विधानसभा निवडणूक: शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीने यात्रा केव्हाच सुरू केल्या पण काँग्रेसला उशीर का?

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून राज्याच्या राजकारणावर काँग्रेस पक्षाचा प्रदीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. हा प्रभाव सामाजिक, राजकीय, सहकारी, सांस्कृतिक आणि अर्थविषयक सर्व संस्थांवर होता. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर आणि 2014 साली केंद्रासह राज्यात सत्तांतर झाल्यापासून हे चित्र बदलल्याचं दिसतं.
एकेकाळी राज्याच्या सर्व सत्ताकेंद्रात आणि निर्णयप्रक्रियेत अग्रभागी असणारा पक्ष आज मागेमागे पडत चालल्याचं दिसतं.
यात्रांच्या राजकारणामध्ये पिछाडी?
सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने 'जनआशीर्वाद यात्रे'तून सर्वांत आधी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरूवात केली. त्या पक्षाचे युवानेते आदित्य ठाकरे सर्व शहरी, ग्रामिण भागासकट आदिवासी प्रदेशातही फिरून लोकांशी बोलायला सुरूवात केली.
कॉलेजला जाणाऱ्या आणि मतदानाचा अधिकार नुकताच मिळालेल्या युवकांशीही ते संवाद साधू लागले. पाठोपाठ भाजपनं 'महाजनादेश यात्रा' सुरू करून लोकांमध्ये जायला सुरूवात केली.
लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही आठवड्यातच या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी आपला राजकीय संवाद वाढवायला सुरूवात केली. त्यानंतर राष्ट्रवादीने 'शिवस्वराज्य' यात्रेद्वारे लोकांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
या तिन्ही यात्रा गेले अनेक दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आधीपासूनच प्रवास करत आहेत. काँग्रेसने आज आपली 'पोलखोल यात्रा' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर तीनही महत्त्वाचे पक्ष या यात्रांच्या राजकारणात आघाडीवर असताना काँग्रेसची यात्रा मात्र इतक्या उशिरा सुरू होणं सर्वांसाठी आश्चर्याची गोष्ट ठरली.
2014 पासून महाराष्ट्र काँग्रेसची स्थिती
2014 साली भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे चारही पक्ष स्वबळावर लढले. युती आणि आघाडीविना झालेल्या या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. त्या निवडणुकीत भाजपला 122 जागा तर शिवसेनेला 63 जागांवर विजय मिळवता आला. काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देऊन भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी शपथही घेतली. त्यामुळे काँग्रेसचा विरोधीपक्षनेतेपद मिळण्याऐवजी काही काळ शिवसेनेचे एकनाथ शिंदे विरोधीपक्षनेतेपद मिळाले.
काही काळानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यावर काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले. हे पद ज्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना मिळाले ते आपल्या मुलासह आता भाजपामध्ये आहेत. राधाकृष्ण स्वतः राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले तर त्यांचे पुत्र सुजय अहमदनगरमधून भाजपाच्या तिकिटावर खासदार झाले.
अखेर काँग्रेसने शेवटच्या काही आठवड्यांसाठी विरोधीपक्षनेते पद विजय वडेट्टीवार यांच्याकडे दिले. चालू विधानसभेत काँग्रेसची ही स्थिती झाली तशीच स्थिती लोकसभेच्या निवडणुकांदरम्यानही दिसून आली.
गेल्या लोकसभेत काँग्रेसचे 4 खासदार निवडून गेले होते. आता या लोकसभेत केवळ एकच खासदार पाठवता येईल इतकी वाईट स्थिती काँग्रेसवर आली. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर हे या पक्षाचे महाराष्ट्रातून निवडून गेलेले एकमेव खासदार आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राची जबाबदारी असणारे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनाही गुलबर्ग्यात पराभव स्वीकारावा लागला.
प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांच्याजागी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच विश्वजित कदम, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर, मुजफ्फर हुसैन यांची एक समितीही नेमण्यात आली. स्वच्छ प्रतिमेचे पण स्वभावाने मवाळ असणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पक्ष या निवडणुकीत कसा वाटचाल करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मुंबई काँग्रेसची बेदिली
महाराष्ट्र प्रदेशात अशी स्थिती असताना मुंबईतला बेबनावही लपून राहिला नाही. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. त्याचप्रमाणे काँग्रेसची मुंबईत एकही जागा निवडून आली नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
देवरा यांनी केंद्रीय कार्यकारिणीत काहीतरी मोठं पद मिळण्याच्या आशेने राजीनामा दिला असा आरोप त्यांच्याच पक्षाच्या संजय निरुपम यांनी केला. संजय निरूपम यांचाही या लोकसभा निवडणुकीत सलग दुसरा पराभव झाला आहे.
