ईदसाठी काश्मीरला जात नाहीये, तर घरच्यांना डोळे भरून पाहण्यासाठी जातोय- काश्मिरी तरुण

- Author, दिलनवाझ पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी, श्रीनगरहून आल्यानंतर
पांढऱ्या शुभ्र ढगातून जात विमान खाली उतरताना खिडकीतून बघितलं की नजर जाईल तिथवर हिरवळच हिरवळ दिसते. झाडांनी वेढलेली डोंगरावरची घरं, हिरवी शेतं, निर्मनुष्य रस्ते. आकाशातून बघितल्यावर सगळीकडे शांतता असल्यासारखं वाटतं.
मात्र, विमानाच्या आत बघितल्यावर अस्वस्थ चेहेरे दिसतात. खाली कशी परिस्थिती असेल, याची काहीच कल्पना नसलेले.
दिल्लीवरून निघालेलं विमान लवकरच श्रीनगरच्या धर्तीवर उतरणार आहे. आप्तेष्टांना भेटण्यासाठी आतूर झालेल्या प्रवाशांना सव्वा तासाचा हा प्रवासही खूप लांबचा वाटतोय.
'माझ्या हँडबॅगेजमध्ये डाळ आहे, खाण्या-पिण्याच्या वस्तू आहेत, औषधं आहेत. गिफ्ट नाही. मी सोबत फक्त खाण्या-पिण्याच्या वस्तू घेऊन चाललोय. माझं कुणाशीच बोलणं होऊ शकलेलं नाही. ना बायकोशी, ना मुलाशी, ना आई-वडिलांशी, काश्मिरातल्या कुणाशीच नाही.'
'खरं सांगायचं तर मी ईद साजरी करायला चाललेलो नाही. माझ्या घरचे सगळे ठीक आहेत की नाही, हे बघायला जातोय. त्यांना हे सांगायला चाललोय की मी इथे ठीक आहे. संवाद पूर्णपणे बंद आहे. असं वाटतं जणू आपण आजच्या आधुनिक युगात नाही तर एखाद्या डार्क एजमध्ये जगतोय.'

'तिथे सगळं ठीक आहे की नाही, ही एकच काळजी मला लागली आहे. या काळजीमुळे माझं कामातही लक्ष लागत नाहीय. खूप टेन्शन आहे आणि टेन्शन असेल तर मनात नको नको ते विचार येतात. तिथे सगळं ठीक असेलही. मात्र, मला काहीच माहिती नाही. माझ्या घरचे कसे आहे, हे मला बघायचं आहे.'
"मी हजार वेळा कॉल केले. मात्र, कुठलाही नंबर डायल केला तरी तो स्वीच ऑफ दाखवतो. सगळ्यांचे नंबर तर स्वीच ऑफ होऊ शकत नाही ना? नक्कीच काहीतरी गडबड आहे, असंच वाटतंय."

आसिफ दिल्लीतल्या इंदिरा गांधी विमानतळाहून श्रीनगरला जात होते. दिल्लीत ते एका खाजगी बँकेत नोकरीला आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची झोप उडाली आहे आणि खाण्या-पिण्यातही त्यांचं लक्ष लागलेलं नाही.
थकवा आणि अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतेय. दिल्लीहून श्रीनगरसाठी निघालेल्या विमानातल्या प्रवाशांचे चेहरे नीट न्याहाळले तर सर्वांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि भीती जाणवते.
भारत सरकारने गेल्या सोमवारी राज्यघटनेतलं अनुच्छेद 370 रद्द करून या कलमांतर्गत जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकला. तसंच या राज्याचं दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजनही केलं.
मात्र, ही घोषणा करण्याआधी काश्मीर खोऱ्याचा इतर सर्वच भागांशी असलेला संपर्क पूर्णपणे तोडण्यात आला. इंटरनेट तर बंद केलंच. मोबाईल आणि लँडलाईन सेवाही खंडित केली.
हरियाणातल्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या चार काश्मिरी विद्यार्थ्यांना पुढच्या महिन्यात होणाऱ्या परीक्षेची तयारी करायची होती. मात्र, आता ते तातडीने आपल्या घरी रवाना झालेत.
ते सांगतात, "परीक्षा होती. आम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं होतं. मात्र, कम्युनिकेशन बंद करण्यात आलं. कुटुंबीयांशी बोलणं होत नव्हतं. आम्ही मानसिकरीत्या खूप डिस्टर्ब झालो होतो. खूप काळजी वाटायला लागली होती. वर्गात लक्ष लागत नव्हतं. कशातच नाही. आम्ही ईद साजरी करायला चाललेलो नाही. घरचे कसे आहेत, ते बघायला चाललोय."

