भारतानं पाकिस्तानकडून काबिज केलेल्या लडाखमधील तूरकूत या गावाची कहाणी

तुरकूत

फोटो स्रोत, Dave Stamboulis

    • Author, डेव्ह स्टॅम्बोलीस
    • Role, बीबीसी

1971 पर्यंत तुरकूत पाकिस्तानचा भाग होता. मात्र, 1971च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि तेव्हापासून हे गाव भारताच्या ताब्यात आहे.

तुरतूक... अत्यंत दुर्गम असा परिसर. लडाखमधल्या नुब्रा खोऱ्याच्या अगदी शेवटच्या टोकाला वसलेलं हे छोटसं गाव कोराकोरमच्या उंचच उंच पर्वतरांगांमध्ये वसलं आहे. गावातून शायोक नदी वाहते. दगडी बांधकाम आणि ये-जा करण्यासाठी केवळ एकच रस्ता. हाच रस्ता पुढे लेहला जातो. निसर्गाने या गावावर सढळ हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे. मात्र, या निसर्ग सौंदर्यापेक्षाही अधिक रंजक आहे गावाचा इतिहास.

बाल्ती

फोटो स्रोत, Dave Stamboulis

भारतातलं 'बाल्टी' खेडं

पाकिस्तानातला एक प्रदेश आहे 'बाल्टिस्तान'. बाल्टी समाज तिथे मोठ्या संख्येने राहतो. मात्र, भारतातही एक 'बाल्टी' आहे. ते म्हणजे तुरकूत. लद्दाखमध्ये बहुसंख्य लोक बौद्ध आहेत. मात्र, तुरकूत एक बाल्टी गाव आहे. (बाल्टी हा तिबेटी वंशीय समाज आहे. पाकिस्तानातल्या स्कार्डू प्रांतात हा समाज मोठ्या संख्येने राहतो.)

ग्रामस्थ नूरबक्षिया या सूफी पंथाचे मुस्लीम आहेत. ते बाल्टी ही तिबेटी बोली बोलतात. सलवार-कुर्ता घालतात आणि पाकिस्तानच्या सीमेवरून अवघ्या सहा किमी आत असलेल्या बाल्तीस्तानात त्यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर राहतात.

तुरकूत

फोटो स्रोत, Dave Stamboulis

...आणि तुरकूत भारताचा भाग बनला

खरंतर 1971 सालापर्यंत तुरकूत पाकिस्तानचाच भाग होता. मात्र, 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात बांग्लादेशची निर्मिती झाली आणि त्याच वेळी भारताने तुरकूत ताब्यात घेतला. सुरक्षेच्यादृष्टीने हा भाग अत्यंत महत्त्वाचा असल्याने भारताने तो आपल्याकडेच ठेवला. त्यादिवशी नातेवाईकांना भेटण्यासाठी किंवा इतर कुठल्या कामानिमित्त गावाबाहेर पडलेल्या लोकांना परत गावात येता आलं नाही. तेव्हापासून भारताने या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मात्र, गेल्या दशकभरात हा भाग बऱ्यापैकी शांत आहे. 2010 सालापासून तुरकूत पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे.

अलौकिक निसर्ग सौंदर्यामुळे हा भाग पर्यटकांना खुणावतो. शिवाय डोंगररांगांच्या शिखरावरच्या अतिदुर्गम भागात वसलेल्या या गावातले लोक कसे राहत असतील, हे जाणून घेण्याची उत्सुकताही दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करते. हा भाग पूर्णपणे डोंगराळ असल्याने इथले लोक या दगडांचाच पूरेपूर वापर करतात. दगडाची घरं, दगडाच्याच पायवाटा, इतकंच नाही तर पिकाला पाणी देण्यासाठी करण्यात आलेली सिंचनाची सोयही याच दगडांपासून तयार केलेली आहे.

तुरकूत

फोटो स्रोत, Dave Stamboulis

नैसर्गिक कुलिंग यंत्रणा

लडाखमध्ये अनेक गावं खूप उंचावर आहेत. त्यातुलनेत तुरकूत कमी उंचीवर आहे. समुद्रसपाटीपासून या गावाची उंची 2,900 मीटर आहे. त्यामुळे उन्ह्याळ्यात इथलं तापमान खूप वाढतं. अशावेळी मांस, भाजीपाला असे नाशवंत पदार्थ टिकावे यासाठी दगडांपासूनच एक उत्तम कुलिंग स्टोरेज सिस्टिम तयार करण्यात आली आहे.

