गडचिरोली नक्षलवादी हल्ला : सुरक्षा दलं पुन्हा पुन्हा त्याच चुका का करतात?

गडचिरोली

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, 1 मे रोजी इथं झाला स्फोट.
    • Author, जयदीप हर्डीकर
    • Role, ज्येष्ठ पत्रकार

1 मे 2019 रोजी महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 पोलीस शिपाई आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना टाळता आली असती. वारंवार होणाऱ्या जुन्याच चुका आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरकडे दुर्लक्ष केलं नसतं तर.

या हल्ल्यात मारले गेलेले जवान गडचिरोली जिल्ह्यातल्या शीघ्र कृती दलाचे जवान होते. पुराडा गावाजवळ हा हल्ला करण्यात आला. पुराड्यातल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना निवडणुकीच्या कामासाठी परगावी तैनात करण्यात आल्याने कुरखेड्यातून शीघ्र कृती दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं होतं.

जिल्ह्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसात उत्तर गडचिरोलीतल्या पुराडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागात नक्षली कारवाया वाढल्या आहेत. गडचिरोलीत 11 एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान पार पडलं. काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत झालं. कुठलीही मोठी हानी किंवा हिंसाचार घडला नाही.

वर्षातला हा तो काळ आहे जेव्हा जिल्ह्यातले आदिवासी जंगलात तेंदू पत्ता वेचण्यासाठी जातात. या भागात तैनात करण्यात आलेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान त्यांच्या तळांवरच असते तर ज्या भागात हल्ला झाला तिथे अधिक चांगल्या प्रकारे गस्त ठेवता आली असती, असं आता काही जणांचं म्हणणं आहे.

2012 साली झालेल्या भुसुरंगाच्या स्फोटात अनेक जवान मृत्युमुखी पडले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2012 साली झालेल्या भुसुरंगाच्या स्फोटात अनेक जवान मृत्युमुखी पडले होते.

1 मे रोजी झालेल्या स्फोटाने नक्षलींच्या दोन दशकांपूर्वीच्या रणनीतीची आठवण ताजी झाली. तेव्हा नक्षलींच्या दलमची स्थापनाही झालेली नव्हती. त्यावेळी सुरक्षा दलांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातल्या संरक्षित क्षेत्रामधल्या नक्षली कारवायांमध्ये अनेकांचे हकनाक बळी गेले होते.

2012 साली देखील अशाच प्रकारच्या IED स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकाला उडवून देण्यात आलं होतं. धानोराजवळ झालेल्या त्या स्फोटात 12 जवान मृत्यूमुखी पडले तर 28 जखमी झाले होते.

त्यादिवशी पोलीस महासंचालक के. विजय कुमार यांच्या हस्ते आदिवासींना धान्य आणि स्वयंपाकाच्या भांड्यांचं वाटप होणार होतं. हे सर्व सामान घेऊन सीआरपीएफचे जवान गट्टा या गावी निघाले होते. तर 2016 साली यापेक्षा कमी तीव्रतेच्या एका स्फोटात अहेरीजवळ पोलिसांची एक जीप उडवण्यात आली. यात तीन पोलिसांचा मृत्यू झाला होता.

1 मेच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी पुराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दादापूरजवळ रस्ता निर्माणासाठीच्या जवळपास 30 गाड्या पेटवून दिल्या होत्या. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याने तात्काळ अतिरिक्त कुमक दादापूरला पाठवण्याचे आदेश दिले. या आदेशाचे पालन करताना प्रथमदर्शनी असं दिसंत की 15 जवानांना गाडीत कोंबून पाठवताना शीघ्र कृती दलाने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचं (SOP) पालन केलं नाही.

2012 साली हल्ल्यात जखमी झालेला जवान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2012 साली हल्ल्यात जखमी झालेले जवान.

SoPचं उल्लंघन आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची भूमिका, याविषयीच्या प्रश्नांना राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल किंवा गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संजीव बलकवडे यांच्याकडून समाधानकारक उत्तरं मिळालेली नाही आणि हेच पुरेसं बोलकं आहे.

मोठ्या प्रमाणावर वाहनं पेटवली तर पोलिसांची मोठी कुमक चारपैकी एका मार्गाने घटनास्थळाकडे येणारच, याची नक्षलवाद्यांना पुरेपूर कल्पना होती. आयईडीचा स्फोट झाल्यानंतर गोळीबार झाला नाही. याचा अर्थ त्या ठिकाणी फार जास्त नक्षलवादी हजर नसतील.

