चौकीदार मोहीम: 'नरेंद्र मोदी यांनी आता चौकीदारांसाठी योजनाही काढायल्या हव्या'

    • Author, पूनम कौशल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी नॉयडाहून

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी 25 लाख चौकीदारांशी संवाद साधला. 31 मार्चला ते चौकीदारांबरोबर व्हीडिओ कॉन्फरन्सिंग करणार आहेत. 'मैं भी चौकीदार' या अभियानाअंतर्गत हे सर्व कार्यक्रम हो आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर हॅंडलचं नाव 'चौकीदार नरेंद्र मोदी' असं ठेवलं. त्यानंतर भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आपल्या नावापुढे 'चौकीदार'लावलं. पण या सर्व राजकीय मोहिमबद्दल खऱ्या चौकीदारांना म्हणजेच सुरक्षा रक्षकांना काय वाटतं?

बेरोजगारी, रोजगार, मोदी, काँग्रेस, निवडणुका

फोटो स्रोत, Poonam Kaushal/BBC

फोटो कॅप्शन, जितेंद्र सिंह नॉयडा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.

जितेंद्र सिंह कोरी, नॉयडा

"मी या मार्केटची सुरक्षा करतोय. जिथपर्यंत माझी नजर जाते त्या ठिकाणापर्यंत मी लक्ष ठेवतो. चौकीदारी म्हणजे सर्व गोष्टींवर नजर ठेवणं. बसून राहणं किंवा झोपणं म्हणजे चौकीदारी नाही. आपली जबाबदारी सांभाळणं म्हणजेच चौकीदारी. इथं काही जरी चुकीचं घडलं तर ती माझी जबाबदारी आहे," असं जितेंद्र सांगतात.

28 वर्षांचे जितेंद्र सिंह कोरी उत्तर प्रदेशातील फिरोजाबादचे रहिवासी आहेत. ते दिल्लीनजीकच्या नॉयडामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. ते या ठिकाणी पूर्ण महिनाभर असतात आणि त्यांची ड्युटी 12 तासांची असते.

त्यांना 9 हजार रुपये मिळतात. जर कधी त्यांना सुट्टी घ्यावी लागली तर त्यांचा दोन दिवसांचा पगार कापला जातो. त्यामुळे ते कधी सुट्टी घेत नाहीत. त्यांना आता हे देखील आठवत नाही की शेवटची सुट्टी त्यांनी कधी घेतली.

लोकसभा निवडणुकांचं मतदान काही आठवड्यांवर आलं असताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या नावापुढे 'चौकीदार' लावलं. काँग्रेसच्या 'चौकीदार चोर है' या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून भाजपची 'मैं भी चौकीदार' मोहीम सुरू आहे.

"त्यांच्या या मोहिमेमुळे मी चौकीदार असल्याचा अभिमान वाटतो," अशी भावना जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.

तुम्हाला हे काम चांगलं वाटतं का, असं विचारलं असता जितेंद्र सिंह सांगतात, "बेरोजगार आहे म्हणून चौकीदार झालो. जर चांगलं काम मिळालं असतं तर नक्कीच हे काम केलं नसतं. या क्षेत्रात मेहनतीचं फळ मिळत नाही."

बेरोजगारी, रोजगार, मोदी, काँग्रेस, निवडणुका

फोटो स्रोत, Poonam Kaushal/BBC

फोटो कॅप्शन, रोजगाराचं चित्र

ते सांगतात, "आमच्या फिरोजाबादमध्ये आम्ही बांगड्यांचं काम करतो. जर दिवसभर काम केलं तर 150-200 रुपये मिळतात. इतक्यात कुटुंबाचं भागत नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकाची नोकरी करण्यासाठी बाहेर पडलो. मला दुसरं काही काम करता येत नाही. सिक्युरिटी हे जबाबदारीचं काम आहे आणि मला जबाबदारी सांभाळता येते."

"पाहणाऱ्याला हे सोपं काम वाटतं, पण जो करतोय, त्यालाच माहीत आहे की या कामात किती जोखीम आहे. आम्ही रात्रभर ड्युटी करतो, आम्हाला ही देखील भीती असते की आम्हाला काही होईल?"

पंतप्रधान मोदी यांनी आता चौकीदार नाव ठेवून घेतलं आहे तर त्यांनी चौकीदारांबद्दल काही करायला हवं देशातल्या बेरोजगारांबद्दल काही करायला हवं, असंही ते सांगतात.

बेरोजगारी, रोजगार, मोदी, काँग्रेस, निवडणुका

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी

23 वर्षांचे दीपक कुमार झा हे बिहारच्या भागलपूर येथून येऊन नोकरी करत आहेत. दुसरं काही काम मिळालं नाही म्हणून हे काम करत असल्याचं ते संगतात. जितेंद्र यांच्याप्रमाणे ते देखील 12 तास काम करतात.

