लोकसभा 2019: 'मुलींनी स्वत:ला न्याय मिळवून देण्यासाठी प्रचार करायला हवा'
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, बुलडाण्याहून
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"चार लोक बघतील तर काय म्हणतील, असं सगळे म्हणतात. पण मी आजही त्या चार लोकांच्या शोधात आहे. चुकीच्या गोष्टींविरोधात प्रचार करायला हवा. मुलींनी स्वत:ला न्याय मिळवून देण्यासाठी प्रचार करायला हवा," असं म्हणणं आहे वैष्णवी वसंता शिंगणे या तरुणीचं.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्व पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महिलांची संख्या खूपच कमी आहे. स्थानिक पातळीवरच्या प्रचारात तर पुरुषांचच वर्चस्व दिसून येतं. अशा परिस्थितीत एखादी तरुणी प्रचारासाठी बाहेर पडते, तेव्हा तिच्यासमोर काय आव्हानं येतात?
वैष्णवी वसंता शिंगणे बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगावमही गावात राहते. सध्या ती पदवीचं शिक्षण घेत आहे. आईवडील शेती करतात, पण घरात कुणालाही राजकीय पार्श्वभूमी नाही, असं ती सांगते. मग ती एका पक्षासाठी प्रचार कशी काय करू लागली?
काही गोष्टी मनाला लागत असल्यामुळे प्रचार करायचं ठरवलं, असं वैष्णवी सांगते.
"सरकारने नोटाबंदी केली, तेव्हा माझ्याच गावातला एक वृद्ध बँकेसमोर रांगेत उभा होता. त्यांना नोटा बदलून घ्यायच्या होत्या. पण त्यांचा नंबर काही लवकर लागला नाही. यातच त्यांचा मृत्यू झाला," ती सांगते.

"याशिवाय सरकारनं कर्जमाफीची योजना आणली. ऑनलाईन फॉर्म भरायला सांगितले. यासाठी माझ्या वडिलांना रात्री 12 वाजेपर्यंत काँप्युटर सेंटरवर ताटकळत बसावं लागलं. सगळ्या शेतकऱ्यांचे हाल झाले. अजूनही कित्येक शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही. या गोष्टी कुठंतरी माझ्या मनाला लागत आहेत, त्यामुळे मग मी प्रचार करायचं ठरवलं," ती सांगते.
पण या योजना यशस्वी झाल्याचा दावा फडणवीस सरकारने केला आहे, तशी आकडेवारीही त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे. यावर ती सांगते, "योजना कागदोपत्री यशस्वी होत आहेत. आकडेवारी कागदावर दिसत आहे, पण प्रत्यक्षात मात्र सामान्य माणसाच्या आयुष्यात काय बदल झाला? या योजनांचा लोकांना प्रत्यक्षात किती फायदा झाला?"
'निर्णय सोपा नव्हता'
वैष्णवी कॉलेज करता करता प्रचार करते. सकाळी घरची कामं आटोपून ती प्रचाराला बाहेर पडते. त्यानंतर 10 वाजता कॉलेजला जाते. संध्याकाळी घरची कामं झाल्यानंतर पुन्हा प्रचाराला बाहेर पडते.
प्रचार करायचा निर्णय घेणं वैष्णवीसाठी सोपं काम नव्हतं. तिला आधी घरच्यांना प्रचाराचं महत्त्व समजावून सांगावं लागलं.
ती सांगते, "घरचे म्हणायचे, प्रचार करायला लागलीस तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. याशिवाय आपल्या घरात कुणी राजकारणात नाही, मग तू का प्रचार करायचं ठरवलं आहे, असं ते विचारायचे.

