बिग बॉस मराठी-2 : भेटा बिग बॉसच्या घरात आलेल्या 15 स्पर्धकांना

फोटो स्रोत, facebook/ColorsMarathi
मराठी कलाविश्वातील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच गाजलेला रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होतील याची उत्सुकता चाहत्यांना होती.
अखेर यंदाच्या पर्वातील स्पर्धकांवरून पडदा उठला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे-विज आणि लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर बिग बॉसच्या घरात पहायला मिळणार आहे.
वादग्रस्त पण तेवढाच लोकप्रिय ठरलेल्या या शोचं सूत्रसंचालन यावेळीदेखील महेश मांजरेकर करणार आहेत. चला तर मग आपण या स्पर्धकांची ओळख करून घेऊ.

फोटो स्रोत, facebook/ColorsMarathi
किशोरी शहाणे-वीज -
मराठमोळी अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज ह्या 'बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वात सहभागी होणाऱ्या पहिल्या स्पर्धक ठरल्यात. किशोरी शहाणेंनी अनेक मराठी-हिंदी मालिका,नाटक, चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. किशोरी शहाणे या फिटनेसप्रेमी म्हणूनही ओळखल्या जातात.

फोटो स्रोत, facebook/ColorsMarathi
वैशाली माडे
महाराष्ट्राची महागायिका म्हणून लोकप्रिय असलेली, बॉलिवुडमध्येही आपला आवाज पोहचवलेली पार्श्वगायिका वैशाली माडे ही या पर्वात झळकणार आहे. वैशालीने 'पिंगा ग पोरी पिंगा' हे गाणं सादर करत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला.

फोटो स्रोत, facebook/ColorsMarathi
दिगंबर नाईक आणि नेहा शितोळे -
'वस्त्रहरण' नाटकात तात्या सरपंच साकारणारा 'कोकणचा आपला माणूस' अर्थात विनोदी अभिनेते दिगंबर नाईक आणि 'सेक्रेड गेम्स' मधली मिसेस काटेकर म्हणजेच नेहा शितोळे यांनी बिग बॉसच्या घरात जोडीने एन्ट्री घेतली.

फोटो स्रोत, facebook/ColorsMarathi
सुरेखा पुणेकर -
मराठी बिग बॉस - २ सिझन सुरू होण्याआधी अनेक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या प्रोमोमध्ये घुंगरू आणि लावणीचा फड दाखवण्यात आला होता. त्यावेळी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या स्पर्धक असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरली.
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मराठी बिग बॉस - २ सिझनमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता लावणीचे फड गाजवल्यानंतर ही लावण्यवती बिग बॉसच्या घरत काय करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

फोटो स्रोत, facebook/ColorsMarathi
अभिजीत बिचुकले
कवीमनाचा राजकीय नेता म्हणून ज्याच्या नावाची चर्चा होती त्या अभिजीत बिचुकले यांनी देखील बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. बिचुकलेने 2004 पासून प्रत्येक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता, अगदी राष्ट्रपतीपदासाठीही त्याने इच्छुक असल्याचं पत्र लिहिलं होतं. यंदाच्या निवडणुकीत पराभव पत्करलेला हा नेता बिग बॉसचं विजेतेपद पटकावणार का, याची उत्सुकता आहे.

फोटो स्रोत, facebook/ColorsMarathi
शिवानी सुर्वे
अभिनेत्री शिवानी सुर्वे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. मात्र ही कोणत्या मालिकेतून नाही तर चक्क मराठी बिग बॉस-सिझन २ मधून. अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि खासकरून देवयानी या लोकप्रिय भूमिकेत झळकलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे बिग बॉस मराठीतून पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिजीत केळकर
'फुलपाखरू' या मालिकेतील अभिनेता अभिजीत केळकरने मराठी बिग बॉस-२ सिझनमध्ये प्रवेश केला आहे. अभिजीतने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीत काम केले आहे. बर्याचदा त्यांनी मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र आता सिझनमध्ये त्याची रिअल लाईफ प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

फोटो स्रोत, facebook/ColorsMarathi
वीणा जगताप
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका जिने काही महिन्यांमध्येच प्रेक्षकांची मने जिंकली, अशी 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतील राधा देशमुख म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री वीणा जगताप हिने मराठी बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केला आहे. याआधी वीणा बिग बॉसच्या घरात पाहुणी म्हणून आली होती. मात्र, आता ती सिझन २ मध्ये स्पर्धक म्हणून आली आहे.

फोटो स्रोत, facebook/ColorsMarathi
मैथिली जावकर
अभिनेत्री मैथिली जावकर नेही बिग बॉसच्या घरामध्ये आपली हजेरी लावली आहे. मैथिली जावकर या मूळच्या प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी सिनेमात आणि मालिकांत काम केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून काम करत आहे. २०१६मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष गणेश पांडे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या.
याशिवाय...
मालिकांतून लोकप्रिय झालेला अभिनेता माधव देवचक्के आणि अभिनेत्री रूपाली भोसले यांनीही जोडीनेच एन्ट्री घेतली. विशेष म्हणजे महेश मांजरेकरांनी त्यांची तुलना 'सई-पुष्कर'सोबत केली.
त्याशिवाय 'रोडीज'मध्ये सहभागी झालेला अमरावतीचा पोट्टा शिव ठाकरे, सेलिब्रेटी शेफ पराग कान्हेरे यासारखे चेहरेही बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत. देवयानी मालिकेमुळे घराघरात पोहचलेली शिवानी सुर्वे ही मराठीत परतली आहे.
याशिवाय 'बाप्पा' या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले हरहुन्नरी अभिनेते विद्याधर जोशी बिग बॉसमध्ये सहभागी झाले आहेत.
आता या १५ सदस्यांचा पहिला दिवस कसा होता ? पहिल्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये कोण कोण नॉमिनेट होणार? हे बघणे रंजक ठरणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