ते म्हणतात, "भारतीय मीडियाने काश्मीरमधल्या परिस्थितीविषयी आम्हाला कुठलीच माहिती दिली नाही. सरकारकडूनही योग्य माहिती मिळत नाहीय. तिथे नेमकं काय चालू आहे, हे कळतच नव्हतं."
'भीतीचं वातावरण तयार करण्यात आलं'
दिल्लीच्या जामिया विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करणारी शफूराच्या सामानातही केवळ खाण्या-पिण्याच्या वस्तू आहेत. ती म्हणते, "मी बेबी फूड आणि काही औषधं घेऊन जातेय. चार दिवसांपूर्वी माझं माझ्या कुटुंबीयांशी अगदी थोडावेळ चॅटवर बोलणं झालं. मात्र, त्यानंतर संपर्क झालाच नाही. ते जिवंत आहेत की नाही, हे सुद्धा मला माहिती नाही."
ती सांगत होती, "भीतीची वातावरण निर्मिती केली जातेय. सरकारने जे केलं ते दुसऱ्या पद्धतीनेही करता आलं असतं. गेल्या वर्षभरापासून आम्ही केंद्र सरकारच्या शासनाखाली राहतोय. इतर अनेक राज्यांनाही विशेष दर्जा आहे. तिथून सुरू करून काश्मीरला आले असते तर कदाचित लोकांनी त्याचा स्वीकार केला असता. मात्र, काश्मीर, जिथल्या लोकांचा केंद्र सरकारवर आधीच विश्वास कमी आहे तिथे असं केल्यानं त्यांच्या हेतूविषयी संशय निर्माण होतो."
शफूराला माहिती नाही की श्रीनगरच्या विमानतळावर उतरून ती घरी कशी जाणार? शफूराच नाही तर बाहेरून येणाऱ्या कुणालाच आपण श्रीनगरला येत आहेत, हे त्यांच्या कुटुंबीयांना सांगता आलेलं नाही.

केंद्रीय रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये शिकणारी एक विद्यार्थिनी श्रीनगर विमानतळाबाहेर उभी आहे. तिच्या डोळ्यात पाणी आहे. अश्रूंनी तिची ओढणी भिजली आहे. तिला सोपोरला जायचंय. मात्र, जाण्यासाठी कुठलंच साधन नाही. मागतील तेवढे पैसे द्यायला ती तयार आहे. मात्र, एकही टॅक्सीवाला जायला तयार नाही.
तिच्याकडे बघून कुपावाडासाठी जाणाऱ्या काही तरुणांनी तिला सोबत घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं. मात्र,तिथून पुढे कसं जाणार, हा प्रश्न आहेच.
सुरक्षेचा प्रश्न इतका गंभीर असतानाही हे लोक घरी का जात आहेत? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात, "आमचे कुटुंबीय जिवंत आहेत की नाही, आम्हाला नाही माहिती. काहीही करून आम्हाला ते कसे आहेत, हे जाणून घ्यायचं आहे. त्यांच्यासोबत राहायचं आहे."
ते ईद साजरी करायला आले आहेत का? यावर ते म्हणतात, "अशा परिस्थितीत कुणी ईद कशी साजरी करेल? सध्या ईद नाही तर कुटुंबीयांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे."
चंदिगडहून आलेल्या एका विद्यार्थिनीच्या डोळ्यातही अश्रू आहेत. रडवेल्या आवाजात ती म्हणते, "कॉलेज आणि पीजीची माणसं मला धीर देत होते. मात्र, माझं मन ऐकायला तयार नव्हतं. आई-वडिलांची काहीच माहिती मिळत नव्हती. मी आईशी बोलल्यावाचून राहू शकत नाही. आता परिस्थिती निवळल्यावरच परतणार. शिक्षण सुटलं तरी चालेल."
तिचा एक मित्र दिल्लीहून आला आहे. त्याने औषधं सोबत आणली आहेत. तो सुद्धा तिच्यासारखाच काळजीत आहे. तो म्हणतो, "माझ्या वडिलांना डायबिटीज आहे. मी दिल्लीहून त्यांच्यासाठी औषधं सोबत आणली आहेत. ही परिस्थिती किती दिवस राहील, काहीच कल्पना नाही."
श्रीनगरमध्ये ईदची तयारी
श्रीनगरमध्ये पाच दिवसांपासून लागू असलेली संचारबंदी शनिवारी थोडी शिथिल करण्यात आली. शहरात रस्तोरस्ती भारतीय सैन्याचे जवान तैनात आहेत.
सुरक्षादलांच्या गाड्या, स्नाईपर, तारांचे कुंपण असलेले बॅरिकेड्स आणि जवानांच्या वाहनांसोबतच आता सामान्य जनतेची वाहनंही रस्त्यावर दिसत आहेत.
बकरी ईदसाठी मेंढ्या विकायला आलेल्या एका तरुणाने सांगितलं, "ही ईद नाही. मातम आहे. दोन दिवसांसाठी थोडं बाहेर पडलोय. ईदनंतर आम्ही आपलं 370 परत घेणार. हे काश्मीर आहे. आमची जमीन आहे. आम्ही आमची जमीन कुणाला घेऊ देऊ का?"

