कर्नाटक सरकार संकटात: सर्व मंत्र्यांच्या राजीनाम्यांनंतर नवीन मंत्रिमंडळ लवकरच

फोटो स्रोत, FACEBOOK/H D KUMARASWAMY
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसीसाठी, बंगळूरूहून
कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल युनायटेड (JDS) आपलं आघाडी सरकार वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत.
सरकारमध्ये सहभागी असलेल्या सगळ्या 21 मंत्र्यांनी आपली पदं सोडण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून आघाडीतून बंड करून बाहेर पडलेल्या आमदारांना मंत्रिपदाचं आश्वासन देऊन त्यांची समजूत काढता येईल.
"काँग्रेसच्या 21 आमदारांप्रमाणेच JDSच्या सर्व आमदारांनीही आपापल्या मंत्रिपदांचा राजीनामा दिला आहे. लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होईल," असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या हँडलवरून ट्वीट करण्यात आलंय.
या नवीन मंत्रिमंडळात राजीनामा देणाऱ्या आमदारांना मंत्री बनवलं जाऊ शकतं.

फोटो स्रोत, Twitter
काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत म्हटलं, "सगळ्या मंत्र्यांनी स्वेच्छेने मंत्रिपदं सोडली आहेत. त्यांनी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळात फेरबदल करण्याबद्दल योग्य तो निर्णय घ्यायला लावला आहे."
या बैठकीत सहभागी असणाऱ्या एका मंत्र्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं होतं की, "जेडीएसचे मंत्रीही असंच करणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतील आणि हे राजीनामे स्वीकारण्याची विनंती करतील."
काँग्रेसच्या मंत्र्यांनी असा निर्णय घेतल्यानंतर एक अपक्ष आमदार एच. नागेश यांनीही राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला आहे. त्यांना भाजपसोबत जाण्यापासून रोखण्यासाठी 21 दिवसांपूर्वीच मंत्रिपद दिलं गेलं होतं.
हे राजीनामासत्र त्या नाराज आमदारांसाठी एक संदेश आहे जे आमदार 'ऑपरेशन कमल' या भाजपच्या सत्ता हस्तगत करण्याच्या डावपेचांनी प्रभावित झालेले नाहीत. हे आमदार नाराज आहेत कारण त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही किंवा आपल्या मतदारसंघासाठी पुरेसा निधी मिळालेला नाही.
आणखी राजीनामे दिले जाणार
मंत्र्यांनी सरकार वाचवण्यासाठी राजीनामे दिले असले तरी इतर काही राजीनाम्यांनी काँग्रेस-JDS सरकारसाठी अडचणी उत्पन्न केल्या आहेत. काँग्रेस-JDSच्या एक डझनहून अधिक आमदारांनी राजीनामे दिले आहेत आणि असं म्हटलं जातंय की ते भाजपच्या संपर्कात आहेत.
कर्नाटकमध्ये भाजप 'ऑपरेशन कमला' च्या अंतर्गत प्रयत्न करत आहे की सत्ताधारी आघाडीच्या आमदारांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा आणि भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा निवडणूक लढवावी.
या सगळ्या कहाणीचे दोन पैलू आहेत. काही आमदार मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत तर काहींची तक्रार आहे की उपमुख्यमंत्री जी परमेश्वर आणि इतर काही मंत्र्यांकडून त्याच्या मतदारसंघातल्या विकासकामांना हिरवा झेंडा दाखवला गेला नाही.
काँग्रेस महासचिव वेणुगोपाल म्हणतात, "काही काँग्रेस आणि JDS आमदारांनी राजीनामे दिले आहेत. काहीं मंत्रिपद न दिलं गेल्याने नाराज आहेत. आमची बोलणी चालू आहेत."
आणि म्हणूनच नाराज आमदारांना मंत्रिपद देता यावं म्हणून सध्याच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.

फोटो स्रोत, JAGADEESH NV/EPA
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, "सध्या ज्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत ते काँग्रेसचे कणखर आणि इमानदार नेते आहेत. त्यांच्या शिवाय काँग्रेस कर्नाटकमध्ये यश संपादन करू शकली नसती. आणि मोदीं लाटेमध्ये 2018 च्या विधानसभेमध्ये पक्षाची पकड मजबूत ठेवण्यात या नेत्यांचाच हात होता."
अपक्ष आमदार नागेश यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस-JDS सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळू शकतं.
जर विधानसभा अध्यक्ष रमेश कुमारांनी काँग्रेस आणि जेडीएसच्या 12 आमदारांचा राजीनामा स्वीकारला, तर विधानसभेतल्या एकूण आमदारांची संख्या घटून 212 होईल. अशात बहुमतचा आकडा 106 होईल आणि भाजपकडे आधीपासूनच 105 आमदार आहेत आणि आता तर अपक्ष आमदार एच नागेश यांनीही राजीनामा दिला आहे.
भाजपच्या एका नेत्याने आपलं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, "अजून दहा आमदार आहेत जे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत."
तर दुसरीकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत बोलताना स्पष्टीकरण दिलं की, "कर्नाटकमध्ये सध्या जे काही चालू आहे त्याचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध नाही. आमच्या पक्षाचा इतिहास आहे की आजवर कधीही आम्ही दुसऱ्या पक्षांच्या सदस्यांवर किंवा नेत्यांवर दडपण आणून किंवा प्रलोभन देऊन पक्ष बदलण्यासाठी प्रवृत्त केलेलं नाही. "
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