बाल्टी भाषेत त्याला 'नांगचुंग' म्हणतात. म्हणजे 'कोल्ड हाउस'. शीतपेटीच म्हणा ना. हे दगडाच्या खंदकासारखे असतात. या खंदकांना मध्येमध्ये असलेल्या फटींमुळे खंदकांमधली हवा खेळती राहते. त्यामुळे ती थंड होते आणि नैसर्गिक कुलिंग सिस्टिम तयार होते.

तुरकूत

फोटो स्रोत, Dave Stamboulis

तूरकूतची शेती

समुद्रसपाटीपासून उंचावर असल्याने तुरकूतमध्ये जव हे मुख्य पीक आहे. मात्र, त्यासोबतच उपवासामध्ये वापरण्यात येणारं 'बकव्हिट'चंही (एक प्रकारचं कडधान्य) उत्पादन घेतलं जातं. शिवाय जर्दाळू (अॅप्रिकॉट) आणि अक्रोडसाठीही कुरकूत प्रसिद्ध आहे. ही शेती खूपच मेहनतीची असते.

शेतीत वर्षभर लागवड केलेलं किंवा कापणी केलेलं पीक दिसतं. त्यामुळे रुक्ष डोंगरांमधली ही सुखद हिरवळ मन मोहून टाकते. (क्रेडीट : डेव्ह स्टॅम्बोलिस)

तुरकूत

फोटो स्रोत, Dave Stamboulis

शांतताप्रिय संस्कृती

काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव असला तरी सीमेवरच्या या गावातलं जीवन मात्र शांतताप्रिय आहे. 1971 नंतर भारत सरकारने इथल्या रहिवाशांना भारतीय ओळखपत्रं दिली आहेत. शिवाय नुब्रा खोऱ्याच्या विकासासाठीही पावलं उचलण्यात आली आहेत. रस्ते बांधणी, आरोग्य सुविधा, दळणवळणाच्या सोयी उभारण्यात येत आहेत. तुरकूत पर्यटनासाठी खुलं झाल्याने विकासाची नवी कवाडं खुली झाली आहेत.

मात्र, तुरकूतला भारतीय संस्कृतीचा स्पर्श नाही. जर्दाळूच्या फळबागा, नूरबक्षीया मशीद, दगडी घरं आणि दगडाचेच पाटबंधारे तसंच याकच्या मांसापासून बनवलेलं स्टफिंग किंवा जर्दाळू आणि अक्रोडाच्या पेस्टपासून बनवलेलं मस्कत, याच्यासोबत दिला जाणारा बकव्हिट पीठापासून बनवलेला किसीर म्हणजे ब्रेड, बलय म्हणजेच बकव्हिटपासून बनवलेले नूडल्स यासारखे परंपरागत बाल्ती पदार्थ, यामुळे हे गाव अजूनही त्यांच्या बाल्ती मूळांशी घट्ट जोडलेलं आहे. (क्रेडीट : डेव्ह स्टॅम्बोलिस)

तुरकूत

फोटो स्रोत, Dave Stamboulis

शरदाचे रंग

शरद ऋतूत तुरकूतचं सौंदर्य अधिकच बहरतं. एका रांगेत उभी असलेली चिनार वृक्ष आपला रंग बदलतात तेव्हा सभोवतालचा डोंगराळ भाग प्रकाशमान झाल्याचा भास होऊन एक सुंदर देखावा तयार होतो. लद्दाखच्या नुब्रा खोऱ्यात असलेल्या इतर गावांमध्येही दगडांचा वापर होतो.

मात्र, तुरकूतच्या ग्रामस्थानी ज्या मेहनतीने आणि व्यापक प्रमाणात दगडांचा उपयोग करून घेतला आहे, त्याला तोड नाही. भूकंप आणि भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तीतही तूरकूतच्या या दगडी भिंती भक्कमपणे उभ्या राहतात. (क्रेडीट : डेव्ह स्टॅम्बोलिस)

तुरकूत

फोटो स्रोत, Dave Stamboulis

सुबत्ता असलेलं खेडं

इथल्या रहिवाशांनी निसर्गावर मात करत सभोवतालच्या कठोर वातावरणाशी जुळवून तर घेतलं आहेच शिवाय भरभराटही केली आहे.

या गावाने आपला देश गमावला असला आणि आता एका नव्या देशाचा ते भाग असले तरीदेखील त्यांनी आपली संस्कृती जपली आहे. (सर्व फोटोंचे क्रेडिट : डेव्ह स्टॅम्बोलिस)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)