ते सांगतात, "हे काम नाइलाजाने करावं लागतं. महिन्याला 9 हजार रुपये मिळतात. काही बचत होत नाही. नुकतंच बहिणीचं लग्न केलं, तेव्हा 25 हजारांचं कर्ज झालं. जे कमवतो ते खाण्या-पिण्यातच खर्च होतात. दोन हजार रुपये उरतात, त्यातून काय होईल? कर्जदेखील फेडता येईना."

ते सांगतात की हे काम अवघड आहे. "पूर्ण रात्रभर जागावं लागतं. जर आठ तासांची ड्युटी असेल आणि महिन्यात चार सुट्या मिळाल्या तर बरं होईल. खूप काम शोधलं पण दुसरं काही मिळत नसल्यामुळे शेवटी हेच काम हाती धरलं. रात्रभर जागावं लागतं. स्वतःला वाया घालतोय," असं वाटतं.

योजना लागू झाल्या तर बरं होईल

60 वर्षांचे राम सिंह ठाकूर गेल्या 20 वर्षांपासून सुरक्षा रक्षकाचं काम करत आहेत. "नाइलाजाने काम स्वीकारलं होतं पण अजूनही मी हे काम करत आहे," ते सांगतात.

त्यांना महिन्याला साडेआठ हजार मिळतात. बाकी गार्डप्रमाणे त्यांना देखील सुट्टी मिळत नाही. कंपनीकडून काही सुविधा मिळत नाहीत. "विमा, PF, काहीच मिळत नाही. जर आजारी पडलो तर घरी पाठवलं जातं. पंतप्रधानांनी स्वतःला चौकीदार म्हटलं हे बरं वाटलं, पण जर आम्हाला योजनाही लागू झाल्या तर आणखी चांगलं होईल," ते सांगतात.

बेरोजगारी, रोजगार, मोदी, काँग्रेस, निवडणुका

फोटो स्रोत, Poonam Kaushal/BBC

फोटो कॅप्शन, रामसिंह ठाकूर वीस वर्षांपासून चौकीदार म्हणून काम करत आहेत.

आजारी पडलं तरी काम करावं लागतं.

जेव्हा मी राम सिंह, जितेंद्र आणि दीपक यांच्याशी बोलत होते तर रात्रीचे 2 वाजले होते. त्यांनी आजूबाजूला पडलेला पालापाचोळा एकत्र केला आणि शेकोटी पेटवली... थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नाही तर डासांपासून स्वतःच्या संरक्षणासाठी. "जर डास चावले आणि आजारी पडलो तर आमचं काही खरं नाही."

या चौकीदारांना वाटतं की गल्लीतले कुत्रे त्यांचे साथीदार आहेत. "ते जवळ येऊन बसतात. आता त्यांच्याशी मैत्री झाली आहे, असंच आम्हाला वाटतं," ते सांगतात.

रात्रीचे अडीच वाजले आहेत. नॉयडाच्या एका दुसऱ्या कोपऱ्यात वेदराम आपली बंदूक हातात घेऊन पहारा देत आहेत. मूळचे उत्तरप्रदेशातले वेदराम 1992 पासून इथंच राहतात. ते सांगतात, "अद्याप त्यांचं PFचं खातं नाही. किंवा त्यांच्याकडे ओळखपत्र नाही. अजूनही त्यांना त्यांचा पगार हा नगदीच मिळतो."

"मी एवढी मोठी साइट सांभाळतो, पण मला फक्त 11 हजार रुपये मिळतात. मला सुट्टी मिळत नाही की औषधी मिळत नाही.

"पंतप्रधान चांगलं काम करत आहेत, पण त्यांनी आम्हाला सुविधा देखील पुरवायला हव्यात. आमचं शिक्षण झालेलं नाही म्हणून आम्हाला काही मिळत नाही," ते सांगतात.

बेरोजगारी, रोजगार, मोदी, काँग्रेस, निवडणुका

फोटो स्रोत, Poonam Kaushal/BBC

फोटो कॅप्शन, एका बिल्डिंगचं काम सुरू असलेल्या ठिकाणी वेदराम काम करतात.

"मी वेदराम यांच्याशी बोलतच होते, तेव्हाच एका दुसऱ्या गार्डला उलटी झाली. ते सांगतात की आजारी असलं तरी त्यांना हे काम करावंच लागतं. कारण सुट्टी घेतली की पैसे कटतात.

ते सांगतात, "नाइलाजाने आम्ही हे काम करत आहोत. कुटुंबापासून दूर राहावं लागतं. सणावाराला देखील सुट्टी नाही मिळत."

