काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात सेना-भाजपनं कसे रोवले पाय?

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना
फोटो कॅप्शन, पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.
    • Author, स्वाती पाटील-राजगोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूर

महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचं प्राबल्य राहिलंय. विशेषतः ग्रामीण भागात या दोन्ही पक्षांची पाळंमुळं घट्ट होती. पश्चिम महाराष्ट्र हा तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण गेल्या काही वर्षांत या भागातही सेना-भाजपला पाठिंबा मिळताना दिसत आहे.

पश्चिम महाराष्ट्र काबीज करण्यात भाजप-सेनेला यश कसं आलं याची प्रमुख कारणं सांगताना राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी म्हटलं, "गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात असलेला एकोपा नष्ट झाला. आघाडीमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभिन्नता आहे. याचा परिणाम म्हणून आघाडीला सत्ता गमवावी लागली."

खरंतर शिवसेना आणि भाजपची कोल्हापूरमध्ये तशी ताकद नाहीये, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत असलेल्या बेबनाव आणि कुरघोड्यामुळं युतीला ताकद मिळाली, असं प्रकाश पवार यांनी सांगितलं.

"लोकसभा निवडणुकीचं उदाहरण घेतलं तर यावेळी शिवसेनेचे जे दोन खासदार निवडून आले आहेत, ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या आई निवेदिता माने या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या खासदार होत्या तर कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचे वडील दिवंगत सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीचे खासदार होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना
फोटो कॅप्शन, शरद पवारांच्या सभेचं दृश्य

"पण एकमेकांवर कुरघोड्या करत मराठा विरूद्ध मराठा चित्र निर्माण झालं आणि यातून युतीला ताकद मिळाली. सहकाराचं जाळं निर्माण करणाऱ्या आघाडीला संस्थांच्या जीवावर सुरुवातीपासूनच कोल्हापूरसह सांगली, सातारा या भागात वर्चस्व मिळवणं सोपं गेलं," असं पवार सांगतात.

पवार यांनी पुढे सांगितलं, "वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण या दिग्गजांनी सहकाराच्या माध्यमातून सामूहिक हितसंबध महत्त्वाचे मानून ते जपण्याचं काम केलं. त्यातून अर्थव्यवस्था उभी केली. पण पुढच्या पिढीने मात्र सहकार संस्थाकडे उत्पन्नाची साधनं म्हणून पाहिलं. याचा परिणाम म्हणून या संस्थांमध्ये भ्रष्टाचार सुरू झाला. जनतेचा पैसा जनतेपर्यत पोहोचला नाही. त्यातून सहकार संपला, विकेंद्रीकरण संपलं आणि पैशाचं केंद्रीकरण सुरू झालं."

ज्या लोकांमुळं या संस्था उभ्या राहिल्या, त्या लोकांची इच्छाशक्ती मरण पावली. याकडे ते फक्त नोकरी म्हणून पाहू लागले. या संस्था जगल्या पाहिजेत. यासाठी राज्य सरकार सातत्याने या संस्थाना आर्थिक पुरवठा करू लागलं. त्या संस्था वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले. पण सहकाराच्या दृष्टीचा अभाव असल्याने या पिढीकडे लोकांना सोबत घेउन जाण्याची दृष्टी नव्हती. शिक्षण संस्थांकडे देखील दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळं जनता आणि राजकारणी यांच्यात उभी दरी निर्माण झाली. याचाच फायदा सेना भाजपने उचलला, असं पवार यांना वाटतं.

भाजपच्या मोर्चेबांधणीला यश

विरोधी पक्षात असताना नेमकं काय करायचं हे नेत्यांना माहीत नसल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला जनाधार राहिला नाही असंही निरीक्षण मांडलं गेलं.

"पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे असं समजून गेल्या निवडणुकीत भाजपने मोर्चेबांधणी केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस हेच मुख्य लक्ष्य ठेवल्यानं याच पक्षातील अनेक नेत्यांना आपल्याकडे घेण्यात भाजपला यश आलं. 'काँग्रेसमुक्त महाराष्ट्र' करण्याची सुरूवात झाली. पश्चिम महाराष्ट्रात भाजप मजबूत करण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांची गेली ५ वर्ष पराभूत मानसिकतेत गेली.

विरोधी बाकावर आहोत याची जाणीव झाली नसल्यानं ते यातून बाहेर पडून लोकांपर्यंत पोहचले नाहीत. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात दुसऱ्यांदा सत्तेची ही संधी भाजप सेनेला मिळते की काय अशी चिन्ह निर्माण झाली," असं महाराष्ट्र टाईम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक विजय जाधव यांना वाटतं.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

विजय जाधव यांनी पुढे सांगितलं, की सध्या शरद पवार यांच्यामुळं राष्ट्रवादीबाबत सकारात्मक वातावरण आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकार, बँकिंग, साखर कारखाने, दूधसंस्था, शैक्षणिक संस्थांची पायाभरणी काँग्रेस-राष्ट्रवादीनं केली. सहकारातून समाजकारण त्यातून राजकारण आणि मग सत्ता हे आघाडीचं सूत्र होतं. वर्षानुवर्षे राजकारण याभोवतीच फिरत होतं. अजूनही हे सूत्र तोडण्यात युतीला यश आलं नाही. पण जर पुन्हा संधी मिळाली तर सेना-भाजप सरकार हे सूत्र तोडण्यासाठी प्रयत्न करेल.

