इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावर औरंगाबादमध्ये इतका गोंधळ झाला कारण...

इम्तियाज जलील

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, इम्तियाज जलील
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

MIMचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून औरंगाबाद महानगर पालिकेत गदारोळ झाला. एकीकडे MIM म्हणत आहे की आम्ही जिंकलो हे शिवसेनेला पचतच नाहीये तर दुसरीकडे शिवसेना नेते म्हणताय MIM ला पाणीप्रश्नापेक्षा अभिनंदन करणं महत्त्वाचं वाटतं?

या अभिनंदन प्रस्तावाच्या निमित्ताने दोन्ही पक्षातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. काय आहे त्यामागचं राजकारण?

इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडल्यानंतर औरंगाबादमधील MIM आणि शिवसेना या दोन्ही पक्षात सातत्यानं खटके उडत आहेत.

याचाच प्रत्यय गुरुवारी (13 जून) औरंगाबाद महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना आला.

या सभेत औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचा सत्कार करण्यात यावा, असा प्रस्ताव MIMच्या नगरसेवकांनी सभेत मांडला.

पण शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला. यातच MIMच्या एका नगरसेवकानं राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला.

यामुळे मग गोंधळ घालणाऱ्या MIMच्या 6 नगरसेवकांचं सदस्यत्व 1 दिवसासाठी निलंबित करण्यात आलं.

जलील काय म्हणतात?

"गेल्या 30 वर्षांपासून औरंगाबादमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीतील माझा विजय शिवसेनेला पचत नाहीये. 2014च्या मोदी लाटेतही मी आमदार म्हणून निवडून आलो होतो. ही सल आजही शिवसेनेच्या मनात आहे. म्हणून मुख्य मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे," असं खासदार जलील यांनी सांगितलं.

MIMच्या नगरसेवकांना पाणी प्रश्न महत्त्वाचा नसून, जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव महत्त्वाचा वाटतो, असा आक्षेप शिवसेनेच्या नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.

यावर ते सांगतात, "खरं तर नवनिर्वाचित खासदाराच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्याची प्रथा पहिल्यापासून आहे. यासाठी 15 ते 20 सेकंद इतका वेळ लागतो, पण शिवसेनेला गोंधळ घालून प्रमुख मुद्द्यांपासून लक्ष भटकवायचं आहे."

बछड्यांच्या नामकरणावरून वाद

औरंगाबादमधल्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात काही दिवसांपूर्वी वाघिणीनं 4 बछड्यांना जन्म दिला होता.

त्या बछड्यांच्या नामकरणावरूनही बराच वाद झाला होता.

चंद्रकांत खैरे

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, चंद्रकांत खैरे

बछड्यांच्या नामकरण सोहळ्याचे प्रमुख म्हणून औरंगाबाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर इम्तियाज जलील यांचं नाव नव्हतं.

त्यामुळे या सोहळ्याला MIMच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. 8 जूनला हा नामकरण सोहळा खैरेंच्या उपस्थितीत पार पडला. पण, इम्तियाज जलील यांना निमंत्रण न दिल्यानं MIMच्या कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयाबाहेर आंदोलन करत निषेध नोंदवला होता.

'इम्तियाज यांना सरळ करणार'

लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात MIMच्या इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या काही हजार मतांनी पराभव केला होता.

"इम्तियाज जलीलला सरळ करणार. त्याने विजयानंतर किती धिंगाणा केला, आमच्या महिला मुलींवर हिरवा गुलाल उधळला," अशी प्रतिक्रिया निकालानंतर खैरे यांनी दिली होती.

चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव

फोटो स्रोत, FACBOOK

फोटो कॅप्शन, चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव

तर विजयानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत इम्तियाज यांनी म्हटलं होतं की, "माझ्या कार्यकर्त्यांमुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो. माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मर्यादेत राहावे. तुम्ही चुकीचे वागलात तर मी वाचवायला येणार नाही."

'शिवसेनेचा रडीचा डाव'

"लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये शिवसेना आणि MIM यांच्यात अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीत शिवसेनेचा गड ढासळला. खरं तर नवनिर्वाचित खासदारांचं अभिनंदन करायला हरकत नसावी, पण तरीही शिवसेनेनं विरोध केला, हा शिवनसेनेचा रडीचा डाव आहे," असं मत ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड यांनी व्यक्त केलं.

औरंगाबाद

महाराष्ट्र टाइम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे वरिष्ठ सहसंपादक प्रमोद माने यांच्या मते, "नव्या खासदारांच्या अभिनंदन प्रस्तावाला विरोध करणं म्हणजे त्यांना मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचा अपमान आहे. कारण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर ती व्यक्ती एका पक्षाची राहत नाही. इम्तियाज जलील यांचं अभिनंदन करण्यात चुकीचं असं काहीच नाही."

"औरंगाबादमधील राजकारण नेहमीच 'खान विरुद्ध बाण' असं राहिलेलं आहे. या निवडणुकीत खान निवडून आल्यामुळे बाण निस्तेज झाला आहे. लोकसभेतील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आता शिवसेना सूडाचं राजकारण करत आहेत," माने पुढे सांगतात.

'स्थानिक प्रश्न महत्त्वाचे'

भाजपच्या गटनेत्यानं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं, "शहरात सध्या पाण्याची बिकट अवस्था आहे. गेल्या 3 तासांपासून आम्ही पाणी प्रश्नावर चर्चा करत आहोत. पण, MIMच्या नगरसेवकांना त्यांचा खासदार निवडून आलंय, हेच तेवढं दिसतंय. बाकी शहराचे प्रश्न यांना दिसत आहे, यांना फक्त अभिनंदन पाहिजे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)