डॉ. शेखर राघवन: चेन्नईच्या पाणी टंचाईशी दोन हात करणारा 'रेन मॅन'

डॉ. शेखर राघवन
फोटो कॅप्शन, डॉ. शेखर राघवन
    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गुरुवारी दुपारी जेव्हा आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली, तेव्हा शेखर राघवन एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदून गेले. चेन्नईमध्ये शेखर राघवन यांना रेन मॅन म्हणून ओळखलं जातं.

आपल्या हातांच्या ओंजळीत त्यांनी पावसाचं पाणी घेतलं आणि प्यायले.

डॉक्टर शेखरन सांगतात, "हे साहजिकच आहे की पाऊस पडला की मला आनंद होतो. 200 दिवसानंतर मी पाऊस पाहतोय. गेल्या वर्षी पाच डिसेंबरला पाऊस पडला होता. तसं पाहायला गेलं तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस पडतो पण ईशान्य मान्सून फेल झाला आणि पाऊस थांबला." गुरुवारी दुपारी जेव्हा आकाशात काळं ढग जमलं आणि थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली, तेव्हा शेखर राघवन एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदून गेले. चेन्नईमध्ये शेखर राघवन यांना रेन मॅन म्हणून ओळखलं जातं.

चेन्नई पाण्याची कमतरता

फोटो स्रोत, Piyush Nagpal

सतत बरसणाऱ्या पावसाप्रमाणेच शेखरन पावसावर कित्येक वेळ बोलू शकतात. पावसावर इतकं प्रेम असणारी व्यक्ती सापडणार देखील नाही असं आपल्याला वाटू लागतं. त्यांचं पावसावर जितकं प्रेम आहे तितकाच त्यांचा या विषयाचा अभ्यास देखील आहे. शेखर राघवन हे चेन्नईच्या द रेन सेंटरचे संस्थापक आहेत.

राघवन सांगतात, "हलक्याशा पावसानं फार काही फायदा होत नाही. हा पाऊस त्यांच्यासाठीच फायद्याचा ठरू शकतो ज्यांना पावसाचं हे पाणी जमा कसं करायचं हे कळतं. पाऊस न पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती बनली आहे. भूजल पातळी कमी झाली आहे. ती पातळी या पावसामुळे वाढू शकत नाही."

चेन्नईमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता. या समस्याचं निराकरण करण्यासाठी त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पर्याय शहराला सुचवला होता. तेव्हापासून त्यांना 'रेन मॅन' असं म्हटलं जाऊ लागलं.

चेन्नई पाण्याची कमतरता

फोटो स्रोत, BBC/Piyush Nagpal

चेन्नईची भौगोलिक रचना इतर महानगरांच्या तुलनेत वेगळी आहे. चेन्नई शहर हे नैऋत्य मान्सूनच्या कक्षेत येतं पण या पावसासाठी मात्र या शहराला ईशान्य मान्सूनवरच अवलंबून राहावं लागतं. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ईशान्य मान्सूनमुळे पाऊस पडतो.

पण गेल्या वर्षी ईशान्य मान्सून फेल झाला. चेन्नईच्या शहरानजीक चार मोठे जलाशय आहेत. रेड हिल्स, शोलावरम, पुंडी आणि चेंबाराबक्कम ही त्यांची नावे. या जलाशयांचा जलसाठा कमी झाल्यामुळे पाण्याची टंचाई आणखी तीव्र झाली.

भूजल पातळी इतकी कमी झाली आहे की लोकांना टॅंकरनं पाणी विकत घ्यावं लागत आहे आणि त्यासाठी लोक चौपट पैसे मोजायला तयार आहेत.

पाणी नसल्यामुळे शाळांनी आपले तास कमी केले आहेत. तसेच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे.

