवलीची जागा भाजपच्या वाट्याला आलीय. मग नितेश राणे हे आम्ही उमेदवार दिलेत. आता शिवसेनेचं म्हणणं आहे की, राणेंना उमेदवारी द्यायची नाही. आता आमचं तिकीट कुणाला द्यायचं हे आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतात, शिवसैनिक थोडं ठरवणार? राणेंना दिला की जठारांना दिला, याबाबत सेनेला काय करायचंय?"

शिवसेनेनं कणकवलीत राणेंच्या विरोधात उमेदवर दिल्यानं आणि भाजपनं इतर दोन ठिकाणी शिवसेनेविरोधात पाठिंबा दिल्यानं सिंधुदुर्गात मतांवर आणि राज्यात इतरत्र युतीच्या संबंधांवर काय परिणाम होईल, याचा आढावा बीबीसी मराठीनं घेतला.

'सतीश सावंतांमुळे कणकवलीची लढत रंगतदार'

कणकवलीत नितेश राणेंविरोधात शिवसेनेनं सतीश सावंतांना उभं केलं. त्यामुळं नितेश राणेंच्या मतांवर फरक पडेल का, याबाबत वरिष्ठ पत्रकार सतीश कामत म्हणतात, "नितेश राणेंना नक्कीच फरक पडेल. तिथं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचाही उमेदवार आहे. तो उमेदवार कायम राहिल्यास नितेश राणेंना फायदा होईल. मात्र एकास एक अशी लढत झाल्यास फरक पडू शकतं. नितेश राणेंच्या विरोधातली मतं फोडणारे उमेदवार उभे राहिल्यास अडचण होणार नाही."

सिंधुदुर्गातील वरिष्ठ पत्रकार विकास गावकर हे याचं अधिक विश्लेषण करतात. ते म्हणतात, "महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची काही मंडळी सतीश सावंतांच्या सोबत आहेत. कणकवली मतदारसंघातल्या फोंडा आणि हरकुळ भागात सतीश सावंतांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्यामुळं या भागातले जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंतांबरोबर राहतील. स्वाभिमानमधली 25 ते 30 टक्के मतं सतीश सावंतांसोबत राहू शकतात."

नारायण राणे, नितेश राणे

फोटो स्रोत, Getty Images

शिवाय, "राणेंना पक्षात घेतल्यानं नाराज झालेले भाजप कार्यकर्त्यांचाही फायदा सतीश सावंत करून घेऊ शकतात. दुसरीकडे, कणकवलीतली शिवसेनाही सावंतांच्या सोबत राहील. एकूणच विजय-पराभवाचं नाही सांगू शकत, मात्र तुल्यबल लढत होईल," असं विकास गावकर म्हणतात.

सिंधुदुर्गातील इतर दोन मतदारसंघांवर काय परिणाम होईल?

शिवसेनेनं कणकवलीतून अधिकृतपणे नितेश राणेंच्या विरोधात सतीश सावंतांना उतरवल्यानं सिंधुदुर्गातील कुडाळ आणि सावंतवाडी या उर्वरीत मतदारसंघातही परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

"उमेदवारी अर्ज भरण्याआधी असं चित्र होतं की, सिंधुदुर्गातील सर्व लढती म्हणजे कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी शिवसेना आणि भाजप एकतर्फी जिंकेल. मात्र, सतीश सावंतांमुळं या तिन्ही मतदारसंघात रंगतदार लढती होतील," असं विकास गावकर यांचं म्हणणं आहे.

"कुडाळमध्ये दत्ता सामंतांना भाजपनं पाठिंबा दिलाय. त्यात त्यांची अर्ज भरण्यासाठीची भव्य रॅली पाहिल्यास त्यांना असणारा पाठिंबा लक्षात येतो. वैभव नाईक यांची एकतर्फी लढत होईल, असं वाटत असताना कुडाळमध्येही रंगतदार लढत होईल.

"दुसरीकडे, सावंतवाडी मतदारसंघ दीपक केसरकरांनी बांधून ठेवलाय. राजन तेली हे आपल्याविरोधात लढणार, हे केसरकरांना माहीत होतं. त्यामुळं त्यांनी तशी तयारी केली होती," असं गावकर सांगतात.

नारायण राणे

फोटो स्रोत, Getty Images

"कणकवली, देवगड, कुडाळ, मालवण या चार तालुक्यात राणेंची ताकद आहे, असं म्हणू शकतो. मतांच्या दृष्टीनं पाहिल्यास कणकवली एवढंच त्यांचं क्षेत्र उरलंय," असं ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत सांगतात.

