लोकसभा 2019 : पार्थ पवार म्हणतात, आजोबा शरद पवारांसाठी मी माघार घेण्याची तयारी दर्शवली होती, पण...

फोटो स्रोत, FACEBOOK/ParthPawar
- Author, हलिमा कुरेशी
- Role, बीबीसी मराठीसाठी पुण्याहून
राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मधील उमेदवार पार्थ पवार हे नाव सध्या बरंच चर्चेत आहे. त्यांनी बीबीसी मराठीशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
काही दिवसांपूर्वी नवीन पिढीला संधी मिळावी म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आणि पुढे काही दिवसांतच मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांच्या उमेदवारीची घोषणा झाली.
दरम्यान पार्थ पवार यांचे चुलत भाऊ रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहिली आणि आजोबांनी या निर्णयाचा पुन्हा विचार करण्याचं आवाहन केलं.
या सगळ्या घटनांवरून पार्थ पवारांमुळे पवार कुटुंबीयांमध्ये वाद आहेत का, यावर जोरदार चर्चा झाली.
'माझ्यामुळे माघार नाही'
शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीतून पार्थ यांच्यामुळे माघार घेतली अशी चर्चा झाली. त्यावर बोलताना पार्थ म्हणाले, "साहेबांनी (शरद पवार) मला संधी द्यायला पाहिजे असा विचार केला असावा. तसंच ते राज्यसभेत खासदार असून तिथं त्यांची अजून दोन वर्षं शिल्लक आहेत. त्यामुळे माझ्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असं नाही. मी त्यांच्याशी बोललो, तसं काही असेल तर मला काही उभं राहण्याची गरज नाही असं सांगितलं, तेव्हा त्यांनी निर्णय झाला असल्याचं मला सांगितलं."

फोटो स्रोत, Supriya Sule/facebook
एकाच कुटंबातून किती जणांना तिकीट द्यायचं' असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. यावर पार्थ पवार यांनी आजोबांचं म्हणणं बरोबर असल्याचं सांगितलं. "त्यांनी अनेक राज्यात एकाच घरातून पाच पाच जण उमेदवार असलेलं पाहिलं होतं, त्यांना हे चित्र पवार कुटुंबात नको होतं," असं पार्थ यांनी पुढे सांगितलं.
रोहित पवारांची पोस्ट
मावळमाधून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवताना रोहित पवार यांनी लिहिलेल्या एका पोस्टमुळे वेगळं वळण मिळालं. त्यावर ते सांगतात, " रोहित पवार यांनी लिहिलेली भावनिक पोस्ट ही नाराज झालेल्या कार्यकर्त्यांमुळे लिहिली होती, मी रोहितदादाशी स्वतंत्र बोललो तेव्हा त्यांनी मला सगळं स्पष्ट सांगितलं."
मीडियाने फेसबुक पोस्टचा चुकीचा अर्थ लावल्याचं ते म्हणाले. ही पोस्ट दुसऱ्या कोणी लिहिली असती तर एवढा प्रतिसाद मिळाला नसता असं त्यांना वाटतं.

फोटो स्रोत, Facebook@ParthPawar
मावळमध्ये राष्ट्रवादी पक्षात अनेक गटतट आहेत तसंच काही गटांनी शिवसेना भाजपला याआधी मदत केल्याचं पार्थ यांनी मान्य केलं. मात्र त्याचवेळी त्यांच्यासाठी हे सर्व एकत्र आल्याचा त्यांचा दावा आहे. "पवारांच्या नातवाला विजयी करायचं सर्वांनी ठरवलंय," असं ते म्हणाले.
पहिलं भाषण आणि ट्रोलिंग
पार्थ यांना त्यांच्या पहिल्या भाषणानंतर चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. त्याबाबत विचारलं असता ते म्हणाले, "पहिल्या भाषणावेळी मी नर्व्हस झालो होतो. पाय कापत होते. सगळं भाषण चांगलं झालं मात्र एक दोन ओळी इकडे तिकडे झाल्या आणि त्यावरूनच भाजप शिवसेनेनं ट्रोल केलं."
तसंच भाषणाची तयारी करायला आवडत नाही. लोकांसमोर जसं आहे तसं जायला आवडतं हेच लोकांना हवं असतं, असंही पार्थ यांनी पुढे सांगतलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