चेन्नई पाण्याची कमतरता

फोटो स्रोत, Piyush Nagpal

राघवन सांगतात, भूजल स्तर खालवल्यामुळे बोअरवेलला पाणीदेखील उपलब्ध नाही. पण बोअरवेलच्या तुलनेत खुल्या विहिरींमध्ये पाणी उपलब्ध आहे. दुष्काळग्रस्त स्थितीमध्ये देखील विहिरींमध्ये किमान दहा फूट पाणी आहे. काही ठिकाणी विहिरींमध्ये 18 ते 20 फूट इतकं पाणी उपलब्ध आहे."

बीबीसीचा इंटरव्यू सुरू असतानाच डॉक्टर राघवन यांना भेटण्यासाठी एक तरुणी तिथं आली. सौम्या अर्जुन तिचं नाव. ती म्हणाली मला तातडीनं डॉ. राघवन यांच्याशी बोलायचं आहे.

त्या तरुणीनं आपली ओळख करून दिली आणि सांगितलं की त्या ज्या परिसरात राहते त्या ठिकाणी 69 घरं आहेत आणि त्यापैकी 40 जणांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बनवायची आहे. एकदा का आम्ही ही सिस्टम बसवली तर इतर 29 घरं देखील नंतर या उपक्रमात सहभागी होतील असा तिला विश्वास आहे.

रेन सेंटरमध्ये आल्यावर सौम्याला कळलं की पूर्ण सिस्टम लावण्याचा खर्च अंदाजे 2 लाख रूपये येईल. पुढे ती सांगते की 69 घरांनी हा खर्च विभागून घेतला तर प्रत्येक कुटुंबाला अंदाजे 3000 रुपये खर्च येईल. आम्ही 24,000 लिटरचं टॅंकर घेण्यासाठी जितका खर्च करतो त्याच्या एक तृतीयांश हा खर्च आहे.

पूर्ण परिसराला एका दिवसाला 35,000 लीटर पाणी लागतं. म्हणजे आमच्या आवश्यकतेपेक्षा 11,000 लीटर पाणी कमी पडतं असं सौम्या सांगतात.

सौम्या आणि डॉक्टर शेखरन

फोटो स्रोत, PIYUSH NAGPAL

फोटो कॅप्शन, सौम्या आणि डॉक्टर शेखरन

डॉक्टर राघवन सांगतात, पाण्याच्या कमतरतेमुळे श्रीमंत-गरीब हे एकाच स्तरावर आले आहेत. लोकांकडे पैसे तर आहेत पण पाणी नाही.

डॉक्टर राघवन यांनी सौम्याला सांगितलं की पुढच्या दहा दिवसांत मी तु्म्हाला भेट देईन.

कुणाला सल्ला हवा असेल तर रेन सेंटर त्यासाठी कोणतंही शुल्क घेत नाही. आपल्या परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंगच पुढचं काम कसं करायचं याचा निर्णय लोकच घेतात.

आताची स्थिती ही 25 वर्षांपूर्वीच्या स्थितीपेक्षा पूर्णतः वेगळी आहे. सुरुवातीला देखील ते रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रचार करत होते पण तेव्हा लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असत.

रेन मॅन

फोटो स्रोत, PIYUSH NAGPAL

पण नंतर जसं त्यांचं नाव माध्यमांमध्ये झळकू लागलं तसं लोक त्यांच्याकडे गांभीर्याने पाहू लागले. जर पाऊस पडला नाही तर अशा परिस्थितीत कसं राहायचं हे राघवन सांगतात अशी चर्चा होऊ लागली. तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य केल्यानंतर राघवन यांच्या कार्याला आणखी बळ मिळालं.

पाण्याची समस्या सोडवायची असेल तर खूप काही करणं आवश्यक आहे असं राघवन यांना वाटतं. ते सांगतात, आज आपण ज्या समस्यांचा सामना करत आहोत त्या समस्या मानव निर्मित आहेत. पाण्याचा साठा करण्यासाठी चेन्नईत जलाशय आहेत पण त्यामध्ये कचरा पडला आहे. कित्येक वर्षांपासून हे जलाशय स्वच्छ झाले नाहीत. पाण्याच्या साठवणुकीसाठी दुसरा पर्याय उपलब्ध नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)