प्रताप चंद्र सारंगी : सोशल मीडियावर हिरो झालेल्या मंत्र्याची 'वादग्रस्त' पार्श्वभूमी

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात गुरुवारी भारताच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी सर्वाधिक टाळ्या मिळाल्या त्या फारसे परिचित नसलेल्या आणि अगदी साधी राहणीमान असणाऱ्या प्रताप चंद्र सारंगी यांना.
प्रताप चंद्र सारंगी यांना ओरिसाबाहेर फारसं कुणी ओळखत नव्हतं. मात्र, गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर त्यांचे फोटो प्रसिद्ध झाले आणि चित्र पालटलं. सारंगी लगेच व्हायरल झाले आणि लोकप्रियही.
सारंगी खासदारकीची निवडणूक जिंकून राज्यमंत्री झाले. रंकाचा राव झाल्याच्या कहाण्यांनी समाजमन हेलावून जाणाऱ्या भारतासारख्या देशात सारंगी यांच्या या यशाचं कौतुक झालं नसतं तरच नवल.
सारंगी यांना साध्या राहणीमानामुळे मोठी लोकप्रियता मिळाली असली तरी त्यांचा इतिहास इतका साधा नाही.
1999 साली ओरिसामध्ये संतप्त हिंदू जमावाने ग्राहम स्टेन्स या ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन मिशनरीचा त्यांच्या दोन लहान मुलांसह पेटवून देऊन त्यांची निर्घृण हत्या केली होती. त्यावेळी प्रताप सारंगी कडव्या हिंदू विचारसरणी असलेल्या बजरंग दलाचे ओरिसा अध्यक्ष होतो. त्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेचे महत्त्वाचे सदस्यही होते.

फोटो स्रोत, Twitter/Giriraj Singh
या हत्यांमागे बजरंग दल असल्याचा आरोप स्थानिक ख्रिश्चन समुदायाने केला होता. मात्र, एखाद्या विशिष्ट संघटनेचा या हत्यांमध्ये हात असल्याचं अधिकृत चौकशीत सिद्ध झालं नाही.
हा खटला बरीच वर्षं चालला. अखेर 2003 साली बजरंग दलाशी संबंधित दारा सिंह आणि इतर बारा जणांना कोर्टाने दोषी ठरवलं. दारा सिंहला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाने दोन वर्षांनंतर फाशीची शिक्षा कमी करत त्याला जन्मठेप सुनावली.
ज्या 11 जणांना जन्मठेप सुनावण्यात आली होती. त्यांचीही सुटका करण्यात आली. त्यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याचं कारण न्यायालयाने दिलं.
ओरिसातले पत्रकार संदीप साहू सांगतात, सारंगी यांनी अनेकांना मुलाखती दिल्या आहेत. त्यांनाही दिली होती. यात त्यांनी कथित बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराला राक्षसी म्हटलं होतं.
ग्राहम स्टेन्स हत्या प्रकरणानंतर साहू त्याच गावात सारंगी यांना भेटले होते. त्यावेळी सारंगी यांनी हत्येचा निषेध केला. मात्र, त्यांचा भर हा धर्मांतरण थांबवण्यावर अधिक होता.
त्यांच्याविरोधात दंगल भडकवणे, धार्मिक तेढ निर्माण करण्यासारखे अनेक आरोप आहेत. सारंगी यांनी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रमाणपत्रात त्यांच्याविरोधात सात गुन्हे दाखल असल्याचं म्हटलंय. यात बेकायदेशीरपणे एकत्र येणे, दंगल आणि धार्मिक भावना भडकवणे, यासारखे गुन्हे आहेत. मात्र, यातल्या एकाही प्रकरणात ते दोषी आढळलेले नाही.

फोटो स्रोत, BISWARANJAN MISHRA
2002 साली ओरिसाच्या विधान भवनावर बजरंग दलासह काही हिंदुत्ववादी संघटनांनी हल्ला चढवला होता. या प्रकरणात सारंगी यांना दंगल, जमावाला भडकवणे, मारहाण आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान या आरोपांखाली अटकही करण्यात आली होती.
मात्र, यापैकी कशाचीच चर्चा सोशल मीडियावर दिसली नाही. दिसली तर त्यांची साधी राहणी. गमचा घेऊन बांबूच्या झोपडीबाहेर नळावर आंघोळ करतानाचे फोटो, सायकल किंवा ऑटोरिक्षावरून प्रचार करतानाचे फोटो, मंदिरात पूजा करतानाचे फोटो.
पत्रकार साहू सांगतात, "मतदारसंघात मतदारांना भेटण्यासाठी ते सायकलीवरून गावोगाव फिरायचे. अधिवेशनावेळी ते विधानसभेतनही सायकलवरूनच जाताना दिसायचे. कधी रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीवजा हॉटेलमध्ये खाताना दिसायचे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट बघत उभे असताना दिसायचे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या निवडणुकीत त्यांनी दोन बड्या उमेदवारांचा पराभव केलाय. डेव्हिड आणि गोलियाथच्या कथेसारखी ही लढत असल्याचं त्यांचे समर्थक सांगतात.
गुरुवारी त्यांनी शपथ घेतली त्यावेळी त्यांच्या मतदारसंघात समर्थकांनी जल्लोष साजरा केला. फटाके उडवण्यात आले, मिठाई वाटण्यात आली. काही जण त्यांना 'ओरिसाचे मोदी' म्हणतात.
मात्र, सोशल मीडिया हिरोंची हीच समस्या असल्याचं प्रतिनिधी सांगतात. सोशल मीडियावर टाकलेला एक फोटो किंवा एखादी गोष्ट लगेच प्रेक्षकांच्या मनाला हात घालते आणि व्हायरल होते. त्यामुळे एखादी व्यक्ती कोण आहे, तिचा भूतकाळ काय आहे, याची पुरेशी माहिती न घेताच कुणीतरी एखाद्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट टाकतो आणि ती व्यक्ती लगेच हिरो बनते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