नक्षल समस्येविषयी करण्यात आलेल्या अनेक अभ्यासांमध्ये सुरक्षा दलांविरोधात नक्षलवाद्यांकडून होणारा आयईडीचा परिणामकारक वापर आणि ही स्फोटकं निकामी करण्यासाठी गस्त आणि घुसखोरीविरोधी मोहिमेसाठी आखून देण्यात आलेल्या तत्वांची काटेकोर अंमलबजावणीची गरज वारंवार अधोरेखित झाली आहे. मात्र, तरीही सुरक्षा दलाकडून SoP आणि नियमांचं सर्रास होणारं उल्लंघन आकलनापलिकडचं आहे.

1 मे रोजीच्या घटनेमुळे अनेक मुद्दे उपस्थित होतात. त्यातले बरेचसे जुनेच आहेत.

  • सुरक्षा तज्ज्ञांनुसार मूलभूत स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमधल्या अनेक नियमांचं शीघ्र कृती दलाकडून उल्लंघन झालं. यात a) आदल्या रात्री अनेक वाहनं पेटवली त्या ठिकाणावर पोलीस जवानांना एका खाजगी गाडीतून पाठवण्यात आलं. b) तेही रोड ओपनिंग न करता. c) शिवाय, नक्षली अगदी सहज अंदाज लावू शकतील, अशा नेहमीच्याच मार्गाने जवानांची गाडी गेली.
  • पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट होण्यासाठी गाडीचा वेग महत्त्वाचा ठरतो. गाडीवर पोलीस दलातला ड्रायव्हर असता तर पूल किंवा नाले पार करताना त्याला याची पुरेपूर कल्पना असती. मात्र, खाजगी ड्रायव्हरला याची माहितीच नव्हती. त्यामुळे ज्या नाल्याखाली स्फोटकं पेरून ठेवली होती त्यावरून जाताना या खाजगी ड्रायव्हरने गाडीचा वेग कमी करताच स्फोट झाला.
  • संबंधित भागात नक्षलवादी आहेत का, याची खातरजमा करण्यात आली नाही, हे आश्चर्यकारकच आहे. कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांनी दादापूरमध्ये अतिरिक्त पोलीस कुमक मागवली होती. पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणतात की SoPचं उल्लंघन झालं का आणि झालं असल्यासं जबाबदार कोण, हा त्यांच्या तपासाचा भाग आहे. या प्रकरणी सध्या शैलेश काळेंना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
  • या घटनेवरून नक्षलवाद्यांकडे आयईडी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दारुगोळा असल्याचंही स्पष्ट झालंय. याचाच अर्थ स्फोटकं तयार करणाऱ्या फॅक्ट्रीमधून दारुगोळा चोरट्या मार्गाने नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचत आहे.

जंगलात कुठेही पेरून ठेवणं आणि ज्या ठिकाणांवर आयईडी निकामी करता येणार नाही, अशा ठिकाणी ते पेरून ठेवणं, हा मध्य भारतातल्या जंगलातल्या नक्षलविरोधी कारवाईतला मोठा अडथळा आहे.

गडचिरोलीमध्ये शांतता नांदणार कधी असा प्रश्न तर या मुलांच्या मनात नसेल?

फोटो स्रोत, Getty Images

छत्तीसगडच्या गृहमंत्र्यांनी विधानसभेत नक्षलविरोधी कारवाईसंबंधी एक अहवाल सादर केला होता. त्या अहवालातल्या माहितीनुसार 2010 ते 2018च्या मध्यापर्यंत एकट्या बस्तर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून सुरक्षा दलांनी 1250 आयईडी शोधले आहेत.

याच अहवालातल्या माहितीनुसार याच काळात आयईडीच्या स्फोटात 66 सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला तर 205 जवान जखमी झाले.

मात्र, महाराष्ट्रात आयईडी स्फोटांची संख्या घसरली आहे.