"मुस्लिमांसाठीचा मोठा दिवस आला की काहीतरी गडबड होतेच. भारताने हा विचार करायला हवा होता की हा यांचा मोठा दिवस आहे. असं करायला नको. कुर्बानी कर्तव्य आहे. म्हणूनच कुर्बानी देतो. दोन दिवसांनंतर तुम्ही बघाल इथे काय होतं."
आणखी एक काश्मिरी तरूण सांगतो, "आमच्या ईदच्या आधी सगळं बंद केलं आहे. कुणाला ईदच्या शुभेच्छाही देता येत नसतील तर कसली आलीय ईद."
खोऱ्यातल्या गावाखेड्यातून आलेले अनेक मेंढपाळ असे आहेत ज्यांच्या मेंढ्याही विकल्या जात नाहीयत आणि त्यांना खाण्या-पिण्याच्या वस्तुही विकत घेता येत नाहीय.
अशाच एका मेंढपाळाने म्हटलं, "यावेळी काम नाहीय. मेंढ्या विकू शकू, असं वाटत नाही. सगळं बंद आहे. सकाळपासून उपाशी आहोत."
थोडीफार दुकानं उघडली
संचारबंदी शिथील झाल्यावर काहीजण आपले ठेले घेऊन भाज्या आणि फळं विकायला आले आहेत. त्यांचा फोटो घेत असताना एका तरुणाने थांबवलं. तो म्हणाला, "तुम्हाला जगाला काय दाखवायचं आहे की श्रीनगरमध्ये सगळं नॉर्मल आहे? काश्मिरी भाज्या-फळं विकत घेत आहेत?"
त्याचं म्हणणं पूर्ण झालंही नव्हतं. तेवढ्यात कुठूनतरी एक दगड आला. दगडफेक होत असल्याची ओरड सुरू झाली आणि ठेलेवाले आपापले ठेले घेऊन पळू लागले.

