अशोक चव्हाण: माझी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी

अशोक चव्हाण

फोटो स्रोत, Shahid Shaikh/bbc

फोटो कॅप्शन, अशोक चव्हाण
    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी

भाजप हे प्रत्येक जिल्ह्यात आमच्यावर मारा करतंय त्यामुळे कॉंग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी त्यांच्या जिल्ह्यावर लक्ष देणं अत्यंत गरजेच आहे. त्यामुळे मी मुंबईपेक्षा नांदेडमध्ये लक्ष देतोय. मला जर पक्षाने सांगितलं तर मी माझ्या जुन्या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवेन. तशी माझी तयारी आहे.

पण सध्याच्या परिस्थितीत आघाडीच्या सर्वांनी मिळून संयमाने काम करण्याला महत्त्व आहे. भाजप चौकशीच्या धमक्या देऊन इतर पक्षामधून मेगा भरती करतंय. अश्या अनेक मुद्दे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत मांडले.

प्रश्न - बर्‍याच घडामोडी घडतायेत पण यात अशोक चव्हाण कुठेही दिसत नाहीयेत. राजीनाम्यानंतर कुठे गायब झाले आहेत?

उत्तर - मी कुठेही गायब नाहीये. मी माझ्या जिल्ह्यात फिरतोय. जेव्हा मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तेव्हा माझी एकच भावना होती की जिल्ह्याकडे लक्ष देता आलं पाहीजे. भाजपकडून जिल्हा पातळीवर आमच्यावर मारा केला जातोय. त्यासाठी कॉंग्रेसच्या प्रत्येक नेत्यांनी राज्यभर फिरण्यापेक्षा आपआपल्या जिल्ह्यावर लक्ष देणं गरजेच आहे. मी आता मुंबईपेक्षा पूर्णवेळ नांदेड जिल्ह्याला आणि मराठवाड्यावर मी लक्ष देतोय. त्यामुळे पूर्वीसारखं मुंबईत फार वेळ देता येत नाहीये. आव्हान मोठं आहे पण अवघड नाही.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

प्रश्न - विधानसभा निवडणूक तोंडावर आहे अशावेळी तुम्ही राज्यातली कोणती जबाबदारी घेणार आहात का फक्त जिल्ह्यातच काम करणार आहात?

उत्तर - माझ्यावर पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. पण विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर सध्या जिल्ह्यात मी लक्ष देतोय. मुंबईच्या बैठकांमध्ये मी सहभागी आहे. जागावाटपाच्या चर्चांमध्ये मी उपस्थित असतो. पण पूर्वीसारखा मुंबईमध्ये वेळ देणं परवडणारं नाही.

प्रश्न - तुम्ही विधानसभा निवडणूक लढवणार आहात?

उत्तर - पक्षाने जर मला विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितले तर निश्चित माझी तयारी आहे. नांदेड जिल्ह्यातला भोकर विधानसभा मतदारसंघ हा माझा जुना मतदारसंघ आहे. माझी पत्नी सध्या तिथली आमदार आहे. तिची संमती मिळाली तर मी त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवेन.

अशोक चव्हाण आणि शरद पवार

फोटो स्रोत, Ashok Chavan / facebook

फोटो कॅप्शन, अशोक चव्हाण आणि शरद पवार

प्रश्न - विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आहे. राज्यभर सत्ताधाऱ्यांकडून दोन यात्रा निघाल्या आहेत. कॉंग्रेस पक्ष राज्यात कुठेही सक्रिय दिसत नाहीये.. लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून अजून कॉंग्रेस पक्ष सावरलेला नाही का?

उत्तर -असं अजिबात नाही. २०१४ ला भाजपला मोठा जनादेश मिळाला होता. पण पाच वर्षांत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेचं काय? त्याची पूर्तता कुठेही होताना दिसत नाहीये. फक्त लोकांना गाजर दाखवण्याचं काम सुरू आहे. लोकांना आश्वासनांची खैरात दिली जातेय. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. कर्जमाफी झाली नाही, हमीभाव मिळत नाहीये. पण मेगा भरतीच्या नावाखाली राजकीय भरती सुरू केलीये. शासकीय यंत्रणांचा वापर करून भाजपमध्ये या मग तुमचे प्रश्न सोडवू असं धमकावून सर्व सुरू आहे.

प्रश्न - तुम्हाला असं वाटतं का ही राजकीय मेगा भरती चौकशांच्या धमक्या देऊन सुरू आहे?

उत्तर - निश्चितच! कोणाच ना कोणाच थोडं फार काहीतरी आहे. हे मी नाकारत नाही. बँकेचं कर्ज असेल, कोणाची संस्था डबघाईला आलीये. पण मग तुमच्यावर खटले चालवू, मग तुम्ही ईडीच्या चौकशीला जा, सर्वांच्या फाईल्स काढून ठेवल्या आहेत अशा पध्दतीने सांगितलं जातं. त्यामुळे एक भीतीचं वातावरण आहे.

अशोक चव्हाण

फोटो स्रोत, Ashok Chavan/facebook

प्रश्न - कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्ये असलेल्या निराशेमुळेही आमदार जातायेत असं ते माध्यमातून सांगतायेत त्याच काय?