आयईडीचा रस्त्याच्या कडेला पेरून ठेवलेला बॉम्ब म्हणून वापर होतो. मध्य भारतात सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवादी आयईडीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. सुरक्षा दलाच्या पुस्तिकेनुसार राष्ट्रीय महामार्ग, राज्यांतर्गत महत्त्वाचे मार्ग किंवा सुरक्षा दलाच्या कॅम्पजवळ स्फोट करण्यासाठी वापरात येणारी ही आयईडी उपकरणं नक्षलवादी वर्षानुवर्ष जमिनीखाली किंवा झुडपांमध्ये लपवून ठेवतात.

राजनाथ सिंह यांचे ट्वीट

फोटो स्रोत, TWITTER/@rajnathsingh

नक्षलविरोधी कारवायांमध्ये जवळपास 70% जवानांचा मृत्यू हा नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी किंवा भूसुरुंग स्फोटांमुळे होतो, असं सीआरपीएफचा अंतर्गत अहवालच सांगतो.

त्यामुळे नक्षलवाद्यांच्या या आयईडी अस्त्राचा सामना करणं ही सीआरपीएफ समोरची एवढी मोठी समस्या बनली होती की त्यांनी 2012 साली पुण्यात आयईडी मॅनेजमेंट इन्सिट्युटची स्थापना केली.

या संस्थेत जवानांना आयईडीचा शोध घेणे, त्यांना निकामी करणे आणि ते नष्ट करण्याचं प्रशिक्षण देण्यात येतं. भारत आणि भारताबाहेरही आयईडी स्फोटाच्या महत्त्वाच्या घटनांचं मॉडेल हे या संस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.

South Asia Terrerism Portal (SATP)च्या डेटानुसार गडचिरोलीतली घटना ही यंदाची भारतातली नक्षलसंबंधी 53वी घटना होती. या सर्व घटनांमध्ये जवळपास 107 जणांचा मृत्यू झाला. यातली गडचिरोलीतली 1 मेची घटना सर्वांत मोठी होती.

गेल्या पाच वर्षांत (एप्रिल 2014 ते एप्रिल 2019) 942 नक्षल किंवा माओवादी हल्ले झाले आहेत. भारतात 2013 साली 1415 हल्ले, 2012 साली 1136, 2011 साली 1760 आणि 2010 साली 2213 नक्षली हल्ले झाले होते.

SATPच्या माहितीनुसार भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या मुख्य भूमिगत नक्षली संघटनेच्या स्थापनेपासून म्हणजे 21 सप्टेंबर 2004 पासून सर्वाधिक नक्षल हल्ले 2010 साली नोंदवण्यात आले.

भाकप (माओवादी) संघटनेची काही गुप्त कागदपत्रं पोलिसांच्या हाती लागली आहेत. या कागदपत्रातल्या माहितीनुसार गडचिरोलीत विशेषतः या आदिवासी जिल्ह्यातल्या उत्तरेकडच्या घनदाट जंगलात गेल्या दहा वर्षांत माओवाद्यांचा प्रभाव हळूहळू कमी होतोय.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट

फोटो स्रोत, TWITTER/@Dev_Fadnavis

नक्षलग्रस्त भागात निर्माण होणाऱ्या राजकीय आणि प्रशासकीय पोकळीचा फायदा घेत नक्षलवादी नव्याने उभारी घेऊ शकतात.

SATPच्या डेटानुसार 2018 साली महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात पाच नागरिक, दोन जवान आणि 51 माओवादी, अशा एकूण 58 जणांचा मृत्यू झाला होता.

तर 2017 साली 25 मृत्यू झाले. यात 7 नागरिक, 3 जवान आणि 15 माओवाद्यांचा समावेश होता. यावर्षीच्या 3 फेब्रुवारीपर्यंतच्या डेटानुसार नक्षलसंबंधी हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यात सात नागरिक आणि एका माओवाद्याचा समावेश होता.

या मृत्यूंचा धावता आढावा घेतला तर लक्षात येईल की 2018 साली माओवाद्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाण 2017च्या तुलनेत 240 टक्क्यांनी वाढलं. तर सुरक्षा दलाच्या जवानांच्या मृत्यूचं प्रमाण 33.33 टक्क्यांनी घसरलं.

2018 साली सुरक्षा दलाचा 'Kill Ratio' म्हणजेच नक्षलींना ठार करण्याचं प्रमाण 1:25.5 इतकं होतं. त्यावर्षी सुरक्षा दलांनी 51 माओवाद्यांना कंठस्नान घातलं. तर आपले दोन जवान गमावले. त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 2017 साली त्यांनी 15 माओवाद्यांना ठार केलं. तर त्यांचे तीन जवान मारले गेले होते.