एक वृद्ध इसम पूर्ण ताकदीनिशी आपला ठेला ढकलण्याचा प्रयत्न करत होता. बघताना असं वाटलं जणू खोऱ्यात पसरलेल्या तणावाचा सगळा भार त्यांच्या वृद्ध पायांवर पडला आहे.
इथून डलकडे जाताना मोठ्या सुरक्षा बंदोबस्तात परिस्थिती जरा सामान्य वाटते. काही ठिकाणी वाहनांची गर्दीही दिसली.
मात्र, असा एकही भाग नाही जिथे बंदूकधारी सुरक्षा जवान नाही.
'काश्मीरला कैदखाना बनवला आहे'
डलच्या किनारी बसलेली काही तरुण मंडळी परिस्थितीवरच चर्चा करत होते. तिशीत असलेला एक तरुण म्हणतो, "काश्मीरला कैदखाना बनवून दोन लोकांनी हा निर्णय घेतला. काश्मीरचं म्हणणं आधीही ऐकून घेतलं नाही आणि आताही नाही. आता लोक घरातच बसून आहेत. जेव्हा ते घराबाहेर पडतील तेव्हाच जगाला कळेल की काश्मिरी लोकांना या निर्णयाबद्दल काय वाटतं."

"इतका मोठा निर्णय घेण्याआधी काश्मीरच्या जनतेला विश्वासात घ्यायला नको होतं का? काश्मिरी लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. निवडून दिलेल्या नेत्यांनाही कैद करून ठेवलं."
"मोदीजींनी म्हटलं होतं की आम्ही सणांचा आदर करतो. लोकांना घरात डांबून आदर करताय? आम्हाला सांगण्यात येतंय की घरातच ईद साजरी करा. आप्तेष्ट-मित्रपरिवार यांना न भेटता कसली ईद? बाहेरच्या जगाला दाखवलं जातंय की सगळं सामान्य आहे. तुम्हाला काही नॉर्मल दिसतंय का?"
परिस्थितीमुळे हताश झालेला एक तरुण म्हणतो, "काश्मिरी लोकं घरात बंद आहेत. त्याचा डोकंही सुन्न झालंय. काश्मिरी लोकांकडे आता कुठलाच पर्याय नाही. मी मोठा झालो, तेव्हापासून हेच बघितलंय. संचारबंदी, बंद, हिंसाचार. कधीच शांतता बघितली नाही."
तो म्हणतो, "बंदुकीचा धाक दाखवून सरकार काहीही करू शकते. जमीनही हिसकावू शकते. जे काही इथे घडतंय ते बंदुकीच्या जोरावर घडतंय. ते जमीन बळकावू शकतात. मात्र, विकत घेऊ शकत नाही. मात्र, हे सामान्य भारतीयांसाठी करण्यात आलेलं नाही. हे त्या लोकांसाठी करण्यात येतंय ज्यांच्या पैशांवर भारत सरकार चालतं. यात ना काश्मिरी लोकांसाठी काही आहे ना सामान्य भारतीयांसाठी."
वादळापूर्वीची शांतता?
काही तरुण निरभ्र आकाशाखाली डलच्या किनाऱ्यावर बसून पाण्यात काटा टाकून मासे पकडत आहेत. परिस्थिती सामान्य होतेय? या प्रश्नावर ते म्हणतात, "ही वादळापूर्वीची शांतता आहे. काश्मीरमध्ये वादळ येणार आहे. ईद होऊ द्या. इथे काय होईल, याची कुणालाच कल्पना नाही."

ते म्हणतात, "दीर्घ संचारबंदीसाठी आम्ही सज्ज आहोत. हा आता आमच्या आयुष्याचाच एक भाग बनला आहे. मात्र, आम्ही काश्मीर कुणालाच द्यायला तयार नाही आणि कधी होणारही नाही. काश्मीर आमचा स्वर्ग आहे आणि याच्यासाठी आम्ही काहीही करू शकतो."
ज्या-ज्या काश्मिरी लोकांशी आम्ही बोललो त्यापैकी अनेकांना भारतातल्या त्या नेत्यांच्या वक्तव्याचा संताप आला होता ज्यात काश्मिरी मुलींशी लग्नाचा विषय होता.
ते म्हणतात, "भारतातले लोक आमच्या जमिनी आणि आमच्या मुली बळकावण्याची भाषा करत आहेत आणि तुम्हाला वाटतं की आम्ही शांत बसू?"
श्रीनगरमध्ये ईदसाठी संचारबंदी शिथील करण्यात आली असली तरी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्यात आलेली नाही. लोकांना पायीच फिरावं लागतंय.
अशाच एका महिलेने सांगितलं, "मी माझ्या धाकट्या बहिणीला भेटायला जात आहे. ती कशी आहे, तिच्या घरी खायला काही आहे की नाही, काहीच माहिती नाही."