उत्तर - थोडं समजदारीने कार्यकर्त्यांशी बोलण्याची गरज आहे. ते आम्ही करत आहोत. नक्कीच लोकसभेच्या निकालानंतर एक निराशा आलेली आहे. पण निवडणुकीत जिंकणं, हरणं हे होत असतं. १९९५ ते १९९९ आम्ही विरोधी पक्षात होतो. पण नंतर पुन्हा आमचं राज्य आलं. आव्हान सोपं नाही पण अधिक जोमाने काम केलं तर खूप अवघड आहे असं नाही वाटत.

प्रश्न - केंद्रात तुम्हाला अध्यक्ष नाही. विधानसभेपर्यंत तो मिळेल की नाही याची शाश्वती नाही अशावेळी तुम्ही कॉंग्रेसला या विधानसभा निवडणुकीत कुठे बघता? कॉंग्रेसच्या किती जागा येतील?

उत्तर - राहुल गांधींनी राजीनामा दिला असला तरी काम काही थांबलेलं नाही. मल्लिकार्जुन खरगे, वेणूगोपालसारखे नेते काम करतायेत. त्यातूनच महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदाचा निर्णय झाला. त्यामुळे काम सुरू आहे. आमची समविचारी पक्षाशी आघाडी निश्चित झाली आहे. जागावाटप जवळपास पूर्ण होत आलंय. इतर मित्रपक्षाशी बोलणी सुरू आहेत. जर ही महाआघाडी यशस्वी झाली तर मतांचं विभाजन टाळता येईल आणि एकत्रितपणे लढा देता येईल.

अशोक चव्हाण

फोटो स्रोत, Ashok Chavan/facebook

प्रश्न - वंचित बहुजन आघाडीचं काय? ते यावेळी सोबत येतील असं वाटतं?

उत्तर - वंचित बहुजन आघाडीशी आमचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे बोलतायेत. आम्ही आशावादी आहोत. आम्हाला वाटतं ते बरोबर आल्यास फायदा होईल.

प्रश्न - नाही आले तर तुमची काय रणनीती असेल?

उत्तर - नाही आले तर आम्हाला आमच्या पध्दतीने लढावं लागेलच. लोकसभा निकालानंतर त्यांनाही अनुभव आलाय की त्यांचही नुकसान झालं आणि आमचही नुकसान झालं. दोघांचही नुकसान होण्यात काय स्वारस्य आहे? त्यांनी सकारात्मक विचार केला तरी बरच काही घडू शकतं. निर्णय शेवटी त्यांना घ्यायचाय.

प्रश्न - कॉंग्रेसला मोट बांधून ठेवणं जमत नाहीये?

उत्तर - मुख्यमंत्री फोन करतायेत. प्रदेशाध्यक्ष फोन करून बोलवतायेत त्याने फरक पडतो. पण नवीन चेहर्‍यांना त्यामुळे संधी मिळेल असं मला वाटतं.

अशोक चव्हाण

फोटो स्रोत, Ashok Chavan/facebook

प्रश्न - आता कॉंग्रेसची किती जागा निवडून येतील असं वाटतं?

उत्तर - ज्या जागा आम्ही जिंकू शकतो त्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार. ज्या आम्हाला कमजोर वाटतात त्या ठिकाणी मित्रपक्षाला संधी देणार. किती जागा येणार हा दावा आज कोणीच करू शकत नाही. मुख्यमंत्री २२० जागांवर निवडून येणार इतकं शाश्वतपणे सांगतायेत. बहुतेक मशिनचं सेंटिग झालं असावं म्हणून ते तसं बोलत आहेत.

प्रश्न - ईव्हीएमचा मुद्दा वारंवार समोर येतोय. ईव्हीएम हा पराभवाचा एकमेव मुद्दा वाटतोय का?

उत्तर - ईव्हीएमवर जर सर्वांची शंका आहे तर पारदर्शकता आणा. तुमचं सरकार आहे. जर एवढा विश्वास आहे तर बॅलेट पेपर आणा आणि मग बघा काय होतय. जर तुम्ही ईव्हीएमवर जोर देताय याचा अर्थ काहीतरी गडबड आहे.

प्रश्न - मुख्यमंत्री म्हणतायेत ईव्हीएमवर बोलण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे याबाबत तुमची प्रतिक्रिया काय?

उत्तर - आत्मचिंतन आम्ही करतोच आहोत आणि ते करण्याची सर्वांनाच गरज भासणार आहे. त्यांनाही कधीतरी आत्मचिंतन करावं लागेल.

प्रश्न - जागावाटपाची चर्चा कुठपर्यंत आहे. तुमच्या पक्षात सगळीकडे शांतता आहे?

उत्तर - सत्ताधारी पक्षाची प्रसिद्धी जास्त आहे. आमचं शांतपणाने काम सुरू आहे. आज आमचं नागपूरमध्ये आंदोलन ठरलं होतं. पण रात्रीच पक्षातल्या लोकांना पोलिसांनी उचलून नेलं. म्हणजे विरोधक नकोच.

प्रश्न - बाळासाहेब थोरातांबरोबर तुम्हीही राज्याची जबाबदारी घेणार?

उत्तर - निश्चितपणे. कारण हे टीमवर्क आहे. आम्ही सगळे मिळून जेव्हा काम करू तेव्हा ते यशस्वीपणे पार पडेल. आम्ही सर्वजण थोरांताच्या बरोबर आहोत. कॉंग्रेस तितक्याच जोमाने या निवडणूकीला सामोरं जाईल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)