बिल्किस बानो: मला हाच न्याय माझ्या गुजरातमध्ये मिळाला असता तर जास्त आनंद झाला असता

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बिल्किस बानो
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
"मला न्याय मिळाला. पण तोच गुजरातमध्ये मिळाला असता तर मला जास्त आनंद झाला असता," असं म्हणणं आहे बिल्किस बानो यांचं.
2002मध्ये गुजरात दंगलीत बिल्किस यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यांच्या कुटुंबातील 14 जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी नुकताच सुप्रीम कोर्टाने बिल्किस बनो यांना घर, सरकारी नोकरी आणि 50 लाखांची नुकसानी भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
पण त्यांना या निर्णयाविषयी, मिळालेल्या न्यायाविषयी काय वाटतं, हे त्यांनीच बीबीसीसाठी लिहिलेला या लेखातून सांगितलंय.

कोर्टानं माझा संघर्ष आणि माझ्यासोबत झालेला अन्याय समजून घेतला, त्यामुळे मी आनंदी आहे, समाधानी आहे. या संघर्षात माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या लोकांची मी आभारी आहे. पण हाच न्याय मला माझ्या राज्यात, गुजरातमध्ये मिळाला असता तर मला जास्त आनंद झाला असता.
मी गुजराती आहे, गुजरातमध्येच माझा जन्म झाला. मी गुजरातची मुलगी आहे. गुजरातीसारखं अस्खलित हिंदीही मला बोलता येत नाही. जेव्हा आम्ही एका दहशतीखाली वावरत होतो, तेव्हा सरकारनं आमची काही मदत केली नाही, याचं मला वाईट वाटतं.
मी कधीच शाळेत गेले नाही. त्या काळात मुलींना शाळेत पाठवलं जात नव्हतं.
मी एकदम शांत मुलगी होते. खूप कमी बोलायचे. मला माझ्या केसांना व्यवस्थित कंगवा करायला आवडायचं. त्याबरोबरच मी काजळही लावायचे.
पण गेली 17 वर्षं माझ्यासाठी संघर्षाची होती... इतकी की जुन्या गोष्टींची आठवण काढायची म्हटल्यावर अंगावर शहारा येतो.

आमचं कुटुंब गुण्यागोविंदानं राहत होतं. आईवडील, माझ्या बहिणी, भाऊ, आम्ही सगळेच आनंदानं राहत होतो. पण आता फक्त आम्हीच उरले आहोत.
आमचं लग्न झालं, तेव्हा आम्हाला सोबत राहायला आवडायचं. मी माझ्या माहेरी गेले की काही दिवसांत याकूबही मला भेटायला तिथं यायचे.
आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी आमचा संघर्ष सुरू होता. मी माझ्या कुटुंबासाठी कष्ट करून काहीतरी चांगलं मिळवण्याचा तो काळ होता. पण 2002मध्ये सर्वकाही नष्ट झालं... माझं कुटुंब, माझी स्वप्न, सगळं काही नष्ट झालं. त्यानंतर उरलं ते फक्त दु:ख.

माझं 14 जणांचं कुटुंब संपवण्यात आलं. सगळ्यांची निष्ठूरपणे हत्या करण्यात आली. माझ्यावर बलात्कार झाला तेव्हा मी गरोदर होते. मी जोरजोरात ओरडत होते, पण माझ्यावर निर्दयीपणे बलात्कार झाला. माझी मुलगी सालेहा... तिची तर माझ्या डोळ्यांदेखत हत्या करण्यात आली.

फोटो स्रोत, DAKSHESH SHAH
मला झालेलं दु:ख मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. सालेहा आमचं पहिलं बाळ, पण तिच्या हत्येनंतर आम्हाला तिचा अंत्यविधीही पार पाडता आला नाही. इतकंच नव्हे तर तिच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आमच्याकडे तिचं थडगंही नाही.
या घटनेनंतर आमच्या अख्ख्या कुटुंबाला हादरवून सोडलं. आम्ही आयुष्यात पुढे जायचं ठरवलं होतं, पण या घटनेमुळे आमचं आयुष्य जागेवरच थांबलं आणि त्यानंतर मागे खूपच मागे ढकललो गेलो.
रेल्वे ट्रॅकवर धावणारी ट्रेन तेवढी मी बघितली होती, पण मोठं रेल्वे स्टेशन काही बघितलं नव्हतं. गोध्रा स्टेशनवर जेव्हा हा अमानवी प्रकार घडला, मी माझ्या पतीसोबत होते. पण या घटनेचे इतके गंभीर परिणाम होतील, असं मला तेव्हा वाटलं नव्हतं.
आमच्या कुटुंबातल्या 14 जणांच्या हत्येमुळे आम्ही उद्ध्वस्त झालो होतो. पण त्याच दुखातून नंतर आम्हाला लढायची ताकद मिळाली.

