जेट एअरवेज संकटात; विमानफेऱ्यांमध्ये घट #5मोठ्याबातम्या

जेट एअरवेज

फोटो स्रोत, Reuters

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे :

1. जेट एअरवेज संकटात विमानफेऱ्यांमध्ये घट

विमानसेवेतील देशातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेली जेट एअरवेज ही विमान कंपनी आर्थिक संकटात सापडली असून तिच्या वैमानिकांनी थकलेल्या पगाराच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा इशारा दिला असल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे. या इशाऱ्यामुळे सरकारनेही धाव घेत या कंपनीला कर्जबाजारी होऊ न देण्यासाठी बँकांना आदेश दिला आहे.

थकलेल्या पगाराच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने 31 मार्चपर्यंत ठोस योजना न मांडल्यास एक एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा कंपनीच्या कर्मचारी आणि वैमानिकांनी दिला आहे.

2. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची मुक्तता करण्याचं आश्वासन

केंद्रात सत्तेत आल्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची मानवतेच्या दृष्टिकोनातून मुक्तता करण्याचे, तसेच वैद्यकीय प्रवेशासाठीची NEET परीक्षा रद्द करण्याचे आश्वासन अण्णा द्रमुक व द्रमुक यांनी जाहीरनाम्यांमध्ये दिले आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.

राजीव गांधी

फोटो स्रोत, Getty Images

खासगी क्षेत्रामध्ये राखीव जागा धोरण लागू करण्याचे आश्वासन द्रमुक पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. NEET परीक्षेला तामिळनाडूतील सर्वच राजकीय पक्षांनी या आधी जोरदार विरोध केला आहे. त्या प्रश्नावरून विद्यार्थ्यांनी निदर्शनंही केली होती.

3.यवतमाळात 12 महिन्यांत 71 शेतकरी आत्महत्या

यवतमाळच्या चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी दत्तपूर येथे आत्महत्या करून शेतीप्रश्नांना वाचा फोडली होती. ३३ वर्षांनंतरही परिस्थितीत बदल न झाल्याने शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरूच आहे. मागील वर्षभरात एकट्या वर्धा जिल्ह्यात ७१ आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

वर्धा जिल्ह्यात २०१५मध्ये सर्वाधिक १३९ शेतकरी आत्महत्या झाल्या. २०१६मध्ये ९३ शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली. २०१७मध्ये ७६ तर २०१८मध्ये ७१ शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे.

4. पुलवामा हल्ला कधीही विसरणार नाही- अजित डोवाल

पुलवामा हल्ला देश विसरलेला नाही आणि कधीही विसरणार नाही असं वक्तव्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलं आहे. द हिंदूने ही बातमी दिली आहे.

अजित डोवाल

फोटो स्रोत, Getty Images

पुलवामा हल्ला आणि बालाकोट हवाई हल्ल्यानंतर अजित डोवाल यांनी प्रथमच याविषयी जाहीर वक्तव्य केलं आहे. CRPFच्या एका कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कट्टरवाद्यांविरुद्धची कारवाई करण्यासाठी देशाचे नेतृत्व सक्षम आहे, असं ते म्हणाले.

5. संरक्षण दलाच्या कारवाया राजकारणासाठी वापरू नका

संरक्षण दलाच्या हालचालींचा राजकारणासाठी वापर न करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. जवानांचे फोटो प्रचारासाठी न वापरण्याचा आदेश याआधीच आयोगाने दिला आहे.

निवडणूक

फोटो स्रोत, SHAMMI MEHRA / Getty Images

नुकत्याच झालेल्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. तरी राजकीय पक्ष गैरवापर करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. म्हणूनच 9 मार्च ला जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा पुढचा भाग म्हणून ही ताजी सूचना आयोगाने केली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)