इंदोरीकर महाराजांविरोधात अंनिसची उच्च न्यायालयात याचिका

फोटो स्रोत, kiran gujar
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, अहमदनगरहून
PCBNDT कायद्यानुसार इंदोरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात दाखल खटला रद्द करण्यात आल्यानंतर याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या खटला रद्द करण्याबाबतच्या आदेशाविरोधात अंनिसने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये इंदोरीकर महाराजांसह सरकारी पक्षालाही प्रतिवादी करण्यात आलं असून आठ आठवड्यात सर्वांना नोटीस बजावण्यात येईल, अशी माहिती याचिककर्त्या व अंनिसच्या राज्यसचिव रंजना गवांदे यांनी दिली.
सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. त्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या कीर्तनाचे व्हीडिओ युट्यूबवर प्रसिद्ध झाले होते. तेच पुरावे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सादर केले होते.
गुन्हा दाखल होताच इंदोरीकर महाराजांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले. याविरोधात इंदोरीकर महाराजांनी आपल्या वकीलामार्फत संगमनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान देत सदर खटला रद्द करण्यासाठी धाव घेतली आणि यात इंदोरीकर महाराजांसह सरकारी पक्ष व अंनिसने युक्तिवाद केल्यानंतर सदर खटला रद्द करत जिल्हा सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना दिलासा दिला.
निकाल देताना डॉ. बालाजी तांबे खटला आणि धार्मिक ग्रंथांचा आधार घेण्यात आला. खटला रद्द झाल्याने इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला होता.
पण, अपप्रवृत्तींच्या विरोधातील ही लढाई आहे. पीसीबीएनडीटी कायद्याचं हे उल्लंघन आहे, असं म्हणत अंनिसने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला, असं अॅड. गवांदे यांनी म्हटलं आहे.
इंदुरीकर महाराजांवरील बीबीसी मराठीची बातमी
जागतिक महिला दिनी, म्हणजेच 8 मार्च, 2019 रोजी बीबीसी मराठीने 'इंदुरीकर महाराजांना महिलांशी काय प्रॉब्लेम आहे?' ही बातमी प्रकाशित केली होती.
महाराजांच्या कीर्तनांमधून महिलांबद्दलची काही वक्तव्यं आणि महिलांनी त्यावर घेतलेले आक्षेप यामध्ये सविस्तर सांगण्यात आले होतं. त्याबरोबरच इंदोरीकर महाराजांची बाजूसुद्धा यात मांडण्यात आली होती.
दुसऱ्या दिवशी 9 मार्चला मला महाराजांचे प्रवक्ते किरण महाराज यांचा फोन आला. "आम्ही तुमची बातमी वाचली. पण आमची नाराजी आहे. तुम्ही आमची बाजू व्यवस्थित मांडली नाही," असा आरोप त्यांनी केला.
"पण बातमीत तुमची बाजू सर्वाधिक मांडली आहे," मी म्हणालो. "तरीही तुम्हाला असं वाटत असेल तर महाराजांनी आम्हाला थोडा वेळ द्यावा, आमच्याशी बोलावं."
"मी तुम्हाला महाराजांची मुलाखत मिळवून द्यायचा प्रयत्न करतो," असं म्हणत किरण महाराजांनी संभाषण संपवलं.
यानंतर 15 मार्चला बीबीसी मराठीनं इंदोरीकर महाराजांवरील एक व्हीडिओ प्रकाशित केला. याच दिवशी संध्याकाळी मला इंदोरीकर महाराजांचे सोशल मीडिया मॅनेजर महेश घुले यांचा फोन आला. "तुम्ही पूर्वग्रहदूषित मतानं महाराजांवरील लेख लिहिला आहे. आमची नाराजी आहे," असं ते म्हणाले.
"आम्हाला तुमची नाराजी ठेवायची नाहीये. त्यासाठी महाराजांनी वेळ द्यावा," असं मी त्यांना सांगितलं.