विमानतळापर्यंत लिफ्ट घेणाऱ्या एका काश्मिरी तरुणाने सांगितलं की तो चेन्नईचं तिकीट काढतोय. काश्मीरमधल्या परिस्थितीमुळे तो चेन्नईला जातोय का?
या प्रश्नावर तो म्हणतो, "मी व्यवसायानिमित्त जातोय. काश्मीरला माझी गरज पडली तर मी परत येईन. काश्मीर आमचा प्राण आहे. त्याच्यासाठी आम्ही आमचे प्राणही देऊ शकतो."
विमानतळाच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या एका सुरक्षा अधिकाऱ्यांनी मला विचारलं, "शहरातली परिस्थिती तुम्हाला कशी वाटली?"
श्रीनगर विमानतळाच्या लॉनमध्ये एक तरुणी तिच्या सामानासोबत वाट बघत बसली होती. ती कुठल्यातरी विमानकंपनीत एअरहॉस्टेस आहे.
ती म्हणते, "मी बारा वाजता इथे पोचलेय. मात्र, घरी कधी पोचणार, काहीच माहिती नाही. मी पुलवामाची आहे. मी पोलीस स्टेशन, फायर स्टेशन, पोलीस आयुक्त, हॉस्पिटल सगळीकडे फोन केले. मात्र, कुणाशीच बोलणं होत नाहीय."
"आम्ही कर्फ्यूमध्येच लहानाचे मोठे झालो आहोत. मात्र, अशी परिस्थिती पहिल्यांदाच बघतोय. संवाद पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे. इथली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मात्र, तरीही मी आलेय. मी ही जोखीम उचलली आहे कारण माझे कुटुंबीय कसे आहेत, हे जाणून घेतल्याशिवाय कामात माझं मन लागत नव्हतं."
काश्मिरी मुलींविषयी येणाऱ्या वक्तव्यांवर तिने तीव्र आक्षेप व्यक्त केला. ती म्हणते, "मी ते मिम्स बघितलेत ज्यात काश्मिरी हॉट गर्ल्सशी लग्न करण्याची भाषा आहे. ते वाचल्यावर दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना मला भीती वाटली."

देशातल्या इतर भागातल्या लोकांना हे कळलं पाहिजे की यावेळी आम्ही एका भावनिक काळातून जातोय. आमच्या हास्यविनोद, टीकाटिप्पणी करण्याऐवजी आमच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. आम्हाला हे वाटलं पाहिजे की ते आमचा विचार करतात. मात्र, हे कुठेच दिसत नाही.
काम सोडून परतणारे कामगार
श्रीनगरहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बहुतांश ते कामगार आहेत जे काश्मीर खोऱ्यात काम करतात. त्यांच्यावर दुहेरी संकट कोसळलंय. एक तर काम गेलं आणि दुसरं म्हणजे महाग तिकीट घ्यावं लागतंय.
सरकारने विमान कंपन्यांना तिकीट दर मर्यादित ठेवायला सांगितलं आहे. मात्र, कामगारांना महाग तिकीटं घ्यावी लागत आहेत. माझ्या सोबत परतणारे बिहारचे सादीकुल आलम यांना दिल्लीपर्यंतचं तिकीट 6000 रुपयांना मिळालं.

काही वेळापूर्वी तिकीट घेणाऱ्या एका कामगाराला हेच तिकीट 4200 रुपयांना मिळालं.
ते म्हणतात, "इंटरनेट बंद असल्याने आमच्यासारख्या लोकांना काउंटरवरूनच तिकीट घ्यावं लागतंय. त्यांच्या किंमती वाढत आहेत. मी दोन तिकीटं घेतली आहेत. हे माझ्या एका महिन्याच्या पगाराइतकं आहे. काम तर गेलंच. जमवलेला पैसाही गेला."
श्रीनगरहून उडताच विमान पांढऱ्याशुभ्र ढगांच्या वर आलं. हे ढग शांततेचं प्रतिक वाटतात. ती शांतता जी जमिनीवर उतरल्यावर दिसतं नाही आणि जाणवतही नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








