युवराज सिंग : पाच अविस्मरणीय खेळी, सलग 6 षटकार ते विश्वचषक विजयाचा शिल्पकार

युवराज सिंह

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक डावखुरा फलंदाज युवराज सिंह याचा आज (12 डिसेंबर 2020) 39 वा वाढदिवस आहे.

डावखुरी आक्रमक फलंदाजी, जोडीला फिरकी गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि सहज हार न मानण्याची वृत्ती यामुळं युवराजनं गेल्या दोन दशकांत क्रिकेटच्या मैदानात, विशेषतः मर्यादित षटकांच्या खेळात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

युवराज सिंगनं जून 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळं एका महान कारकिर्दीची अखेर झाली आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. भारतीय क्रिकेटला एकविसाव्या शतकात घेऊन जाणाऱ्या पिढीचा क्रिकेटर म्हणूनही जाणकार त्याचा अनेकदा उल्लेख करतात.

युवराजची कामगिरी स्वप्नवत वाटत असली तरी त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली वाटचाल खडतर ठरली. चढ-उतारांनी भरलेल्या या प्रवासात त्यानं क्रिकेट चाहत्यांना दिलेल्या पाच अविस्मरणीय क्षणांचा हा आढावा.

1. अंडर-19 वर्ल्डकपचा मालिकावीर

युवराजचं नाव पहिल्यांदा चर्चेत आलं 2000 साली. त्या वर्षी भारतानं पहिल्यांदाच अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. श्रीलंकेत झालेल्या त्या स्पर्धेत मोहम्मद कैफच्या नेत्तृत्त्वाखाली खेळताना युवराज मालिकावीर ठरला होता. आठ सामन्यांत 203 धावा आणि 12 विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी युवराजनं बजावली होती. त्या कामगिरीनं युवराजसाठी भारतीय संघाचं दारही उघडलं. त्याला 2000 सालीच केनियात झालेल्या आयसीसी नॉक आऊट ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि भारतीय क्रिकेटमधल्या युवराज-पर्वाची सुरूवात झाली.

2. लॉर्डसवरचा ऐतिहासिक विजय

2002 साली इंग्लंडमध्ये झालेल्या नॅटवेस्ट मालिकेमध्ये युवराजच्या कारकिर्दीला खरी झळाळी चढली. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतानं ती मालिका जिंकली होती. लॉर्ड्सवर झालेल्या फायनलमध्ये भारतानं 326 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यावेळी युवराजनं मोहम्मद कैफच्या साथीनं 121 धावांची भागीदारी रचून भारताचा विजय निश्चित केला.

युवराज सिंह

फोटो स्रोत, Getty Images

त्या विजयानंतर गांगुलीनं लॉर्ड्सच्या बाल्कनीत शर्ट काढून सेलिब्रेशन केलं होतं.

3. एका षटकात सहा षटकार

2007 साली भारतानं पहिलावहिला टी20 विश्वचषक जिंकला, त्यातही युवराजनं महत्त्वाचं योगदान दिलं. त्या स्पर्धेतच इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराजनं एकाच षटकात सलग सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता.

4. विश्वचषक विजयाचा शिल्पकार

2007नंतर युवराजच्या कामगिरीत सातत्यानं चढउतार पाहायला मिळाले. खराब कामगिरीमुळं त्याला आशिया चषकातून वगळण्यातही आलं होतं. पण 2011 साली भारतात झालेल्या वन डे विश्वचषकात त्यानं पुन्हा उसळी मारली आणि भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

युवराज सिंह

फोटो स्रोत, Getty Images

ती स्पर्धा युवराजसाठी एखाद्या सुंदर स्वप्नासारखीच ठरली होती. त्या स्पर्धेत युवराजनं 9 सामन्यांत 362 धावांची लूट केली होती आणि 15 विकेट्स काढल्या होत्या. त्या कामगिरीनं युवराजला मालिकावीराचा किताबही मिळाला. अंडर-19 आणि ट्वेन्टी20 क्रिकेटपाठोपाठ वन डे विश्वचषक जिंकण्याऱ्या संघाचा सदस्य असल्याचा मानही त्यामुळं युवराजला मिळाला.

5. कॅन्सरवर मात

पण युवराजच्या आयुष्यातला सर्वांत मोठा विजय मैदानावर नाही, तर मैदानाबाहेरचा आहे. 2011 सालच्या विश्वचषकादरम्यानच युवराजला श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. युवराजला फुफ्फुसात कॅन्सर झाल्याचं निदान झालं आणि जगभरातल्या त्याच्या चाहत्यांना हादराच बसला.

युवराज सिंह

फोटो स्रोत, Getty Images

पण अमेरिकेत उपचार आणि अडीच महिने केमोथेरपीनंतर युवराजनं कॅन्सरवर यशस्वी यशस्वी मात केली. इतकंच नाही तर 2012 साली क्रिकेटच्या मैदानात पुनरागमनही केली.

त्यानंतरच्या काळात युवराजनं ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये 2012 साली पाकिस्तानविरुद्ध 72 धावांची आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2013 साली 77 धावांची खेळी केली होती. पण असे तुरळक अपवाद वगळता युवराजला कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. 2017 सालानंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नव्हता. अखेर त्यानं आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)