नंतर काही दिवसांनी फोन केल्यानंतर किरण महाराज म्हणाले, "तुम्ही यायच्या दोन दिवस अगोदर कळवा. महाराज तुम्हाला फेस टू फेस बोलतील."
मुलाखतीसाठी गेलो तेव्हा...
मंगळवार, 2 एप्रिल. मी इंदोरीकर महाराजांच्या मुलाखतीसाठी त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या ओझर खुर्द गावी पोहोचलो. सकाळी साडे सातची वेळ.

एका घरावर 'प्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) वारकरी शिक्षण संस्था' असं लिहिलं होतं. त्या घरासमोर तीन-चार चारचाकी, तितक्याच मोटारसायकली होत्या आणि लोकांची वर्दळ सुरू होती.
घरातील वरच्या मजल्यावर इंदोरीकर महाराज राहतात. याच मजल्यावरील एका खोलीत काही माणसं बसलेली दिसून आली. ही माणसं महाराजांच्या किर्तनाची तारीख घ्यायला आली आहेत, असं विचारपूस केल्यानंतर कळालं.
दुसरीकडे एकाने महाराजांची गाडी वायूवेगानं साफ केली आणि पाच-सहा पाण्याच्या बाटल्या गाडीत ठेवल्या. ज्या वेगानं तो काम करत होता ते बघून महाराज पुढच्या काही क्षणांत निघतील, हे स्पष्ट होत होतं.
खाली उभं राहून आम्ही हे सर्व बघत होतो. त्याक्षणी इंदोरीकर महाराजांनी आम्हाला आवाज दिला. इंदोरीकर महाराज तुमच्याशी बोलतील, असं किरण महाराजांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं.
"काय रे तुमचं काय काम?" असं त्यांनी विचारलं.
"मी तुमची मुलाखत घ्यायला आलोय. किरण महाराजांना फोन करतोय, पण ते उचलत नाहीयेत," मी त्यांना म्हटलं.
"तुम्हाला काय पाहायचंय, ते पटकन पाहून घ्या," असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी आम्हाला वर बोलावलं.
वरच्या मजल्यावर पोहोचल्यानंतर ते म्हणाले, "आमचं काम तुम्हाला माहितीये का? नाही ना. मग आधी काम बघा आणि मग बोला."
"महाराज तुमचं काम बघायलाच आलो आहोत. पण त्याव्यतिरिक्त तुमची 10 मिनिटं लागतील. तुम्ही आमच्याशी बोलायला हवं," मी म्हणालो.
"आधी काम बघून या."

त्यानंतर त्यांनी त्यांच्या एका शिष्याला बोलावलं आणि यांना 'आपली शाळा दाखवून आण', असं सांगितलं.
मी त्यांच्या शिष्याच्या कारमध्ये बसलो आणि आम्ही शाळेकडे निघालो. तेव्हा महाराजांच्या शिष्यानं मला गाडीतच विचारलं, "काय! काही कार्यक्रम बिघडवला की काय?"
"नाही. मी महाराजांचं काम बघायला आलोय," मी त्यांना सांगितलं.
शाळा आणि गोशाळा
महाराजांच्या घरापासून जवळपास 5 मिनिटांच्या अंतरावर 'खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय, ओझर बु, तालुका संगमनेर' ही शाळा आहे. शाळेच्या प्रशस्त मैदानानं ध्यान आकर्षित करून घेतलं.
आधी आम्ही शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब केसकर यांना भेटलो. "आमच्या शाळेची विद्यार्थीसंख्या आहे 210. यात 85 विद्यार्थिनी आहेत. बुहतेक मुलं अनाथ आहेत.
"गेल्या 15 वर्षांपासून महाराज या मुलांचा शैक्षणिक खर्च स्वत: करत आहेत. इतकंच नाही तर महाराज स्वत: 9वी आणि 10वीच्या मुलांचा सायन्सचा क्लास घेतात," त्यांनी सांगितलं.