देवरा यांच्या राजीनाम्यानंतर संजय निरुपम यांनी राजीनाम्यात त्यागाची भावना अंतर्भूत असते पण इथं राष्ट्रीय पातळीवरचं पद मागितलं जात आहे. हा राजीनामा आहे की वर जाण्याची शिडी? अशा कर्मठ लोकांपासून पक्षानं सावध राहिलं पाहिजे असं त्यांनी ट्विट केलं होतं. यातूनच मुंबई काँग्रेसमध्ये असलेली बेदिली सर्वांच्या समोर आली होती.
नाना पटोले यांच्याकडे यात्रेचे नेतृत्व
काँग्रेसची यात्रा उशिरा सुरू झाली असली तरी पक्षानं या यात्रेचं नेतृत्व नाना पटोले यांच्याकडे दिलं आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत हेच नाना पटोले भाजपाचे खासदार होते आणि काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांना पराभूत करून संसदेत गेले होते. आता काँग्रेसच्या इतर नेत्याऐंवजी या पोलखोल यात्रेचं नेतृत्व नाना पटोले यांच्याकडे देण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, BALASAHEB THORAT TWITTER
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासावरील चर्चेस प्रत्युत्तर न दिल्यामुळे आपण ही यात्रा काढत आहोत असे नाना पटोले यांनी जाहीर केलं होतं.
काँग्रेसतर्फे आज अमरावती, आर्वी, पुलगांव, वर्धा इथं महापर्दाफाश सभा घेण्यात येत आहेत. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी महापर्दाफाश सभा होणार आहेत. पुढच्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण-मुंबई या विभागात सभा होतील असं महाराष्ट्र काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे.
नाना पटोले यांच्याकडे या यात्रेची धुरा देण्यामागे काय कारण असावे याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणाल्या, "नाना पटोले गेले काही महिने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आरोप करत आहेत. काँग्रेसला सध्या मरगळ आलेली आहे. पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्यातच वेळ गेला त्याचप्रमाणे त्यानंतर सर्व पक्षाची घडी बसवण्यात वेळ जातो. त्यामुळे काँग्रेस थोडा मागे पडला आहे. परंतु कदाचित लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नाना पटोले यांचा चेहरा उपयोगी पडू शकतो."

फोटो स्रोत, BALASAHEB THORAT TWITTER
काँग्रेसला प्रचारामध्ये येण्यास नक्कीच उशीर झाला आहे असं लोकमतचे राजकीय संपादक राजा माने यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले, "काँग्रेसला आपल्या पक्षामध्ये नवसंजीवनी येण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं होतं. त्यामध्ये पटोले आक्रमक आहेत. विदर्भात नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अगदी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणारे ते नेते आहेत. त्यामुळे कदाचित ही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली असावी."
"सरकारचे गैरप्रकार यात्रेदरम्यान चव्हाट्यावर यावेत यासाठी काँग्रेसने ही योजना केली असावी. राज्यपातळीवर काँग्रेसच्या संघटनपातळीवर ऊर्जा यावी यासाठी काँग्रेस नेते प्रयत्न करत असावेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर तात्काळ काँग्रेसने पावलं उचलायला हवी होती. ही यात्रा तेव्हाच सुरू झाली असती तर त्याचा परिणाम अधिक दिसला असता," माने सांगतात.
भाजप आणि इतर पक्षांनी यात्रा काढल्या म्हणून काँग्रेसनं यात्रा काढणं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना अयोग्य वाटतं. काँग्रेसनं केवळ प्रत्युत्तर म्हणून दुसरे काही पर्याय वापरून पाहायला हवं होते असं त्यांना वाटतं. ते म्हणतात, "काँग्रेस आणि विरोधकांमध्ये कल्पकतेचा दुष्काळ आहे. तसेच अभ्यासपूर्ण टीका करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