कामत पुढे म्हणतात, "कणकवलीतल्या समीकरणांचा बाजूच्या जिल्ह्यात म्हणजे रत्नागिरीत सुद्धा फरक पडणार नाही. इतर महाराष्ट्रात तर काहीच संबंध नाही"

मात्र, 2014 साली कुडाळमधून नारायण राणे हे वैभव नाईक यांच्यासमोर पराभूत झाले होते. तर सावंतवाडीचे उमेदवार दीपक केसरकर हेही नारायण राणे यांचे राजकीय विरोधक राहिलेत. त्यामुळे त्यांच्या पराभवासाठी राणे काही प्रयत्न करतील का, हाही प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

मात्र, ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत म्हणतात, "नितेश राणेंना निवडून आणणं हेच राणेंचं आता लक्ष्य असेल. गेल्यावेळी कुडाळमधून स्वत: लढले होते. मात्र पराभूत झाले. त्यामुळं यंदा इतरांना किती ताकद देतील, याबाबत शंका आहे.

सिंधुदुर्गात युतीचे तीनतेरा?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप युती संपल्यात जमा असल्याचं स्वत: भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

प्रमोद जठार

फोटो स्रोत, Facebook/Pramod Jathar

फोटो कॅप्शन, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार

जठार म्हणाले, "सिंधुदुर्गात युती नसल्यासारखी स्थिती. याची सुरुवात शिवसेनेनं केली. कुडाळ, सावंतवाडीतले AB फॉर्म आमच्याकडे पण होते, पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी सांगितलं की, आपण एबी फॉर्म द्यायचे नाही. आम्ही युती धर्माचं पालन केलंय."

"स्वाभिमान जर भाजपमध्ये विलीन होणार असेल, तर भाजपची ताकद वाढणार आहे. राणेंना भाजपनं सोबत घेतल्यास भाजपची कोकणातली ताकद वाढेल, ही शिवसेनेची पोटदुखी आहे," असा दावाही भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केलाय.

शिवसेनेचं काय म्हणणं आहे?

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सिंधुदुर्गात आम्ही भाजपच्या विरोधात नाही. मात्र ज्यानं शिवसेनाप्रमुखांशी बेईमानी केलीय (त्यांचा इशारा नारायण राणेंकडे आहे), बाळासाहेबांवर गलिच्छ आरोप केलेत, अशा माणसाचा शिवसेना प्रचार करणार नाही, हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विनंतीपूर्वक कळवलं होतं."

शिवसेना

फोटो स्रोत, Twitter/@ShivSena

"युतीचंच बोलायचं तर लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गातून राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार दिला होता. त्यावेळी राणेंचा पक्ष NDAच घटक होता. मग त्यावेळी कोणत्या आधारावर उमेदवार दिला?" असा सवाल विनायक राऊत यांनी उपस्थित केला.

"आम्ही नितेश राणेच्या विरोधात उभे आहोत, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नाही. आम्हाला मोदी, शाह, फडणवीस आणि प्रमोद जठार या सर्वांबद्दल आदर आहे," असं विनायक राऊत म्हणाले.

2014च्या निवडणुकीनंतर काय झालं होतं?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी यांचा समावेश होतो.

2014 सालच्या निवडणुकीचा निकाल पाहता, यातला एक काँग्रेसनं आणि दोन शिवसेनेनं जिंकले होते.

कणकवलीतून काँग्रेसच्या तिकिटावर नितेश राणे जिंकले होते, तर कुडाळमधून नारायण राणेंचा पराभव करत वैभव नाईक विधानसभेत दाखल झाले होते. सावंतवाडीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले दीपक केसरकर जिंकले होते.

दीपक केसरकर हे 2014 साली राज्याचे गृहराज्यमंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्रीही झाले. गेल्या पाच वर्षात केसरकर आणि राणेंमध्ये अनकेदा टीका-प्रतिटीका झाल्या.

दरम्यानच्या काळात नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुरू केला आणि भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत गेले.

राणेंच्या मोठ्या मुलानं, म्हणजेच माजी खासदार निलेश राणेंनी यंदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, मात्र 2014 प्रमाणेच यंदाही शिवसेनेच्या विनायक राऊतांनी त्यांचा पराभव केला.

नारायण राणे

फोटो स्रोत, Getty Images

नितेश राणे हे या काळात काँग्रेसचेच आमदार होते. मात्र काँग्रेसवर टीका करण्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या व्यासपीठांवरही ते दिसायचे. त्यामुळे ते काँग्रेस सोडणार हे निश्चित मानलं जातं होतं. झालेही तसेच. नितेश राणे यांनी दोनच दिवसांपूर्वी छोटेखानी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मात्र राज्यभरात महायुतीत भाजप आणि शिवसेना प्रमुख पक्ष आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आजवर नारायण राणेंचा संघर्ष शिवसेनेसोबतच राहिला आहे.

त्यामुळं विधानसभा निकालानंतर सिंधुदुर्गात कुणाची ताकद हे स्पष्ट होईलच. मात्र सिंधुदुर्गासह इतरत्र राणे आणि शिवसेना यांच्यातील संबंध कसे राहतील, हे ठरण्यासही सिंधुदुर्गातील निकाल महत्त्वाचे ठरतील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)