यानंतर केसकर यांनी आम्हाला शाळेतील संगणक कक्ष आणि डिजिटल क्लासरूम दाखवली. 5वी ते 10वी पर्यंतची ही शाळा आहे. परीक्षा सुरू असल्यानं मैदानातल्या व्यासपीठावर मुलांची दप्तरं ठेवलेली होती.
तितक्यात तिथे किरण महाराज आले आणि मग त्यांनी महाराजांच्या कामाविषयी सांगायला सुरुवात केली.
"आसपासच्या गावांमध्ये बंद पडलेले सप्ते (सप्ताह) महाराजांनी स्वत:च्या खर्चातून सुरू केले. यामुळे मग तरुण मुलं संप्रदायात येऊ लागली. महाराज शेजारच्या गावांमधील मंदिराला कलर देतात, देणगी देतात, मंदीर कोणतंही असो, मूर्ती मात्र महाराजच देतात," किरण महाराज म्हणाले.
यानंतर आम्ही इंदोरीकर महाराजांच्या घराकडे परतलो. घरामागेच महाराजांची गोशाळा आहे. किरण महाराज आम्हाला ती गोशाळा दाखवायला घेऊन गेले.

"भाकड गायींना आम्ही इथं आणतो. मग एखाद्या शेतकऱ्याला गाय हवी असल्यास आम्ही त्याच्याकडून लिहून घेतो की, 'तुला ती विकता येणार नाही' आणि मगच देतो," किरण महाराजांनी सांगितलं.
या गोशाळेशेजारीच इंदोरीकर महाराजांच्या नवीन घराचं बांधकाम सुरू असल्याचं दिसलं.
अखेर मुलाखतीचा क्षण आला
यानंतर आम्ही इंदोरीकर महाराजांच्या घरी परतलो. तिथली लगबग कमी झाली होती. वरच्या मजल्यावरून खाली आलेल्या एकाला विचारलं, "काय, कीर्तनाची तारीख घ्यायला आले होते का?"
"हो. मी येवल्याचा आहे. तारीख घेतली महाराजांची," त्यांनी सांगितलं.
दुसऱ्या एकाला फेब्रुवारी 2020मधील तारीख मिळाली होती. त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
इंदोरीकर महाराजांची शाळा,गोशाळा बघून झाल्यानंतर आता त्यांच्याशी बोलायचं होतं. हजारो लोकांसमोर मंचावर, युट्यूबवरच्या शेकडो व्हीडिओतून आपली परखड मतं मांडणाऱ्या महाराजांच्या मुलाखतीची मला आतुरता होती.
किरण महाराज आम्हाला इंदोरीकर महाराज जिथे बसून लोकांशी संवाद साधतात, त्या वरच्या मजल्यावरील आतल्या खोलीत घेऊन गेले.
या खोलीच्या दोन्ही भिंती महाराजांना मिळालेल्या मानचिन्हांनी खचाखच भरलेल्या होत्या. महाराजांचं आसन समोर मध्यभागी होतं.

आम्हाला चहा देण्यात आला आणि तितक्यात इंदोरीकर महाराज आले. "पाहिलं का काम? कसं वाटलं?" त्यांनी विचारलं.
"तुमचं काम पाहिलं. पण आता तुमच्याशी बोलायचंय," मी म्हणालो. ते काहीच बोलले नाहीत आणि खाली जाऊ लागले.
किरण महाराज त्यांच्या मागेमागे गेले आणि त्यांना मुलाखतीसाठी विचारणा केली. पण महाराजांनी नकार दिला.
काही क्षणांनी महाराजांची गाडी सुरू होण्याचा आवाज आला. आम्ही खाली गेलो, महाराज होते तिथे.
"महाराज, तुम्ही आम्हाला 5 मिनिटं द्या," मी म्हणालो.
"माझ्या वतीनं दीपक महाराज देशमुख तुमच्याशी बोलतील," त्यांनी सांगितलं आणि ते गाडीच्या फ्रंट सीटवर बसून कीर्तनासाठी निघून गेले.