'पंतप्रधानांनी स्वतःला चौकीदार म्हणवून घेणं योग्य नाही'

स्वतःला महादेवाचा भक्त आणि मोदींचा फॅन म्हणवून घेणारे केशव कुमार हे नॉयडा एक्सप्रेसवेवर सेक्युरिटी गार्डचं काम करतात. त्या ठिकाणी एक मोठ्ठी LCD स्क्रीन लावण्यात आली आहे. त्या स्क्रीनची सुरक्षा करणं, हे त्यांचं काम आहे. ते या ठिकाणी सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत काम करतात.

"होळी येत आहे पण सुट्टी मिळणार नाही. सुट्टी तर सोडा, पगारदेखील वेळेवर मिळत नाही. नऊ हजार मिळतात, पण त्यात आमचं भागत नाही," ते सांगतात.

बेरोजगारी, रोजगार, मोदी, काँग्रेस, निवडणुका

फोटो स्रोत, Poonam Kaushal/BBC

फोटो कॅप्शन, नोएडा एक्स्प्रेस वे वर केशव कुमार एलसीडी जाहिरातींच्या सुरक्षेचं काम करतात.

पंतप्रधानांच्या चौकीदार मोहिमेबद्दल ते सांगतात, "पंतप्रधानांनी स्वतःला चौकीदार म्हणवून घेणं योग्य नाही. ते देशाच्या खूप मोठ्या पदावर आहेत. त्या पदाची जबाबदारी खूप मोठी असते. चौकीदार तर लोक स्वतःला असंच म्हणवून घेतात. पंतप्रधानांनी स्वतःला चौकीदार म्हणवून घेणं मला बिल्कुल आवडलं नाही."

"पंतप्रधानांनी आमच्यासारख्या लोकांचं काहीतरी करायला हवं. ज्यांचा पगार कमी आहे, ज्यांना सुट्टी मिळत नाही, रोजगार नाही, ज्यांचं घर नऊ हजारात चालत नाही. त्यांच्यासाठी काही करायला हवं. कुणाचा पगार 12 हजारांपेक्षा कुणाचा पगार कमी नसावा."

केशव सांगतात की सरकारनं जे नियम बनवले आहेत, ते लागू करायला हवेत. "होळी-दिवाळीलाच नाही तर इतर वेळाही सुट्टी मिळावी," ते सांगतात.

बेरोजगारी, रोजगार, मोदी, काँग्रेस, निवडणुका

फोटो स्रोत, Poonam Kaushal/BBC

फोटो कॅप्शन, नोएडा सेक्टर 18 मार्केटच्या सुरक्षेसाठी तैनात राम अवतार

राम अवतार यांनी नुकताच नॉयडाच्या सेक्टर 18 मार्केटमध्ये सेक्युरिटी गार्डचं काम हाती घेतलं आहे. त्यांना 5 मुली आहेत. काही महिने ते सेक्युरिटी गार्डचं काम करतात तर काही महिने ते आपल्या कुटुंबाची देखभाल करतात.

राम अवतार यांच्या तिसऱ्या मुलीचं लग्न पुढच्या महिन्यात आहे. त्यांना ही चिंता आहे की पगार वेळेवर होईल की नाही. युनिफॉर्मचे पैसे देखील पगारातून कापले जातात. मुलीच्या लग्नासाठी हा पैसा महत्त्वाचा होता.

ते सांगतात, "या सरकारनं आमचं रेशन कार्ड बनवलं. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था होते. या व्यतिरिक्त इतर योजनांचा लाभ आम्हाला होत नाही.

बेरोजगारी, रोजगार, मोदी, काँग्रेस, निवडणुका

फोटो स्रोत, Poonam Kaushal/BBC

फोटो कॅप्शन, सुधन आणि निरंजन सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.

27 वर्षांचे निरंजन आणि 21 वर्षांचे सुधन कुमार हे दोघं एका मोठ्या सोसायटीत चौकीदार आहेत. दुपारच्या जेवणासाठी त्यांना सुटी मिळणंदेखील अवघड आहे. बोलण्यासाठी त्यांच्याकडे फक्त दोन मिनिटं आहेत.

सुधन सांगतात, "मोदी जनतेची सेवा करतात, त्यामुळे ते स्वतःला चौकीदार म्हणवून घेतात. आम्ही देखील जनतेची सेवा करत आहोत. मोदींनी स्वतःला चौकीदार म्हणवून घेणं, हे त्यांच्या मोठ्या मनाचं लक्षण आहे. आता आम्हाला वाटतं की आम्ही देखील मोठं काम करत आहोत."

सुधन आणि निरंजन सांगतात की जर आम्हाला चांगली संधी मिळाली तर आम्ही हे काम सोडून देऊ. "12 तासांची ड्युटी आणि त्यानंतर जाण्या-येण्यासाठी लागणाऱ्या वेळेमुळे आम्हाला ना धड जेवता येतं, ना झोपता येतं. सणावाराला देखील घरी जाता येत नाही. दुसरं काही काम नाही, त्यामुळे आम्ही हे करत आहोत."

