नीरव मोदींच्या संग्रहातील गायतोंडेंच्या चित्राला 25 कोटींची बोली

पेंटिंग

फोटो स्रोत, SAFFRONART

फोटो कॅप्शन, अमूर्त शैलीत भारताचा ठसा उमटवणारे महान चित्रकार वासुदेव गायतोंडे यांनी १९७३ साली चितारलेलं एक अनाम तैलचित्रही या लिलावाचं प्रमुख आकर्षण ठरलं. कलाविश्वात गायतोंडे या नावाचं तयार झालेलं गूढ पाहता त्यांच्या चित्रांना नेहमीच चढ्या भावानं बोली लागते. २०१५ साली गायतोंडे यांचं आणखी एक अनाम चित्र ३० कोटी रुपयांना विकलं गेलं होतं. कोणत्याही भारतीय चित्रकारानं रेखाटलेलं ते सर्वात महागडं चित्र ठरलं होतं.
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

बँक घोटाळ्याप्रकरणी अटक झालेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या संग्रहातील महागड्या चित्रांच्या लिलावातून प्राप्तीकर विभागाला 54.84 कोटी रुपये वसूल करण्यात यश आलं.

त्यात वासुदेव गायतोंडे यांच्या चित्राला 25 कोटी 20 लाख रुपयांची तर राजा रविवर्मा यांच्या चित्राला 16 कोटी 10 लाख रुपयांची यशस्वी बोली लागली.

नीरव मोदीना पंजाब नॅशनल बँकेतील जवळजवळ 13,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गेल्या आठवड्यात लंडनमध्ये अटक करण्यात आली असून, त्यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी जानेवारीत हा घोटाळा समोर आल्यानंतर नीरव मोदी यांनी लंडनला पलायन केलं होतं.

त्यानंतर प्राप्तीकर विभागानं नीरव मोदींची मालमत्ता जप्त केली होती ज्यात जवळपास १७०हून अधिक महागड्या पेंटिंग्जचा समावेश होता.

नीरव मोदींच्या संग्रहातली चित्रं

फोटो स्रोत, EPA

त्या चित्रांचा लिलाव करून नीरव मोदींनी करात बुडवलेला पैसा वसूल करण्यास मुंबईतील विशेष न्यायालयानं गेल्या आठवड्यात अंमलबजावणी संचलनालयाला परवानगी दिली.

त्यानंतर या संग्रहातील ६८ चित्रांचा मुंबईत मंगळवारी प्राप्तीकर खात्यातर्फे सॅफ्रनआर्ट या संस्थेच्या माध्यमातून लिलाव करण्यात आला. त्यात 55 चित्र विकली गेली. यामध्ये भारतीय चित्रकारितेत मोलाचं योगदान देणाऱ्या चित्रकारांच्या दुर्मिळ कलाकृतींचा समावेश आहे.

अमूर्त शैलीत भारताचा ठसा उमटवणारे महान चित्रकार वासुदेव गायतोंडे यांनी १९७३ साली चितारलेलं एक अनाम तैलचित्रही या लिलावाचं प्रमुख आकर्षण ठरलं.

राजा रवी वर्मा यांचं चित्र

फोटो स्रोत, Saffron art

फोटो कॅप्शन, राजा रवी वर्मा यांनी काढलेलं चित्र

१९व्या शतकातील महान भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांनी साकारलेलं एक दुर्मिळ 16 कोटी 10 लाख रुपयांना विकलं गेलं.

'त्रावणकोरचे महाराज आणि त्यांचे छोटे बंधू बकिंगहमचे तिसरे ड्यूक आणि मद्रासचे गव्हर्नर जनरल रिचर्ड टेंपल ग्रेनविल यांचं स्वागत करताना'चं हे चित्र १८८१ मध्ये चितारण्यात आलं होतं. या चित्राची राष्ट्रीय संपदा म्हणून दर्जा मिळालेल्या चित्रांत गणना केली जाते.

द ग्रे न्यूड

फोटो स्रोत, Saffron art

फोटो कॅप्शन, अकबर पद्मसी यांनी काढलेलं द ग्रे न्यूड

भारताचे आणखी एक दिग्गज चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा यांच्या चित्रांसाठीही चढ्या भावानं बोली लागल्या. सूझ यांनी १९७४ साली चितारलेलं 'सिटिस्केप' हे चित्रही एक कोटी 78 लाख रुपयांना विकलं गेलं.

या लिलावात अकबर पदमसी यांचं १९६० सालचं 'ग्रे न्यूड' हे चित्र 1 कोटी 72 लाख रुपयांना विकलं गेलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)