'महाराजांचा दृष्टिकोन समजून घ्यावा'
यानंतर आम्ही वरच्या मजल्यावरील खोलीत परत आलो. तिथे आम्हाला दीपक महाराज देशमुख भेटले आणि त्यांनी इंदुरीकरांच्या वतीनं आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली.
महाराजांच्या कीर्तनांमधील महिलांविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यांबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, "तुम्ही महाराजांचं लाईव्ह कीर्तन ऐका. एकच वाक्य पकडून त्यांच्याविषयीचं मत बनवू नका. महाराज त्यांच्या कीर्तनात पाच-पन्नास आक्षेपार्ह वाक्यं बोलले असतील, पण त्यामागचा त्यांचा हेतू समजून घ्या."

फोटो स्रोत, KIRAN GUJAR
महिलांनी लग्नात नाचण्यावर आणि त्यांच्या मर्जीने कपडे घालण्यावर महाराजांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल ते म्हणाले, "पाटलांच्या पोरींनी लग्नात नाचायला सुरुवात केली. आधी पोरींनी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घ्यावी आणि मग बदल स्वीकारावा.
"आजकाल महिला पुरुषाच्या पुरुषत्वाला आव्हान देणारे कपडे घालून रस्त्यावर येत आहेत. खरंतर महिलेकडे पाहिल्यावर सात्त्विक भाव निर्माण व्हायला हवा.
"ज्या बायांनी आचारसंहिता सोडली आहे, नैतिक-सामाजिक जबाबदाऱ्या टाळून आधुनिकतेच्या मागे लागल्या आहेत, त्यांची तुलना महाराजांनी चपलेशी केली आहे. आधुनिकतेला महाराजांचा विरोध नाही, पण संस्कृती सांभाळून बाकी गोष्टींचं प्रदर्शन करावं, असं महाराजांचं म्हणणं आहे," देशमुख महाराजांनी इंदोरीकर महाराजांचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला.
पण त्यांच्या अशा विधानांमुळे काही महिलांची मनं दुखावली गेलीय, त्याचं काय, असं विचारल्यावर, "या महिलांनी महाराजांचा दृष्टिकोन समजून घ्यावा. ते जे काही सांगतात त्यामागचा उद्देश समजून घ्यावा. संस्कृतीचा विचार करूनच काय करायचंय, ते करावं," असं ते म्हणाले.
अनुत्तरित प्रश्न
यानंतर आम्ही इंदुरीकरांच्या घरून निघालो, "तेव्हा तुम्ही आमचे पाहुणे आहात. पाहुण्यांचं स्वागत करायची आमची परंपरा आहे", असं म्हणत त्यांनी मला शाल दिली. आमच्याबरोबर फोटोही काढण्यात आले.
इंदुरीकरांच्या घरातून निघण्यासाठी गाडीत बसलो, तेव्हा मात्र माझ्या मनात प्रश्नांनी काहूर माजवलं होतं... 'पंचवीस हजार लोकांसमोर कीर्तन करणारे इंदुरीकर महाराज हेच सगळं स्वत: का बोलले नाहीत? तेच हे बोलले असते तर त्यांच्याबद्दलच्या महिलांच्या आक्षेपांना उत्तरं मिळाली असती का? स्वत:ची भूमिका स्पष्ट करायला त्यांना दुसऱ्या कुणाची गरज का भासावी?'
हे प्रश्न डोक्यात घेऊन मी ओझर खुर्दमधून बाहेर पडलो.
महाराजांसाठी डिजिटल स्वच्छता मोहीम
बीबीसी मराठीनं 8 मार्चला सकाळी साडे आठ वाजता ही बातमी प्रकाशित केली. त्यानंतर ठीक 10 वाजता 'ह.भ.प. इंदुरीकर महाराज' या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकण्यात आली - 'गुन्हा दाखल होऊ शकतो. सर्वांनी काळजी घ्यावी.'
