सचिन तेंडुलकर: मी मुंबई इंडियन्सकडून पैसे घेत नाही

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईच्या आयपीएल टीमकडून कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ घेतला नाही आणि तो या संघाच्या वतीने कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेत नाही असं माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सांगितलं.
हितसंबंधाच्या मुद्दयावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे लोकपाल न्या. डी. के.जैन यांच्याकडून आलेल्या नोटिशीला उत्तर देताना सचिनने हे स्पष्ट केलं आहे.
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी तक्रार केली होती. त्यांनी माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणविरुद्ध तक्रार केली होती.
हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित करत गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की तेंडुलकर आणि लक्ष्मण दुहेरी भूमिका निभावत आहेत. ते आयपीएलच्या मुंबई इंडियन्स आणि सनराईजर्स हैदराबादच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत.
हितसंबंधांचा प्रश्न नाही
पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार सचिन तेंडुलकरने जैन यांना पाठवलेल्या उत्तरात हे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी मुंबई इंडियन्सला त्यांच्या भूमिकेची माहिती दिली आहे.
सचिन आपल्या उत्तरात सांगतो, "निवृत्तीनंतर मुंबई इंडियन्सच्या आयकॉनच्या रुपात असलेल्या व्यक्तीला कोणत्याही स्वरुपाचं मानधन मिळत नाही. ते फ्रँचाईजीचे कर्मचारीही नाही. त्यांनी कोणत्याही खेळाडूची निवड केलेली नाही."
"अशात बीसीसीआयच्या नियमानुसार किंवा इतर कोणत्याही नियमांनुसार माझे हितसंबंध गुंतले असल्याचा प्रश्नच निर्माण होत नाही," असं सचिनने स्पष्ट केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर सगळ्यात जास्त शतकं करण्याचा विक्रम आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 15,921 धावा केल्या आहेत आणि वनडेत 18 हजार 426 धावा केल्या आहेत. त्यात 49 शतकांचा समावेश आहे.
2013 मध्ये त्याने निवृत्ती घेतली. 2008 साली तो मुंबई इंडियन्समध्ये आयकॉन म्हणून सामील झाला. 2013 पर्यंत त्याने 73 सामन्यातून 2 हजार 334 धावा केल्या.

फोटो स्रोत, Getty Images
गुप्ता यांच्या तक्रारीच्या उत्तरात सचिन तेंडुलकरने सांगितलं की तो बीसीसीआयच्या सल्लागार समितीचा 2015 मध्ये सदस्य झाला. याआधी तो एक वर्षाआधी मुंबई इंडियन्स मधून निवृत्त झाला होता.
CAC मध्ये नियुक्तीच्या वेळी बीसीसीआयबरोबर असलेल्या संबंधांविषयी माहिती होती असंही तो म्हणाला.
मार्गदर्शक म्हणून भूमिका
टीमच्या डगआऊट मध्ये बसण्यावरून गुप्ता आणि उपस्थित केलेले प्रश्न निरर्थक असल्याचं सांगत सचिन पुढे म्हणतो, "एका मार्गदर्शकाला व्यवस्थापक म्हणून पहायला नको."
सचिनने सांगितलं की त्याची भूमिका मार्गदर्शकापर्यंतच मर्यादित आहे. याउपरही न्या. जैन यांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी जर पुढील कारवाई केली तर सचिन आपल्या वकिलांमार्फत खासगी सुनावणीची विनंती करू शकतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








