You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उन्नाव बलात्कार: पीडितेच्या चुलत बहिणीने सांगितलं की जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, पण...
उन्नाव बलात्कार प्रकरणामध्ये भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या विषयीचा संशय वाढतोय.
बलात्कार पीडित मुलगी रविवारी रायबरेलीला जात असताना एका ट्रकने तिच्या कारला धडक दिली होती. त्यात पीडित मुलगी गंभीररीत्या जखमी झाली तर तिच्या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला. या कारमध्ये असणारे पीडितेचे वकीलही जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
कार-ट्रक धडकेची ही घटना अपघात आहे की घातपात, याची चौकशी होत आहे. योगी सरकारने हा तपास CBIकडे सोपवला आहे.
या प्रकरणी भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यासह 10 लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये या पीडित तरुणीवर उपचार करण्यात येत आहेत.
पण भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावरून विरोधी पक्षांनी भाजपला घेरलं आहे. त्यांना आधीच पक्षातून निलंबित करण्यात आलं असून निलंबन रद्द करण्यात आलेलं नाही असं उत्तर प्रदेश भाजपने स्पष्ट केलं आहे.
पीडित मुलीच्या तब्येतीविषयी तिच्या चुलत बहिणीने बीबीसी प्रतिनिधी दिव्य आर्य यांना सांगितलं...
तिची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आताच काही सांगता येणार नाही, असं डॉक्टर म्हणतायत. तिच्या डोक्याला दुखापत झालेली आहे.
वर्षभरापासून तपास सुरू आहे. CBI एका महिन्यात दोनदा जबाब घेते. या आमदाराच्या भीतीने ही पीडिता दिल्लीमध्ये काकासोबत राहत होती, कारण तिथे कॅमेरे लावलेले होते, सुरक्षा व्यवस्था होती.
या पीडितेच्या काकांना खोट्या आरोपांखाली नऊ महिन्यांपासून तुरुंगात डांबण्यात आलं आहे. नऊ महिन्यांपासून आम्ही भटकतोय. 'खटला परत घ्या नाहीतर मारून टाकू,' अशी धमकी आम्हाला देण्यात येतेय.
पीडिता जबाब द्यायला उन्नावला आली असताना कुलदीप सेंगरचे लोक म्हणाले की 'आता यांना (काकांना) आतमध्ये टाकलंय, पण त्यांना अजून लटकवलेलं नाही आणि तुलाही मारून टाकायचं राहिलंय. तू केस परत घेणार नाही? खूप शूर आहेस! तुला मारून टाकल्यावरच आम्हाला उसंत मिळेल.'
या सगळ्या गोष्टी तिने काकूला सांगितल्या होत्या. काकूने सांगितलं की तू जबाब दे आणि घरी जा. तिथे थांबणं सुरक्षित नाही.
माझ्या बहिणीने सांगितलं की ती रविवारी काकांना भेटून परत येईल. रविवारी जणू मृत्यूच तिची वाट पाहत उभा होता. तिला मारून टाकलं.
माझी आईही गेली आणि मावशीही मरण पावली. असं होईल अशी भीती होतीच.
'ना पीडितेला न्याय मिळेल, ना काकांना'
हा अपघात नव्हता. दोन्ही बहिणींना (माझी आई आणि मावशी) असं होण्याची भीती होती.
आता CBI जो तपास करत आहे, त्याबाबत मी समाधानी आहे, पण उन्नाव पोलिसांच्या बाबतीत मी खूश नाही.
कोर्टात न्याय मिळत नाही. इथे सरळसरळ अन्याय होतोय. दरवेळी आम्हाला तारीख मिळायची, कारण तिच्या (पीडितेच्या) मृत्यूचा कट रचला जात होता.
मला उन्नावची चीड येते आता, ना पीडितेला न्याय मिळणार आहे, ना काकांना.
कुलदीपचे लोक आमच्यावर जोरजोरात हसायचे. म्हणायचे 'त्यांना उडवून टाका, काम तमाम करून टाका.' आम्ही तिघी महिला असायचो आणि त्यांच्या बाजूला अख्खी गँग असायची.
पीडितेला आधी सुरक्षा मिळाली होती. पण ते तिला बसवून काहीतरी आणायला निघून जायचे. पीडिता बाहेर सुरक्षित नसायची म्हणून मग तिला आतमध्ये बसवून चालले जायचे. त्याचवेळी तिला धमकावलं जायचं.
गेल्या नऊ महिन्यांमध्ये जेव्हापासून पीडितेचे काका महेश सिंह यांना तुरुंगात डांबण्यात आलंय, ते लोक धमकावत रहायचे. काकूला रस्त्यामध्ये घेरलं जायचं. तिला म्हणायचे, 'चला तुम्हाला बोलावलं आहे.'
काकू काही लोकांना ओळखायची म्हणून त्यांच्या नावाची FIR पोलिस स्टेशन, एसपी, मुख्यमंत्री आणि अगदी पंतप्रधानांनाही दिली. पण कोणतीही कारवाई झाली नाही.
'आम्हाला चिरडून मारून टाकतील'
साक्षी महाराज सेंगरला भेटायला गेले, पण पीडितेला भेटायला आले नाहीत. फक्त स्मृती इराणी आल्या आणि दिलासा देऊन निघून गेल्या.
काका नसतील तर आम्ही कुठे रहायचं? आम्ही जिथे जाऊ तिथे आम्हाला चिरडून मारून टाकतील.
आमचं म्हणणं पंतप्रधानांपर्यंत पोहोचवा. जे खोटे आरोप लावण्यात आले आहेत ते मागे घेण्यात यावेत. 307च्या आरोपाखाली काकांना तुरुंगात टाकण्यात आलं. ते त्यांच्या दरवाज्यात उभे होते. ज्यांनी गोळी झाडली त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली.
कुलदीप सेंगरच्या बाबतीत इतकंच म्हणायचंय की जर असंच सुरू राहिलं तर माझं कुटुंब उरणार नाही. त्याला अजूनही पक्षात का ठेवण्यात आलंय?
जेव्हा ते धमकी द्यायला आले होते, तेव्हा मी तक्रारही दाखल केली होती. त्यांना जर अटक करण्यात आली असती तर हे झालं नसतं.
ते उघडपणे म्हणायचे की एक-एक करून तुम्ही सगळे मराल. असं धमकावलं जात असेल तर आम्ही सुरक्षित नाही. आम्हाला संरक्षण द्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)