या पोस्टसोबत एक प्रसिद्धिपत्रक जोडण्यात आलं होतं. अॅड. पांडुरंग गोविंद शिवलीकर यांनी या पत्रकात म्हटलं आहे की, "इंदुरीकर महाराज यांच्याविषयी युट्यूब आणि इतर सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेले बदनामीकारक व्हीडिओ, छायाचित्र इत्यादी काढून टाकणेबाबत. ज्यांनी टाकले आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत आणि इथून पुढे महाराजांच्या परवानगीशिवाय सदरचे व्हीडिओ, छायाचित्र प्रसिद्ध होऊ नये, याबाबत हे पत्रक जारी करण्यात येत आहे."
'ह.भ.प. इंदुरीकर महाराज' हे त्यांचं अधिकृत पेज आहे का, असं विचारल्यावर किरण महाराज म्हणाले, "महाराजांचं कोणतंही अधिकृत फेसबुक पेज नाही. शिवलीकर हे महाराजांचे मित्र आहेत आणि त्यांनी काळजीपोटी गेल्या वर्षी ते पत्रं लिहिलं होतं."

फोटो स्रोत, FACEBOOK
"आम्ही यूट्यूब, टिकटॉक या सगळ्यांवर आळा घालायचा प्रयत्न करतो, पण आटोक्यात येत नाही. आम्ही बऱ्याच युट्यूब चॅनेलवर आक्षेप घेतला. आता तुम्ही बरेचसे चॅनेलचे व्हीडिओ ओपन करून पाहा, तुम्हाला ब्लॅक दिसेल," ते म्हणाले. (खरंच अनेक व्हीडिओ, ज्यांच्या आधारे बीबीसीवर ती पहिली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, ते आता काढून टाकण्यात आले आहेत.)
"महिलांविषयीच्या मुद्द्यावर आपली जेव्हा चर्चा झाली, तेव्हापासून आम्ही यूट्यूबला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत मी महाराजांना कल्पनाही दिली की, असं असं होतंय म्हणून. आता कीर्तनातून महाराज महिलांना म्हणून राहिलेत की, आमच्या बोलण्याचा तुम्हाला राग येऊन राहिलाय? मग आम्ही तुम्हाला बोलणंच बंद करतो. महाराज तीन किर्तनांमध्ये असं म्हटलेत," किरण महाराजांनी पुढे सांगितलं.
15 मार्चला बीबीसी मराठीने महाराजांवरील व्हीडिओ प्रसिद्ध केल्यावर त्यांचे सोशल मीडिया मॅनेजर महेश घुले यांनीही फोन करून सांगितलं की, "लोकांनी महाराजांच्या संपूर्ण कीर्तनातले एक किंवा दोन वाक्यं मोडतोड करून टिकटॉक, युट्यूबवर टाकलेत. त्यासाठीच आम्ही सोशल मीडिया टीम तयार केलीय. आम्ही सगळे लोक मिळून एक मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेअंतर्गत आम्ही युट्यूबवरील 100 ते 150 चॅनेल, जे वात्रट व्हीडिओ टाकत होते, त्यांना आम्ही बंद केलेलं आहे आणि आमचं काम पुढेही असंच चालू राहील. पुढच्या दोन ते तीन महिन्यांत बाकीचेही व्हीडिओ जातील."
"आता तर आम्ही स्वत:चं युट्यूब चॅनेल काढलंय. 'इंदोरीकर महाराज' या नावानं चॅनेल आहे. याच नावानं एक फेसबुक पेज काढलंय. या माध्यमातून वाईट संदेश पसरवणाऱ्या लोकांना आम्ही आळा घालायचा प्रयत्न करत आहोत," ते पुढे सांगत होते.
पण या 'अधिकृत' पानांवरचे व्हीडिओ निवडक आणि एडिट केलेले (लोकांसाठी आक्षेपार्ह मजकूर गाळलेले) असू शकतात, अशी शंका आता उपस्थित होऊ शकते. म्हणून की काय, कोण जाणे, गेल्या काही दिवसांपासून इंदुरीकर महाराजांची कीर्तनं युट्यूबवर लाईव्ह दाखवली जात आहेत. या किर्तनांमध्ये ते महिलांविषयी सकारात्मक बोलताना दिसून येत आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