फोटो स्रोत, Getty Images
आम्हाला चित्रपट बघायला आवडायचं आणि आम्ही नियमितपणे चित्रपट बघायला जायचो. पण गेल्या 17 वर्षांमध्ये आम्ही एकही चित्रपट पाहिलेला नाही. एकदा मित्रानं आग्रह केला म्हणून माझे पती याकूब यांनी चित्रपट पाहिला.
पण गेल्या 17 प्रतिकूल वर्षांत फक्त एक आशेचा किरण होता - माझे पती माझ्या पाठीशी सदैव होते. आमच्यात कधीही कुठलेही मतभेद झाले नाहीत.
अनेकांनी माझ्या पतीला सल्ला दिला की ही न संपणारी लढाई बाजूला ठेव आणि आधी पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लाव. कधीकधी आम्हाला त्यांचं म्हणणं पटायचं. पण जीवनातील स्थैर्यापेक्षा न्यायासाठीची लढाई महत्त्वाची आहे, असं माझे पती आणि मला वाटायचं. त्यामुळे मग न्यायाच्या शोधात आम्ही संघर्ष करत राहिलो.
जेव्हा कधी हा संघर्ष करणं सोडून देण्याचा विचार आमच्या मनात आला, तेव्हा आमच्या सदसद्विवेक बुद्धीनं आम्हाला त्यापासून रोखलं आणि आम्हाला या मार्गावर चालत राहण्याची ऊर्जा दिली.
गेल्या 17 वर्षांच्या लढाईत आम्ही अनेक अडचणींना सामोरे गेलो. पण समाज, महिला अधिकार कार्यकर्ते, CBI, मानवाधिकार कार्यकर्ते आणि समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातील लोकांनी आम्हाला मदत केली. त्यामुळे मग आम्ही अडचणींचा धैर्यानं सामना करू शकलो.
17 वर्षं आम्ही अनेक खडतर आव्हानांना सामोरे गेलो, पण माझा आणि माझ्या पतीचा देशातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास कायम होता... मला आतून वाटायचं की एक दिवस असा येईल जेव्हा आम्हालाही न्याय मिळेल.

आता मला न्याय मिळाला आहे, पण 14 जणांचं कुटुंब गमावल्याचं दु:ख माझ्या मनातून कधी जाणार नाही. मी दिवसा स्वत:ला काही ना काही कामात व्यग्र ठेवलं तरी रात्री ते भयंकर अनुभव माझ्या डोळ्यांसमोर येतात.
खटल्याची सुनावणी सुरू होती, तेव्हा कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवून आहे, असं मला सतत वाटायचं. आता आम्हाला न्याय मिळालाय, पण एक अदृश्य भीती कायमची आमच्या मनात घर करून राहतेय, याची मला जाणीव झाली आहे.
दीर्घ कालावधीनंतर आम्हाला न्याय मिळालाय, पण सगळ्या कुटुंबाला गमावल्याचं दु:ख, त्यातून आलेली भीती आणि सालेहाच्या आठवणी एक प्रकारचा एकटेपणा घेऊन येतो. हा एकटेपणा आता आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

फोटो स्रोत, PRAKASH SINGH/GETTY IMAGES
आता मला माझ्या मुलांसोबत शांततेत आयुष्य घालवायचंय. अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मला माझ्या मुलीला वकील बनवायचंय.
मी प्रार्थना करते की, देशातील द्वेष आणि हिंसाचारावर प्रेम आणि शांती विजय मिळवेल.
(बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी मेहुल मकवाना यांनी बिल्किस बानो आणि त्यांचे पती याकूब रसूल यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