गावाकडं रोजगार नाही

मी नॉयडातल्या उच्चभ्रू वर्गाच्या इमारतींची सुरक्षा करणाऱ्या किमान 50 सुरक्षा गार्डसोबत बोलले. सर्वांची कथा एकसारखी आहे. गावाकडे रोजगार नाहीत. त्यामुळे त्यांनी दिल्ली गाठलं. इथं ते सुट्टीशिवाय काम करतात. त्यांना 10 ते 12 हजारापर्यंत पगार मिळतो.

एका सेक्युरिटी कंपनीच्या एरिया मॅनेजरने आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की त्यांच्या एजन्सीत काही पदवीधारक सेक्युरिटी गार्डदेखील आहेत. त्यांना वाटतं की बेरोजगारीमुळं ते हे काम करत नाहीत तर चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी लागण्यासाठी जी कॉम्पिटिशन असते, त्यामुळे त्यांना हे काम करावं लागतं. किंवा जे लोक इंटरव्यू देऊ शकत नाहीत ते सेक्युरिटी गार्ड बनतात.

कामाच्या वेळेत सुटी न मिळण्याबाबत ते सांगतात की "तुम्ही कोणत्याही सेक्युरिटी कंपनीत जा, तुमच्या लक्षात येईल की 12 तासांचीच ड्युटी असते. सुट्टी ही बिनपगारी असते आणि उत्तर प्रदेश सरकारनं किमान वेतनाची जी अट लागू केली आहे, त्याप्रमाणे आम्ही त्यांना वेतन देतो."

एका रहिवासी सोसायटीचे सेक्युरिटी सुपरवायजर गजराज सांगतात, "जबाबदारी हेच सेक्युरिटी गार्डचं सर्वांत मोठं आव्हान असतं."

पंतप्रधानांनी स्वतःला सेक्युरिटी गार्ड म्हटलं त्यावर ते सांगतात की गेल्या निवडणुकीत त्यांनी आम्हाला जे वचन दिलं होतं ते पाळलं नाही. खासगी संस्थांमध्ये काम करणाऱ्यांची वेळ आठ तास करणं, साप्ताहिक सुटी देणं, अकुशल कामगारांना किमान वेतन 15 हजार करणं ही वचनं त्यांनी दिली होती पण तसं काही झालं नाही. आम्ही अजूनही 12 तास काम करत आहोत आणि सुट्टी देखील मिळत नाही.

बेरोजगारी, रोजगार, मोदी, काँग्रेस, निवडणुका

फोटो स्रोत, Poonam Kaushal/BBC

फोटो कॅप्शन, थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीभोवती जागणारे सुरक्षारक्षक

ते सांगतात, राष्ट्रीय संरक्षणाची जबाबदारी पंतप्रधानांवर असते ती देशाची चौकीदारीच आहे. संरक्षणावर त्यांनी भरपूर पैसे खर्च केले. बेरोजगारी आणि गरीबी मात्र ते संपवू शकले नाहीत. जोपर्यंत ठेकेदारीची (कंत्राटी कामाची) प्रथा नष्ट होणार नाही तोपर्यंत चौकीदार गरीब राहतील. त्याच्या श्रमाची चोरीच होत राहील.

जेव्हा गजराज हे सर्व काही सांगत होते तेव्हा बाजूलाच बसलेल्या कंपनी मॅनेजरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. "या गोष्टी बोलू नको," असं तो त्यांना सूचित करत होता. कारण ज्या कंत्राटी कामाच्या प्रथेबद्दल ते बोलत होते, त्याचं प्रतिनिधित्व तो मॅनेजर करत होता.

केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सप्टेंबर 2016 मध्ये सांगितलं होतं की सुरक्षारक्षकांना कुशल कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत आणण्यासाठी सरकार विचार करत आहे. असं झालं तर त्यांना किमान पगार 15 हजार मिळेल.

याशिवाय सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि पर्यवेक्षकांना अतिकुशल श्रमिक म्हणून मान्यता मिळाली तर त्यांचं वेतन 25,000 करण्याचं आश्वासनही सरकारने दिलं होतं.

चौकीदार, चौकीदार आणि चौकीदार
फोटो कॅप्शन, चौकीदार, चौकीदार आणि चौकीदार

एका अंदाजानुसार भारतात पन्नास हजारापेक्षा जास्त सुरक्षारक्षक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला चौकीदार म्हणवलं आहे. त्यामुळे त्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत.

आम्ही सुरक्षारक्षकांच्या परिस्थितीबाबत नॉयडातील श्रम उपायुक्त प्रदीप कुमार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणत्याही प्रश्नांचं उत्तर दिलं नाही. आम्ही त्यांना लिखित स्वरूपात प्रश्न विचारले. तरीही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)