भाकप (माओवादी) संघटनेची 4 जुलै 2018 सालची काही कागदपत्र सुरक्षा दलाच्या हाती लागली. या कागदपत्रांनुसार माओवाद्यांनी गडचिरोलीत Tactical Counter-Offensive Campaign (TCOC) या रणनीतीअंतर्गत विशेषतः उन्हाळ्यात ज्या कारवाया केल्या त्या सुरक्षा दलांची दृश्यता (Visiblity) आणि गतीशीलता (Mobility) वाढल्याने 'पूर्णपणे अपयशी' ठरल्या. या कागदपत्रांमध्ये त्यांच्याच मोहिमांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती.

त्यामुळेच 1 मे रोजी घडलेल्या घटनेचं महत्त्व कितीतरी जास्त आहे. कारण, यातून माओवादी कुरखेडा-कोरची-मालेवाडा या भागात आपली राजकीय हालचाल वाढवत असल्याचं दिसतं. उत्तर गडचिरोलीतला हा भाग वर उत्तरेकडे देओरी-गोंदियाला तर पूर्वेकडे राजनांदगाव-उत्तर बस्तरला जोडत असल्याने रणनीतीकदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे.

अहवालानुसार उत्तर गडचिरोलीतील विभागीय समिती सदस्य आणि पिपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या (PLGA) दलम चारचा इन्चार्ज असलेला नक्षली नेता भास्कर हिचामी कुरखेडा-कोर्ची या पट्ट्यात संघटनेचं अस्तित्व हळूहळू वाढवतोय आणि 1 मेच्या आयईडी हल्ल्याची आखणी आणि त्याची अंमलबजावणी करण्यात त्याची भूमिका महत्त्वाची होती.

या प्रकरणी 40 नक्षलवाद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्यात भास्कर हिमाचीचं सुद्धा नाव आहे.

हा सुनियोजित स्फोट होता, हे स्पष्ट आहे. आणि नक्षलवाद्यांनी रचलेल्या सापळ्यात शीघ्र कृती दलाचे 15 जवान अलगद अडकले, त्यात त्यांचे प्राण गेले. नक्षलवाद्यांनी यापूर्वीही अगदी अशाच प्रकारे योजनांची आखणी केलेली आहे.

त्यामुळे एकतर सुरक्षा दल मागचे धडे विसरले किंवा आपण अशा एका तणावग्रस्त भागात काम करत आहोत जिथे कुठल्याच चुकीला जागा नाही आणि SoPचं उल्लंघन जीवावर बेतू शकतं, याकडे त्यांनी अजिबात लक्षच दिलं नाही.

तिकडे हिचामीवर गेल्या दोन वर्षांपासून दबाव वाढत होता. गेल्या दोन वर्षांत त्याचे अनेक साथीदार पकडले गेले होते. दक्षिण गडचिरोलीत 27 एप्रिलला झालेल्या कारवाईत त्याची बायको रामको मारली गेली. या अपयशाचा सूड घेण्यासाठीच त्याने 1 मेचा हल्ला घडवून आणला असावा.

सुरक्षा दलांकडून करण्यात आलेल्या एकत्रित कारवायांनंतर गेल्या पाच वर्षांपासून उत्तर गडचिरोलीतला कुरखेडा-कोरची हा भाग बऱ्यापैकी शांत होता. या भागातल्या नक्षली कारवाया आटोक्यात आल्या होत्या. त्यामुळे या भागात रस्ते निर्मितीसारख्या पायाभूत सुविधांच्या कामांनाही गती मिळाली होती. म्हणूनच हिचामीने हल्ल्यासाठी अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने याच भागाची निवड केली असावी. कारण, या भागात तुलनेने पोलीस फार दक्ष नसतील, याची त्याला पुरेपूर कल्पना असावी.

नक्षलविरोधी कारवाईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते सुरक्षा दलांकडून इतर नक्षलप्रभावीत क्षेत्रात SoPची काटेकोट अंमलबजावणी केली जाते. तशी यावेळीही केली असती तर ही घटना टाळता आली असती.

( या लेखात व्यक्त करण्यात आलेली मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत. त्यांच्यांशी बीबीसी मराठी सहमत असेलच असं नाही. )

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)