"राजकीय गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी केवळ एक पर्याय या दृष्टीकोनातून लोकांनी भाजप सेनेला निवडून दिलं. पण याचे गंभीर परिणाम झाले. जीसटी, नोटबंदी या सारखे निर्णय घेतले गेले. त्याच्या वाईट झळा ग्रामीण भागाला बसल्या. बेरोजगारी वाढली. पण विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीला हे मुद्दे लावून धरता आले नाहीत. हेच हेरुन भाजप-सेनेने आघाडीचे जे शिलेदार शिल्लक होते. त्यांनाच पळवलं. कारवाईची भीती घालून पक्षांतर केले गेले. भावनेचे राजकारण केलं गेलं. एकीकडे हे सुरू असताना गटबाजीचा मोठा फटका या पक्षांना बसला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी पक्ष सोडून जाणं ही कॉंग्रेसवर आलेली नामुष्की म्हणावी लागेल, असं जाधव यांनी म्हटलं.

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस कशी रुजली?

पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस रुजण्याची कारणं सांगताना पुण्यनगरीचे संपादक अशोक घोरपडे यांनी एक आठवण सांगितली. वसंतदादा पाटील यांनी काँग्रेसच्या एका मेळाव्यात म्हटलं होतं, की आम्ही बांधावर जाऊन काँग्रेस पक्ष वाढवला. त्यामुळं तो तळागाळात रुजला होता. दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहिला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

घोरपडेंनी म्हटलं, "स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या माध्यमातून इथलं राजकारण वाढत गेलं. ग्रामपंचायत ते विधानसभा, लोकसभेपर्यंत सत्ता हवी हेच सूत्र बनत गेलं. त्यामुळं निष्ठेने पक्ष टिकवणाऱ्या लोकांऐवजी नवीन लोक सत्तेसोबत गेले. गेल्यावेळी झालेल्या सत्ताबदलानंतर हेच लोक सत्तेच्या मागे धावू लागले. अनियमित कामकाज, गैरव्यवहार या शंकामुळे कारवाईच्या भीतीने पक्षांतर होऊ लागलं. सत्तेच्या मागे धावणाऱ्यांमुळे सेना भाजप बळकट झाली.

'केवळ सत्ता आहे म्हणून भाजपकडे झुकतं माप आहे. कारवाईच्या भीतीने आणि सत्तेत राहायचं या हेतूने अनेकांनी सेना भाजपला पसंती दिलीये,' असं घोरपडे यांना वाटतं.

दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा अभाव

घोरपडे यांनी सांगितलं, "कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दिग्गज नेत्यांनंतर दुसरी फळी तयार झाली नाही. तळागाळात काम करणारी नवीन लोक तयार होत नाहीत. गेल्या पाच वर्षांत नवीन विकासकामं झाली नाहीत. कोणताही मोठा उद्योग कोल्हापूर मध्ये आला नाही. खंडपीठ, उड्डाणपूल, रस्ते, रोजगार निर्मिती अशी कामं होण गरजेचं आहे. कर्नाटक सरकारकडून उद्योजकांना सोयी उपलब्ध होऊ शकतात पण राज्य सरकार याबाबत उदासीन का आहे, असे अनेक प्रश्न आजही प्रलंबितच आहेत."

लोकसत्ताचे वरिष्ठ प्रतिनिधी दयानंद लिपारे यांच्या मते, राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. सहकार क्षेत्र, साखर कारखाने, दूधसंस्था, सूतगिरण्या, शिक्षण संस्था या माध्यमातून गावागावामध्ये त्यांचा आजही संपर्क आहे. पण अंतर्गत गटबाजीमुळं आघाडीला ही निवडणूक अवघड जाऊ शकते. याचा परिणाम म्हणून यावेळीही युतीलाच जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे.

"कोल्हापूरमध्ये कॉंग्रेसकडे सध्या एकही आमदार नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसला चंदगड आणि कागल या दोन जागा टिकवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. एकंदरित सध्याचं वातावरण भाजप-सेनेला अनुकूल असल्याचं चित्र असलं तरी हे राजकारण आहे. त्यामुळं कुणाच्या पारड्यात यश टाकायचं हा निर्णय शेवटी मतदारांच्या हाती असणार आहे," असं लिपारे यांनी म्हटलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)