"मग मी त्यांना समजावून सांगितलं की, जेव्हा आपली स्वत:ची मानसिकता बदलेल तेव्हाच समोरच्याची बदलेल. आपण काही वाईट काम करत नाही आहोत. आपल्यावर अन्याय होत असेल, तर आपण त्याविरोधात बंड पुकारायला हवं, असं मी त्यांना सांगितलं आणि त्यांनाही पटलं."
"याशिवाय लोकांचा दृष्टिकोनही वेगळा असतो. अभ्यास सोडून ही प्रचाराला का चालली, असं लोक विचारतात. हिला काहीतरी आमिष दाखवलं असेल, म्हणून ही प्रचार करते, असं लोकांना वाटतं. पण मला वाटतं, एक पुरुष ज्या पद्धतीनं समजून सांगू शकत नाही, त्यापद्धतीनं महिला समजून सांगू शकते," ती पुढे सांगते.
महिलांसाठी महत्त्वाचा मुद्दा काय?
महिलांसासाठी सुरक्षेचा मुद्दा सर्वांत महत्त्वाचा आहे, असं वैष्णवीला वाटतं. "महिला सुशिक्षित होतेय पण सुरक्षित नाही. महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार व्हायला हवं, यासाठीही प्रचार करते," असं ती म्हणते.
महिला सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी ती बुलडाणा जिल्ह्यातील एक उदाहरण देते. "मलकापूर इथली एक शेतकरी महिला बँकेत नोटा बदलायला गेली, तेव्हा बँकेच्या मॅनेजरनं तिला शरीरसुखाची मागणी केली. मला सांगा, महिला कुठे सुरक्षित आहेत?"
"महिलांवरील अत्याचारासाठी कोणत्याही एका सरकारला दोष देता येणार नाही अथवा चांगलंही म्हणता येणार नाही. समाजाची मानसिकता बदलली तरच महिलांवरील अत्याचार कमी होतील," असं तिला वाटतं.

प्रचार कसा करायचा हे कसं शिकलीस, यावर ती सांगते, "लहानपणापासून मी नेत्यांना घरी मतं मागायला येताना पाहिलं आहे, ते कसा प्रचार करतात हे पाहिलं आहे. हातात हात देतात, पाया पडतात, आम्ही हे करू, ते करू असं सांगतात. याशिवाय टीव्हीवर पण नेत्यांना प्रचार करताना पाहिलं आहे."
"प्रचाराला जाताना मी पोशाखात काहीएक बदल करत नाही. मी कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात घेत नाही, गळ्यात रुमाल घालत नाही. मला जे मुद्दे महत्त्वाचे वाटतात, त्याबाबत मी लोकांशी बोलते."
प्रचारात ग्रामीण बेरोजगार तरुणांचा वापर केला जातो, असं तिला वाटतं.
"गावाकडच्या उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रचारात सामील करून घेतलं जातं. तुम्ही आमचा प्रचार करा, आमचं सरकार आलं की आम्ही सगळ्यात पहिले तुमचं काम करू, असं त्यांना सांगितलं जातं. एकप्रकारची लालूच त्यांना दाखवली जाते. प्रचारादरम्यान त्यांना पैसे दिले जातात, यामुळे उलट ते व्यसनाधीन होतात. त्यांचं भविष्य खराब होतं."
प्रचारात महिलांची संख्या कमी कारण...
वैष्णवी यंदा पहिल्यांदाच मतदान करणार आहे.
"राजकारण चांगली गोष्ट नाही, असं आपल्याकडे म्हटलं जातं. त्यामुळे घर आणि समाजाचं दपडण येतं. यामुळे मग प्रचार करणाऱ्या महिलांची संख्या कमी दिसते," असं ती सांगते.

"प्रचारात मुली खूप कमी दिसतात. घरचे अथवा समाजामुळे त्यांना मागे यावं लागतं. चार लोक बघतील तर काय म्हणतील, असं सगळे म्हणतात. पण मी आजही त्या चार लोकांच्या शोधात आहे.
"चुकीच्या गोष्टींविरोधात बाहेर पडायला हवं, प्रचार करायला हवा. मुलींनी स्वत:ला न्याय मिळवून देण्यासाठी प्रचार करायला हवा, कारण आजवर कोणतीच गोष्टी महिलांना भांडल्याशिवाय मिळाली नाही," ती सांगते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








